Friday, December 17, 2021

डोस आनंदाचा

 डोस आनंदाचा

 नुकतेच एक पुस्तक वाचत असताना डॉ. चंद्रशेखर देसाई यांचा 'आनंदी शिक्षक आनंदी विद्यार्थी' हा लेख वाचनात आला. या लेखामध्ये त्यांनी हॅपिनेस हार्मोन्स याविषयी विवेचन केलेले आहे.हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती. सर्वसामान्यपणे खेळाकडे आणि व्यायामाकडे आपला समाज केवळ शारीरिक फायद्यासाठीच बघतो परंतु, भावनिक आणि मानसिक गरजांसाठी शारीरिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव परत एकदा मला झाली.  आनंदी राहण्यासाठी किंवा 'आनंद' ही भावना निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये चार हॉर्मोन्स किंवा संप्रेरके आहेत. ती पुढील प्रमाणे

डोपामिन (D)

ऑक्सिटोसिन(O)

सेरिटोनीन (S)

एडॉर्फिन (E)

चारही संप्रेरकांचा पहिला शब्द मिळून जो शब्द तयार होतो त्यालाच डोस (DOSE)असे म्हटले आहे. अशा या चार हार्मोन्स ला हॅप्पीनेस हार्मोन्स असे म्हणतात. 

त्यातील डोपामीन हे छोट्या छोट्या कृतीमधून मिळत असते. छोटी ध्येये, आव्हाने आपण स्वतः करता आणि आपल्या विद्यार्थ्यांकरता मांडायची. ते ध्येय प्राप्त केले की विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शारीरिक शिक्षण आणि खेळांमध्ये अशा अनेक घटना किंवा परिस्थिती येतात ज्या वेळेस अशा प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. विद्यार्थ्यांमध्ये रेस लावल्यानंतर जो विद्यार्थी जिंकतो त्याच्या आनंदाला उधाण येते, फुटबॉल खेळत असताना गोल झाल्यानंतर, वॉलीबॉल, खोखो, कबड्डी यासारख्या खेळांमध्ये हे गुण मिळाल्यानंतर किंवा सामना जिंकल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शिक्षकाने शारीरिक शिक्षण तासादरम्यान विद्यार्थ्यांना अशी छोटी छोटी आव्हाने द्यायची आणि ती पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा जर दिली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हे कधीच शिक्षा वाटणार नाही. 

दुसरे आहे ऑक्सिटोसिन. जेव्हा एखाद्याला कौतुकाची थाप आपण देतो, किंवा चांगल्या गोष्टीला दाद देतो तितके ऑक्सिटोसिन तुम्हाला मिळते आणि आपल्याला आनंदाची भावना तयार होते. शारीरिक शिक्षण आणि खेळामध्ये जेव्हा विद्यार्थी चांगले कौशल्य दाखवतो, चांगले खेळतो, चांगले कार्य करतो अशावेळी नेहमीच शिक्षक त्यांचे कौतुक करतात त्यालाच मॅजिक वर्ड्स असेही संबोधले जाते. शब्बास, खूप छान, Good, Awesome या सारखे शब्द जेव्हा विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात तेव्हा विद्यार्थी आनंदी होतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठीची कोणतीही संधी दवडू नये आणि कौतुक करण्यात कंजुषी करू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे केवळ तात्पुरता आनंद मिळतो असे नाही तर पुन्हा चांगले कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत असते. 

सेरेटोनिन मिळवण्याकरता आपल्याला थोडेसे स्वतः मधून बाहेर पडावे लागते. आपण जेव्हा इतरांकरिता काहीही केले तरी स्वतःच्या शरीरात सेरेटोनिन गोळा व्हायला लागते. आपण गरजू व्यक्तींसाठी, पर्यावरणासाठी असे कोणासाठीही काही केले की, हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक अतिशय महत्त्वाचे हॅपिनेस हार्मोन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे इतरांना देण्यासाठी काहीतरी असते. ज्ञान, वेळ, पैसा, कौशल्य, प्रेम असे बरेच काही. या हार्मोनचे महत्त्व आणि ते कशामुळे तयार होते हे समजल्या नंतर शारीरिक शिक्षणामध्ये अनेक प्रसंगी याचा अंतर्भाव करता येईल. कोणत्याही वर्गामध्ये काही विद्यार्थी विशिष्ट खेळांमध्ये कुशल असतात आणि काही विद्यार्थी अकुशल असतात. अशावेळी कुशल विद्यार्थ्यांच्या मदतीने अकुशल विद्यार्थ्यांना शिकविण्यास सांगितल्यास आपल्याकडे जे कौशल्य आहे ते इतरांना शिकविण्याची प्रेरणा यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांना आनंदाची अनुभूती येईल. एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा अनुभव. पहिलीच्या वर्गाला बाई शिकवत होत्या. एकदा त्यांनी मुलांना चित्र काढायला सांगितले. तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी मदत केली आहे अशा कोणाचेही चित्र काढा, असे बाईंनी मुलांना सांगितले होते. पहिलीतील लहान मुलांनी झटपट चित्रे काढली पाटीवर. बाईंनी ती सगळी चित्रे वर्गासमोर मांडली. मुलांनी काढलेल्या त्या चित्रांवर वर्गामध्ये चर्चा सुरू केली. कोणी आईची चित्र काढले होते, कोणी बाबांचे चित्र काढले होते. एका चित्रात फक्त हात दाखवला होता. तर हा हात कोणाचा यावर बाईंनी चर्चा सुरू केली. चौकातल्या वाहतूक पोलिसाचा हात आहे, देवाचा हात आहे, शेतकऱ्याचा हात आहे अशी काही उत्तरे मुलांनी दिली. शेवटी बाईंनी ज्या मुलाने हे चित्र काढले होते त्यालाच विचारले की हा तू काढलेला हात कोणाचा? तो विद्यार्थी म्हणाला "बाई, हा हात तुमचाच!" त्या मुलाने पुढे सांगितले, मी झोपडपट्टीत राहतो. माझे कपडे खराब आहे. माझ्याकडे जुनी पुस्तके आहेत. मी पहिल्यांदा वर्गात आलो आणि या सगळ्या मुलांना पाहिल्यानंतर पळून चाललो होतो. त्याचवेळी तुम्ही वर्गाकडे येत होत्या. तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून वर्गात घेऊन आलात. मी कोणाला तरी हवा आहे ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. अशा रीतीने आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो हा संस्कार त्या बाईंनी त्यांच्या कृतीतून विद्यार्थ्यांसमोर ठेवला होता. एका शाळेमध्ये एक अथलेटिक्सचा अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता. परतू त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. चांगल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक शूज त्याच्याकडे नव्हते. अशा वेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून शिक्षकांकडे दिले व त्याला शूज आणायला सांगितले. अशा प्रकारची भावना आणि मानसिकता निर्माण होण्यासाठी शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 2019 मध्ये दिवाळीला चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी गरजू व्यक्तींना फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फराळ, पैसे किंवा कपडे देण्याचे आवाहन केले. त्याला सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गोळा झालेले फराळ, कपडे आणि ब्लॅंकेट घेऊन हे विद्यार्थी रात्री पुण्यातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तींकडे गेले आणि त्यांनी केवळ फराळ आणि कपडे दिले नाही तर त्यांच्याशी काही वेळ प्रेमाने गप्पा मारल्या, त्यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतलेले अनुभव सर्वांना सांगितले त्यावेळेस प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते. अशा रीतीने सर्वांचीच दिवाळी इतरांसाठी काहीतरी केल्याने आनंदात गेली होती. 

पुढचे हार्मोन आहे ते म्हणजे एडॉर्फिन. एडॉर्फिन निर्माण करायचे असेल तर त्याकरता व्यायाम, शरीरश्रम करणे आवश्यक आहे. तसेच आपण जेव्हा खळखळून हसतो तेव्हा भरपूर एडॉर्फिन मिळते. विविध मनोरंजनात्मक खेळ खेळताना या दोन्ही बाबींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांचा व्यायाम आणि शरीर श्रम होत असतात त्याचबरोबर विद्यार्थी मनसोक्तपणे हसत आणि खेळत असतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी शिस्तीचा अति बाऊ न करता विद्यार्थ्यांना अधिकाधिक खेळायला कसे मिळेल आणि वर्गामध्ये खेळीमेळीचे वातावरण कसे असेल याचा विचार करावा. छोट्या-छोट्या रिले, मनोरंजनात्मक खेळ, मॉडिफाइड खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद  (एडॉर्फिन) मिळू शकते.

