छडी लागे छम छम ?
माझे शालेय शिक्षण ज्या शाळेमध्ये झाले ती शाळा अतिशय कडक शिस्तीची होती. त्यामुळे शाळेमध्ये असताना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झालेल्या होत्या आणि भरपूर मार खाल्लेला होता. त्यामुळे कुठलेही चुकीचे वर्तन झाल्यानंतर केवळ शिक्षा अथवा मार अथवा जोराने ओरडणे हाच एक उपाय असू शकतो हा विचार मनामध्ये जबरदस्त भिनलेला होता. त्यामुळे मी शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून जेव्हा कामाला लागलो तेव्हा या शिस्तीच्या विचाराचा माझ्यावर प्रचंड पगडा बसलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करायला मी खूप शिक्षा करू लागलो. त्यात विद्यार्थी मला घाबरायला लागले तसतसा माझा अहंकार सुखाऊ लागला. मुलं आपल्याला खूप घाबरतात याचा मला अभिमान वाटू लागला. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविण्यासाठी केवळ शिक्षा हा एकच उपाय आहे असा समज माझा असल्यामुळे व अज्ञान असल्यामुळे गेली अनेक वर्ष मी नको नको त्या शिक्षा विद्यार्थ्यांना केल्या. परंतु आज मला असे वाटते की गेली अनेक वर्ष शिस्त, शिक्षा या नावाखाली मी अध्यापनाचा आनंद म्हणावा तसा घेऊ शकलो नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या या शिक्षेबद्दलच्या विचारांमध्ये परिवर्तन घडायला काही पुस्तकांची मला खूप मदत झाली. त्या पुस्तकांमधील शिक्षे संबंधीचे विचार व दुसरी बाजू आपल्यापर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे. कारण तुम्ही सर्व शिक्षक म्हणून वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्य करत आहात आणि शिक्षेबद्दल आपल्या संकल्पना व विचार यामध्ये स्पष्टता यावी हाच हेतू.
शिक्षे संबंधी जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकामध्ये पुढील विचार दिलेले आहेत.
मध्यंतरी शिक्षकांनी मुलांना शारीरिक शिक्षा केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल या अध्यादेशाच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली शिक्षकांमध्ये संताप आणि भीतीची लाट उमटली. संताप यासाठी की मुलांना मारल्याशिवाय मुले अभ्यास करणार नाहीत या त्यांच्या गृहीतकाला धक्का बसला म्हणून. आता माराची भीतीच नसेल तर मुले अभ्यासच करणार नाहीत. शिक्षकांना आणखी एका गोष्टीचा राग आला की पिढ्यानपिढ्या मुलांवर अधिकार गाजवण्याचा हा अधिकार आता जातो आहे. कृष्णमूर्ती शाळांमध्ये मात्र आज नव्हे तर स्थापनेपासून शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे. बक्षीस आणि शिक्षा विरहित मुलांना शिकवायला हवे हा तिथला दृष्टिकोन आहे. कृष्णमूर्तींनी सतत ज्या गोष्टीवर खूप टीका केली असेल ती म्हणजे शिस्त होय. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांची उर्मी मरते मनाची चपळता नष्ट होते ही बाह्य शिस्तीची सक्ती मनाला मंद बनविते. खडी दाबण्याच्या यंत्राची उपमा कृष्णमूर्ती शिस्तीला देऊन त्याची दमन क्षमता स्पष्ट करतात. मुळातच शिस्तीच्या मागची वृत्ती ही लोकशाही विरोधी व हुकूमशाही असते. समोरच्याला त्याचे मतपरिवर्तन न करता सक्तीने बदलविणे त्यात गृहीत असते. त्यामुळे समोरच्याच्या भावना, मनोभूमिका याचा किंचितही त्यात विचार केलेला नसतो. एका साच्यात सर्वांना बांधण्यावर भर दिलेला असतो. स्वतंत्र विचार दाबण्यासाठी तिचा उपयोग होतो. अभ्यास न करण्याबाबत केले जाणारी शिक्षा ही आम्ही तुला अभ्यासाची आवड लावू शकत नाही इतका वेळ आणि संयम आमच्याजवळ नाही तेव्हा मी शिक्षा करतो तू त्या भीतीने अभ्यास कर, असा सरळ मामला असतो. मारामारी करणाऱ्या मुलात अतिरिक्त ऊर्जा असते त्या ऊर्जेला आम्ही वळण देऊ शकत नाही. तेव्हा मार्क आणि त्या भीतीने तुझी ऊर्जा दाबून ठेव असा सांगावा असतो. थोडक्यात मुलांशी प्रेमाने संवाद करून त्यांना बदलविण्याची आमची तयारी नसल्याने आम्ही शिक्षेचा शॉर्टकट वापरतो यावर वादविवाद होतील विद्यार्थी संख्या, वेळ सारे मुद्दे येतील पण दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. कृष्णजी म्हणतात मुलाची समज फक्त उंचावा तो स्वयंशिस्त पाळेल. शिस्तपालन यावर कृष्णमूर्तींचा दृष्टिकोन शिक्षक आणि पालकांना खूपच आदर्शवादी आणि व्यवहारिक वाटतो. मुलांना मारले नाही तर मुले अभ्यास करतील का? हा त्यांचा प्रश्न असतो. मागच्या पिढीने शिस्तीचा इतका प्रचंड प्रभाव आपल्यावर बसवलेला आहे की आपण दुसऱ्या बाजूने विचार करण्याची क्षमता गमावून बसलो आहोत. भीतीशिवाय अपेक्षित परिणाम साधला जाईल यावर आपला विश्वास उरला नाही. संवादाने प्रेमाने मुले बदलू शकतात यावर आपला विश्वास आहे का? हे मनाच्या तळात जाऊन स्वतःपुरतेच शोधले पाहिजे तर आपलाच मुळात प्रेमावर एक थेरपी म्हणून विश्वास नाही म्हणून आपण शिस्त आणि शारीरिक शिक्षा यांना कवटाळून बसतो आहोत. आमच्या सर्व चर्चांमध्ये जेव्हा बालपणीच्या जुन्या पिढीच्या चांगल्या शिक्षकांचा विषय निघतो तेव्हा हमखास ते एका गल्लीने जात तेव्हा आम्ही दुसऱ्या गल्लीने जात असू ही आमच्या चांगल्या शिक्षकाची व्याख्या. शिक्षक आणि पोलीस यातला फरक आम्ही करणार की नाही? कृष्णमूर्ती नेमके प्रेमाच्या बाजूचे आहेत ते म्हणतात प्रेम करत असाल तर शिस्तीची गरज नसते. प्रेमामुळे आपोआपच सर्जनशील बोधाचा उदय होतो. तेव्हा शिस्तीच्या गरजेपेक्षा प्रेमाची मात्रा वाढविण्याची गरज आहे. गाडी चालवताना एक्सलेटर वाढत जाताना ब्रेक वरचा पाय हळूहळू निघत जातो अगदी तसेच प्रेम वाढत जाईल त्या प्रमाणात शिस्तीची गरज संपेल.
