Thursday, December 5, 2019
माझे प्रयोग
Tuesday, October 1, 2019
शिक्षणतज्ञ महात्मा गांधी
शिक्षणतज्ञ महात्मा गांधी
Sunday, September 1, 2019
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग
आंतरराष्ट्रीय स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कार्यशाळा, ग्वालियर – २०१९
शरद आहेर, अमित प्रभू, महेश देशपांडे आणि श्रीकांत महाडिक
Wednesday, August 28, 2019
प्रवास मेजर ध्यानचंद ते पी व्ही सिंधू पर्यंतचा
प्रवास मेजर ध्यानचंद ते पी व्ही सिंधू पर्यंतचा
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव 'ध्यान सिंग' परंतु ते रात्री उशिरापर्यंत हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं 'ध्यानचंद' हे नाव प्रसिद्ध केल. अशा वेळी आजच्या पिढीला कदाचित ध्यानचंद, खाशाबा जाधव ही नावे आणि त्यांचे कर्तृत्व व योगदान माहीत नसेल. 1928 च्या ऑलम्पिक मध्ये ध्यानचंद यांनी तब्बल १४ गोल् ठोकले होते. भारतीय संघाच्या या विजयाचं वर्णन करताना हा फक्त हॉकी चा खेळ नाही तर जादू आहे आणि मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार आहे असे म्हटले होते. ध्यानचंद यांनी आपल्या २२ वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल ४०० पेक्षा जास्त गोल केले. ब्रिटिशांच्या राजवटीत गुलामांचे जिने जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या समर्थनावर बसणारे मेजर ध्यानचंद त्यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्ता पेक्षा कमी नाही. १९२८,१९३२,१९३६ या पाठोपाठच्या ऑलम्पिक मध्ये तीन सुवर्णपदके यात ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. या भूतकाळातील दैदिप्यमान कामगिरीचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असतानाच नुकतीच एक आकडेवारी समोर आली ती म्हणजे, भारतीय खेळाडूनीं केवळ जुलै २०१९ या एका महिन्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचे मिळून 227 पदके जिंकली. हा योगायोग नसून क्रीडा क्षेत्रातही भारत झपाट्याने प्रगती करत आहे याचे हे लक्षण आहे. नुकताच क्रिकेट चा वर्ल्डकप संपला या वर्ल्डकप मधील एका सामन्यात 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघामधील एक खेळाडू समालोचन करत होता. त्यावेळेस तो म्हणाला की 1983 च्या वर्ल्डकप पूर्वी भारतीय संघ हा फक्त वर्ल्डकप मध्ये सहभागी होण्यासाठी जात होता, जिंकण्यासाठी नाही. परंतु 1983 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येक वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ हा जिंकण्यासाठीच जातो. भारतातील क्रीडा क्षेत्रात अनेक बदल घडत आहेत, भौतिक सोयीसुविधा निर्माण होत आहेत परंतु, भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये झालेला हा वरील बदल अधिक महत्त्वाचा आहे असे वाटते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना उभरत्या भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये झालेला हा सकारात्मक बदल प्रकर्षाने जाणवत आहे. एकदा एका तज्ञाने व्याख्यानामध्ये असे सांगितले होते की, भारताला ॲथलेटिक्समध्ये कधीच पदक मिळू शकणार नाही. जर पदक मिळवायचे असेल तर आपल्याला परदेशी खेळाडू आयात करावे लागतील. परंतु, गेल्या काही वर्षांमधील हिमा दास, धुती चंद, अंजू बॉबी जॉर्ज, दिपा कर्माकर या आणि इतरही खेळाडूंनी भारत कोणत्याही खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केलेला आहे. बॅडमिंटनमधील पी व्ही सिंधू सध्या जागतिक क्रमवारी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, काही वर्षांपूर्वी सायना नेहवाल जागतिक क्रमवारी मध्ये प्रथम क्रमांकावर होती. ज्या बॅडमिंटनमध्ये चीन, जपान, इंडोनेशिया या देशांचे वर्चस्व आहे, त्यामध्ये भारतीय महिला खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. बॉक्सिंग मध्येही मेरी कोम हि सध्या जागतिक एक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, आणि इतर वयोगटात सुद्धा भारतीय महिला आणि पुरुष जागतिक क्रमवारी मध्ये पहिल्या दहामध्ये आहेत. त्याचबरोबर शूटिंग, आर्चरी या खेळांमध्येही भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत ही सर्व भारतीयांसाठी अतिशय आशादायी आणि अभिमानास्पद बाब आहे.
भारतामध्ये क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचा मोठा वाटा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951 मध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली आशियाई स्पर्धा संपन्न झाली. त्यानंतर 1982 मध्ये पुन्हा एकदा आशियायी स्पर्धा भारताने आयोजित केल्या होत्या. 2008 मध्ये राष्ट्रकुल युवा स्पर्धांचे आयोजन आणि त्यानंतर 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन भारताने यशस्वीपणे केले होते. या विविध क्रीडा प्रकारांच्या आयोजना बरोबरच टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, आर्चरी अशा विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन भारताने गेल्या काही वर्षांमध्ये केलेले आहे. या सर्व स्पर्धांच्या आयोजनामुळे उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यमान जवळून पाहता आले आणि भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास या सर्व स्पर्धा आयोजनाचा मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धां बरोबरच भारतामध्ये सध्या चांगल्याच लोकप्रिय झालेल्या व्यवसायिक लीग स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट, प्रो कबड्डी, हॉकी, फुटबॉल, वॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती अशा विविध खेळांच्या व्यवसायिक लीग स्पर्धा सध्या भारतात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे भारतातील उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूं बरोबर खेळण्याचा अनुभव मिळत आहे. या व्यवसायिक लीग स्पर्धांमुळे अनेक खेळाडूंना आपले कार्यमान दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या जास्तीत जास्त संधी या सर्व व्यवसाय लीग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनामुळे मिळत आहे.
1980-90 च्या दशकापर्यंत भारतीय संघाबरोबर कोच किंवा मॅनेजर असायचे. विशेष म्हणजे भारताने 1983 ला क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी भारतीय संघा बरोबर कुणीही कोच नव्हता. परंतु, अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भारतीय संघ जेव्हा सहभागी होतो तेव्हा त्या संघाबरोबर मुख्य कोच, सहाय्यक कोच, ट्रेनर, फिजिओ, आहार तज्ञ, जीवयांत्रिकीशास्त्र तज्ञ, क्रीडा वैद्यकशास्त्र तज्ञ, मानस तज्ञ, मसाज थेरपिस्ट अशा सपोर्ट स्टाफची मोठी फौज संघाबरोबर असते. सपोर्ट स्टाफ चे क्रीडा कार्यमानातील महत्व आता सर्वच स्तरातील खेळाडूंना पटले आहे. अशाप्रकारे गेल्या १५-२० वर्षांमध्ये क्रीडाक्षेत्र हे सामान्याकडून (general) अतिविशिष्टतेकडे (super specialisation) वेगाने वाटचाल करत आहे.
भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हा कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि नाही. केवळ ऑलम्पिक स्पर्धा अथवा साथीचा रोग आला की न्युज चॅनलवर आणि वर्तमानपत्रांमधून भारतीय पदकांची आणि रोगप्रतिकारक शक्तीची चर्चा रंगू लागते.एका बाजूला ऑलम्पिक मध्ये भारताने जास्तीत जास्त पदके जिंकावी अशी अपेक्षा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला मात्र शाळांमधून वेगवेगळ्या विषयाचा भडीमार केला जातो आणि या शैक्षणिक गर्दीमध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा हे दुर्लक्षित राहते. शाळेमध्ये विषयांची संख्या आणि शाळेबाहेर क्लासेस ची संख्या या चक्रामधे आजची तरुण पिढी अडकलेली आहे. तरुणांच्या मुक्तपणे खेळण्यावर दिवसेंदिवस मर्यादा वाढत आहेत. हे चित्र भारतातील क्रीडा विकासाला मारक आहे. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वृद्धिंगत होत जाते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी किंवा भारत हा क्रीडा देश म्हणून पुढे जाण्यासाठी भारतीय राजकारणी, समाजव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था या सर्व स्तरांवर आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा कडे लक्ष द्यायला हवे.
भारतात आर्थिक प्रगतीच्या जोरावर विविध क्रीडा सोयीसुविधा निर्माण होत आहे परंतु, चांगले खेळाडू घडविण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक आणि प्रशिक्षक घडविणाऱ्या चांगल्या संस्थांची भारतामध्ये मोठी वानवा आहे. त्यामुळे बऱ्याच खेळांचे प्रमुख कोच हे विदेशी आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर शारीरिक शिक्षण शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता सुधारण्याकडे आणि पारंपरिकता जपत आधुनिकता आत्मसात कराव्या लागतील. भारतात ज्याप्रमाणे क्रीडा सोयीसुविधा वाढत आहेत, क्रीडा व खेळाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहेत त्या प्रमाणात तज्ञ प्रशिक्षक मात्र खूपच कमी प्रमाणात आहे. केवळ क्रीडा प्रशिक्षक नाही तर एकूणच क्रीडा क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ निर्मिती केंद्रे सध्या भारतात खूपच कमी आहेत आणि भविष्यात क्रीडा क्षेत्रात करियर च्या खूप संधी असणार आहे. अनेक आव्हानांना तोंड देत भारतातील क्रीडा विकास मंद गतीने पुढे जात आहे आणि भविष्यात हा वेग वाढेल अशी आशा आजच्या क्रीडा दिनाच्या दिवशी करू या.
डॉ. शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक,
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे.
मो. ९८९००२५२६६
Monday, August 19, 2019
आशेचा किरण !
आशेचा किरण !
दिनांक 2 डिसेंबर 2018 रविवारचा दिवस होता मुलीची ट्रायथलनची स्पर्धा सहकारनगरमधील संस्कृत विद्या मंदिर संस्थेच्या विद्याविकास प्रशालेमध्ये होती. यामध्ये स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग या तीन गोष्टींचा अंतर्भाव होता दुपारी तीन वाजेची वेळ दिलेली होती त्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये पोहोचलो. शाळेत गेल्या गेल्या तेथील शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. अमोल झरेकर आणि श्री महादेव ढेंबरे भेटले. मला बघितल्यावर त्यांनी विचारलं सर, तुम्ही इकडे? मी म्हटले स्पर्धेसाठी मुलीला घेऊन आलेलो आहे. मला भेटल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला होता आणि त्यांच्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण यासंबंधी काय काय अॅक्टिविटी चालतात कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत हे एकामागून एक सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही जलतरण तलाव बघायला गेलो छोटासा परंतु अतिशय चांगला जलतरण तलाव शाळेमध्ये होता झरेकर सरांनी सांगितले की इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना जलतरण हे अनिवार्य आहे व प्रत्येक विद्यार्थ्याला जलतरणाचे धडे शाळेमध्ये दिले जातात ऐकून खूपच समाधान वाटले. त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील बॅडमिंटन हॉल कडे गेलो. अतिशय उत्कृष्ट असे एक बॅडमिंटन कोर्ट या शाळेमध्ये आहे. बॅडमिंटन हॉलच्या शेजारीच एक मल्टीपर्पज हॉल या शाळेमध्ये आहे ज्या ठिकाणी योगासन, ज्युदो, कराटे, एरोबिक्स यासारख्या अॅक्टिविटी घेतल्या जातात. मल्टीपर्पज हॉल च्या शेजारीच टेबल टेनिस हॉल आहे ज्याठिकाणी दोन टेबल ठेवलेले आहेत आणि अतिशय चांगला असा टेबल टेनिस हॉल आहे. त्यानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील फुटसाल ग्राउंड कडे गेलो. फुटसल ग्राउंड बघून तर मी थक्क झालो कारण शाळेच्या टेरेस वरती अतिशय सुंदर असे फुटसाल चे ग्राउंड आहे. विशेष म्हणजे या सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये वापरायला मिळतात व त्याव्यतिरिक्तही विद्यार्थी या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर शाळेच्या बाहेरच एक छोटेसे मैदान आहे साधारणपणे ३०X ३० मीटर लांबीचे. मैदानाच्या शेजारीच 30 x 20 मीटर लांबीचा स्केटिंग ट्रॅक आहे व मैदानावरच रोप मल्लखांब चे युनिट आहे. एवढ्या सगळ्या सोयी-सुविधा एका शाळेमध्ये बघून खूपच आनंद झाला व समाधान वाटले. सध्या शारीरिक शिक्षण शिक्षकांशी बोलताना शाळेमध्ये सोयीसुविधांचा अभाव असतो अशी ओरड सर्वच शिक्षक करताना दिसतात परंतु या शाळेमध्ये शिक्षक मात्र या शाळेतील सोयीसुविधा बद्दल अतिशय भरभरून बोलत होते व समाधान व्यक्त करत होते. ते सांगत होते की आम्ही आमच्या संस्थाचालकांकडे कुठल्याही प्रकारच्या सुविधांची मागणी केली असता आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर अमोल सरांनी माझी ओळख तेथील संस्थेचे सरचिटणीस श्री विनायक जांभोरकर यांच्याशी करून दिली जांभोरकर यांना भेटल्याबरोबर त्यांनी तेथील शारीरिक शिक्षण शिक्षकांची अतिशय मुक्तहस्ते स्तुती केली. आमचे शिक्षक अतिशय चांगले काम करत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हे पण जरा विचित्रच वाटत होते कारण सर्वसाधारणपणे संस्थाचालक अथवा मुख्याध्यापक हे शिक्षकांबद्दल असमाधान व्यक्त करतात तर शिक्षक हे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याबद्दल असमाधान व्यक्त करतात परंतु इथली परिस्थिती बरोबर उलटी होती संस्थाचालक पण शिक्षकांचे भरभरून कौतुक करत होते तर शिक्षकही त्या संस्थाचालकांचे भरभरून कौतुक करत होते. येथील शारीरिक शिक्षण शिक्षकांनी सांगितले की आम्ही सकाळी सात वाजता शाळेमध्ये येतो व संध्याकाळी सात वाजताच शाळेमधून जातो. एवढा वेळ काम करूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही कारण आमचे संस्थाचालक जांभोरकर सर हे अतिशय उत्साही व सकारात्मक व्यक्ती असल्यामुळे ते नेहमी आम्हाला नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देतात आणि ते आमच्यासाठी इतकं काही करतात त्यामुळे आम्हालाही चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. असे संस्थाचालक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांचा वेगळं कॉम्बिनेशन असलेली ही शाळा बघून खूपच बरं वाटलं.कधीकधी शारीरिक शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी, समस्या, सोयीसुविधा, आणि शारीरिक शिक्षणाची शाळेमधील सद्यस्थिती या सर्वांबद्दल ऐकले की काहीसे नैराश्य येते परंतु अशा काही शाळा बघितल्या की काहीतरी आशादायक घडते आहे याचे याचे समाधान मिळते आणि हे समाधान माझ्यापुरतं न राहता ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न. आजूबाजूला नकारात्मक घटना घडल्या की काही क्षणातच सर्वांपर्यंत पोहोचतात आणि त्यांची चर्चा होते परंतु अशा काही सकारात्मक गोष्टीही सर्वापर्यंत पोहोचाव्या हीच आशा.
