बुद्धिमत्ता हा शब्द उच्चारला की,, सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर शाळेचे प्रगतिपुस्तक येते. नव्हे ते एक समीकरणच झाले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये असणारे प्रश्न हे तार्किकतेवर व गणितीय प्रक्रियावर आधारलेले असतात. त्यामुळे वेगळ्या क्षमता आणि बुद्धिमत्तेला त्यात वाव नसतो. परंतु अलीकडच्या संशोधनांतून विशेषतः मेंदूविषयीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, बुद्धिमत्ता नावाची एकच क्षमता नसून अनेक बुद्धिमत्तांची वेगवेगळे केंद्रे मेंदूच्या डाव्या व उजव्या भागात असतात. हार्वर्ड गार्डनर यांच्या "फ्रेम्स ऑफ माईंड" या ग्रंथात अशा आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांचा उल्लेख केला आहे. त्या पुढीप्रमाणे
भाषिक / वाचिक बुद्धिमत्ता - भाषिक व्यवहारांची निर्मिती , भाषे / भाषांवरील प्रभुत्व , भाषेचा लवचिक वापर , काव्य , कथाकथन , कथा - कादंबरी लेखन , चर्चा , संवाद इत्यादींमध्ये भाषेची बुद्धिमत्ता अभिव्यक्त होते . ज्या लोकांना ही बुद्धिमत्ता तीव्रतेने प्राप्त झालेली असते असे लोक साहित्यिक , वक्ते , विनोदकर किंवा अगदी उत्तम वाचकही असतात . आचार्य अत्रे , पु.ल. देशपांडे अनेक साहित्य क्षेत्रातील दिगजांची नावे आपल्याला उदाहरणादाखल घेता येतील .
तार्किक / गणिती बुद्धिमत्ता - तार्किक विचार करता येणे , शास्त्रांच्या किंवा गणिताच्या क्षेत्रात अवगाहन करणे , अमूर्त गोष्टींत रमणे अशा गोष्टींतून ही बुद्धिमत्ता प्रकट होत असते . ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या व्यक्ती , प्रामुख्याने , घटनांचे विश्लेषण करणे , गणित - शास्त्रे यांतील प्रश्नांची उकल करणे , अशा बाबीमध्ये चांगले तयार असतात . आईनस्टाईन , रसेल , रामन अशी अनेक उदाहरणे सांगता येतील .
सांगितिक बुद्धिमत्ता - गुणगुणणे , ताल , लय यांचे आकलन होणे , त्यांचा वापर करता येणे , आवाजाबाबत संवेदनशील असणे , गाण्यांची धून आठवणे , म्हणता येणे इ . यांमधून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होते . गायक , संगीतकार , वादक , काव्यगायक अशा लोकांचा या प्रकारात समावेश होतो . कुमारगंधर्व , लता मंगेशकर , रवी शंकर अशी अनेक नावे आपण या प्रकारात सागू शकू .
अवकाशीय दृष्टीगोचर / बुद्धिमत्ता (Visual-Spatial Intelligence) - पाहिलेल्या रचना , आकार याचे मनात चित्र तायर करता येणे , भौगोलिक नकाशे करता येणे , समजणे , अंतराचा अंदाज घेता येणे अशा अनेक कृतींतून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होत असते . चित्रकार , वास्तुरचनाकार , शिल्पकार , अभियंते , शल्यविशारद अशांसारख्यांना प्रामुख्याने अशी विशेष दृष्टी असते . कोलंबसाला ही बुद्धिमत्ता होती असे म्हणता येईल .
शारीरिक स्नायुविषयक बुद्धिमत्ता - आपल्या संपूर्ण शरीराचा किंवा एखादी विशिष्ट अवयवांचा वापर करून भावना व्यक्त करता येणे किंवा उत्तम खेळता येणे , उत्तम शारीरिक नियंत्रण , अवयवांचे परस्पर संघटन किंवा हाताने करून पाहून गोष्ट शिकता येणे अशा प्रकारांतून ही बुद्धिमत्ता व्यक्त होते . नर्तक , खेळाडू , पोहणारे किंवा शल्यविशारद यांना अशातर्हेची बुद्धिमत्ता असते .
