शारीरिक
शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली

सध्या शालेय शिक्षणामध्ये अध्ययन आणि अध्यापनासंबंधी
वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू
आहेत, शैक्षणिक प्रवाह येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन शैली / पद्धती
विकसित
होत आहेत. एकूणच शालेय शिक्षण व्यवस्था शिक्षकांकडून-विद्यार्थ्यांकडे, शिकविण्याकडून
- शिकण्याकडे मार्गक्रमण करत आहे. शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या पद्धतींमध्ये, शैलींमद्धे बदल होत आहेत. शिक्षक शिक्षण देतो आणि विद्यार्थी ते घेतो
अशाप्रकारचा भेद आता
राहिलेला नाही कारण, शिक्षण ही कुणी कुणाला द्यायची वस्तू नाही ती आपली आपण आत्मसात
करायची गोष्ट आहे. फक्त
शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं ही समजूत, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही हा
विचार,
विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले
पाहिजेत हा दंडक,
शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा. शिक्षणातील ही
सारी गृहीतकं बदलत आहेत (पाटील, 2012).
अशा या बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षणामध्येही
आवश्यक
ते बदल होणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. वर्षानुवर्षं
ज्या पद्धतीने शिकवीत आहे, त्यामध्ये काळानुरूप बदल जे इतर
विषयामध्ये होत आहे तसे शारीरिक शिक्षणामद्ध्येही होणे ही काळाची गरज आहे. शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले असता काही
विद्यार्थी सराव करत असतात तर काही विद्यार्थी बाजूला गप्पा मारत बसलेले असतात. या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणामध्ये कसे
सामावून घेता येईल? आजच्या
तरुण-तरुणींना शारीरिक शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी अध्यापन शैली मध्ये काय बदल
करावे लागतील? या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावे लागतील.
सर्वसाधारणपणे शिक्षक
सांगतात व विद्यार्थी ऐकून त्याप्रमाणे कृती करतात या प्रकारे हुकूम शैली हि शारीरिक शिक्षणाला घट्ट चिकटून
बसलेली अध्यापन शैली आहे. यापेक्षा काही वेगळ्या शैलीने/पद्धतीने अध्यापनाचा
विचारही करू शकत नाही. शारीरिक शिक्षणामध्ये काही घटकांचे अध्यापन
करण्यासाठी हुकूम शैली निश्चितच परिणामकारक आहे. परंतु, सर्वच
घटक हुकूम पद्धतीने शिकविणे हे ही तितकेच चुकीचे होईल. हुकूम शैलीची
परिणामकारकता आपणा सर्वांच्या परिचयाची आहे परतू या पद्धतीमध्ये पाठातील सर्व
निर्णय शिक्षक घेतात, विद्यार्थ्याच्या विचार क्षमतेला
कुठेही वाव नसतो या मर्यादा कमी करण्यासाठी आपणास इतर अध्यापन शैलीचा विचार करावा
लागेल. विनोबा म्हणतात कि, ‘शिक्षणाची
पद्धतच अशी हवी कि, आपण काहीतरी शिकत आहोत असे
विद्यार्थ्याला वाटायला नको तसेच शिक्षकालाही असे वाटला नको कि आपण काहीतरी शिकवत
आहोत.’ या वाक्याचा प्रत्यय आपणास
घेण्यासाठी शारीरिक शिक्षणातील विविध अध्यापन शैली पुढीलप्रमाणे
या अध्यापन शैलीद्वारे
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग खर्या अर्थाने वाढतो व त्यांना
स्वातंत्र्य, मोकळेपणा मिळून शिकण्याचा आनंद मिळतो. प्रस्तुत
लेखामद्धे मॉस्टन व अश्वर्थ यांनी मांडलेल्या अध्यापन शैलींचा उल्लेख केलेला आहे.