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास?
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास?
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास
जिथे सारखेच ओळीत किंवा गोलात उभे रहावा लागणार नाही
जिथे मला साहित्यासाठी ताटकळत थांबावे लागणार नाही
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास
जिथे शिक्षक मला रनिंग/ फ्रेंटरोल/ फ्रॉगजम्प ची शिक्षा देणार नाही
जिथे मला आवडतं ते कधीतरी करायला मिळेल
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास
जिथे शिक्षक आम्हाला म्हणणार नाही की हा घ्या बाँल आणि खेळा
जिथे तेच ते पारंपारिक मास पीटी चे प्रकार नाही घेतले जाणार
जिथे तेच ते खेळ नाही घेतले जाणार
असा असेल का शारीरिक शिक्षणाचा तास ?
जिथे मला काय येतंय हे नक्की समजेल
पंखात आत्मविश्वासाचं बळ मिळेल
असा आहे माझ्या मनातील शारीरिक शिक्षणाचा तास
मनातच राहील? की कुठे पाहायला मिळेल?
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६
स्पर्धेमध्ये शारीरिक शिक्षणच हारते आहे का?
स्पर्धेमध्ये शारीरिक शिक्षणच हारते आहे का?
शारीरिक शिक्षण आणि खेळ हा शालेय अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाचा विषय आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील एक आवश्यक विषय आहे. शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्य अथवा क्षमतांचा विकास होतो असे नाही तर शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकास होतो ज्यामुळे विद्यार्थी एकमेकाला सहकार्य करणे, मदत करणे, खिलाडू वृत्ती जोपासणे यासारख्या गुणांचा विकास शारीरिक शिक्षणामुळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर शारीरिक शिक्षण आणि खेळामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचाही विकास होण्यास मदत होते हे काही संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहेत. स्वामी विवेकानंदांनी तर असे म्हटले आहे की तुम्हाला जर गिता समजून घ्यायची असेल तर तुम्ही मैदानावर फुटबॉल खेळायला हवा, महात्मा गांधींनीही त्यांच्या शिक्षण विषयक विचारांमध्ये शारीरिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान दिलेले होते. अशाप्रकारे शारीरिक शिक्षणाचे महत्त्व वेगवेगळ्या शिक्षण तज्ञ, संशोधनाद्वारे सांगितलेले आहे.परंतु शारीरिक शिक्षणाचा खूप मर्यादित अर्थ समाजामध्ये लावला जातो. एखाद्या शाळेमधील किती विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळले, शाळेमध्ये किती संघ आंतरशालेय स्पर्धेमध्ये जिंकले, यालाच शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक, मुख्याध्यापक, पालक हे महत्व देताना दिसतात. एखाद्या शाळेमध्ये जास्त विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळले म्हणजे त्या शाळेतील शारीरिक शिक्षण व खेळाचा दर्जा चांगला आहे असे खात्रीशीरपणे म्हणता येणार नाही. कारण शाळांमधून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि शाळेची एकूण विद्यार्थी संख्या यांचे जर प्रमाण आपण बघितले तर असे लक्षात येते की शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या केवळ १० ते २० % इतकेच विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतात. असे म्हटले जाते की “ physical education for masses not for classes” कारण शाळेमध्ये 10 ते 20% विद्यार्थ्यांपुरतेच शारीरिक शिक्षण मर्यादित नाही शारीरिक शिक्षण हे शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. स्पर्धा आणि स्पर्धांमधील यश म्हणजेच केवळ शारीरिक शिक्षण नव्हे तर तो एक शारीरिक शिक्षणातील छोटा घटक आहे. परंतु सध्या त्याला वर्तमानपत्रांमधून जास्त प्रसिद्धी मिळत असल्यामुळे मुख्याध्यापक अथवा संस्था चालक यांच्या दृष्टीकोनातून आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी हे राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळायला पाहिजे अथवा आंतरशालेय स्पर्धांमध्ये आपल्याच शाळेचा संघ जिंकायला हवा जेणेकरून वर्तमानपत्र मध्ये शाळेचे नाव येईल व त्याचा फायदा शाळेची प्रतिष्ठा उंचावण्यास होईल. याठिकाणी स्पर्धा या वाईट आहेत असा म्हणण्याचा हेतू नाही तर स्पर्धेमध्ये एकूण किती विद्यार्थी सहभागी होतात आणि शारीरिक शिक्षणातील इतर जे घटक आहेत यावर किती लक्ष दिले जाते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे काराण म्हणजे कदाचित शारीरिक शिक्षणाचे स्वरूप अथवा व्याप्ती समाजापर्यंत चांगली पोहोचलेली नाही. त्यामुळे असू शकेल. केवळ स्पर्धांना महत्त्व द्यायचे नाही तर मग कशाला महत्व द्यायचे हे समजून घेण्यासाठी आपणास शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे पहावी लागतील. ती पुढील प्रमाणे शारीरिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना विविध क्रीडा कौशल्यांमध्ये सक्षम होण्यास मदत करणे, शारीरिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या शारीरिक सुदृढतेचा विकास व तो राखण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी पुरविणे, शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक हालचाली मागील शास्त्रीय तत्त्व समजण्यास मदत करणे, शारीरिक शिक्षणातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास आणि स्वसंकल्पना उंचावण्यास मदत करणे, शालेय सामाजिक शिक्षणाद्वारे शारीरिक उपक्रमात सहभागी होता येत्या उपक्रमाचा आनंद घेता येईल यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे.
