Monday, August 19, 2019

स्पर्धेमध्ये शारीरिक शिक्षणच हारते आहे का?

स्पर्धेमध्ये शारीरिक शिक्षणच हारते आहे का?

शारीरिक शिक्षण आणि खेळ हा शालेय अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाचा विषय आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील एक आवश्यक विषय आहे. शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्य अथवा क्षमतांचा विकास होतो असे नाही तर शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकास होतो ज्यामुळे विद्यार्थी एकमेकाला सहकार्य करणे, मदत करणे, खिलाडू वृत्ती जोपासणे यासारख्या गुणांचा विकास शारीरिक शिक्षणामुळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण आणि खेळामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचाही विकास होण्यास मदत होते हे काही संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहेत. स्वामी विवेकानंदांनी तर असे म्हटले आहे की तुम्हाला जर गिता समजून घ्यायची असेल तर तुम्ही मैदानावर फुटबॉल खेळायला हवा, महात्मा गांधींनीही त्यांच्या शिक्षण विषयक विचारांमध्ये शारीरिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान दिलेले होते. अशाप्रकारे शारीरिक शिक्षणाचे महत्त्व वेगवेगळ्या शिक्षण तज्ञ, संशोधनाद्वारे सांगितलेले आहे.
परंतु शारीरिक शिक्षणाचा खूप मर्यादित अर्थ समाजामध्ये लावला जातो. एखाद्या शाळेमधील किती विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळले, शाळेमध्ये किती संघ आंतरशालेय स्पर्धेमध्ये जिंकले, यालाच शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक, मुख्याध्यापक, पालक हे  महत्व देताना दिसतात. एखाद्या शाळेमध्ये जास्त विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळले म्हणजे त्या शाळेतील शारीरिक शिक्षण व खेळाचा दर्जा चांगला आहे असे खात्रीशीरपणे म्हणता येणार नाही. कारण शाळांमधून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळेची एकूण विद्यार्थी संख्या यांचे जर प्रमाण आपण बघितले तर असे लक्षात येते की शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ १० ते २० % इतकेच विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतात. असे म्हटले जाते की “ physical education for masses not for classes” कारण शाळेमध्ये 10 ते 20% विद्यार्थ्यांपुरतेच शारीरिक शिक्षण मर्यादित नाही शारीरिक शिक्षण हे शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. स्पर्धा आणि स्पर्धांमधील यश म्हणजेच केवळ शारीरिक शिक्षण नव्हे तर तो एक शारीरिक शिक्षणातील छोटा घटक आहे. परंतु सध्या त्याला वर्तमानपत्रांमधून जास्त प्रसिद्धी मिळत असल्यामुळे मुख्याध्यापक अथवा संस्था चालक यांच्या दृष्टीकोनातून आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी हे राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळायला पाहिजे अथवा आंतरशालेय स्पर्धांमध्ये आपल्याच शाळेचा संघ जिंकायला हवा जेणेकरून वर्तमानपत्र मध्ये शाळेचे नाव येईल व त्याचा फायदा शाळेची प्रतिष्ठा उंचावण्यास होईल. याठिकाणी स्पर्धा या वाईट आहेत असा म्हणण्याचा हेतू नाही तर स्पर्धेमध्ये एकूण किती विद्यार्थी सहभागी होतात आणि शारीरिक शिक्षणातील इतर जे घटक आहेत यावर किती लक्ष दिले जाते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे काराण म्हणजे कदाचित शारीरिक शिक्षणाचे स्वरूप अथवा व्याप्ती समाजापर्यंत चांगली पोहोचलेली नाही. त्यामुळे असू शकेल. केवळ स्पर्धांना महत्त्व द्यायचे नाही तर मग कशाला महत्व द्यायचे हे समजून घेण्यासाठी आपणास शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे पहावी लागतील. ती पुढील प्रमाणे शारीरिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना विविध क्रीडा कौशल्यांमध्ये सक्षम होण्यास मदत करणे, शारीरिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या शारीरिक सुदृढतेचा विकास व तो राखण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी पुरविणे, शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक हालचाली मागील शास्त्रीय तत्त्व समजण्यास मदत करणे, शारीरिक शिक्षणातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास आणि स्वसंकल्पना उंचावण्यास मदत करणे,  शालेय सामाजिक शिक्षणाद्वारे शारीरिक उपक्रमात सहभागी होता येत्या उपक्रमाचा आनंद घेता येईल यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे.
वरील उद्दिष्टं वरून असे लक्षात येते की या उद्दिष्टांमध्ये कुठेही स्पर्धा कार्यमान याचा अंतर्भाव नाही. त्यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक पालक व शारीरिक शिक्षण शिक्षक या सर्वच घटकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता स्तर काय आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यासाठी लागणारे मूलभूत कौशल्य येतात का? शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची योग्य अंमलबजावणी होते का? शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन उंचीच्या प्रमाणात योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असतील तर शाळेतील शारीरिक शिक्षण यशस्वी चालू आहे असे म्हणता येईल. आजकाल वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून असे दिसून येत आहे की शालेय विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर मधुमेहा सारखे आजारही विद्यार्थ्यांना जडलेले आहेत. त्याचबरोबर आज-काल विद्यार्थ्यांचा बराच वेळ टीव्ही व मोबाईल वर जातो यालाच स्क्रीन टाईम असे म्हणतात. टीव्ही, मोबाइल या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा हालचाली या दिवसेंदिवस कमी होत आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक सक्रियतेचा दर वाढायला हवा. आणि त्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षणाचा तास हा एक अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे. परंतु या वेळेचा उपयोग कसा केला जातो हे महत्वाचे आहे. या सर्व विश्लेषणाचा सारांश करायचा झालास तर शारीरिक शिक्षणातील यशाच्या व्याख्येची पुनर्मांडणी करायला हवी आणि शारीरिक शिक्षणामध्ये क्रीडा स्पर्धा पेक्षाही बरेच काही आहे हे समाजातील सर्वच घटकांनी समजून घ्यायला हवे. आपल्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण यशस्वी चालते किंवा नाही याचे परीक्षण करायचे झाल्यास शाळेमधून बाहेर पडणारा विद्यार्थ्याकडे जर पुढील गुणवैशिष्ट्ये असतील तर त्या शाळेतील शारीरिक शिक्षण यशस्वी चालू आहे असे म्हणता येईल. आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना अथवा बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला विविध खेळ खेळण्यासाठी ची आवश्यक कारक कौशल्य विद्यार्थी करू शकतो का?, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे का?, विद्यार्थी नियमित पणे शारीरिक उपक्रमात सहभागी होतात का?, विद्यार्थी शारीरिक सक्रिय राहण्याचे महत्त्व व फायदे जाणतात का?, विद्यार्थी शारीरिक उपक्रम व त्यांचा आरोग्यपूर्ण जीवनशैली मधील मूल्य जातात का? या निकषां बरोबर आपल्या शाळा अथवा महाविद्यालयात चालणाऱ्या शारीरिक शिक्षणाची तुलना केल्यास आपल्या शाळा अथवा महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण चांगले चालू आहे की? ते पण स्पर्धांमध्ये हरवलेले आहे हे समजेल.

शरद आहेर
मो. ९८९००२५२६६

No comments:

Post a Comment

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...