शिक्षकांसाठी साने गुरुजी या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तका मध्ये शिस्ती संबंधी चे विचार पुढील प्रमाणे
मुळात शिक्षा करण्यातले गृहीतक समाज, पालक आणि शिक्षक यांना मान्य आहे. शिक्षेमुळे मुलं बदलतात असे सर्वांना वाटते. आपल्या समाजात मुळी चूक केल्यावर तुरुंग आणि चांगल्या कामांना पुरस्कार अशी रचना आहे. त्यामुळे शिक्षा करण्याला आपल्या समाजात प्रतिष्ठा आहे. मग त्याला शाळा अपवाद कसे असणार. “छडी लागे छम छम” हे सूत्र तर प्रतिष्ठित आहे. पालकही शाळेत येतात तेव्हा पोराला फटकून काढा! हे सांगायला येतात, यातून शिक्षेमुळे माणसं बदलतात हा समज दृढ झाला. सानेगुरुजी त्यांच्यातील अपवादात्मक क्षमा आणि प्रेम यामुळे महाराष्ट्राच्या लक्षात राहिले. ७० वर्ष आज ते महाराष्ट्रात चर्चिले जातात याचं कारण त्यांनी केलेल्या सहा वर्षाच्या नोकरीत फक्त प्रेम हीच त्यांची अध्यापनाची आणि वर्तनाची, संवादाची भाषा ठेवली. एक शिक्षक म्हणून मला शाळेत पूर्णवेळ हीच भाषा बोलने किती कठीण असतं हे अनुभवल्यामुळे मला गुरुजींचं अशक्यप्राय वाटणारा वर्तन हा कौतुकाचा विषय वाटतं. शाळेत अनेक प्रसंग येतात की जे आपल्या संयमाची परीक्षा पाहतात हे प्रसंग गुरुजीं पुढे आले आणि त्यांनी त्या प्रसंगांना प्रेमानेच प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात गुरुजी ही व्यक्ती अशक्यप्राय वाटू लागते कारण, हा सर्वसाधारण मानवी स्वभाव नाही. मानवी स्वभाव दुसर्याच्या चुका दाखवून शिस्त लावायची असा आहे. पण त्या चुकीची जाणीव करून न देता आपण योग्य वर्तन करून दाखवत समोरच्याला अंतर्मुख करत राहणे ही सामान्य मानवाच्या पलीकडे जाणारी वृत्ती आणि संतत्त्वाच्या लक्षणांशी नात सांगणारी आहे. साने गुरूजींना बघितलेल्या अमळनेरच्या सराफ सरांना गुरुजी न रागावता कसं समजावून सांगत असं विचारलं तेव्हा ते चुका केलेल्या मुलाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले “अरे आपण असे नको ना करायला? अशा शैलीत ते सौम्यपणे बोलत. मुलाच्या आत्मसन्मानाला कुठेही तडा जाणार नाही अशा रीतीने ते बोलत. यातून त्या मुलावर कोणतेही दडपण न येता तो अंतर्मुख होत असे. एवढं सगळं समजून घेतल्यावर तुमच्या माझ्यासाठी गुरुजी कसे महत्त्वाचे आहेत. एक तर आपण मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही, मुलांवर ओरडून बोलणार नाही आणि त्यांना अपमानकारक शब्द वापरणार नाही अशी प्रतिज्ञा प्रथम करायला हवी. एकदा हे ठरवून टाकलं की मग आपल्याला मुलांच्या चुका दिसल्या वर आपण वेगळे रस्ते शोधू शकू. चूक दिसल्यावर शिक्षा हेच उत्तर असल्याने इतर पर्याय आपण आज शोधतच नाही. पण एकदा शिक्षा करायची नाही हे ठरवलं की इतर पर्याय आपण शोधू शकू.
मुलांना एक मोठा माणूस समजून सन्मान देणे आणि त्याचबरोबर त्यांना अवमानकारक न बोलणं हा साने गुरुजींनी लक्षात आणून दिलेला महत्त्वाचा धडा आहे. साने गुरुजींनी विद्यार्थिदशेत हा अनुभव घेतला होता. दापोलीच्या शाळेत एक शिक्षक गुरुजींना “बावळ्या साने” या नावाने हाका मारायचे गुरुजी म्हणाले हे ऐकताना माझ्या हृदयाचे पाणी पाणी होत असे! खरोखरच का आपण बावळट आहोत? असे माझ्या मनात येत. माझा बावळटपणा दूर करणे हे त्या शिक्षकाचे काम होते परंतु, तो मार्ग मला न दाखवता नेहमी त्याच विशेषणाने मला हाक मारीत गेल्याने माझा बावळटपणा वाढला मात्र असेल. अशा रीतीने मुलांची मने आपण किती दुखावतो याची शाळेतल्या शिक्षकांना खरोखर कल्पना नसते. त्यांचा खेळ होतो परंतु मुलांचा जीव जातो. अशा वास्तवावर भाष्य करत खरा शिक्षक कसा असेल याची लक्षणे साने गुरुजींनी पुढे सांगितले. ते म्हटले खरा शिक्षक होता होईतो मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही, त्यांना दमदाटी करणार नाही, त्यांच्यावर दात-ओठ खाणार नाही, पुस्तक फेकून मारणार नाही, खरा शिक्षक मुलांना भ्याड बनवणार नाही, हसत खेळत शिकवेल तो मुलांच्या आत्म्याचे वैभव ओळखेल व त्यावर दृष्टी ठेवून सदैव वागेल, बोलेल, चालेल.