वरील उद्दिष्टं वरून असे लक्षात येते की या उद्दिष्टांमध्ये कुठेही स्पर्धा कार्यमान याचा अंतर्भाव नाही. त्यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक पालक व शारीरिक शिक्षण शिक्षक या सर्वच घटकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता स्तर काय आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यासाठी लागणारे मूलभूत कौशल्य येतात का? शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची योग्य अंमलबजावणी होते का? शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन उंचीच्या प्रमाणात योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असतील तर शाळेतील शारीरिक शिक्षण यशस्वी चालू आहे असे म्हणता येईल. आजकाल वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून असे दिसून येत आहे की शालेय विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर मधुमेहा सारखे आजारही विद्यार्थ्यांना जडलेले आहेत. त्याचबरोबर आज-काल विद्यार्थ्यांचा बराच वेळ टीव्ही व मोबाईल वर जातो यालाच स्क्रीन टाईम असे म्हणतात. टीव्ही, मोबाइल या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा हालचाली या दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक सक्रियतेचा दर वाढायला हवा. आणि त्यासाठी शाळेतील शारीरिक शिक्षणाचा तास हा एक अत्यंत महत्त्वाचा वेळ आहे. परंतु या वेळेचा उपयोग कसा केला जातो हे महत्वाचे आहे. या सर्व विश्लेषणाचा सारांश करायचा झालास तर शारीरिक शिक्षणातील यशाच्या व्याख्येची पुनर्मांडणी करायला हवी आणि शारीरिक शिक्षणामध्ये क्रीडा स्पर्धा पेक्षाही बरेच काही आहे हे समाजातील सर्वच घटकांनी समजून घ्यायला हवे. आपल्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षण यशस्वी चालते किंवा नाही याचे परीक्षण करायचे झाल्यास शाळेमधून बाहेर पडणारा विद्यार्थ्याकडे जर पुढील गुणवैशिष्ट्ये असतील तर त्या शाळेतील शारीरिक शिक्षण यशस्वी चालू आहे असे म्हणता येईल. आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना अथवा बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला विविध खेळ खेळण्यासाठी ची आवश्यक कारक कौशल्य विद्यार्थी करू शकतो का?, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे का?, विद्यार्थी नियमित पणे शारीरिक उपक्रमात सहभागी होतात का?, विद्यार्थी शारीरिक सक्रिय राहण्याचे महत्त्व व फायदे जाणतात का?, विद्यार्थी शारीरिक उपक्रम व त्यांचा आरोग्यपूर्ण जीवनशैली मधील मूल्य जातात का? या निकषां बरोबर आपल्या शाळा अथवा महाविद्यालयात चालणाऱ्या शारीरिक शिक्षणाची तुलना केल्यास आपल्या शाळा अथवा महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण चांगले चालू आहे की? ते पण स्पर्धांमध्ये हरवलेले आहे हे समजेल.
शारीरिक शिक्षणाची दशा आणि दिशा: विद्यार्थ्यांच्या नजरेतून!!!
शारीरिक शिक्षणाची दशा
आणि दिशा: विद्यार्थ्यांच्या नजरेतून!!!
- शाळेमध्ये
शारीरिक शिक्षणाचे नियमितपणे तास होतात.
- शारीरिक
शिक्षणाचे आठवड्यातून 3 ते 4 तास होतात.
- शारीरिक
शिक्षणाच्या तासाला विद्यार्थी लंगडी,डॉजबॉल, टेन पासेस, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, वॉलीबॉल
यासारखे खेळ खेळतात.
- शारीरिक शिक्षणाच्या तासाला कोणते खेळ घ्यावे असे वाटते, या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल, फुटबॉल हे
खेळ घ्यावे असे सांगितले.
- नवीन नवीन खेळ शिकवावे, खेळाच्या तासाला मैदानावर सोडावे, शारीरिक
शिक्षणाचा तास होणे गरजेचे आहे, शारीरिक शिक्षणाच्या तासाला खेळच
शिकवावा इतर विषय किंवा गाणी नाही, शारीरिक शिक्षणाचा तास दररोज व्हावा,खेळामधील
करियर विषयी माहिती द्यावी अशा विविध अपेक्षा विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षण शिक्षकाकडून
आहेत.
- शारीरिक शिक्षण
तासाला साहित्य मिळत नाही असे उत्तर सर्वच विद्यार्थ्यांनी दिले.
- शारीरिक
शिक्षणाची परीक्षा होते का या प्रश्नाला काही विद्यार्थ्यांनी होते असे
म्हटले तर काही विद्यार्थ्यांनी नाही होत असे म्हटले.
सध्याच्या तंत्रज्ञान युगामध्ये विद्यार्थी मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर
इ. साहित्याच्या सहवासात असूनही विद्यार्थ्यांना
शारीरिक शिक्षणाचा तास असावा आणि तो नियमितपणे व्हावा असे वाटणे हे नक्कीच आशादायी
आहे. त्याचप्रमाणे शिक्षण प्रक्रियेत विविध विषयांची
गर्दी असूनही नियमितपणे आठवड्याला शारीरिक शिक्षणाचे तीन ते चार तास होतात ही
सुद्धा सकारात्मक बाब या सर्वेक्षणातून समोर आलेली आहे.शाळेमध्ये शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची
कमतरता असूनही विद्यार्थी शारीरिक शिक्षणाच्या तासाला फुटबॉल, कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल
यासारखे मैदानी खेळ खेळतात. शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन, प्रभावी
अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी
केंद्री अध्यापन शैली,पुरेसे साहित्य आणि उत्साही शारीरिक शिक्षण शिक्षक
या सर्व घटकांचे एकत्रीकरण झाले तर शारीरिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करता
येण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आपआपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, अभिप्राय जाणून घेतल्यास आपण
निश्चितच विद्यार्थी केन्द्रित शारीरिक शिक्षणाकडे टाकलेले ते पहिले पाऊल असेल.
शरद आहेर
चन्द्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
मो. 9890025266
Saturday, August 17, 2019
छडी लागे छम छम ?
छडी लागे छम छम ?