अध्यापन शैली व पद्धती याबद्दल विविध श्रोतात वेगवेगळी माहिती मिळते. मुळात अध्यापन
पद्धती या मानसशाश्रातील काही सिद्धानतावर आधारित आहेत. सदर लेखातील अध्यापन शैली मॉस्टन
यांनी मांडतांना अध्यापन प्रक्रियेतील निर्णयावर आधारित आहेत
शिक्षककेन्द्रित अध्यापन शैली
- हुकूम शैली (Command Style)
- सराव शैली (Practice Style)
- अन्योन्य शैली (Reciprocal Style)
- सर्वसमावेशक शैली (Inclusion Style)
- स्व परीक्षण शैली (Self Check Style )
विद्यार्थीकेन्द्रित अध्यापन शैली
- निर्देशित शोध शैली (Guided discovery Style)
- केन्द्रोत्सरी शोध शैली (Divergent discovery Style )
- केंद्राभिगामी शोध शैली (Convergent discovery Style)
मी बीपीएड विद्यार्थी शिक्षकांना फिटनेस आणि कंडिशनिंग शिकवत असताना
मी सर्वसाधारणपणे जे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अंमलबजावणी करतो. उदा. पार्टनरबरोबर करावयाचे व्यायाम. यामध्ये कोणते
व्यायाम घ्यायचे हे निश्चित केलेले असते, त्याप्रमाणे ते व्यायाम प्रकार सांगतो आणि
विद्यार्थी करतात. परंतु, गेल्या काही तासांमध्ये मी माझ्या या
पद्धतीमध्ये काही बदल केले. एक
दिवशी हुल्ला हुप बरोबर करायचे उपक्रम घ्यायचे
होते. नियोजन केल्याप्रमाणे व्यायाम सुरू केले परंतु, काही व्यायाम घेतल्यानंतर मी विद्यार्थ्यांना
म्हणालो की, हुप बरोबर कोणते उपक्रम करू
शकता याचा विचार करा आणि करून पहा. ही सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थी एकटेच काय-काय करु शकतो याचा विचार करु लागले आणि
त्याप्रमाणे कृती करू लागले तर, काही
विद्यार्थी जोडीदाराबरोबर आणि गटामध्ये एकत्रितरीत्या वेगवेगळे उपक्रम
विचार करून तयार करू लागले. त्यानंतर
विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम
व व्यायाम प्रकार करून दाखवले. विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले व्यायाम प्रकार
कुठल्याही युट्यूब वरील व्हिडिओ मध्ये बघितलेले नाही किंवा कुठल्याही पुस्तकात दिलेले
नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांमधून तयार
केलेले व्यायाम होते. विशेष म्हणजे स्वतः तयार केलेले व्यायाम
केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आणि मलाही माझ्या
शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे वेगळेच समाधान जाणवत होते. सर्जनशीलता, नाविन्यता हे सर्व शब्द मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने अनुभवत होतो. शारीरिक शिक्षण म्हणजे
म्हणजे केवळ शिक्षकाने आज्ञा देणे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करणे
एवढेच अपेक्षित नाही हेही लक्षात आले(बरेच उशिरा), तसेच नविन पिढीला विचार करण्याची
संधी दिली तर ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात याची जाणीव झाली. या
पद्धतीचे नाव आहे केन्द्रोत्सरी शोध शैली. या शैलीमध्ये एका प्रश्नाला अथवा
परिस्थितीला विद्यार्थी अनेक उत्तरांचा आणि शक्यतांचा शोध घेतात. नवीन कौशलयांचे
अध्यापन करतांना, विशेषकरून सुदृढताविषयक उपक्रम
शिकविताना हि शैली उपयुक्त ठरते.
अन्योन्य शैली
ही अशी शैली आहे ज्यामधे विद्यार्थी आपल्या जोडीदाराबरोबर शिकतो. एक विद्यार्थी
कौशल्य सराव अथवा उपक्रम करतांना दूसरा विद्यार्थी त्याचे निरीक्षण करून अभिप्राय देतो.
यामध्ये विद्यार्थी हा ‘मिनी’
शिक्षकाची भूमिका करतो. काय निरीक्षण करायचे हे शिक्षकाने सांगीतलेले असते. अध्ययन
आणि अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्यास काय होते हे अनुभव
घेतल्यास अधिक चांगले समजेल. शाळेतील एका वर्गात साधारणपणे ५० ते ७०
विद्यार्थिसंख्या असतांना अनेक घटकांसाठी या पद्धतीचा उपयोग केल्यास शिक्षकास
निश्चित फायदा होईल.
सराव शैली ही
अजून एक माझी आवडती शैली आहे. ज्यामधे विद्यार्थ्याला वैयक्तिक सरावाचे
स्वातंत्र्य असते. विनोबा म्हणतात की ‘स्वातंत्र्य’ हा
शिक्षणाचा आत्मा आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या कौशल्याचा
सराव घेतांना शिक्षक सर्वांना समान काठीण्यपातळीचा सराव देतात. वर्गामद्धे
वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांसाठी तो सराव अवघड
असू शकतो तर, काहींसाठी तो अधिक सोपा असू शकतो. म्हणून
प्रत्येकाला आपआपल्या क्षमतेला योग्य सराव करू देणारी ही पद्धत आहे. हे
समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या
बास्केटबॉल अथवा हॅंडबॉल
मधील ड्रिब्लिंग या कौशल्याचा सराव घ्यावयाचा असल्यास जागेवर ड्रिब्लिंग, चालत ड्रिब्लिंग, पळत ड्रिब्लिंग, जोडीदाराबरोबर ड्रिब्लिंग इत्यादी विविध सरावाच्या काठीण्यपातळी असू शकतील.
