प्रवास मेजर ध्यानचंद ते पी व्ही सिंधू पर्यंतचा
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव 'ध्यान सिंग' परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं 'ध्यानचंद' हे नाव प्रसिद्ध केल. अशा वेळी आजच्या पिढीला कदाचित ध्यानचंद, खाशाबा जाधव ही नावे आणि त्यांचे कर्तृत्व व योगदान माहीत नसेल. 1928 च्या ऑलम्पिक मध्ये ध्यानचंद यांनी तब्बल १४ गोल् ठोकले होते. भारतीय संघाच्या या विजयाचं वर्णन करताना हा फक्त हॉकी चा खेळ नाही तर जादू आहे आणि मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार आहे असे म्हटले होते. ध्यानचंद यांनी आपल्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल ४०० पेक्षा जास्त गोल केले. ब्रिटिशांच्या राजवटीत गुलामांचे जिने जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या समर्थनावर बसणारे मेजर ध्यानचंद त्यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्ता पेक्षा कमी नाही. १९२८,१९३२,१९३६ या पाठोपाठच्या ऑलम्पिक मध्ये तीन सुवर्णपदके यात ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. या भूतकाळातील दैदिप्यमान कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असतानाच नुकतीच एक आकडेवारी समोर आली ती म्हणजे, भारतीय खेळाडूनीं केवळ जुलै २०१९ या एका महिन्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचे मिळून 227 पदके जिंकली. हा योगायोग नसून क्रीडा क्षेत्रातही भारत झपाट्याने प्रगती करत आहे याचे हे लक्षण आहे. नुकताच क्रिकेट चा वर्ल्डकप संपला या वर्ल्डकप मधील एका सामन्यात 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघामधील एक खेळाडू समालोचन करत होता. त्यावेळेस तो म्हणाला की 1983 च्या वर्ल्डकप पूर्वी भारतीय संघ हा फक्त वर्ल्डकप मध्ये सहभागी होण्यासाठी जात होता, जिंकण्यासाठी नाही. परंतु 1983 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येक वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ हा जिंकण्यासाठीच जातो. भारतातील क्रीडा क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत, भौतिक सोयीसुविधा निर्माण होत आहेत परंतु, भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये झालेला हा वरील बदल अधिक महत्त्वाचा आहे असे वाटते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना उभरत्या भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये झालेला हा सकारात्मक बदल प्रकर्षाने जाणवत आहे. एकदा एका तज्ञाने व्याख्यानामध्ये असे सांगितले होते की, भारताला ॲथलेटिक्समध्ये कधीच पदक मिळू शकणार नाही. जर पदक मिळवायचे असेल तर आपल्याला परदेशी खेळाडू आयात करावे लागतील. परंतु, गेल्या काही वर्षांमधील हिमा दास, धुती चंद, अंजू बॉबी जॉर्ज, दिपा कर्माकर या आणि इतरही खेळाडूंनी भारत कोणत्याही खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. बॅडमिंटनमधील पी व्ही सिंधू सध्या जागतिक क्रमवारी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, काही वर्षांपूर्वी सायना नेहवाल जागतिक क्रमवारी मध्ये प्रथम क्रमांकावर होती. ज्या बॅडमिंटनमध्ये चीन, जपान, इंडोनेशिया या देशांचे वर्चस्व आहे, त्यामध्ये भारतीय महिला खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. बॉक्सिंग मध्येही मेरी कोम हि सध्या जागतिक एक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, आणि इतर वयोगटात सुद्धा भारतीय महिला आणि पुरुष जागतिक क्रमवारी मध्ये पहिल्या दहामध्ये आहेत. त्याचबरोबर शूटिंग, आर्चरी या खेळांमध्येही भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत ही सर्व भारतीयांसाठी अतिशय आशादायी आणि अभिमानास्पद बाब आहे.
