पुण्यातील व्यायामाची आणि खेळांची तीर्थस्थळे
पुण्याला ज्याप्रमाणे शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते, त्याच प्रमाणे पुणे हे क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा माहेरघर बनत आहे व देशातील आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा केंद्र म्हणून पुढे येत आहे. राष्ट्रकुल युवा स्पर्धा त्याचबरोबर खेलो इंडिया यासारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन पुण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे पुणे हे देशातील प्रमुख क्रीडा केंद्र समोर येत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुण्यामध्ये असणाऱ्या क्रीडाविषयक सोयीसुविधा होय. पुण्याचा सगळ्या बाजूने झपाट्याने विस्तार होत असताना सुद्धा सुदैवाने पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये चांगली क्रीडांगणे उपलब्ध आहेत आणि पुण्यातील लोक त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. कोणती आहेत ही क्रीडांगणे आणि व्यायामप्रेमींचे तीर्थस्थळे ती पाहू या
1. बालेवाडी: पुणे शहरापासून काहीसे लांब परंतु, पुण्याचे प्रमुख क्रीडा केंद्र म्हणजे बालेवाडी. नवशिक्या खेळाडूंपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंपर्यंत बालेवाडी म्हणजे प्रमुख तिर्थस्थळ होय. अथलेटिक्स, शूटिंग, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, जिम्नास्टिक, बॉक्सिंग या सर्व खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा बालेवाडी येथे आहेत. अनेक खेळांचे राष्ट्रीय शिबिरे या ठिकाणी आयोजित केले जातात. अनेक खेळांच्या अकॅडमी या ठिकाणी चालविल्या जातात व त्यांच्यामार्फत नवीन खेळाडू घडविले जात आहेत.
2. महाराष्ट्रीय मंडळ: गुलटेकडी येथे महाराष्ट्रीय मंडळाचे 32 एकर मध्ये असलेले प्रशस्त मैदान आहे. या मैदानामध्ये ॲथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व कुस्ती अशा विविध खेळांचे प्रशिक्षण वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरात दिले जाते. त्याचबरोबर सर्वसामान्य हजारो व्यायामप्रेमी आपल्या आरोग्यचे संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या खेळांचे प्रशिक्षण आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठीची ही जागा म्हणजे बालेवाडी नंतरचे दुसरे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी प्रौढांचे विविध ग्रुप आहेत आणि ते समूहाने विविध प्रकारचे खेळ आणि व्यायाम प्रकार करताना दिसतात. तसेच याठिकाणी जिम आणि योगासने वर्गही चालवले जातात. कै. कॅ. शिवरामपंत दामले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रीय मंडळाचे हे क्रीडांगण म्हणजे पुण्यातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे.
3. बाबुराव सनस मैदान: पुण्याच्या मध्यभागी आणि सारसबागेच्या शेजारी असलेलं हे मैदान पुणे शहरांमधील ॲथलेटिक्स च्या खेळाडूंसाठी प्रमुख केंद्र आहे. ॲथलेटिक्स खेळासाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुणे महानगरपालिकेने याठिकाणी मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ॲथलेटिक्स साठी आवश्यक असणारा सिंथेटिक ४०० मीटरचा प्रमाणित ट्रॅक याठिकाणी असल्यामुळे अनेक उभरते हजारो खेळाडू या ठिकाणी आपले प्रशिक्षण घेत आहेत. रनिंग, गोळाफेक, भालाफेक, हातोडा फेक, उंचउडी, लांबउडी, तिहेरीउडी, हर्डल्स अशा अथलेटिक्स मधल्या विविध बाबींसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंबरोबरच या ठिकाणी चालायला येणारे अनेक लोक या मैदानाचा आरोग्य संवर्धनासाठी उपयोग करून घेत आहेत.