व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) - स्वतःच्या मनात डोकावता येणे , स्वतःच्या भावना ओळखता येणे , त्यांवर नियंत्रण ठेवता येणे किंवा अध्यात्मिक अनुभव घेता येणे या प्रकारच्या बुद्धिमत्तेला व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता असे म्हणतात . संयमित , ध्यानधारणा करणारे , भावनांचे उद्दिपन होऊ न देणारे असे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . स्थितप्रज्ञ , संत , अध्यात्मिक गुरू यांचा यात समावेश करता येतो
आंतर - व्यक्ती बुद्धिमत्ता (Intrapersonal Intelligence) - दुसऱ्यांशी संवाद साधता येणे , मिळून मिसळून वागता येणे , दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणे , दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणे अशा क्षमता असणारे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . नेते , शिक्षक , विक्रीकरणारे किंवा लोकांच्यात रमणारे , एकत्रित काम करायला आवडणारे असे हे लोक असतात . दुसऱ्यांच्या भावनांची जपणूक करणे , किंवा दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे हे यांना चांगले जमते . महात्मा गांधी , हिटलर किंवा कृष्णमूर्ती , रजनीश अशा मोठ्या लोकांचा समावेश आपण या गटात करू शकतो . अलीकडे आणखी एका बुद्धिमत्तेचा , गार्डनर यांनी , आपल्या यादीत समावेश केला आहे . ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता .
सृष्टपदार्थविषयक बुद्धिमत्ता - निसर्गातील पशु - पक्षी - प्राणी , झाडे , खडक , नद्या - डोंगर अशा गोष्टींविषयी ओढ असणे , त्यांचे - त्यांच्या स्वरूपाचे आकलन असणे , त्यांविषयी जवळिक वाटणे , किंवा निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हे या बुद्धिमत्तेच्या माणसांचे विशेष आहेत . या लोकांना , रानावनांतून हिंडण्याच्या शिकारीची , डोंगर चढण्याची किंवा वनस्पतींचा , प्राण्यांचा अभ्यास करण्याची आवड असते . डार्विनचे ठळक नाव यासंदर्भात आपल्यासमोर येईल .
काही वर्षापूर्वी 'शिक्षणाच्या आईचा घो' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुलाला क्रिकेटची प्रचंड आवड असते आणि कौशल्यही असते तर वडिलांना मात्र आपल्या मुलाने शाळेमध्ये चांगले गुण मिळवावे अशी प्रखर इच्छा असते. मुलगा व वडीलांमधला संघर्ष या सिनेमामध्ये दाखविलेला आहे. अनेक विद्यार्थी अशा प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आहेत.शिक्षणाच्या दबावामुळे आणि पालकांच्या महत्वकांक्षामुळे आज अनेक विद्यार्थी त्यांच्यातील बुद्धिमत्ता काय आहे हे माहीत असूनही ते त्यांचे आवडीचे क्षेत्र अथवा क्रीडाक्षेत्र सोडून देतात अशाच संघर्षाला बळी पडलेल्या काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता एका विद्यार्थिनीने सांगितले की तिला परीक्षेत खूप कमी मार्क मिळायचे त्यामुळे घरचे सारखेच टोमणे मारायचे, इतर विद्यार्थ्यांशी तुलना करायचे त्याला कंटाळून शेवटी तिने खेळ सोडून दिला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, तो खेळामध्ये खूप चांगली प्रगती करत होता, वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदकही मिळविल होते परंतु घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्याने शेवटी क्रीडा क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. अशा अनेक खेळाडूंना किंवा वेगळी बुद्धिमत्ता असणार्या बालकांना पाठिंब्याची नितांत गरज आहे. शिक्षक आणि पालकांनी बालकातील बुद्धिमत्ता ओळखून ती वृद्धिंगत करण्यासाठी संधी पुरविण्याची आणि संपूर्ण पाठिंबा देण्याची गरज आहे.
संदर्भ:
प्रा. रमेश पानसे. आजचे शिक्षण: उद्याचे जीवन
शरद आहेर
Khup Chan mahiti aahe Sir.
ReplyDeleteVery nice information Sir
ReplyDeleteउत्तम आणि मार्गदर्शक
ReplyDeleteडॉ शरद आहेर सर खूप छान लेख यात कौशल्ये पुरविणारी नवी शिक्षण पद्धती आणि पालकांचे प्रोत्साहन हे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन आपण केलेत .कारण या वरच विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे जाता येणार आहे.
ReplyDeleteWow your writing style is getting better day by day, sir and I wish it to be even better
ReplyDeleteVery informative information and should be implemented in schools. Appreciating every child for his work will motivate him to do better.
ReplyDeleteसुंदर माहिती...आठ प्रकारची बुद्धिमत्ता...फक्त आपल्याला कोणती बुद्धीमत्ता जास्त आहे ते ओळखले पाहिजे.
ReplyDeleteफार सुंदर लेख.. पारंपरिक शिक्षण विचारातून आपण बाहेर यायला हवे. कौशल्य आणि क्षमता विचारात घेऊन मुलांना प्रशिक्षित करावे.. हा विचार पटला.
ReplyDelete