व्यायाम, शारीरिक शिक्षण आणि खेळ याकडे केवळ वजन कमी किंवा जास्त, स्पर्धा अथवा मेडल यादृष्टीने न बघता आनंदाचा मुख्य स्रोत म्हणूनही बघू या!

संदर्भ

माणूस घडविणारे शिक्षण. मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा. पा. क्र.११३-११७




Tuesday, August 17, 2021

बुद्धिमत्तेवर मार्काची सत्ता !


बुद्धिमत्ता हा शब्द उच्चारला की,,  सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर शाळेचे प्रगतिपुस्तक येते. नव्हे ते एक समीकरणच झाले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये असणारे प्रश्न हे तार्किकतेवर व गणितीय प्रक्रियावर आधारलेले असतात. त्यामुळे वेगळ्या क्षमता आणि बुद्धिमत्तेला त्यात वाव नसतो. परंतु अलीकडच्या संशोधनांतून विशेषतः मेंदूविषयीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,  बुद्धिमत्ता नावाची एकच क्षमता नसून अनेक बुद्धिमत्तांची  वेगवेगळे केंद्रे मेंदूच्या डाव्या व उजव्या भागात असतात. हार्वर्ड गार्डनर यांच्या "फ्रेम्स ऑफ माईंड" या ग्रंथात अशा आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांचा उल्लेख केला आहे. त्या पुढीप्रमाणे 


  1. भाषिक / वाचिक बुद्धिमत्ता - भाषिक व्यवहारांची निर्मिती , भाषे / भाषांवरील प्रभुत्व , भाषेचा लवचिक वापर , काव्य , कथाकथन , कथा - कादंबरी  लेखन , चर्चा , संवाद इत्यादींमध्ये भाषेची बुद्धिमत्ता अभिव्यक्त होते . ज्या लोकांना ही बुद्धिमत्ता तीव्रतेने प्राप्त झालेली असते असे लोक साहित्यिक , वक्ते , विनोदकर किंवा अगदी उत्तम वाचकही असतात . आचार्य अत्रे , पु.ल. देशपांडे अनेक साहित्य क्षेत्रातील दिगजांची नावे आपल्याला उदाहरणादाखल घेता येतील .

  2. तार्किक / गणिती बुद्धिमत्ता - तार्किक विचार करता येणे , शास्त्रांच्या किंवा गणिताच्या क्षेत्रात अवगाहन करणे , अमूर्त गोष्टींत रमणे अशा गोष्टींतून ही बुद्धिमत्ता प्रकट होत असते . ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या व्यक्ती , प्रामुख्याने , घटनांचे विश्लेषण करणे , गणित - शास्त्रे यांतील प्रश्नांची उकल करणे , अशा बाबीमध्ये चांगले तयार असतात . आईनस्टाईन , रसेल , रामन अशी अनेक उदाहरणे सांगता येतील . 

  3. सांगितिक बुद्धिमत्ता - गुणगुणणे , ताल , लय यांचे आकलन होणे , त्यांचा वापर करता येणे , आवाजाबाबत संवेदनशील असणे , गाण्यांची धून आठवणे , म्हणता येणे इ . यांमधून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होते . गायक , संगीतकार , वादक , काव्यगायक अशा लोकांचा या प्रकारात समावेश होतो . कुमारगंधर्व , लता मंगेशकर , रवी शंकर अशी अनेक नावे आपण या प्रकारात सागू शकू .

  4. अवकाशीय दृष्टीगोचर / बुद्धिमत्ता (Visual-Spatial Intelligence) - पाहिलेल्या रचना , आकार याचे मनात चित्र तायर करता येणे , भौगोलिक नकाशे करता येणे , समजणे , अंतराचा अंदाज घेता येणे अशा अनेक कृतींतून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होत असते . चित्रकार , वास्तुरचनाकार , शिल्पकार , अभियंते , शल्यविशारद अशांसारख्यांना प्रामुख्याने अशी विशेष दृष्टी असते . कोलंबसाला ही बुद्धिमत्ता होती असे म्हणता येईल . 

  5. शारीरिक स्नायुविषयक बुद्धिमत्ता - आपल्या संपूर्ण शरीराचा किंवा एखादी विशिष्ट अवयवांचा वापर करून भावना व्यक्त करता येणे किंवा उत्तम खेळता येणे , उत्तम शारीरिक नियंत्रण , अवयवांचे परस्पर संघटन किंवा हाताने करून पाहून गोष्ट शिकता येणे अशा प्रकारांतून ही बुद्धिमत्ता व्यक्त होते . नर्तक , खेळाडू , पोहणारे किंवा शल्यविशारद यांना अशातर्‍हेची  बुद्धिमत्ता असते .

  6. व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) - स्वतःच्या मनात डोकावता येणे , स्वतःच्या भावना ओळखता येणे , त्यांवर नियंत्रण ठेवता येणे किंवा अध्यात्मिक अनुभव घेता येणे या प्रकारच्या बुद्धिमत्तेला व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता असे म्हणतात . संयमित , ध्यानधारणा करणारे , भावनांचे उद्दिपन होऊ न देणारे असे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . स्थितप्रज्ञ , संत , अध्यात्मिक गुरू यांचा यात समावेश करता येतो 

  7. आंतर - व्यक्ती बुद्धिमत्ता (Intrapersonal Intelligence) - दुसऱ्यांशी संवाद साधता येणे , मिळून मिसळून वागता येणे , दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणे , दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणे अशा क्षमता असणारे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . नेते , शिक्षक , विक्रीकरणारे किंवा लोकांच्यात रमणारे , एकत्रित काम करायला आवडणारे असे हे लोक असतात . दुसऱ्यांच्या भावनांची जपणूक करणे , किंवा दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे हे यांना चांगले जमते . महात्मा गांधी , हिटलर किंवा कृष्णमूर्ती , रजनीश अशा मोठ्या लोकांचा समावेश आपण या गटात करू शकतो . अलीकडे आणखी एका बुद्धिमत्तेचा , गार्डनर यांनी , आपल्या यादीत समावेश केला आहे . ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता . 

  8. सृष्टपदार्थविषयक बुद्धिमत्ता - निसर्गातील पशु - पक्षी - प्राणी , झाडे , खडक , नद्या - डोंगर अशा गोष्टींविषयी ओढ असणे , त्यांचे - त्यांच्या स्वरूपाचे आकलन असणे , त्यांविषयी जवळिक वाटणे , किंवा निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हे या बुद्धिमत्तेच्या माणसांचे विशेष आहेत . या लोकांना , रानावनांतून हिंडण्याच्या शिकारीची , डोंगर चढण्याची किंवा वनस्पतींचा , प्राण्यांचा अभ्यास करण्याची आवड असते . डार्विनचे ठळक नाव यासंदर्भात आपल्यासमोर येईल . 

अशा प्रकारे बुद्धिमत्ता एक नसून अनेक आहे आणि प्रत्येक मनुष्याला यापैकी काही बुद्धिमत्ता उपजत प्राप्त  झालेल्या असतात. असा एकही मनुष्य नसतो की ज्याला एकही बुद्धिमत्ता नाही किंवा असा आहे कोणी नसतो की त्याला सर्वच बुद्धिमत्ता तीव्रतेने प्राप्त झालेल्या आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्ती ही इतरांपासून भिन्न असते. शाळेच्या संदर्भात हा सिद्धांत लागू केला तर असे लक्षात येईल की शाळेत आजवर केले जाणारी 'हुशार' आणि 'ढ'  विभागणी चुकीचे आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी एखाद्या गोष्टीत 'हुशार' असेल तर तोच दुसऱ्या कुठल्यातरी बाबतीत 'ढ' असेल. त्यामुळे शाळेत प्रत्येकजण कशात तरी 'हुशार' आणि कशात तरी 'ढ'  असतो.विद्यार्थ्यांमधील विविध बुद्धिमत्तांचा शोध घेणारी त्या  बुद्धिमत्तांच्या  विकासाला वाव देणारी आणि त्या बुद्धिमत्तांच्या दिशेने कौशल्य पुरविणारी अशी नवी शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे.

