खेळांची बाराखडी
कोणत्याही विषयाच्या अथवा क्षेत्राच्या काही मूलभूत गोष्टी असतात, तत्त्वे असतात त्याचप्रमाणे विविध खेळांची सुद्धा काही मूलभूत कौशल्य आहेत. ज्याप्रमाणे मराठी भाषा ही मुळाक्षरंवर आधारलेली आहे, तर इंग्रजी भाषा ही A to Z या अल्फाबेट वर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे खेळामधील मूलभूत कौशल्य म्हणजे सर्व खेळांचा व हालचालींचा पाया आहे. चालणे, धावणे, उड्या मारणे, लंगडी घालने, थ्रोइंग, कॅचींग, कीकिंग, पुलिंग, पुशिंग, बेंडींग ही सर्व खेळांची बाराखडी म्हणजेच पाया आहे. कुठल्याही विषयात प्रगती साधायची असेल तर त्या विषयाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्यामुळे पाया कमकुवत राहिला तर त्यावर उभी राहणारी इमारत सुद्धा कमकुवत असते त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा खेळाचा किवा शारीरिक हालचाली चा पाया कमकुवत राहील अशा विद्यार्थ्यांना पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यमान करताना मर्यादा येतात. कोणत्याही खेळामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी मुलभूत कौशल्यांवर प्रभुत्व मिळणे अत्यावश्यक आहे. वर्ष २ ते ७ हा कालखंड मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. २ ते ७ या कालखंडात मूलभूत कौशल्यांचा विकास जितका चांगला होईल तितके उच्च क्रीडा कार्यमान मिळवण्यासाठी नंतर त्या विद्यार्थ्यांना मदत होईल. सगळ्या खेळांमधील क्रीडा कौशल्य ही मूलभूत कौशल्यांच्या एकत्रीकरणामधून तयार झालेली असतात उदा. Bat हा इंग्रजी शब्द b, a, t हे तीन अल्फाबेट मिळून तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये आपण बॉल बॅटने टोलवल्यानंतर रन घेतो. यामध्ये स्ट्रायकिंग आणि रनिंग या दोन मूलभूत कौशल्याचे एकत्रीकरण होते. अशाप्रकारे सगळ्या खेळांची कौशल्य ही मूलभूत कौशल्याचे एकत्रीकरणच असते. त्यामुळे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थांना मूलभूत कौशलयांचे चांगले अध्यापन करणे शारीरिक शिक्षण या विषयासाठी अत्यंत महत्वाचे आहे. अध्यापन शास्त्रानुसार २ ते ७ हा वयोगट मूलभूत कौशल्य शिकविण्यासाठी महत्वाचा कालखंड आहे. परंतु, दुर्दैवाने भारतामध्ये या वयोगटाला मूलभूत कौशल्यांचे अध्यापन करण्यासाठीचे तज्ञ, शिक्षक व मार्गदर्शक उपलब्ध नाहीत आणि असे तज्ञ तयार करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम सध्या भारतामध्ये नाही. या मुलभूत कौशल्या बद्दलची जागरूकता शारीरिक शिक्षण शिक्षक व एकूणच समाजामध्ये कमी प्रमाणात आहे.
सध्या भारतामध्ये कबड्डी, क्रिकेट या खेळांच्या व्यवसायिक स्पर्धांमुळे तसेच क्रीडाविषयक उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, पालकांचा क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांमध्ये बदल झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून चांगली क्रीडा संस्कृती सध्या निर्माण होत आहे. आजकाल पालक आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत ही सकारात्मक बाब आहे. परंतू, पालक आपले पाल्य चार - पाच वर्षाचे झाली की लगेचच त्याला कुठल्यातरी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात करतात. २ ते ७ या वयोगटात मूलभूत कौशल्य विकासावर भर द्यायला हवा याची माहिती पालकांना आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना व प्रशिक्षकांनाही नाही. ४-५ वर्षाच्या विद्यार्थ्यांना मुख्य खेळाचे प्रशिक्षण देणे म्हणजे पहिली ते चौथी पर्यंतचे चे शिक्षण न घेताच पाचवी ला प्रवेश घेण्यासारखे आहे. ७ ते ८ वर्षानंतर कोणत्याही खेळाचे मुख्य प्रशिक्षण द्यायला सुरुवात करावी असे शास्त्र सांगते. त्यामुळे भारतामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले प्रशिक्षक आहेत त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्रीडा कौशल्यांचा विकास करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांची आणि शिक्षकांची भारतामध्ये आवश्यकता आहे. त्याचबरोबर पालक, शारीरिक शिक्षण शिक्षक, खेळांचे कोचेस या सर्वांमध्ये यासंबंधीची जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासंबंधीचे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे. ऑलिंपिक आल्यानंतर टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये भारताला ऑलिंपिक मध्ये पदके कमी का मिळतात याच्या अनेक चर्चा झडतात त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत त्यापैकीच हा एक महत्त्वाचा घटक आहे.
No comments:
Post a Comment