द लास्ट रिझल्ट या शारीरिक शिक्षे विरुद्धच्या मासिकाच्या संपादिकेने देशभरातील शाळांमध्ये किती मुलांना अधिकृत औपचारिकरित्या मारण्यात आले होते यासंबंधी एक सर्वेक्षण केले. ज्या शाळांनी उत्तरे पाठवली नाहीत तिथेही ज्या शाळांनी उत्तरे पाठवली तितकेच मारले जाते किंबहुना अधिकच असे गृहीत धरल्यास शाळेच्या एका वर्षात 15 लाख वेळा मारझोड करण्यात आली. या मारहाणीला शाळांनी जरी चापटी मारणे असे नाव दिले तरी त्यापैकी काही लहान मुलांना त्यासाठी इस्पितळात जावे लागणे इतकी ती जबर जखमी होती आणि ही केवळ अधिकृत म्हणजे मुख्याध्यापकांच्या ऑफिसात करण्यात आलेली मारहाण असून तिची नोंद वहीत नोंद करण्यात आली होती. मुलांना आणखी किती अनधिकृत मारहाणीला तोंड द्यावे लागत असेल धपाटा, बुक्के, केस ओढणे, हात व कान पिरगाळणे गालगुच्चे घेणे, भिंतीवर आपटने, हाताने गुदा मारणे अशा वर्गात घडणाऱ्या घटना किती असतील याचा अंदाज करणेही शक्य नाही. शारीरिक हिंसा बरोबरच मानसिक हिंसेचे ही उपरोध चेष्टा अपमान असे अनेक प्रकार होत असतात.
शारीरिक शिक्षणाच्या तासालाही वर्षानुवर्ष अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वेगवेगळे व्यायाम करायला लावतात उद. रनिंग, उठ बश्या, फ्रंट रोल, प्लांक इ. खरंतर हे सर्व व्यायाम शारीरिक सुदृढता विकासासाठी अतिशय उत्तम असे व्यायाम आहे. परंतु हेच व्यायाम शिक्षा म्हणून केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या व्यायामाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते व आयुष्यभर त्या उठबष्या लक्षात ठेवतात. आपल्या सगळ्यांनाच याची जाणीव आहे की व्यायाम हा आरोग्यदायी जीवनशैली मध्ये किती महत्त्वाचा घटक आहे. व्यायाम हा शिक्षा होऊ शकत नाही हे आपणास ज्ञात असूनही आपण त्याचा वापर शिक्षा म्हणून करतो व विद्यार्थ्यांच्या मनावर व्यायामाबद्दल ची नकारात्मक भावना आयुष्यभर बिंबवतो.
वरील सर्व विचार हे केवळ आदर्शवादी किंवा अव्यवहारिक अजिबात नाही. त्यांची अंमलबजावणी कधीतरी करून पाहू या! जेणेकरून शाळेमधील वातावरण शिक्षा विरहित, भीती विरहीत असेल आणि शिक्षक व विद्यार्थी दोघांचेही लक्ष अध्ययन अध्यापनावर असेल व अध्ययन अध्यापन हसत-खेळत व आनंदात होईल.
शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, पुणे.
9890025266
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, पुणे.
9890025266
No comments:
Post a Comment