माझे शालेय शिक्षण ज्या शाळेमध्ये झाले ती शाळा अतिशय कडक शिस्तीची होती. त्यामुळे शाळेमध्ये असताना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झालेल्या होत्या आणि भरपूर मार खाल्लेला होता. त्यामुळे कुठलेही चुकीचे वर्तन झाल्यानंतर केवळ शिक्षा अथवा मार अथवा जोराने ओरडणे हाच एक उपाय असू शकतो हा विचार मनामध्ये जबरदस्त भिनलेला होता. त्यामुळे मी शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून जेव्हा कामाला लागलो तेव्हा या शिस्तीच्या विचाराचा माझ्यावर प्रचंड पगडा बसलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करायला मी खूप शिक्षा करू लागलो. त्यात विद्यार्थी मला घाबरायला लागले तसतसा माझा अहंकार सुखाऊ लागला. मुलं आपल्याला खूप घाबरतात याचा मला अभिमान वाटू लागला. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविण्यासाठी केवळ शिक्षा हा एकच उपाय आहे असा समज माझा असल्यामुळे व अज्ञान असल्यामुळे गेली अनेक वर्ष मी नको नको त्या शिक्षा विद्यार्थ्यांना केल्या. परंतु आज मला असे वाटते की गेली अनेक वर्ष शिस्त, शिक्षा या नावाखाली मी अध्यापनाचा आनंद म्हणावा तसा घेऊ शकलो नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या या शिक्षेबद्दलच्या विचारांमध्ये परिवर्तन घडायला काही पुस्तकांची मला खूप मदत झाली. त्या पुस्तकांमधील शिक्षे संबंधीचे विचार व दुसरी बाजू आपल्यापर्यंत पोहोचवावी असे वाटले म्हणून हा लेख लिहीत आहे. कारण तुम्ही सर्व शिक्षक म्हणून वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्य करत आहात आणि शिक्षेबद्दल आपल्या संकल्पना व विचार यामध्ये स्पष्टता यावी हाच हेतू.
शिक्षे संबंधी जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकामध्ये पुढील विचार दिलेले आहेत.
मध्यंतरी शिक्षकांनी मुलांना शारीरिक शिक्षा केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल या अध्यादेशाच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली शिक्षकांमध्ये संताप आणि भीतीची लाट उमटली. संताप यासाठी की मुलांना मारल्याशिवाय मुले अभ्यास करणार नाहीत या त्यांच्या गृहीतकाला धक्का बसला म्हणून. आता माराची भीतीच नसेल तर मुले अभ्यासच करणार नाहीत. शिक्षकांना आणखी एका गोष्टीचा राग आला की पिढ्यानपिढ्या मुलांवर अधिकार गाजवण्याचा हा अधिकार आता जातो आहे. कृष्णमूर्ती शाळांमध्ये मात्र आज नव्हे तर स्थापनेपासून शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे. बक्षीस आणि शिक्षा विरहित मुलांना शिकवायला हवे हा तिथला दृष्टिकोन आहे. कृष्णमूर्तींनी सतत ज्या गोष्टीवर खूप टीका केली असेल ती म्हणजे शिस्त होय. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांची उर्मी मरते मनाची चपळता नष्ट होते ही बाह्य शिस्तीची सक्ती मनाला मंद बनविते. खडी दाबण्याच्या यंत्राची उपमा कृष्णमूर्ती शिस्तीला देऊन त्याची दमन क्षमता स्पष्ट करतात. मुळातच शिस्तीच्या मागची वृत्ती ही लोकशाही विरोधी व हुकूमशाही असते. समोरच्याला त्याचे मतपरिवर्तन न करता सक्तीने बदलविणे त्यात गृहीत असते. त्यामुळे समोरच्याच्या भावना, मनोभूमिका याचा किंचितही त्यात विचार केलेला नसतो. एका साच्यात सर्वांना बांधण्यावर भर दिलेला असतो. स्वतंत्र विचार दाबण्यासाठी तिचा उपयोग होतो. अभ्यास न करण्याबाबत केले जाणारी शिक्षा ही आम्ही तुला अभ्यासाची आवड लावू शकत नाही इतका वेळ आणि संयम आमच्याजवळ नाही तेव्हा मी शिक्षा करतो तू त्या भीतीने अभ्यास कर, असा सरळ मामला असतो. मारामारी करणाऱ्या मुलात अतिरिक्त ऊर्जा असते त्या ऊर्जेला आम्ही वळण देऊ शकत नाही. तेव्हा मार्क आणि त्या भीतीने तुझी ऊर्जा दाबून ठेव असा सांगावा असतो. थोडक्यात मुलांशी प्रेमाने संवाद करून त्यांना बदलविण्याची आमची तयारी नसल्याने आम्ही शिक्षेचा शॉर्टकट वापरतो यावर वादविवाद होतील विद्यार्थी संख्या, वेळ सारे मुद्दे येतील पण दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. कृष्णजी म्हणतात मुलाची समज फक्त उंचावा तो स्वयंशिस्त पाळेल. शिस्तपालन यावर कृष्णमूर्तींचा दृष्टिकोन शिक्षक आणि पालकांना खूपच आदर्शवादी आणि व्यवहारिक वाटतो. मुलांना मारले नाही तर मुले अभ्यास करतील का? हा त्यांचा प्रश्न असतो. मागच्या पिढीने शिस्तीचा इतका प्रचंड प्रभाव आपल्यावर बसवलेला आहे की आपण दुसऱ्या बाजूने विचार करण्याची क्षमता गमावून बसलो आहोत. भीतीशिवाय अपेक्षित परिणाम साधला जाईल यावर आपला विश्वास उरला नाही. संवादाने प्रेमाने मुले बदलू शकतात यावर आपला विश्वास आहे का? हे मनाच्या तळात जाऊन स्वतःपुरतेच शोधले पाहिजे तर आपलाच मुळात प्रेमावर एक थेरपी म्हणून विश्वास नाही म्हणून आपण शिस्त आणि शारीरिक शिक्षा यांना कवटाळून बसतो आहोत. आमच्या सर्व चर्चांमध्ये जेव्हा बालपणीच्या जुन्या पिढीच्या चांगल्या शिक्षकांचा विषय निघतो तेव्हा हमखास ते एका गल्लीने जात तेव्हा आम्ही दुसऱ्या गल्लीने जात असू ही आमच्या चांगल्या शिक्षकाची व्याख्या. शिक्षक आणि पोलीस यातला फरक आम्ही करणार की नाही? कृष्णमूर्ती नेमके प्रेमाच्या बाजूचे आहेत ते म्हणतात प्रेम करत असाल तर शिस्तीची गरज नसते. प्रेमामुळे आपोआपच सर्जनशील बोधाचा उदय होतो. तेव्हा शिस्तीच्या गरजेपेक्षा प्रेमाची मात्रा वाढविण्याची गरज आहे. गाडी चालवताना एक्सलेटर वाढत जाताना ब्रेक वरचा पाय हळूहळू निघत जातो अगदी तसेच प्रेम वाढत जाईल त्या प्रमाणात शिस्तीची गरज संपेल.