काही वर्षापूर्वी 'शिक्षणाच्या आईचा घो' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुलाला क्रिकेटची प्रचंड आवड असते आणि कौशल्यही असते तर वडिलांना मात्र आपल्या मुलाने शाळेमध्ये चांगले गुण मिळवावे अशी प्रखर इच्छा असते. मुलगा व वडीलांमधला संघर्ष या सिनेमामध्ये दाखविलेला आहे. अनेक विद्यार्थी अशा प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आहेत.शिक्षणाच्या दबावामुळे आणि पालकांच्या महत्वकांक्षामुळे आज अनेक विद्यार्थी त्यांच्यातील बुद्धिमत्ता काय आहे हे माहीत असूनही ते त्यांचे आवडीचे क्षेत्र अथवा क्रीडाक्षेत्र सोडून देतात   अशाच संघर्षाला बळी पडलेल्या काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता एका विद्यार्थिनीने सांगितले की तिला परीक्षेत खूप कमी मार्क मिळायचे त्यामुळे घरचे सारखेच टोमणे मारायचे, इतर विद्यार्थ्यांशी तुलना करायचे त्याला कंटाळून शेवटी तिने खेळ सोडून दिला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, तो खेळामध्ये खूप चांगली प्रगती करत होता, वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदकही मिळविल होते परंतु घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्याने शेवटी क्रीडा क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. अशा अनेक खेळाडूंना किंवा वेगळी बुद्धिमत्ता असणार्‍या बालकांना पाठिंब्याची नितांत गरज आहे. शिक्षक आणि पालकांनी बालकातील बुद्धिमत्ता ओळखून ती वृद्धिंगत करण्यासाठी संधी पुरविण्याची आणि संपूर्ण पाठिंबा देण्याची गरज आहे.

संदर्भ: 

प्रा. रमेश पानसे. आजचे शिक्षण: उद्याचे जीवन 


शरद आहेर 


 

Sunday, July 11, 2021

संघर्षातून उत्कर्ष !!!


 

झरे (ता. करमाळा, जि.सोलापूर) या  अत्यंत खेडेगावातील व आई वडील शेतमजुरी करून पोट भरतात अशा परिस्थितीत एक व्यक्ती मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण  संचालक पदापर्यंत पोहोचते. ही संघर्षमय कथा आहे डॉ.मोहन आमृळे यांची. शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाच्या माहेर घरी म्हणजे पुण्यात येतात. बी.पी. एड ला प्रवेश घेतात. परंतु फी भरण्यासाठी पैसे नसतात. त्यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या फीचे पैसे देतात. त्यानंतर एम.पी.एड साठीही प्रवेश घेतात. वेगवेगळी कामं करून काही फी ते भरतात तर काही मित्र फी साठी मदत करतात. कधी मेसचे पैसे माफ केले जातात, कधी मित्र भरतात, हॉस्टेलची फी भरण्यासाठीही पैसे नसतात तेव्हा मित्रांच्या रूमवर राहतात. अशा अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत आमृळे सरांनी आपले बी.पी.एड व एम. पी. एड पूर्ण केले. त्यानंतर एका शाळेमध्ये काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांना महाविद्यालयामध्ये नोकरी मिळते. 2003 मध्ये पुण्यातील सर्वात मोठे फर्ग्युसन महाविद्यालयात कोणाचाही पाठिंबा आणि वरदहस्त नसतांनाही शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पदी निवड होते. अशा प्रकारे त्यांच्या संघर्षाचा प्रवास काही प्रमाणत कमी होऊन उत्कर्षाच्या प्रवासाला सुरुवात होते. या संपूर्ण प्रवासात त्यांना प्रा. सुनीता कुलकर्णी, प्रा. पुरुषोत्तम  पटेल, नेस वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत तुलकर, कै. अशोकराव मोरे  व विद्यार्थी सहाय्यक समिती या सर्वांनी आर्थिक व सर्वप्रकारची मदत या संघर्षमय काळात केली. त्यानंतरही स्वस्थ बसत ते आमृळे सर कसले? थोड्याच दिवसात सरांनी विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदासाठी सरांची नियुक्ती झाली. थोड्याच कालावधीत सरांनी धडाकेबाज निर्णय घेतले जे क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड (Milestone) ठरत आहे. 

डॉ.मोहन आमृळे यांनी मुंबई विद्यापीठाच्याा संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण  कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेले बदल पुढील प्रमाणे

१. खेळाडूंना स्पर्धाकाळात मिळणारा दैनिक भत्ता (DA) २५० होता त्याच्यात वाढ करून थोड्याच दिवसात ४५० केला आणि नुकताच तो 1000 रुपये केला.  खेळाडूंना इतका दैनिक आत्ता देणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.




2. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे बजेट १ कोटीवरुन  वरून ४ कोटी   करण्यात आले. 



३. खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान प्रवास सुद्धा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

४. मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचे अनुदान २५ लाखावरून १ कोटी ३० लाख करण्यात आली. 

५. आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला मिळणारे अनुदान १ लाखावरून ६ लाख रुपये करण्यात आले.


६. स्पर्धांमधील गैरप्रकार कमी करण्यासाठी ज्या संघांनी आणि खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असेल अशाच संघांना आणि खेळाडूंना खेळण्यास पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सरांवर विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमृळे  सर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे इतर खेळाडूंवर होणारा अन्याय कमी झाला. 

७. आमृळे सरांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या वर्षी विविध स्पर्धांच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर खेळाडूंची निवड, स्पर्धा आयोजन यासंबंधी वाद-विवाद झालेले निरीक्षणास आले. त्यामुळे पुढील वर्षी सरांनी एक समिती स्थापन करून मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांची एक घटना किंवा धोरण निश्चित करण्यात आले. ज्यामध्ये स्पर्धा आयोजन, स्पर्धांच्या रचना, स्पर्धा पद्धती, खेळाडू निवड पद्धती अशा विविध घटकांबद्दल निश्चित असे धोरण ठरविले. त्यामुळे असे वाद-विवाद टळतील अशी सरांना आशा आहे. विद्यापीठाची ही घटना किंवा धोरण हे इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. एकूणच मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये पारदर्शकता आणून यंत्रणा सुधारण्यावर सर भर देत आहेत जेणेकरून तरुण आणि तरुणी खेळाच्या मैदानाकडे आकर्षिले जातील. या सगळ्याचा परिणाम खूप चांगला दिसत आहे. 

भविष्यामध्ये क्रीडा विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटलायझेशन करण्याचा सरांचा मानस आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाखापासून १ कोटी पर्यंत शिष्यवृत्ती देण्याची सरांची योजना आहे. थोड्याच दिवसांमध्ये ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडिया मध्ये ऑलम्पिक पदकांबद्दल चर्चा आणि विश्लेषण सुरू होतील. परंतु पदक विजेते निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तिंचीही तितकीच आवश्यकता आहे.

मोहन आमृळे सरांच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता मला महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होता, आणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल. याच पद्धतीने टोकाचा प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि प्रखर इच्छाशक्ती  डॉ.मोहन आमृळे  सरांचे स्वभाववैशिष्ट्ये आहे. अशाच प्रामाणिक आणि तळमळ असणार्‍या शिक्षकांची आज  केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे.

Wednesday, June 30, 2021

शारीरिक शिक्षणातील प्रयोग -क्रीडा शिक्षण अभ्यासक्रम मॉडेल

 

शालेय शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या बोर्ड्सचा वेगळा आहे. विषयाचे नाव आरोग्य व शारीरिक शिक्षण असे आहे परंतु प्रत्यक्षात शाळेमध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाप्रमाणे चालते की क्रीडेवर अधिक भर दिला जातो याबाबत शारीरिक शिक्षण शिक्षक आणि  शारीरिक शिक्षणातील तज्ञ यांच्यामध्ये  मतमतांतरे आहे. बोर्डाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम राबवावा की स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल करून अभ्यासक्रम राबवावा याबद्दलही शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये द्विधा मनस्थिती  आढळते. काही शाळांमध्ये मात्र त्यांच्या शाळेपुरता शारीरिक शिक्षणाचा वेगळा अभ्यासक्रम तयार करून तो राबविला जात आहे. शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे  वेगवेगळे मॉडेल्स आहेत व हे  मॉडेल्स वेगवेगळ्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत.  शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे मॉडेल्स कोणते ते जाणून घेऊ या  

  1. बहूपक्रम मॉडेल: हे मॉडेल विशेषत: माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम तयार करताना उपयुक्त आहे.या मॉडेलचा प्राथमिक हेतू विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शारीरिक उपक्रम व  खेळांची ओळख करून देणे हे होय. 