यापैकी कोणत्या काठीण्यपातळीचा सराव करायचा हे शिक्षक नाही तेर विद्यार्थी स्वतः
ठरवितो. तसेच काठीण्यपातळी कधी बदलायची, सराव कधी सुरू करायचा कधी थांबायचे हेसुद्धा विद्यार्थी ठरवितात.
स्व परीक्षण शैली चे
प्रमुख वैशिष्टे म्हणजे शिक्षकाने निश्चित केलेल्या सराव नियोजनानुसार वैयक्तिक
सराव करणे. या शैली त शिक्षकाची भूमिका म्हणजे घटक निश्चित करणे, तर विद्यार्थ्याची भूमिका म्हणजे वैयक्तिक सराव करून शिक्षकांनी दिलेल्या
निकषांप्रमाणे स्वतःच्या कार्यामानाचे
मूल्यमापन करणे. स्वतःच्या शिकण्याची
जबाबदारी स्वतः घेणे, सामाजिक सुसंवादाचा विकास हे या शैलीचे
वैशिष्ट आहे.
सर्वसमावेशक
शैली हि नावानुसार कार्यमानात सर्व
स्तरातील (कौशल्य अथवा सुदृढतेच्या दृष्टीने) विद्यार्थ्याचा पाठात समावेश करून
घेण्यासाठी उपयुक्त शैली आहे. ज्यामधे कमी मध्यम व क्लिष्ट अशा विविध काठीण्यपातळीचे कार्य
विद्यार्थ्यांना दिले जाते आणि विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार काठिन्यपातळीची
निवड करून सराव करावा. यादोन्ही शैलीमुळे विद्यार्थी सरावास व अध्ययनास प्रेरित
होतात कारण त्यांना सरावात स्वातंत्र्य असते.
निर्देशित शोध शैली हि
विद्यार्थी केन्द्रित अध्यपन शैलीतील महत्वाची शैली आहे. नावाप्रमाणेच या शैली मध्ये विद्यार्थी
नवीन हालचालींचा, संकल्पनांचा,
कौशल्याचा शोध घेतात व शिक्षक तो शोध घेण्यासाठी आवश्यक प्रश्नांची मालिका विद्यार्थ्यांसामोर
मांडतो व विद्यार्थी त्या प्रश्नांचा शोध हालचालींचे वेगवेगळे प्रयोग करून
शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रयोगाद्वारे शिकणे, समस्या
सोडविणे हा या शैलीचा गाभा आहे.
केंद्राभिगामी शोध शैली मध्ये
शिक्षक समस्येची मांडणी करतात व विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर शोधण्यास प्रवृत्त
करतात. विद्यार्थी एकटे, गटात किंवा जोडीदारा बरोबर उत्तर
शोधण्याचा प्रयत्न करतात. समस्या किंवा परिस्थिति काय मांडायची यासाठी शिक्षकांना
विशेष तयारी करावी लागेल. कदाचित एका तासामध्ये उत्तर मिळणार नाही, कदाचित विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाली अपेक्षेप्रमाणे होणार नाही, परंतु विद्यार्थी बोधात्मकदृष्ट्या सक्रिय असतील,
वेगळा विचार करतील व शारीरिक शिक्षण हे केवळ कारक क्षेत्राशीच (Psychomotor
domain) संबंधित नसून, बोधात्मक
(Cognitive domain) आणि भावात्मक क्षेत्राशी (Affective
domain) सुद्धा निगडीत आहे, किंबहुना कारक
बोधात्मक व भावात्मक अश्या तिन्ही क्षेत्रांचा विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षण
हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे याची जाणीव सर्वांनाच होईल. शारीरिक शिक्षणातील या
शैली विद्यार्थ्यांची कुतूहल जिज्ञासा
वाढविणाऱ्या, स्वयम्
अध्ययनाची प्रेरणा देणाऱ्या आहे. हुकूम
शैली शिवाय इतर अध्यापन शैली प्रत्यक्ष राबविताना हाच अनुभव मिळतो. ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता
विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित
दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतः सुद्धा शिकतात, परस्परांकडून
शिकतात. हे
या सर्व अध्यापन शैलीचा उपयोग केल्यानंतर
लक्षात येते. असे म्हणतात की शिक्षक हा शाळेतील ‘सौम्य
हुकूमशहा’ असतो. नव्या शिक्षकांना आता
हुकूम सोडीत राहण्याचा पवित्रा सोडावा लागेल. त्याची
भूमिका आता थोरल्या भावाची
किंवा
मित्रासारखी विकसित करावी लागेल.