शिक्षकांसाठी साने गुरुजी या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तका मध्ये शिस्ती संबंधी चे विचार पुढील प्रमाणे
मुळात शिक्षा करण्यातले गृहीतक समाज, पालक आणि शिक्षक यांना मान्य आहे. शिक्षेमुळे मुलं बदलतात असे सर्वांना वाटते. आपल्या समाजात मुळी चूक केल्यावर तुरुंग आणि चांगल्या कामांना पुरस्कार अशी रचना आहे. त्यामुळे शिक्षा करण्याला आपल्या समाजात प्रतिष्ठा आहे. मग त्याला शाळा अपवाद कसे असणार. “छडी लागे छम छम” हे सूत्र तर प्रतिष्ठित आहे. पालकही शाळेत येतात तेव्हा पोराला फटकून काढा! हे सांगायला येतात, यातून शिक्षेमुळे माणसं बदलतात हा समज दृढ झाला. सानेगुरुजी त्यांच्यातील अपवादात्मक क्षमा आणि प्रेम यामुळे महाराष्ट्राच्या लक्षात राहिले. ७० वर्ष आज ते महाराष्ट्रात चर्चिले जातात याचं कारण त्यांनी केलेल्या सहा वर्षाच्या नोकरीत फक्त प्रेम हीच त्यांची अध्यापनाची आणि वर्तनाची, संवादाची भाषा ठेवली. एक शिक्षक म्हणून मला शाळेत पूर्णवेळ हीच भाषा बोलने किती कठीण असतं हे अनुभवल्यामुळे मला गुरुजींचं अशक्यप्राय वाटणारा वर्तन हा कौतुकाचा विषय वाटतं. शाळेत अनेक प्रसंग येतात की जे आपल्या संयमाची परीक्षा पाहतात हे प्रसंग गुरुजीं पुढे आले आणि त्यांनी त्या प्रसंगांना प्रेमानेच प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात गुरुजी ही व्यक्ती अशक्यप्राय वाटू लागते कारण, हा सर्वसाधारण मानवी स्वभाव नाही. मानवी स्वभाव दुसर्याच्या चुका दाखवून शिस्त लावायची असा आहे. पण त्या चुकीची जाणीव करून न देता आपण योग्य वर्तन करून दाखवत समोरच्याला अंतर्मुख करत राहणे ही सामान्य मानवाच्या पलीकडे जाणारी वृत्ती आणि संतत्त्वाच्या लक्षणांशी नात सांगणारी आहे. साने गुरूजींना बघितलेल्या अमळनेरच्या सराफ सरांना गुरुजी न रागावता कसं समजावून सांगत असं विचारलं तेव्हा ते चुका केलेल्या मुलाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले “अरे आपण असे नको ना करायला? अशा शैलीत ते सौम्यपणे बोलत. मुलाच्या आत्मसन्मानाला कुठेही तडा जाणार नाही अशा रीतीने ते बोलत. यातून त्या मुलावर कोणतेही दडपण न येता तो अंतर्मुख होत असे. एवढं सगळं समजून घेतल्यावर तुमच्या माझ्यासाठी गुरुजी कसे महत्त्वाचे आहेत. एक तर आपण मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही, मुलांवर ओरडून बोलणार नाही आणि त्यांना अपमानकारक शब्द वापरणार नाही अशी प्रतिज्ञा प्रथम करायला हवी. एकदा हे ठरवून टाकलं की मग आपल्याला मुलांच्या चुका दिसल्या वर आपण वेगळे रस्ते शोधू शकू. चूक दिसल्यावर शिक्षा हेच उत्तर असल्याने इतर पर्याय आपण आज शोधतच नाही. पण एकदा शिक्षा करायची नाही हे ठरवलं की इतर पर्याय आपण शोधू शकू.
मुलांना एक मोठा माणूस समजून सन्मान देणे आणि त्याचबरोबर त्यांना अवमानकारक न बोलणं हा साने गुरुजींनी लक्षात आणून दिलेला महत्त्वाचा धडा आहे. साने गुरुजींनी विद्यार्थिदशेत हा अनुभव घेतला होता. दापोलीच्या शाळेत एक शिक्षक गुरुजींना “बावळ्या साने” या नावाने हाका मारायचे गुरुजी म्हणाले हे ऐकताना माझ्या हृदयाचे पाणी पाणी होत असे! खरोखरच का आपण बावळट आहोत? असे माझ्या मनात येत. माझा बावळटपणा दूर करणे हे त्या शिक्षकाचे काम होते परंतु, तो मार्ग मला न दाखवता नेहमी त्याच विशेषणाने मला हाक मारीत गेल्याने माझा बावळटपणा वाढला मात्र असेल. अशा रीतीने मुलांची मने आपण किती दुखावतो याची शाळेतल्या शिक्षकांना खरोखर कल्पना नसते. त्यांचा खेळ होतो परंतु मुलांचा जीव जातो. अशा वास्तवावर भाष्य करत खरा शिक्षक कसा असेल याची लक्षणे साने गुरुजींनी पुढे सांगितले. ते म्हटले खरा शिक्षक होता होईतो मुलांना शारीरिक शिक्षा करणार नाही, त्यांना दमदाटी करणार नाही, त्यांच्यावर दात-ओठ खाणार नाही, पुस्तक फेकून मारणार नाही, खरा शिक्षक मुलांना भ्याड बनवणार नाही, हसत खेळत शिकवेल तो मुलांच्या आत्म्याचे वैभव ओळखेल व त्यावर दृष्टी ठेवून सदैव वागेल, बोलेल, चालेल.
द लास्ट रिझल्ट या शारीरिक शिक्षे विरुद्धच्या मासिकाच्या संपादिकेने देशभरातील शाळांमध्ये किती मुलांना अधिकृत औपचारिकरित्या मारण्यात आले होते यासंबंधी एक सर्वेक्षण केले. ज्या शाळांनी उत्तरे पाठवली नाहीत तिथेही ज्या शाळांनी उत्तरे पाठवली तितकेच मारले जाते किंबहुना अधिकच असे गृहीत धरल्यास शाळेच्या एका वर्षात 15 लाख वेळा मारझोड करण्यात आली. या मारहाणीला शाळांनी जरी चापटी मारणे असे नाव दिले तरी त्यापैकी काही लहान मुलांना त्यासाठी इस्पितळात जावे लागणे इतकी ती जबर जखमी होती आणि ही केवळ अधिकृत म्हणजे मुख्याध्यापकांच्या ऑफिसात करण्यात आलेली मारहाण असून तिची नोंद वहीत नोंद करण्यात आली होती. मुलांना आणखी किती अनधिकृत मारहाणीला तोंड द्यावे लागत असेल धपाटा, बुक्के, केस ओढणे, हात व कान पिरगाळणे गालगुच्चे घेणे, भिंतीवर आपटने, हाताने गुदा मारणे अशा वर्गात घडणाऱ्या घटना किती असतील याचा अंदाज करणेही शक्य नाही. शारीरिक हिंसा बरोबरच मानसिक हिंसेचे ही उपरोध चेष्टा अपमान असे अनेक प्रकार होत असतात.