  2. सुदृढता शिक्षण मॉडेल: सुदृढता शिक्षण मॉडेलचा उद्देश शारीरिक स्वास्थ्य सुधारणे आणि आयुष्यभर टिकविणे हे आहे. 

  3. अजीवन  शारीरिक उपक्रम मॉडेल: विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचा शारीरिक उपक्रम निवडून त्यामध्ये अजीवन सहभागी होण्यासाठी व सक्रिय राहण्यासाठी मदत करणे हे या मॉडेलचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

  4. हालचाल शिक्षण मॉडेल: नृत्य, खेळ आणि जिम्नॅस्टिक्ससारख्या क्षेत्रातील विविध हालचालींच्या कौशल्यांचा शोध घेण्यावर जोर देणे हे या क्षणाचे शैक्षणिक मॉडेलचे मूळ उद्दीष्ट आहेत.

  5. क्रीडा शिक्षण मॉडेल: सायडनटॉप यांनी  विद्यार्थ्यांना क्रीडा साक्षर बनविण्याच्या उद्देशाने क्रीडा शिक्षण मॉडेलची रचना केली.विद्यार्थ्यांना विविध खेळ व शारिरीक क्रिया शिकवून प्रामाणिकपणाची मनोवृत्ती निर्माण करणे आणि केवळ चांगले खेळाडूच नव्हे तर क्रीडाप्रेमी  व्यक्तींचा विकास करणे हे या मॉडेलचे मुख्य उद्दीष्ट आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची विविध मॉडेल्स आहेत. परंतु बहु-उपक्रम  मॉडेल अधिक वापरले जात होते.परंतु गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाचे मॉडेल अधिकाधिक वापरले जात  आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एक अहवालनुसार "क्रीडा आणि क्रियाशील मनोरंजन (Active Recreation) हे सर्व वयोगटाच्या आणि क्षमतांच्या व्यक्तीच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या वाढीसाठी मदत करतात." हे मॉडेल कोणत्या शाळेत राबविले जाते? कसे राबविले जाते याबाबतीत उत्सुकता होती. त्यासाठी काही शिक्षक मित्रांकडून माहिती घेऊन ज्या शाळांमध्ये हे मॉडेल राबवले जात आहे त्या शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली असता महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी समोर आल्या त्या पुढील प्रमाणे 


  • इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षण मॉडेल लागू केले जाते

  • इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख करून दिली जाते.

  • पुढच्या वर्गात म्हणजे तिसर्‍या इयत्तेपासून एका खेळामध्ये स्पेशलायझेशन दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, द्वंदात्मक खेळ इत्यादी विविध पर्याय दिले जातात.

  • क्रीडा शिक्षण मॉडेल शाळेच्या आधी किंवा नंतर लागू केले जाते, शाळेच्या नियमित वेळेदरम्यान नाही.

  • क्रीडा शिक्षण मॉडेल दररोज सोमवार ते शनिवार या कालावधीत राबविला जातो आणि एका सत्राचा कालावधी 90 मिनिटांचा असतो.

  • प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमला जातो

  • प्रत्येक खेळाचे वार्षिक नियोजन आणि सत्र नियोजन असते

  • विद्यार्थी दरवर्षी एक वेगळा खेळ निवडू शकतो किंवा प्रत्येक वर्षी समान खेळ निवडू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यास आवडीचे स्वातंत्र्य दिले जाते.

  • विद्यार्थ्यां खेळामध्ये चांगला सहभाग घेतात कारण, त्यांना त्यांचा आवडता खेळ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.

  • अधिककरून  विद्यार्थी फुटबॉल आणि बास्केटबॉलची निवड करतात.

  • उच्च कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत काही सवलती दिल्या जातात उदाहरणार्थ प्रशिक्षणासाठी अधिक वेळ दिला जातो, आवश्यक असल्यास आर्थिक मदत दिली जाते, शाळेत उपस्थितीत सवलत दिली जाते.

  • क्रीडा शिक्षण मॉडेलच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसे साहित्य  उपलब्ध करुन दिली जातात. विद्यार्थी - साहित्य प्रमाण साधारणत: 1/5: 1 असते जे खूप चांगले आहे.

  • क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ किंवा उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. 

  • या शाळांमधील क्रीडा शिक्षण मॉडेल व्यतिरिक्त शालेय वेळापत्रकात देखील शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. ज्यामध्ये योग, फिटनेस, तायक्वांदो इ. उपक्रम घेतले जातात 

  • विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकण्याचे आणि निवडण्याचे स्वातंत्र्य मिळण्याचा पर्याय आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र कोच हे क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य आहे. 


युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शारीरिक शिक्षण आणि खेळांसाठी आठवड्यातून किमान 120 मिनिटे असावीत. परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणार्‍या शाळेमध्ये आठवड्यातून 450 मिनिटे शारीरिक शिक्षण आणि खेळासाठी दिले जातात. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत आणि क्रीडा शिक्षण मॉडेलची अंमलबजावणी करणार्‍या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी  90 मिनिटे हालचाली करतात हे अतिशय सकारात्मक आहे. शारीरिक शिक्षण या विषयाची प्रत्यक्ष शाळेतील परिस्थिती पाहिल्यानंतर अथवा ऐकल्यानंतर मनामध्ये निराशाजनक भावना येतात परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर  निश्चितच प्रेरणादायी आणि सकारात्मक भावना माझ्या मनात निर्माण झाल्या होत्या. तोच अनुभव शारीरिक शिक्षण क्षेत्रातील सर्वांना यावा हाच हा ब्लॉग लिहिण्याचा उद्देश आहे.  क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शाळांचाही काही मर्यादा असतीलही तरीसुद्धा वरील बाबींचा विचार करता क्रीडा शिक्षण मॉडेल हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच यशस्वी मॉडेल आहे असे म्हणता येईल. असे प्रयोग इतर शाळेतही सुरू होतील अशी आशा.  


 शरद आहेर 

चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे 

Thursday, May 13, 2021

एरोबिक्स

विद्यार्थ्यांचा आवडता उपक्रम-एरोबिक्स !

लेझीम, सह-साहित्य कवायती आणि झांज यासारख्या तालबद्ध उपक्रमांची महाराष्ट्रा  मध्ये मोठी परंपरा आहे. या तालबद्ध उपक्रमांमध्ये आता 'एरोबिक्स' या उपक्रमाचा गेल्या काही वर्षापासून समावेश झाला आहे.  एरोबिक्स ही संकल्पना काही वर्षांपूर्वी केवळ जिम किंवा हेल्थ क्लब यांच्याशी संबंधित होती. परंतु सध्या एरोबिक्स हा तालबद्ध उपक्रम केवळ शहरी भागातील नव्हे तर खेड्या पाड्या वरील शाळेच्या मैदानावरही मोठ्या उत्साहात केला जातो. याचे सर्व श्रेय चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या  डॉ. नयना निमकर यांचे. 

मॅडमच्या प्रयत्नांमुळेच केवळ  बी.पी. एड अभ्यासक्रमातच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 'एरोबिक्स' या उपक्रमाचा समावेश करण्यात आला.  या उपक्रमाचे महत्त्व बीपीएड करणाऱ्या भावी शारीरिक शिक्षण शिक्षकांना समजले आणि जेव्हा हे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले त्यावेळी त्यांनी हा आधुनिक तालबद्ध उपक्रम आपआपल्या शाळेमध्ये घ्यायला सुरुवात केली. अनेक वर्षानुवर्ष त्याच-त्याच सह-साहित्य कवायती नाखुषीने करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एरोबिक्स मुळे नवचैतन्य संचारले  आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.कारण, अनेक वर्षानंतर शारीरिक शिक्षणात काहीतरी नवीन उपक्रम आला होता, तालबद्ध उपक्रमांसाठी एक पर्याय आला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा एरोबिक्स साठी म्यूजिक सुरू होते तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा जोष संचारतो आणि हिरमुसलेल्या चेहर्‍यांवर हास्य उमटते. अजूनही शाळेत एरोबिक्स सुरू झाल्यानंतर ज्याप्रमाणे खेडे गावात एखादी नवीन गाडी आल्यानंतर सर्व गाव बघण्यासाठी गोळा होते तसे आसपासचे लोक कुतुहलाने बघतात. जणूकाही शारीरिक शिक्षणाच्या तासात संगीत लाऊन  काय प्रकार चालू आहे ?  एरोबिक्स हा उपक्रम केवळ मुलीं मध्येच लोकप्रिय नसून विद्यार्थीही याकडे आकर्षिले गेले आहेत. अतिशय कमी जागेत आणि संगीताच्या तालावर हा उपक्रम केला जातो त्यामुळे सर्वच वयोगटाच्या व्यक्तींचा हा आवडता उपक्रम आहे . 

