Wednesday, August 14, 2019

'हँडबॉल' हीच भेकराईनगर या गावाची ओळख!!!


'हँडबॉल' हीच भेकराईनगर या गावाची ओळख!!!

पुण्यापासून13 किलोमीटरवर हवेली तालुक्यामध्ये भेकराईनगर नावाचे एक छोटेसे गाव. या छोट्याशा गावामध्ये भेकराई माता माध्यमिक विद्यालय ही एक शाळा आहे. वर्ष १९९१! राजेंद्र राऊत नावाचे शिक्षक या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयासाठी रुजू होतात व हँडबॉल या खेळाची सुरुवात करतात. भेकराईनगर हे खेडेगाव असल्यामुळे त्याठिकाणी खेळाच्या मैदानावर मुली कमीच येत होत्या. मुलींनी हाफ पॅंट घालून खेळने ही कल्पनाच दुरापास्त होती. सुरुवातीला दहा ते अकरा मुलीच सरांकडे सरावासाठी येत होत्या. राऊत सर नियमितपणे शाळा सुटल्यानंतर मुलींचा हँडबॉल चा सराव घेत.पहिल्याच वर्षी भेकराई माता माध्यमिक विद्यालय मधील एक मुलगी राष्ट्रीय पातळीवरील हँडबॉल स्पर्धेत सहभागी झाली आणि त्यानंतर मात्र गावातील अनेक मुली हँडबॉल च्या मैदानाकडे वळू लागल्या. राऊत सरांनी संघबांधणी करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच वर्षी भेकराईनगर गावातील या मुलींच्या संघाने राज्यस्तरावरील अजिंक्यपद मिळविले. आता मात्र गावातील वातावरण एकदमच पालटू लागले. पालक स्वतःहून आपल्या मुलींना हँडबॉल खेळण्यासाठी पाठवू लागले मैदानावर मुलींची रेलचेल वाढली होती. एका बाजूला मुली हँडबॉल मध्ये उत्तम कामगिरी करत होत्या परंतु त्याच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेला जाण्यासाठी मुलींना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत होते.तसेच मैदानावर साहित्याची कमतरता जाणवत होती. अशा विपरीत परिस्थितीतही विद्यार्थिनींच्या हँडबॉल मधील आवडीवर त्यांच्या खेळावर व कार्यमानावर काहीही परिणाम झाला नाही.त्या जिद्दीने मैदानावर आपले कौशल्य पणाला लावत होत्या. अशावेळी शाळेकडून काही मदत केली जात होती व वेळ पडल्यास राऊत सर स्वतःच्या पैशांनी या मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांना घेऊन जात होते.हळूहळू भेकराईनगर गावातील अनेक मुली जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळू लागल्या व अजिंक्यपद मिळू लागल्या आणि भेकराईनगर गाव व भेकराईमाता माध्यमिक विद्यालयाचे नाव पेपर मध्ये झळकू लागले आणि हँडबॉल हा खेळ हीच आता भेकराईनगर गावाची ओळख झाली होती. त्यामुळे पालक, शाळेतील शिक्षक, गावांमधील कार्यकर्ते, शाळेतील विद्यार्थी व आजूबाजूच्या गावातील लोकांचा राऊत सरांवरील विश्वास वृद्धिंगत होऊ लागला.
आता मात्र गावातील अनेक लोक मुलींना व सरांना मदतीसाठी पुढे येऊ लागले. स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यासाठी गावातील लोकांची मदत मिळत होती. भेकराईनगर गावांमध्ये आता मात्र हँडबॉल या खेळाची संस्कृतीच निर्माण झाली होती. विविध वयोगटातील मुलींचे संघ तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत मैदान गाजवत होत्या. आत्तापर्यंत भेकराईनगर या छोट्याशा गावातील एकूण 300 विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर खेळल्या आहेत तर 473 मुली राष्ट्रीय स्तरावर खेळल्या आहेत.त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवलेले दहा खेळाडू या एकाच गावांमधील आहेत. ज्या शारीरिक शिक्षण शिक्षकांमुळे संपूर्ण गाव हँडबॉलमय झाले अशा राजेंद्र राऊत सरांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
राजेंद्रराऊत सरांनी भेकराईनगर गावातील या मुलींना केवळ हॅण्डबॉल च्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले नाही तर जीवन कौशल्यायांचेही प्रशिक्षण राऊत सरांनी मैदानावर मुलींना दिले. मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, एकमेकास मदत करणे सहकार्य करणे, तसेच दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण हँडबॉल च्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले त्यानिमित्त वरिष्ठ व कनिष्ठ सर्व खेळाडू एकत्र येऊ लागले. त्यामुळे हँडबॉल चे मैदान हे केवळ मैदान राहिले नाही तर ते एक कुटुंब झाले होते.
या मैदानावर खेळून बाहेर पडलेल्या अनेक मुली आता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहे. हँडबॉल मुळेच साधारणपणे 50 मुलींना नोकऱ्या मिळण्यास मदत झाली. काही मुली पोलीस खात्यामध्ये पीएसआय, काही मुली प्राध्यापक, शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक,सरकारी अधिकारी, विविध बँकांमध्ये अभिमानाने व आत्मसन्मानाने काम करत आहेत. काही गावांची ओळख ही तेथील भौगोलिक वातावरण, फळे, प्रसिद्ध व्यक्ती इत्यादींमुळे असते तशी भेकराईनगर गावाची ओळख म्हणजे हँडबॉल होय. एक शिक्षक जेव्हा समर्पित भावनेने कार्य करतो तेव्हा संपूर्ण गावाचा तर कायापालट होतो शिवाय अनेक पिढ्यांवर त्याचा किती सकारात्मक परिणाम होतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री राजेंद्र राऊत सर.असे अनेक शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक खेड्यापाड्या मधून समर्पित भावनेने काम करत आहेत. त्यांच्या कार्याचीओळख करूनदेण्यासाठी केलेला हा प्रयत्न.

शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक,
चन्द्रशेखर अगाशे शा. शि . महाविद्यालय, पुणे
मो. 9890025266

No comments:

Post a Comment

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...