भारतामध्ये क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचा मोठा वाटा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951 मध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली आशियाई स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर 1982 मध्ये पुन्हा एकदा आशियायी स्पर्धा भारताने आयोजित केल्या होत्या. 2008 मध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धांचे आयोजन आणि त्यानंतर 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन भारताने यशस्वीपणे केले होते. या विविध क्रीडा प्रकारांच्या आयोजना बरोबरच टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, आर्चरी अशा विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन भारताने गेल्या काही वर्षांमध्ये केलेले आहे. या सर्व स्पर्धांच्या आयोजनामुळे उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यमान जवळून पाहता आले आणि भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास या सर्व स्पर्धा आयोजनाचा मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धां बरोबरच भारतामध्ये सध्या चांगल्याच लोकप्रिय झालेल्या व्यवसायिक लीग स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट, प्रो कबड्डी, हॉकी, फुटबॉल, वॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती अशा विविध खेळांच्या व्यवसायिक लीग स्पर्धा सध्या भारतात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे भारतातील उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूं बरोबर खेळण्याचा अनुभव मिळत आहे. या व्यवसायिक लीग स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंना आपले कार्यमान दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या जास्तीत जास्त संधी या सर्व व्यवसाय लीग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनामुळे मिळत आहे.
1980-90 च्या दशकापर्यंत भारतीय संघाबरोबर कोच किंवा मॅनेजर असायचे. विशेष म्हणजे भारताने 1983 ला क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी भारतीय संघा बरोबर कुणीही कोच नव्हता. परंतु, अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारतीय संघ जेव्हा सहभागी होतो तेव्हा त्या संघाबरोबर मुख्य कोच, सहाय्यक कोच, ट्रेनर, फिजिओ, आहार तज्ञ, जीवयांत्रिकीशास्त्र तज्ञ, क्रीडा वैद्यकशास्त्र तज्ञ, मानस तज्ञ, मसाज थेरपिस्ट अशा सपोर्ट स्टाफची मोठी फौज संघाबरोबर असते. सपोर्ट स्टाफ चे क्रीडा कार्यमानातील महत्व आता सर्वच स्तरातील खेळाडूंना पटले आहे. अशाप्रकारे गेल्या १५-२० वर्षांमध्ये क्रीडाक्षेत्र हे सामान्याकडून (general) अतिविशिष्टतेकडे (super specialisation) वेगाने वाटचाल करत आहे.
भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हा कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि नाही. केवळ ऑलम्पिक स्पर्धा अथवा साथीचा रोग आला की न्युज चॅनलवर आणि वर्तमानपत्रांमधून भारतीय पदकांची आणि रोगप्रतिकारक शक्तीची चर्चा रंगू लागते.एका बाजूला ऑलम्पिक मध्ये भारताने जास्तीत जास्त पदके जिंकावी अशी अपेक्षा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला मात्र शाळांमधून वेगवेगळ्या विषयाचा भडीमार केला जातो आणि या शैक्षणिक गर्दीमध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा हे दुर्लक्षित राहते. शाळेमध्ये विषयांची संख्या आणि शाळेबाहेर क्लासेस ची संख्या या चक्रामधे आजची तरुण पिढी अडकलेली आहे. तरुणांच्या मुक्तपणे खेळण्यावर दिवसेंदिवस मर्यादा वाढत आहेत. हे चित्र भारतातील क्रीडा विकासाला मारक आहे. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वृद्धिंगत होत जाते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी किंवा भारत हा क्रीडा देश म्हणून पुढे जाण्यासाठी भारतीय राजकारणी, समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था या सर्व स्तरांवर आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा कडे लक्ष द्यायला हवे.
भारतात आर्थिक प्रगतीच्या जोरावर विविध क्रीडा सोयीसुविधा निर्माण होत आहे परंतु, चांगले खेळाडू घडविण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक आणि प्रशिक्षक घडविणाऱ्या चांगल्या संस्थांची भारतामध्ये मोठी वानवा आहे. त्यामुळे बऱ्याच खेळांचे प्रमुख कोच हे विदेशी आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर शारीरिक शिक्षण शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता सुधारण्याकडे आणि पारंपरिकता जपत आधुनिकता आत्मसात कराव्या लागतील. भारतात ज्याप्रमाणे क्रीडा सोयीसुविधा वाढत आहेत, क्रीडा व खेळाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहेत त्या प्रमाणात तज्ञ प्रशिक्षक मात्र खूपच कमी प्रमाणात आहे. केवळ क्रीडा प्रशिक्षक नाही तर एकूणच क्रीडा क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ निर्मिती केंद्रे सध्या भारतात खूपच कमी आहेत आणि भविष्यात क्रीडा क्षेत्रात करियर च्या खूप संधी असणार आहे. अनेक आव्हानांना तोंड देत भारतातील क्रीडा विकास मंद गतीने पुढे जात आहे आणि भविष्यात हा वेग वाढेल अशी आशा आजच्या क्रीडा दिनाच्या दिवशी करू या.
डॉ. शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक,
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे.
मो. ९८९००२५२६६