4. तळजाई टेकडी: तळजाई टेकडी हे अनेक वर्षापासून व्यायाम प्रेमींचं एक प्रमुख केंद्र आहे. परंतु, सध्या तळजाई टेकडीचा पूर्ण कायापालट झालेला आहे. तळजाई टेकडी हे एक फिटनेस पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना व्यायाम करण्यासाठीच पुण्यामधील सर्वात उत्तम केंद्र म्हणजे तळजाई टेकडी आहे. तळजाई टेकडीकडे जाताना रस्त्यामध्येच कै. सदाभाऊ शिंदे क्रीडांगण नव्यानेच बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूने मोठा जॉगिंग ट्रॅक आहे व मध्यभागी हौशी क्रिकेटपटूंसाठी हिरवेगार असे क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या क्रीडांगणाचा हजारो हौशी क्रिकेटपटू पहाटेपासूनच आनंद घेत असतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला मध्ये-मध्ये ओपन जिम सुद्धा आहे; ज्याचा अनेक लोक उपयोग करतात. या ठिकाणी काही लोक चालतात, खेळतात, प्राणायाम करतात, मेडिटेशन करतात. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हे क्रीडांगण सामावून घेणारे आहे. हिरवेगार मैदान, रंगीबेरंगी फुलांची झाडे यामुळे मनाला वेगळीच शांतता या मैदानावर लाभते. विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या सोयीसुविधा असणारे हे मैदान सर्वांसाठी मोफत आणि खुले आहे. या मैदानातून बाहेर पडल्यावर थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला मुख्य तळजाई टेकडी आहे. तळजाई टेकडी कडे जाताना उजव्या हाताला प्रशस्त असे मंदिर आहे तर डाव्या हाताला मोठा मल्टीपर्पज हॉल आहे. ज्यामध्ये जिम, योगासने, टेबल टेनिस, स्विमिंग आणि बॅडमिंटन या सुविधा उपलब्ध आहेत. तर हॉलच्या पाठीमागे शूटिंग रेंज सुद्धा आहे. त्यानंतर येते ती मुख्य तळजाई टेकडी. पक्षांचा कलकलाट, सर्वत्र हिरवीगार अशी झाडी आणि नागमोडी वळणाने जाणारा रस्ता. तळजाई टेकडीमध्ये प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक छोटा म्हणजे साधारणपणे पाच किलोमीटरचा राऊंड आहे तर दुसरा मोठा म्हणजे आठ ते दहा किलोमीटरचा राउंड आहे. सर्वसामान्य व्यक्तींसाठी तळजाई टेकडीला चालायला जाणे म्हणजे एक आदर्श जागा आहे. तळजाई टेकडीचे वैशिष्ट्य म्हणजे टेकडी पुण्यात असूनही चालताना आपण घनदाट अशा जंगलांमधून जात आहोत, शहरापासून दूर आहोत असा भास त्याठिकाणी होतो. अनेक तरुण-तरुणींचे गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट, गप्पा मारत, हसत-खेळत चालण्याचा आणि धावण्याचा आनंद घेत असतात. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरुण-तरुणी या ठिकाणी सरावासाठी येत असतात. तसेच अनेक व्यवसायिक ॲथलेटिक्स चे खेळाडू आठवड्यातून ठराविक दिवशी या ठिकाणी सरावाला येत असतात. याठिकाणी हास्यक्लब सुद्धा चालतो. त्याचबरोबर नवीन झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी सुद्धा अनेक कार्यकर्ते व क्लब या ठिकाणी कार्यरत आहेत. मोर, ससे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यांचे वास्तव्य सुद्धा तळजाई टेकडी वर आहे व त्यांची निगा राखण्याचे काम काही क्लब करत आहेत. तळजाई टेकडीवर व्यायामाला जाणार्या लोकांसाठी पार्किंग ची समस्या अजिबात नाही, या ठिकाणी पुरेशी पार्किंगची व्यवस्था आहे. अशाप्रकारे तळजाई टेकडी म्हणजे फिटनेस प्रेमींसाठी पूर्ण पॅकेज, खरोखर तीर्थस्थळ आहे.