महत्व 
  •  रुधिराभिसरण दमदारपणा वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 
  • आपल्या हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती सुधारली
  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 
  • तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत 
  • स्नायू मजबूत होतात आणि टोन सुधारतो 

एरोबिक्स म्हणजे एक प्रकारचे शिस्तबद्ध असे नृत्य आहे. ज्यामध्ये मार्चिंग, साइड टू साइड, L-शेप,  डबल साइड टू साइड, ग्रेप वाइन यासारख्या मूलभूत प्रकार किंवा हालचाली आहेत. या हालचालींच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारच्या रचना तयार करता येतात. एरोबिक्स करताना हे प्रकार उजव्या आणि डाव्या बाजूला एकसारखे केले जातात. गाण्याची निवड हा एरोबिक्स मधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.त्यासाठी काही नियम नाही परंतु  गाणे हे जोषपूर्ण असावे.  सध्या अनेक शाळांमध्ये संपूर्ण शाळेचे एकत्रित एरोबिक्स आठवड्यातून एकदा घेतले जाते. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा वार्षिक क्रीडा महोत्सव या कार्यक्रमांमध्ये विविध प्रात्यक्षिके सादर केली जातात.  त्यामध्ये सध्या एरोबिक्सचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आढळतो. 

शिक्षकांसाठी काही शिफारशी 

  • विद्यार्थ्यांना सुरूवातीला मूलभूत स्टेप्स शिकवाव्या 
  • शारीरिक शिक्षण तासात आठवड्यातून किमान एकदा काही वेळ एरोबिक्स घ्यावे 
  • नवनवीन आणि लोकप्रिय गाण्यांचा समावेश करावा 
  • विद्यार्थी नेत्यांचा (Leaders) सहाय्याने घेता येईल 
  • मूलभूत स्टेप्स च्या एकत्रीकरण करून नवीन रचना तयार करण्यासाठी विद्यार्थांना प्रोत्साहित करावे 
एरोबीक्स हा उपक्रम कमी जागेत मनोरंजनाच्या माध्यमातून आणि आजच्या तरुण-तरुणींना आकर्षित करेल अशा प्रकारचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने आपल्या शाळेत हा उपक्रम सुरू करून तरुण तरुणींना आनंददायी उपक्रमाचा आनंद द्यावा. 

शरद आहेर 
मो. 9890025266 

Thursday, May 6, 2021

अनोखी स्पर्धा अडथळ्यांची !


अनोखी स्पर्धा - अडथळ्यांची !


 

स्पर्धा म्हटली म्हणजे कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल यासारख्या खेळांची आठवण होते. या खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष कौशल्यांवर प्रभुत्व मिळवावं लागतं, त्या खेळातील कौशल्य, डावपेच यांचा सराव करावा लागतो.आणि त्यानंतर स्पर्धेत सहभागी होतात. निरीक्षणावरून असे लक्षात येते की, विशिष्ट खेळ खेळणारे अथवा विशिष्ट खेळातील कौशल्यांवर प्रभुत्व मिळविले निवडक विद्यार्थीच शाळेमध्ये असतात. कोणत्याही खेळांमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी स्व क्षमता, वैयक्तिक आवड-निवड, कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय वातावरण, सोयीसुविधा, स्व प्रेरणा इ घटक कारणीभूत असतात. त्यामुळे शाळेत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी वरील काही कारणांमुळे स्पर्धात्मक खेळांमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी स्पर्धात्मक अनुभवापासून वंचित राहतात. 

त्यामुळेच चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढता, शारीरिक सक्रियता आणि शारीरिक साक्षरता या घटकांची जागृती निर्माण करण्यासाठी, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष कौशल्यांची आवश्यकता नसलेली, स्पर्धात्मक अनुभवापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आजच्या तरुण तरुणींना आकर्षित करेल अश्या अडथळा शर्यत (Obstyrace) या स्पर्धेची सुरुवात २०१७ पासून केली. 


अडथळा स्पर्धेची काही वैशिष्टे पुढीलप्रमाणे 

  • या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे ८ ते १२ इतके अडथळे पार करावे लागतात. 
  • यामध्ये रनिंग,  वस्तू ओढणे, ढकलणे, वस्तूच्या वरुन उडी मारणे, तोल सांभाळत चालणे अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव असतो 
  • ही स्पर्धा सांघिक स्वरूपात घेतली जाते. कोणत्याही खेळात एका संघात जास्तीत जास्त ११ खेळाडूंचा सहभाग असतो. परंतु अडथळा शर्यत या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून 25 विद्यार्थ्यांचा संघ स्पर्धेत सहभागी होतो. 
  • स्पर्धेचे आयोजन अतिशय काटेकोरपणे केलेले असते. सहभागी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, केळी, बसण्याची व्यवस्था, स्पर्धेदरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, झुंबा यांचा अंतर्भाव केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंददायी अनुभव यावा.
  • स्पर्धा अडथळ्यांची असल्यामुळे दुखापतीची शक्यता असते हे लक्षात घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पूर्णवेळ ॲम्बुलन्स व डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळतात. 
  • स्पर्धा म्हटल्या म्हणजे विजेत्या आणि उपविजेत्या संघांनाच केवळ पारितोषिके मिळतात. परंतु या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मुलांच्या १२ संघांना आणि मुलींच्या ८ संघांना पारितोषिके दिली जातात. सहभागी होणाऱ्या तेक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते.

  • सर्वसाधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट दर्जाचे असते. परंतु आंतरशालेय स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच दर्जाचे उत्तम आयोजन आणि नियोजन अनुभवण्याची संधी सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे दिली जाते. 
महत्व: 
  • शारीरिक सुदृढता, आव्हान Challenge) आणि मनोरंजन हे एकाच उपक्रमातून साध्य 
  • ताकद, दमदारपणा, शक्ती, चपळता, वेग अशा विविध सुदृढता विकास एकाच उपक्रमातून 
  • उपलब्ध जागेत करता येतो 
  • अडथळा कायमचा (permanent) असल्यास विद्यार्थी मिळेल त्या वेळेत, मधल्या सुट्टीत करतात 

दर वर्षी या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील ७० ते ८० शाळा सहभागी होतात. दर वर्षी स्पर्धेच्या स्वरूपामध्ये काहीतरी नाविन्यता आणण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. अडथळा स्पर्धा ही केवळ स्पर्धाच नसून शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला नियमितपणे घेण्याचा एक उत्तम उपक्रम सुद्धा आहे. नियमित व्यायामापेक्षा वेगळे आणि आव्हानात्मक उपक्रम असल्यामुळे विद्यार्थी याकडे आकर्षिले जातात आणि नकळत विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता वाढण्यास मदत होते तसेच  शारीरिक सक्रियता  पातळी उंचावण्यास ही मदत होते. सध्या ही स्पर्धा केवळ पुणे शहरापुरती मर्यादित आहे.या उपक्रमासाठी विशिष्ठ मैदान लागते असे नाही तर, शाळेमध्ये जी काही जागा असेल त्या जागेमद्धे हा उपक्रम घेता येतो. शाळेच्या पायर्‍या, उंच भाग, खोल भाग अशा शाळेतील नैसर्गिक घटकांचा उपयोग अडथळ्यांसाठी करता येतो. परंतु प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने आपापल्या शाळेत अडथळा शर्यत स्पर्धेची किंवा उपक्रमाची अंमलबजावणी केल्यास इतर खेळाच्या स्पर्धेत सहभागी न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक मेजवानीच  ठरेल. 