शारीरिक शिक्षणाच्या तासालाही वर्षानुवर्ष अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वेगवेगळे व्यायाम करायला लावतात उद. रनिंग, उठ बश्या, फ्रंट रोल, प्लांक इ. खरंतर हे सर्व व्यायाम शारीरिक सुदृढता विकासासाठी अतिशय उत्तम असे व्यायाम आहे. परंतु हेच व्यायाम शिक्षा म्हणून केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या व्यायामाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते व आयुष्यभर त्या उठबष्या लक्षात ठेवतात. आपल्या सगळ्यांनाच याची जाणीव आहे की व्यायाम हा आरोग्यदायी जीवनशैली मध्ये किती महत्त्वाचा घटक आहे. व्यायाम हा शिक्षा होऊ शकत नाही हे आपणास ज्ञात असूनही आपण त्याचा वापर शिक्षा म्हणून करतो व विद्यार्थ्यांच्या मनावर व्यायामाबद्दल ची नकारात्मक भावना आयुष्यभर बिंबवतो.
वरील सर्व विचार हे केवळ आदर्शवादी किंवा अव्यवहारिक अजिबात नाही. त्यांची अंमलबजावणी कधीतरी करून पाहू या! जेणेकरून शाळेमधील वातावरण शिक्षा विरहित, भीती विरहीत असेल आणि शिक्षक व विद्यार्थी दोघांचेही लक्ष अध्ययन अध्यापनावर असेल व अध्ययन अध्यापन हसत-खेळत व आनंदात होईल.
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, पुणे.
9890025266
पुण्यातील व्यायामाची आणि खेळांची तीर्थस्थळे
पुण्यातील व्यायामाची आणि खेळांची तीर्थस्थळे
पुण्याला ज्याप्रमाणे शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते, त्याच प्रमाणे पुणे हे क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा माहेरघर बनत आहे व देशातील आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा केंद्र म्हणून पुढे येत आहे. राष्ट्रकुल युवा स्पर्धा त्याचबरोबर खेलो इंडिया यासारख्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन पुण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे पुणे हे देशातील प्रमुख क्रीडा केंद्र समोर येत आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुण्यामध्ये असणाऱ्या क्रीडाविषयक सोयीसुविधा होय. पुण्याचा सगळ्या बाजूने झपाट्याने विस्तार होत असताना सुद्धा सुदैवाने पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये चांगली क्रीडांगणे उपलब्ध आहेत आणि पुण्यातील लोक त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. कोणती आहेत ही क्रीडांगणे आणि व्यायामप्रेमींचे तीर्थस्थळे ती पाहू या
1. बालेवाडी: पुणे शहरापासून काहीसे लांब परंतु, पुण्याचे प्रमुख क्रीडा केंद्र म्हणजे बालेवाडी. नवशिक्या खेळाडूंपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंपर्यंत बालेवाडी म्हणजे प्रमुख तिर्थस्थळ होय. अथलेटिक्स, शूटिंग, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, जिम्नास्टिक, बॉक्सिंग या सर्व खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा बालेवाडी येथे आहेत. अनेक खेळांचे राष्ट्रीय शिबिरे या ठिकाणी आयोजित केले जातात. अनेक खेळांच्या अकॅडमी या ठिकाणी चालविल्या जातात व त्यांच्यामार्फत नवीन खेळाडू घडविले जात आहेत.
2. महाराष्ट्रीय मंडळ: गुलटेकडी येथे महाराष्ट्रीय मंडळाचे 32 एकर मध्ये असलेले प्रशस्त मैदान आहे. या मैदानामध्ये ॲथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व कुस्ती अशा विविध खेळांचे प्रशिक्षण वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरात दिले जाते. त्याचबरोबर सर्वसामान्य हजारो व्यायामप्रेमी आपल्या आरोग्यचे संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या खेळांचे प्रशिक्षण आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठीची ही जागा म्हणजे बालेवाडी नंतरचे दुसरे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी प्रौढांचे विविध ग्रुप आहेत आणि ते समूहाने विविध प्रकारचे खेळ आणि व्यायाम प्रकार करताना दिसतात. तसेच याठिकाणी जिम आणि योगासने वर्गही चालवले जातात. कै. कॅ. शिवरामपंत दामले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रीय मंडळाचे हे क्रीडांगण म्हणजे पुण्यातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे.
3. बाबुराव सनस मैदान: पुण्याच्या मध्यभागी आणि सारसबागेच्या शेजारी असलेलं हे मैदान पुणे शहरांमधील ॲथलेटिक्स च्या खेळाडूंसाठी प्रमुख केंद्र आहे. ॲथलेटिक्स खेळासाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुणे महानगरपालिकेने याठिकाणी मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ॲथलेटिक्स साठी आवश्यक असणारा सिंथेटिक ४०० मीटरचा प्रमाणित ट्रॅक याठिकाणी असल्यामुळे अनेक उभरते हजारो खेळाडू या ठिकाणी आपले प्रशिक्षण घेत आहेत. रनिंग, गोळाफेक, भालाफेक, हातोडा फेक, उंचउडी, लांबउडी, तिहेरीउडी, हर्डल्स अशा अथलेटिक्स मधल्या विविध बाबींसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंबरोबरच या ठिकाणी चालायला येणारे अनेक लोक या मैदानाचा आरोग्य संवर्धनासाठी उपयोग करून घेत आहेत.