5. डेक्कन जिमखाना: पुण्याच्या मध्यवस्तीत वसलेले हे पुणे शहरातील व महाराष्ट्रातील एक महत्वाचे क्रीडा केंद्र आहे. या ठिकाणी क्रिकेट बास्केट बॉल वॉलीबॉल, स्विमिंग, वॉटर पोलो, टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्स व जिम्नॅशियम या सर्व खेळाचे प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी चालतात. या सर्व खेळांच्या अतिशय अद्ययावत अशा सोयी-सुविधा जिमखान्यावर उपलब्ध आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू डेक्कन जिमखान्यावर आपले प्रशिक्षण घेत असतात. या ठिकाणी ४५० मीटरचा ट्रॅक आहे त्यावर सकाळ-संध्याकाळ विविध वयोगटतील खेळाडू, सर्वसामान्य नागरिक आपले प्रशिक्षण व व्यायाम करतात.
6. रेस कोर्स: स्वारगेटहून हडपसरला जाताना डाव्या बाजूला रेसकोर्सचे प्रशस्त असे मैदान आहे. रेस कोर्सेचा राऊंड हा दोन किलोमीटरचा आहे. विविध वयोगटातील लोक या ठिकाणी सकाळ व सायंकाळी चालायला येतात. क्रॉस कंट्री करणारे खेळाडू आणि लांब पल्ल्याचे धावपटू यांच्यासाठी रेस कोर्स ही चांगली जागा आहे.
7. पर्वती: पर्वती म्हणजे पुण्याच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थळ. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. व्यायाम प्रेमींसाठी पर्वती महत्वाचे तीर्थस्थळ आहे. पर्वती टेकडी चढण्यासाठी एकूण 103 पायऱ्या आहेत. विविध वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत चालण्यासाठी येतात. एरोबिक सुदृढता अथवा स्टॅमिना वाढविण्यासाठी पर्वती अतिशय परिणामकारक आहे. पर्वती टेकडी चढून गेल्यानंतर वरती मंदिर आहे जेथून संपूर्ण पुणे आपणास दिसते.
8. वेताळ टेकडी: या टेकडीला हनुमान टेकडी ह्या नावानेही पुणेकर ओळखतात. या टेकडीवर लॉ कॉलेज रोड, MIT कॉलेज, पाषाण, गोखले नगर येथून चढून जाता येतं किंवा गाडीने ARAI रस्त्याने वर जाता येतं. सकाळी व सायंकाळी बरीच लोकं चालायला येतात. ह्यात सर्व वयोगटातील म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण येतात. तरुण मुलं सायकल घेऊन पण येतात. सकाळ संध्याकाळ नियमित टेकडीवर येणारी लोकं आहेत. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे जास्त लोक टेकडीवर येतात. टेकडीवरच्या चबुतऱ्यावर व्यायम्प्रेमी योगासन व सूर्य नमस्कार पण घालतात. येथील वातावरण खूप उल्हासित असं असतं. बऱ्याचदा मोर बघायला मिळतात व बरेच पक्षी दिसतात. फोटोग्राफी चा कोर्स करणारे बरेच गट पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी टेकडीवर येतात. टेकडीवर गेलं की एकदम फ्रेश वाटतं व उत्साह वाढतो.
अशी ही व्यायामाची आणि वेगवेगळ्या खेळांची केंद्र पुण्यामध्ये व्यायामाची आणि खेळांची संस्कृती वाढायला महत्त्वाचे योगदान देत आहे. खाद्य शौकीन ज्याप्रमाणे चांगलं हॉटेल कितीही दूर किंवा महाग असलं तरी त्याठिकाणी जाऊन खाण्याचा आनंद घेतात त्याप्रमाणे पुण्यामध्ये अनेक व्यायामप्रेमी आहेत आणि त्यांच्यासाठी सुदैवाने अनेक व्यायामाची मैदाने ज्याला मी तीर्थस्थळे म्हटले ते आहेत. अश्या या तीर्थस्थळच्या त्याठिकाणी जाऊन व्यायाम करण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा आनंद प्रत्येक जण घेऊ शकतो.
शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक,
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,
पुणे.
मो. 9890025266
No comments:
Post a Comment