आशेचा किरण !
दिनांक 2 डिसेंबर 2018 रविवारचा दिवस होता मुलीची ट्रायथलनची स्पर्धा सहकारनगरमधील संस्कृत विद्या मंदिर संस्थेच्या विद्याविकास प्रशालेमध्ये होती. यामध्ये स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग या तीन गोष्टींचा अंतर्भाव होता दुपारी तीन वाजेची वेळ दिलेली होती त्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. शाळेत गेल्या गेल्या तेथील शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. अमोल झरेकर आणि श्री महादेव ढेंबरे भेटले. मला बघितल्यावर त्यांनी विचारलं सर, तुम्ही इकडे? मी म्हटले स्पर्धेसाठी मुलीला घेऊन आलेलो आहे. मला भेटल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला होता आणि त्यांच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण यासंबंधी काय काय अॅक्टिविटी चालतात कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत हे एकामागून एक सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही जलतरण तलाव बघायला गेलो छोटासा परंतु अतिशय चांगला जलतरण तलाव शाळेमध्ये होता झरेकर सरांनी सांगितले की इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना जलतरण हे अनिवार्य आहे व प्रत्येक विद्यार्थ्याला जलतरणाचे धडे शाळेमध्ये दिले जातात ऐकून खूपच समाधान वाटले. त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील बॅडमिंटन हॉल कडे गेलो. अतिशय उत्कृष्ट असे एक बॅडमिंटन कोर्ट या शाळेमध्ये आहे. बॅडमिंटन हॉलच्या शेजारीच एक मल्टीपर्पज हॉल या शाळेमध्ये आहे ज्या ठिकाणी योगासन, ज्युदो, कराटे, एरोबिक्स यासारख्या अॅक्टिविटी घेतल्या जातात. मल्टीपर्पज हॉल च्या शेजारीच टेबल टेनिस हॉल आहे ज्याठिकाणी दोन टेबल ठेवलेले आहेत आणि अतिशय चांगला असा टेबल टेनिस हॉल आहे. त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील फुटसाल ग्राउंड कडे गेलो. फुटसल ग्राउंड बघून तर मी थक्क झालो कारण शाळेच्या टेरेस वरती अतिशय सुंदर असे फुटसाल चे ग्राउंड आहे. विशेष म्हणजे या सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये वापरायला मिळतात व त्याव्यतिरिक्तही विद्यार्थी या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर शाळेच्या बाहेरच एक छोटेसे मैदान आहे साधारणपणे ३०X ३० मीटर लांबीचे. मैदानाच्या शेजारीच 30 x 20 मीटर लांबीचा स्केटिंग ट्रॅक आहे व मैदानावरच रोप मल्लखांब चे युनिट आहे. एवढ्या सगळ्या सोयी-सुविधा एका शाळेमध्ये बघून खूपच आनंद झाला व समाधान वाटले. सध्या शारीरिक शिक्षण शिक्षकांशी बोलताना शाळेमध्ये सोयीसुविधांचा अभाव असतो अशी ओरड सर्वच शिक्षक करताना दिसतात परंतु या शाळेमध्ये शिक्षक मात्र या शाळेतील सोयीसुविधा बद्दल अतिशय भरभरून बोलत होते व समाधान व्यक्त करत होते. ते सांगत होते की आम्ही आमच्या संस्थाचालकांकडे कुठल्याही प्रकारच्या सुविधांची मागणी केली असता आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर अमोल सरांनी माझी ओळख तेथील संस्थेचे सरचिटणीस श्री विनायक जांभोरकर यांच्याशी करून दिली जांभोरकर यांना भेटल्याबरोबर त्यांनी तेथील शारीरिक शिक्षण शिक्षकांची अतिशय मुक्तहस्ते स्तुती केली. आमचे शिक्षक अतिशय चांगले काम करत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हे पण जरा विचित्रच वाटत होते कारण सर्वसाधारणपणे संस्थाचालक अथवा मुख्याध्यापक हे शिक्षकांबद्दल असमाधान व्यक्त करतात तर शिक्षक हे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याबद्दल असमाधान व्यक्त करतात परंतु इथली परिस्थिती बरोबर उलटी होती संस्थाचालक पण शिक्षकांचे भरभरून कौतुक करत होते तर शिक्षकही त्या संस्थाचालकांचे भरभरून कौतुक करत होते. येथील शारीरिक शिक्षण शिक्षकांनी सांगितले की आम्ही सकाळी सात वाजता शाळेमध्ये येतो व संध्याकाळी सात वाजताच शाळेमधून जातो. एवढा वेळ काम करूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही कारण आमचे संस्थाचालक जांभोरकर सर हे अतिशय उत्साही व सकारात्मक व्यक्ती असल्यामुळे ते नेहमी आम्हाला नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देतात आणि ते आमच्यासाठी इतकं काही करतात त्यामुळे आम्हालाही चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. असे संस्थाचालक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांचा वेगळं कॉम्बिनेशन असलेली ही शाळा बघून खूपच बरं वाटलं.कधीकधी शारीरिक शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी, समस्या, सोयीसुविधा, आणि शारीरिक शिक्षणाची शाळेमधील सद्यस्थिती या सर्वांबद्दल ऐकले की काहीसे नैराश्य येते परंतु अशा काही शाळा बघितल्या की काहीतरी आशादायक घडते आहे याचे याचे समाधान मिळते आणि हे समाधान माझ्यापुरतं न राहता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न. आजूबाजूला नकारात्मक घटना घडल्या की काही क्षणातच सर्वांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची चर्चा होते परंतु अशा काही सकारात्मक गोष्टीही सर्वापर्यंत पोहोचाव्या हीच आशा.
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६
No comments:
Post a Comment