4. तळजाई टेकडी: तळजाई टेकडी हे अनेक वर्षापासून व्यायाम प्रेमींचं एक प्रमुख केंद्र आहे. परंतु, सध्या तळजाई टेकडीचा पूर्ण कायापालट झालेला आहे. तळजाई टेकडी हे एक फिटनेस पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. सर्वसामान्य व्यक्तींना व्यायाम करण्यासाठीच पुण्यामधील सर्वात उत्तम केंद्र म्हणजे तळजाई टेकडी आहे. तळजाई टेकडीकडे जाताना रस्त्यामध्येच कै. सदाभाऊ शिंदे क्रीडांगण नव्यानेच बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूने मोठा जॉगिंग ट्रॅक आहे व मध्यभागी हौशी क्रिकेटपटूंसाठी हिरवेगार असे क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या क्रीडांगणाचा हजारो हौशी क्रिकेटपटू पहाटेपासूनच आनंद घेत असतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला मध्ये-मध्ये ओपन जिम सुद्धा आहे; ज्याचा अनेक लोक उपयोग करतात. या ठिकाणी काही लोक चालतात, खेळतात, प्राणायाम करतात, मेडिटेशन करतात. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हे क्रीडांगण सामावून घेणारे आहे. हिरवेगार मैदान, रंगीबेरंगी फुलांची झाडे यामुळे मनाला वेगळीच शांतता या मैदानावर लाभते. विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या सोयीसुविधा असणारे हे मैदान सर्वांसाठी मोफत आणि खुले आहे. या मैदानातून बाहेर पडल्यावर थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला मुख्य तळजाई टेकडी आहे. तळजाई टेकडी कडे जाताना उजव्या हाताला प्रशस्त असे मंदिर आहे तर डाव्या हाताला मोठा मल्टीपर्पज हॉल आहे. ज्यामध्ये जिम, योगासने, टेबल टेनिस, स्विमिंग आणि बॅडमिंटन या सुविधा उपलब्ध आहेत. तर हॉलच्या पाठीमागे शूटिंग रेंज सुद्धा आहे. त्यानंतर येते ती मुख्य तळजाई टेकडी. पक्षांचा कलकलाट, सर्वत्र हिरवीगार अशी झाडी आणि नागमोडी वळणाने जाणारा रस्ता. तळजाई टेकडीमध्ये प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक छोटा म्हणजे साधारणपणे पाच किलोमीटरचा राऊंड आहे तर दुसरा मोठा म्हणजे आठ ते दहा किलोमीटरचा राउंड आहे. सर्वसामान्य व्यक्तींसाठी तळजाई टेकडीला चालायला जाणे म्हणजे एक आदर्श जागा आहे. तळजाई टेकडीचे वैशिष्ट्य म्हणजे टेकडी पुण्यात असूनही चालताना आपण घनदाट अशा जंगलांमधून जात आहोत, शहरापासून दूर आहोत असा भास त्याठिकाणी होतो. अनेक तरुण-तरुणींचे गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट, गप्पा मारत, हसत-खेळत चालण्याचा आणि धावण्याचा आनंद घेत असतात. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरुण-तरुणी या ठिकाणी सरावासाठी येत असतात. तसेच अनेक व्यवसायिक ॲथलेटिक्स चे खेळाडू आठवड्यातून ठराविक दिवशी या ठिकाणी सरावाला येत असतात. याठिकाणी हास्यक्लब सुद्धा चालतो. त्याचबरोबर नवीन झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी सुद्धा अनेक कार्यकर्ते व क्लब या ठिकाणी कार्यरत आहेत. मोर, ससे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यांचे वास्तव्य सुद्धा तळजाई टेकडी वर आहे व त्यांची निगा राखण्याचे काम काही क्लब करत आहेत. तळजाई टेकडीवर व्यायामाला जाणार्या लोकांसाठी पार्किंग ची समस्या अजिबात नाही, या ठिकाणी पुरेशी पार्किंगची व्यवस्था आहे. अशाप्रकारे तळजाई टेकडी म्हणजे फिटनेस प्रेमींसाठी पूर्ण पॅकेज, खरोखर तीर्थस्थळ आहे.
5. डेक्कन जिमखाना: पुण्याच्या मध्यवस्तीत वसलेले हे पुणे शहरातील व महाराष्ट्रातील एक महत्वाचे क्रीडा केंद्र आहे. या ठिकाणी क्रिकेट बास्केट बॉल वॉलीबॉल, स्विमिंग, वॉटर पोलो, टेनिस, टेबल टेनिस, बिलियर्ड्स व जिम्नॅशियम या सर्व खेळाचे प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी चालतात. या सर्व खेळांच्या अतिशय अद्ययावत अशा सोयी-सुविधा जिमखान्यावर उपलब्ध आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू डेक्कन जिमखान्यावर आपले प्रशिक्षण घेत असतात. या ठिकाणी ४५० मीटरचा ट्रॅक आहे त्यावर सकाळ-संध्याकाळ विविध वयोगटतील खेळाडू, सर्वसामान्य नागरिक आपले प्रशिक्षण व व्यायाम करतात.
6. रेस कोर्स: स्वारगेटहून हडपसरला जाताना डाव्या बाजूला रेसकोर्सचे प्रशस्त असे मैदान आहे. रेस कोर्सेचा राऊंड हा दोन किलोमीटरचा आहे. विविध वयोगटातील लोक या ठिकाणी सकाळ व सायंकाळी चालायला येतात. क्रॉस कंट्री करणारे खेळाडू आणि लांब पल्ल्याचे धावपटू यांच्यासाठी रेस कोर्स ही चांगली जागा आहे.
7. पर्वती: पर्वती म्हणजे पुण्याच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थळ. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. व्यायाम प्रेमींसाठी पर्वती महत्वाचे तीर्थस्थळ आहे. पर्वती टेकडी चढण्यासाठी एकूण 103 पायऱ्या आहेत. विविध वयोगटातील व्यक्ती या ठिकाणी पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत चालण्यासाठी येतात. एरोबिक सुदृढता अथवा स्टॅमिना वाढविण्यासाठी पर्वती अतिशय परिणामकारक आहे. पर्वती टेकडी चढून गेल्यानंतर वरती मंदिर आहे जेथून संपूर्ण पुणे आपणास दिसते.
8. वेताळ टेकडी: या टेकडीला हनुमान टेकडी ह्या नावानेही पुणेकर ओळखतात. या टेकडीवर लॉ कॉलेज रोड, MIT कॉलेज, पाषाण, गोखले नगर येथून चढून जाता येतं किंवा गाडीने ARAI रस्त्याने वर जाता येतं. सकाळी व सायंकाळी बरीच लोकं चालायला येतात. ह्यात सर्व वयोगटातील म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वजण येतात. तरुण मुलं सायकल घेऊन पण येतात. सकाळ संध्याकाळ नियमित टेकडीवर येणारी लोकं आहेत. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे जास्त लोक टेकडीवर येतात. टेकडीवरच्या चबुतऱ्यावर व्यायम्प्रेमी योगासन व सूर्य नमस्कार पण घालतात. येथील वातावरण खूप उल्हासित असं असतं. बऱ्याचदा मोर बघायला मिळतात व बरेच पक्षी दिसतात. फोटोग्राफी चा कोर्स करणारे बरेच गट पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी टेकडीवर येतात. टेकडीवर गेलं की एकदम फ्रेश वाटतं व उत्साह वाढतो.
अशी ही व्यायामाची आणि वेगवेगळ्या खेळांची केंद्र पुण्यामध्ये व्यायामाची आणि खेळांची संस्कृती वाढायला महत्त्वाचे योगदान देत आहे. खाद्य शौकीन ज्याप्रमाणे चांगलं हॉटेल कितीही दूर किंवा महाग असलं तरी त्याठिकाणी जाऊन खाण्याचा आनंद घेतात त्याप्रमाणे पुण्यामध्ये अनेक व्यायामप्रेमी आहेत आणि त्यांच्यासाठी सुदैवाने अनेक व्यायामाची मैदाने ज्याला मी तीर्थस्थळे म्हटले ते आहेत. अश्या या तीर्थस्थळच्या त्याठिकाणी जाऊन व्यायाम करण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा आनंद प्रत्येक जण घेऊ शकतो.
शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक,
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,
पुणे.
मो. 9890025266
खेळांची बाराखडी
खेळांची बाराखडी
Wednesday, August 14, 2019
'हँडबॉल' हीच भेकराईनगर या गावाची ओळख!!!
'हँडबॉल' हीच भेकराईनगर या गावाची ओळख!!!
'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'
भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER) नुकताच ...

-
शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजे ही जागतिक आरोग्य संघटनेचे अपेक्षा आणि वि...
-
युनेस्कोच्या शिक्षण विभागाने द ग्लोबल स्टेट ऑफ प्ले अशा प्रकारचा एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणासंबंधीच...
-
भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER) नुकताच ...