Tuesday, April 13, 2021

शारीरिक शिक्षण तासातील वेळेचे गणित

 



शारीरिक शिक्षण तासातील वेळेचे गणित    

असे म्हणतात की, विद्यार्थी शारीरिक शिक्षण तासापेक्षा मधल्या सुट्टीत अधिक मनसोक्त आणि आनंदाने खेळतात. मधली सुट्टी आणि शारीरिक शिक्षणाचा तास हे दोन प्रसंग डोळ्यासमोर आणले तर लक्षात येते की,  मधल्या सुट्टी मध्ये विद्यार्थी मिळेल त्या साहित्यात वेळ न दवडता मित्रांसोबत खेळताना दिसतात. याउलट शारीरिक शिक्षणाच्या  तासामध्ये सर्वसाधारणपणे पुढील चित्र दिसते. ओळीने मैदानावर येणे, शिक्षकांच्या सूचना ऐकणे, प्रास्ताविक हालचाली करणे, गट करणे, साहित्याची वाट पाहणे, कौशल्य सराव अथवा खेळ खेळणे आणि ओळीने वर्गात जाणे. अशा पद्धतीने शारीरिक शिक्षणाचा 30 मिनिटाच्या तासामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुदृढता/कौशल्य सराव अथवा खेळण्यास किती वेळ मिळतो ? याचा आढावा या लेखात घेऊ या 

शारीरिक शिक्षणाचा तास हा विविध भागांमध्ये विभागलेला असतो. आयोजन कालावधी (Management time), सूचना कालावधी (Instruction time), शैक्षणिक अध्ययन कालावधी (Academic Learning time) आणि प्रतीक्षा कालावधी.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुदृढता/कौशल्य सराव अथवा खेळण्यास मिळणारा वेळ यास शैक्षणिक अध्ययन कालावधी (Academic learning Time)असे म्हणतात. हे सर्व भाग शारीरिक शिक्षण तासामध्ये अनिवार्य असले तरी कोणत्या भागाला अधिक वेळ मिळाला पाहिजे याबद्दल शारीरिक शिक्षण शिक्षकाने सजग राहायला हवे.

यासंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सर्वेक्षण झालेले आहेत त्यांचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.

  • एका सर्वेक्षणानुसार आठवड्याला एका वर्गाला शारीरिक शिक्षणाचे तीन तास मिळत असतील तर वर्षाला एकूण ३२४० मिनिटे मिळतात. त्यामधील सूचना कालावधी, साहित्य देवाण-घेवाण, गट करणे आणि इतर कार्य या सर्व गोष्टींसाठी दिला जाणारा वेळ सोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य अध्ययनासाठी केवळ १४५८ मिनिटे म्हणजे वर्षाला २४.३ तास मिळतात. 

  • परदेशात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार विद्यार्थ्यांचा शारीरिक शिक्षण तासातील अध्ययन काळ हा  केवळ २० % आहे, प्रतीक्षा कालावधी १९ % आहे, प्रास्ताविक हालचालींसाठी १४.७ इतका वेळ दिला जातो आणि स्थित्यंतर कालावधी १९ % आहेे .



  • भारतामध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष कौशल्य अध्ययनासाठी ३०.३६ % इतका वेळ दिला जातो. 
या सर्व आकडेवारीवरून असे लक्षात येते की,  शारीरिक शिक्षणाला मिळणाऱ्या एकूण कालावधी पैकी बराच कालावधी हा इतर गोष्टींसाठी जातो आणि प्रत्यक्ष सुदृढता/कौशल्य अध्ययन आणि खेळासाठी कमी कालावधी मिळतो. शारीरिक शिक्षण तासाची परिणामकारकता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी जास्तीत जास्त ठेवणे हे गरजेचे आहे. एका वर्गात असणारी विद्यार्थी संख्या आणि त्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा यांचे गुणोत्तर व्यस्त असल्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी हे निश्चितच आव्हानात्मक आहे परंतू,, अशक्य नाही. शारीरिक शिक्षण तासात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी वाढवण्यासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे.
  1. ज्याप्रमाणे विद्यार्थी मधल्या सुट्टीत, शाळा भरण्याअगोदर किंवा गल्लीबोळात विविध मॉडिफाइड साहित्याच्या सहाय्याने मित्रांबरोबर खेळत असतात त्याच प्रमाणे शारीरिक शिक्षण तासात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी वाढविण्यासाठी काही मॉडिफाइड साहित्य विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करणे. 

  2. शारीरिक शिक्षण तासातील कौशल्य सराव, उपक्रम किंवा खेळ ही छोट्या गटात घेणे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळतील. कारण मोठ्या गटात उपक्रम घेतल्यानंतर स्ता ज्या विद्यार्थ्यांचा कौशल्य स्तर चांगला आहे हे ती विद्यार्थीच जास्त संधी घेतात आणि कमी कौशल्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा छोट्या गटात उपक्रम घ्यावी.
  3. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी अधिक मिळण्यासाठी शिक्षकाचे नियोजन अत्यंत काटेकोर असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनी त्यांचा सूचना कालावधी कमीत कमी ठेवावा.
  4. शारीरिक शिक्षण पाठातील नियम आणि शिष्टाचार (शारीरिक शिक्षण तासाला मैदानावर येणे आणि जाणे, साहित्य देवान-घेवान, स्टार्ट आणि स्टॉप सिग्नल इ.) वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सांगितले आणि त्याचा सराव करून घेतल्यासशैक्षणिक अध्ययन कालावधी वाढण्यास मदत होते असे संशोधनावरून सिद्ध झालेले आहे.
  5. काही अनावश्यक औपचारिकता (लाईन करणे, सर्कल करणे इ ) शारीरिक शिक्षण तासातून कमी कराव्या.
शालेय अभ्यासक्रमात वेगवेगळ्या विषयांचा होणारा अंतर्भाव, बदलणारी शासकीय धोरण यामुळे शारीरिक शिक्षण विषयासाठी आठवड्याला मिळणाऱ्या तासिका कमी होत आहे. या तासिका अधिक मिळण्यासाठी आग्रही राहणे परंतु त्याच बरोबर मिळणाऱ्या तासिकांचा उपयोग जास्तीत जास्त अध्ययनासाठी कसा होईल याचे प्रयत्न शारीरिक शिक्षण शिक्षकांना करावे लागणार आहे. 
संदर्भ
  1. Graham George (2001). Teaching Children Physical Education. P.No. 17
  2. Jonathan Osbert Ayi Ammah (1998). Academic Learning Time In Physical Education In Ghana - A Descriptive Analytic Study 


शरद आहेर 
मो. 98900252566 

Tuesday, February 16, 2021

व्याकरण ते अंतःकरण !!! 


 

व्याकरण ते अंतःकरण !!! 


उस्मनाबाद जिल्ह्यातील चिंचपूर या छोट्याशा गावातील अन्सार शेख सर हे हिंदी विषयाचे शिक्षक. परंतु शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कबड्डी खेळलेले असल्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कबड्डी विषयाचे प्रेम होतेच. दिवसभर शाळेमध्ये हिंदी विषयाचे अध्यापन झाल्यानंतर अन्सार सर सायंकाळी 7 ते 9 कबड्डीच्या मैदानावर येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि मुलांबरोबर मुलीही सरावाला येऊ लागल्या. सरांच्या मार्गदर्शनाखाली 14,16 आणि 17 वर्षाखालील मुल व मुलींचे संघ जिल्हा आणि राज्यस्तरावर चांगले कार्यमान करून लक्ष वेधून लागले. मैदानावर येणार्‍या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगले नसल्यामुळे बाहेरगावी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी सर्व खर्च अन्सार सर स्वतः करतात. ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे महत्व पटवून देऊन त्यात मिळणाऱ्या संधी काय काय आहेत याची विशेष माहिती करून देण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. आत्तापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर एक मुलगी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाली. या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर कदाचित विशेष काही वाटणार नाही परंतु, ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि हे विद्यार्थीही खेळतात ते कुठल्याही संख्याशास्त्रीय विश्लेषणा पलिकडचे आहे असे वाटते. कारण,  शाळेत बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील,बिगारी कामगार,ऊसतोड कामगारांची आहेत. त्यामुळे त्यांचे आई वडील सहसा कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असतात,त्यामुळे ही मुलं आजी, आजोबा किंवा नातेवाईकांकडे असतात. परिणामी घरी लक्ष द्यायला कुणी नसल्यामुळे मुल वाईट मार्गाला किंवा इतर ठिकाणी भटकू नयेत म्हणून शेख सर विशेष लक्ष देतात. वेळप्रसंगी त्यांचा अभ्यास घेणे, आर्थिक मदत करणे ही कामे सर करताना दिसून येतात.त्यांच्या या कार्यात त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांची मदत नेहमी असते,क्लासमेंट्स नावाचा माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप सरांकडे जमेल तेवढे पैसे देऊन सरांच्या कार्याला हातभार लावतात.गावातील सर्व क्षेत्रातील व्यक्तीसुद्धा त्यांच्या कामात सहकार्य करतात. 

या विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीच्या मैदानावरच स्पर्धा करावी लागत नसून जीवनाच्या मैदानावरही त्यांना दररोज स्पर्धा करावी लागते. आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांना भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शन असते ते अन्सार सरांचे. 

अन्सार सर विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीचेच धडे देत नाही तर ज्याप्रमाणे हिंदी चे व्याकरण सुधारण्यासाठी वर्गामध्ये प्रयत्न करतात तसेच विद्यार्थ्यांचे अंतकरण सुधारण्यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात. त्यासाठी सरांनी घरामध्येच छोटे ग्रंथालय सुरू केले आहेत. या ग्रंथालयात विविध प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला सर आवर्जून पुस्तक भेट म्हणून देतात आणि विद्यार्थ्यांना अवांतर वाचनास प्रेरित करतात. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी विविध विषयावर लेखन तसेच कविता करू लागले आहे. 


 हे सगळे कार्य करण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे किंवा तुम्ही हे का करता? या प्रश्नावर सर म्हणाले की "कबड्डी हे माझे पॅशन आहे आणि कबड्डीच्या मैदानावर मला आनंद मिळतो जो मला इतर कुठेही मिळत नाही" म्हणून मी हे सर्व कार्य करतो.  "आपल्याला काय पाहिजे ते पाहू नका, मुलांना काय पाहिजे ते ओळखा आणि त्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करा"असे सरांचे नेहमी म्हणणे असते.  

असे म्हणतात की, " शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील आणि उत्तरदायी असनंच जास्त महत्त्वाचे आहे"  या वाक्याचा प्रत्यय सरांच्या कार्याकडे पाहून येतो. समाजामध्ये आत्मकेंद्रीपणा वाढत असताना अन्सार सरांसारखे शिक्षक इतर  शिक्षकांना अंतर्मुख आणि  प्रेरित करतात. सरांच्या या कार्याला सलाम!!!

नाव - अन्सार शेख

मो. 9657584171


लेखन 

युवराज देवकर : ७७७४८०११७६

 शरद आहेर : ९८९००२५२६६


    


Monday, February 8, 2021

शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

 


शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

शारीरिक शिक्षण हा अभ्यासक्रमतील असा एकमेव  विषय आहे जो 21 व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये (Creativity, Critical thinking, Collaboration and Communication) वाढविण्यासाठीचे  एक प्रवेशद्वार आहे. शारिरीक सक्रियतेने मध्ये आजीवन सहभागाचा प्रवेश बिंदू म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा विषय असतानाही शारीरिक शिक्षणासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये किती वेळ दिला जातो ? यासंबंधी जगभरात झालेल्या संशोधनातील काही प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे 

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) यांच्या मार्गदर्शकानुसार गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण राबविण्यासाठी आठवड्यामध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी १२० मिनिटे इतका वेळ द्यायला पाहिजे.
  • प्राथमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी किती वेळ दिला जातो तो पुढीलप्रमाणे: आफ्रिका ९७ मिनिट, अशिया  ८४ मिनिटे, युरोप १०९ मिनिटे आणि  अमेरिका १०७ मिनिटे.




  • माध्यमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी दिला जाणारा वेळ पुढील प्रमाणे: आफ्रिका ९६ मिनिट, अशिया  ८५ मिनिटे, युरोप १०५ मिनिटे आणि  अमेरिका १२५ मिनिटे.









या सगळ्या आकडेवारीचा विचार केल्यानंतर पुण्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अभ्यासक्रमांमध्ये किती वेळ दिला जातो ?  यासंबंधी एक सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षणासाठी आठवड्याला सरासरी १२० मिनिटे वेळ दिला जातो तर, माध्यमिक स्तरावर सरासरी 117 मिनिटे वेळ दिला जातो. ही आकडेवारी खूप छोट्या सर्वेक्षणावर आधारित आहे त्यामुळे ती प्रातिनिधिक असेलच असे नाही किंवा तिचे सामान्यीकरण करता येणार नाही परंतु, निश्चितच समाधान देणारी आहे. 

  • जगभरामध्ये 2000 ते 2013 या दरम्यान अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाला दिलेला वेळ कसा कमी होत जात आहे हे दर्शवणारा आलेख पुढील प्रमाणे 



प्राथमिक स्तरावर 2000 मध्ये ११६ मिनिटे, 2007 मध्ये १०० मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९७ मिनिटे वेळ दिला गेला. तर माध्यमिक स्तरावर 2000 मध्ये १४३ मिनिटे, 2007 मध्ये १०२ मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९९ मिनिटे वेळ दिला गेला.

यावरून असे लक्षात येते की, शारीरिक शिक्षण या विषयासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये दिला जाणारा वेळ हा वर्षागणिक कमी होत आहे. 

विविध सर्वेक्षनावरून असे दिसून आले आहे की, इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिकांचा उपयोग केला जातो. या सर्व आकडेवारीवरून आणि  विश्लेषनावरून शारीरिक शिक्षणात कार्य करणाऱ्या सगळ्यांनीच बोध घेऊन पुढील संकल्प करण्याची आवश्यकता आहे.

  1. अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासाठी दिलेल्या तासिकांची नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी करणे.
  2. शारीरिक शिक्षणाच्या तासिकांचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठीच होईल!!! इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नाही याची दक्षता प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने घ्यावी.
  3. शारीरिक शिक्षणाचा तास हा सर्वसमावेशक असावा जेणेकरून विविध सुदृढता स्तर, कौशल्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या क्षमतेप्रमाणे शारीरिक हालचाली करण्याची संधी मिळेल 
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६



Sunday, January 10, 2021

एक झपाटलेला: शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक


 भारतीय शिक्षण आणि समाज व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा अत्यंत दुर्लक्षित आणि प्राधान्यक्रम नसलेला असा विषय आहे. सोयी-सुविधांचा अभाव, इतर विषय शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांचा दृष्टिकोन, बदलती शासकीय धोरण अशा एक ना अनेक समस्या सध्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या विषयाला भेडसावत आहेत. असे म्हटले जाते की, "Be a part of answer NOT a question." म्हणजे "उत्तराचा भाग बना, प्रश्नाचा नाही" या वाक्याप्रमाणे काही व्यक्ती आजूबाजूला असलेल्या प्रश्‍नांच्या आणि समस्यांच्या गर्दीत अथवा चर्चेत वेळ न घालवता आपल्या परीने या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या गावांमधील एमजीएम कॉलेजचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची संक्षिप्त सांख्यिकी माहिती पुढीलप्रमाणे 

१. आत्तापर्यंत आंतर महाविद्यालयीन स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या महाविद्यालयातील 302 खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळात प्रतिनिधित्व केले आहे.

२. महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन स्तरापासून अंतर विद्यापीठ स्तरापर्यंत आत्तापर्यंत 132 स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.

३. आत्तापर्यंत विद्यापीठ, राज्य सरकार आणि  भारत सरकार मार्फत २ कोटी 98 लाख रुपयाचे अनुदान मिळविले आहेे.

४. २०१५ मध्ये  क्रीडा महोत्सव (अश्वमेध) स्पर्धेचे यशस्वी आयोजन ज्यामध्ये 4000 हजार खेळाडू व पाच खेळाचा समावेश होता.

या मधूनच एकूण 3 इनडोअर स्टेडियम, ४ बास्केट बॉल ग्राउंड, ४ हॉलीबॉल ग्राउंड, ४ कबड्डी ग्राउंड, 4 खो खो ग्राउंड, १ नेट बॉल, १ हँडबॉल, १ बॉल बॅडमिंटन आणि २००  मीटरचा ट्रॅक अशा प्रकारच्या सोयीसुविधा सरांनी एमजीएम महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या आहेत. 