या अध्यापन शैली शारीरिक
शिक्षण तासात वापरणे शक्य होईल का ? विद्यार्थी
प्रतिसाद देतील का? मोठ्या विद्यार्थी संख्या असल्यास या
अध्यापन शैली कश्या राबविणार? साहित्य नसेल तर कसे करणार? असे एक अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात गर्दी करतील पण, बदल घडवायचा असेल, तर पर्याय शोधावे लागतील. बदल
घडवायचे असतील तर, केवळ व्यवस्थेवर खापर फोडून चालणार नाही
तर प्रत्यक्षा कृती करावी लागेल कारण, कृती हेच प्रसाराचे
सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या विषयाचे महत्व पटवून देण्याच्या लढ्यामधे नावीन्यपूर्ण
विचार, कृतीयुक्त सहभाग, कठोर परिश्रम
घ्यावे लागतील. हि काही रेडिमेड मिळण्याची गोष्ट नव्हे, त्यासाठी
आपल्याला विषयाचे व पर्यायाने आपले स्टेटस
बदलण्यासाठी अनेक प्रयोग, प्रयत्न करावे लागतील, त्यापैकि एक छोटा प्रयोग म्हणजे विविध अध्यापन शैली वापरुन अध्यापन करणे, त्याचे परिणाम सर्वांसमोर मांडणे व शारीरिक शिक्षणामुळे
विद्यार्थ्यांच्या कौशल्यात, विचारप्रक्रियेत व समजवर्तनात
कसा आमुलाग्र बदल होतो हे दाखवून देणे.
संदर्भ
Muska Mosston & Sara
Ashworth (2008). Teaching Physical Education
विनोबा (2016). शिक्षण
विचार. सर्व सेवा संघ प्रकाशन, वाराणसी.
ओशो (1993). शिक्षण
क्रांति हीच खरी क्रांति. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन, पुणे.
पाटील लीला (2012). शिक्षण
घेता-देता. उन्मेष प्रकाशन, पुणे.
शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे
Nice one
ReplyDeleteबऱ्याच नविंन्यापूर्ण शिक्षण पद्धती वाचावयास मिळाल्या. त्यातील काही वरिष्ठ गटकरिता योग्य आहेत. परंतु लहान मुलांना शिकवताना वेगळ्या पद्धती वापरावयास लागतात. या लेखांमधून नक्कीच नवीन शिकण्यास मिळाले.
ReplyDeleteVery nice and informative article Sir
ReplyDeleteखूप खूप चांगली माहिती
ReplyDeleteशारीरिक साक्षरता ह्या विषयावर ही आपल्या कडून शिकण्यास आवडेल सर
ReplyDeleteGreat sir
ReplyDelete" सर्जनशिलता व नाविण्यता "
ReplyDeleteLikes..
सुंदर. अभिनंदन..
हे बदल गरजेचे आहे.....हे अमलात आणले तरच विद्यार्थि आणि शिक्षक ज्ञानाच्या उच्च स्तरावर पोहचतील.
ReplyDeleteमाझ्या येवढ्या वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असून सुद्धा अश्या प्रकारच्या लेखा मधून मार्गदर्शन आणि बोध सुद्धा मिळाला आहे
ReplyDeleteVery good information sir
ReplyDelete
Deleteसर लेख खूप छान आहे. प्रत्येक लेखामधून नवनवीन माहिती मिळते आहे.
बदलत्या काळानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पण बदलावे त्यातुन नवनवीन कौशल्य आत्मसात करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे. व्यावसायिक आणि भविष्य काळातील गरजा लक्षात घेऊन नविन समाज निर्माण करावयास हवा, धन्यवाद.
ReplyDeleteबदल हा निसर्गाचा नियमच आहे, आणि तो शारीरिक शिक्षण अध्यापनात होणे गरजेचे आहे.
ReplyDeleteसदर लेखात अतिशय अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले आहेत.