या सांख्यिकी माहितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, मनोज रेड्डी सरांची आत्तापर्यंत एकूण 18 वर्षाची सेवा झालेली आहे. या सेवेमध्ये त्यांचे दर वर्षी सरासरी १७ खेळाडू वेगवेगळ्या स्तरावर खेळलेले आहेत, दर वर्षी सरासरी ७ स्पर्धांचे आयोजन केलेले आहे, तर दर वर्षी सरासरी १ मैदानाचा विकास केलेला आहे आणि दर वर्षी सरासरी १६ लाख ५५ हजार इतके अनुदान शासनामार्फत मिळविलेले आहे.

हे सर्व केवळ सांख्यिकी आकडे नाही तर स्पर्धांचे आयोजन असो की, मैदानांचा विकास असो या प्रत्येक बाबींमध्ये गुणवत्ता घसरणार नाही याची काळजी सर नेहमीच घेतात. त्यामुळेच अहमदपूर मध्ये स्पर्धांचे आयोजन असते तेव्हा संपूर्ण गावांमध्ये एक वेगळाच उत्साह, ऊर्जा आणि वातावरण निर्मिती झालेली असते. या स्पर्धा बघण्यासाठी अहमदपूर मध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी उसळते. असाच एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. 2011 यावर्षी एमजीएम महाविद्यालया मध्ये हँडबॉलच्या आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातील विविध विद्यापीठांचे ६५ मुलींचे आणि ७५ मुलांचे  संघ सहभागी होण्यासाठी आले होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या सर्व संघांची मिरवणूक संपूर्ण गावा मधून काढण्यात आलेली होती. ही मिरवणूक बघण्यासाठी संपूर्ण गावांमधून मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती. प्रत्येक चौकाचौकात खेळाडूंवर पुष्पवृष्टी होत होती, खेळाडूंना स्थानिक लोक उस्फूर्तपणे पुष्पगुच्छ देत होते, हार घालत होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला अहमदपूर मधील हा पाहुणचार म्हणजे अतिशय सुखद अनुभव होता. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये हँडबॉल सारख्या खेळालाही इतकी समाजमान्यता निर्माण होण्यामध्ये मनोज रेड्डी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

याबरोबरच सरांनी चार वर्षे विद्यापीठामध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्य करताना आणि महाविद्यालयांमध्ये कार्य करताना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले ते पुढीलप्रमाणे

१. विद्यापीठामध्ये स्पर्धा आयोजनांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्यामुळे खेळाडू, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित झाला

२. खेळाडूंना स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो हे ओळखून सरांनी प्रत्येक संघासाठी रेल्वेचे आरक्षण करूनच प्रवास करेल याकडे लक्ष पुरविले.

३. वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आणि त्या प्रशिक्षण शिबिरांसाठी भारतातील नामवंत मार्गदर्शकांना निमंत्रित केले. 


या संपूर्ण कार्यामध्ये यशस्वी होण्यामागे मनोज रेड्डी यांची स्वभाव वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ही स्वभाववैशिष्ट्ये मार्गदर्शक ठरू शकतील असे वाटते ती पुढील प्रमाणे.

१. कमी बोलणे आणि कृतीवर लक्ष केंद्रित करणे

२. संस्थाचालकांपासून शिपायापर्यंत, गावातील प्रतिष्ठित व्यक्तीपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांशीच मनोज रेड्डी यांचे संबंध आणि नेटवर्किंग अतिशय चांगले आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यामध्ये त्यांना सर्वांचाच पाठिंबा आणि सहकार्य लाभते.

३. कोणतेही कार्य करत असताना ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा (Follow up) करणे हे त्यांचे महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. 

४. प्रामाणिक, निस्वार्थी आणि विनम्र स्वभावामुळे सगळ्यांचाच विश्वास संपादन केला.

५. उत्तमता (Excellence) आणि गुणवत्ता (Quality) यालाच प्राधान्य देतात 


तळागाळात अशाच झपाटून काम करणाऱ्या, क्रीडा संस्कृती निर्माण करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांची आज शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला अत्यंत आवश्यकता आहे. 


शरद आहेर 

मो. ९८९००२५२६६ 


Saturday, January 9, 2021

फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

 फिनलंड मधील शिक्षण पद्धती आणि भारत 

फिनलंड मधील शिक्षण पद्धती ही समस्या निराकरण, उद्योजकता आणि कौशल्य यावर आधारलेले आहे. तर भारतीय शिक्षण पद्धती ही घोकंपट्टी, पुस्तकिपना आणि आशय यावर आधारलेली आहे. प्रा. लीला पाटील यांनी एका पुस्तकात म्हटले आहे की, साचेबद्धपणा आणि पुस्तकीपणा हा भारतीय शिक्षणाला लागलेला शाप आहे. खरंतर महात्मा गांधी यांनी 1937 मध्ये त्यांच्या 'नई तालीम' या शिक्षण विचारातून उद्योग केंद्री शिक्षणाचा विचार मांडला होता. परंतु भारतीय धोरणकर्त्यांनी आणि समाजाने हा विचार नाकारला व नई तलीमच्या शाळा बंद पडू लागल्या. म्हणजेच फिनलंडने 1970 नंतर जो दृष्टिकोन अंगीकारला तो भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला होता. 

फिनलंड आणि भारतीय शिक्षणाची तुलना करताना शिक्षकांची गुणवत्ता हा मला कळीचा मुद्दा वाटतो. फिनलंड प्रत्येक शिक्षकाला पाच वर्षाचे पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते. परंतु भारतामध्ये एक किंवा दोन वर्षाचे शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम आहेत. आणि त्या ठिकाणी चाललेला अभ्यासक्रम हा अत्यंत कालबाह्य आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता भारतामध्ये अत्यंत खालावलेली आहे असे वाटते. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या 'शोध नव्या युगाचा' या पुस्तकामध्ये तर "शिक्षकांची संख्या आणि गुणवत्ता ही आपले राष्ट्रीय संकट म्हणून घोषित करावे" असे म्हटले आहे.

फिनलंड मधील शिक्षण हे खासगीकरणाकडे कडून सार्वजनिकरनाकडे वाटचाल करत आहे तर, भारतामध्ये याच्या उलट परिस्थिती असून भारताने सर्वजनिकरणाकडून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. भारतीय सरकार शिक्षणातील खासगीकरणाला अनुकूल धोरण आखत आहे. भारतामध्ये सरकारी शाळा या बंद पडत आहेत किंवा त्यामध्ये पालक आपल्या मुले प्रवेश घेत नाहीत आणि खाजगी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे. 

1970 नंतर फिनलंडने तेथील शिक्षण पद्धतीचे योग्य विश्लेषण केले, नियोजन केले आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी केली त्यामुळे त्याचे फलित त्यांना सध्या मिळत आहे. परंतु, भारतामध्ये विश्लेषण केले जाते, नियोजन केले जाते, निर्णय घेतले जातात परंतु, शेवटच्या पायरीला म्हणजे अंमलबजावणीला मात्र व्यवस्था कमी पडतो. (नवीन शैक्षणिक धोरण याला अपवाद ठरेल अशी अपेक्षा)

फिनलंड मधील शिक्षण पद्धती मध्ये विद्यार्थी स्वतःचे नियम स्वतः बनवितात. परंतु, भारतामध्ये प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांवर लादली जाते. कुठल्याही निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात नाही. आणि शिस्तीच्या नावाखाली धाक, दडपशाही याचा अतिरेक केला जातो. शिक्षक हा शाळेतील ‘ हुकूमशहा’ सारखा वागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता (Creativity) आणि नाविन्यता (Innovation) याचा विकास होण्यास खूप मर्यादा येतात.

फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा हि भारतीय शिक्षणाची ग्रहीतके आहेत. 

शिक्षण तज्ञ रमेश पानसे सर यांनी असे म्हटले आहे की, ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतःसुद्धा शिकतात, परस्परांकडून शिकतात. 

भारतामधील शिक्षणपद्धती मध्ये काही प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शाळा, संस्था, शिक्षक नक्कीच चांगले कार्य करत आहेत परंतु, त्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा नवीन शैक्षणिक धोरणात दूर होतील अशी अशा करूया.


शरद आहेर, 

प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे 

मो. ९८९००२५२६६

sharadaher3@gmail.com


'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...