Friday, May 29, 2020

मिशन 80 टू 60

मिशन 80 टू 60 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत विकसित देश होणार अशा प्रकारचा आशावाद निर्माण केला होता. परंतू, ज्या तरुण पिढीच्या जोरावर त्यांनी हा आशावाद सांगितलं होता त्या तरुण पिढीच्या आरोग्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतला असता पुढील बाबी समोर आल्या. भारत मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जगातील सर्वात जास्त मधुमेही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत. एका सर्वेक्षणानुसार 1990 मध्ये भारतात 26 दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण होते त्यांची संख्या २०१६ ला ६५ दशलक्ष इतकी झाली तसेच फुफ्फुसांच्या संबंधित रुग्णांची संख्या २८ दशलक्ष होती ती २०१६ मध्ये ५५ दशलक्ष इतकी झाली. दरवर्षी हृदयविकारामुळे सुमारे 1.7 दशलक्ष भारतीयांचे मृत्यू  होतात. ही आकडेवारी गेल्या २५ वर्षात भारतातील आरोग्याची पातळी किती ढासळत आहे याचे चित्र दर्शविते आणि अतिशय चिंताजनक आहे. सध्या समाजामध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, हृदयाशी संबंधित आजार हे सर्व आजार शारीरिक अक्रियाशीलतेशी (Physical Inactivity) संबंधित आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वच घटकांना समाजामध्ये शारीरिक क्रियाशीलते विषयी जागृती निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे. शारीरिक क्रियाशीलते विषयीचा प्रसार व पाया शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्कम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. असे म्हणतात की, Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle” त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शारीरिक क्रियाशीलता किती करायला हव्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शिका दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

5 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्रियाशीलता पातळी किती असावी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या  शिफारशी 

तरुण व्यक्तीसाठी, शारीरिक क्रियाशीलतेमध्ये खेळ, क्रीडा, मनोरंजन, वाहतूक, दैनंदिन कामेशारीरिक शिक्षण किंवा नियोजित व्यायाम यांचा समावेश होतो.

  • 5 ते 17 वयोगटातील मुले आणि तरुणांनी दररोज कमीतकमी 60 मिनिटे  साधारण ते  तीव्र  शारीरिक हालचाली  केल्या पाहिजेत.
  •  60 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली अधिक आरोग्य लाभ प्रदान करतात.
  •  दैनंदिन शारीरिक हालचाली बहुतांश एरोबिक असाव्यात. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा स्नायू आणि हाडांना बळकटी देणार्‍या तीव्र हालचालींचा  समावेश केला पाहिजे.
  •  या शिफारसी लिंग, वांशिक किंवा उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता सर्व तरुणांसाठी लागू आहेत.
  • निष्क्रिय तरूणांसाठी, वरती संगीतलेले  लक्ष्य साध्य करण्यासाठी सुरूवातीला थोड्या प्रमाणात शारीरिक हालचालींसह प्रारंभ करावा आणि हळूहळू कालावधी, वारंवारता आणि तीव्रता वाढविणे योग्य आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जर तरुण सध्या कोणतीही शारीरिक हालचाल करीत नसतील तर शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कमी प्रमाणात केल्याने काहीही न केल्यापेक्षा अधिक फायदा होईल.

 परंतु एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, 5  ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही. अशा या 80 % विद्यार्थ्यांना 60 मिनिट शारीरिक हालचाली करण्यासाठी विविध उपक्रम घेणे व प्रोत्साहन देणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांपुढील आव्हान आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक मिशन 80-60  असे दिलेले आहे. या 80 % विद्यार्थ्यांना अधिकाधिक क्रियाशील करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक शाळेमध्ये काय करू शकतो याबद्दलचे विविध संशोधनाचे निष्कर्ष आणि जगभरातील काही शाळांमध्ये चालू असलेल्या कल्पना पुढे मांडत आहे. शारीरिक क्रियाशीलतेची पातळी वाढवण्यासाठी केवळ शारीरिक शिक्षणाचे तास पुरेसे होणार नाही तर त्यासाठी विविध उपाययोजना शाळेमध्ये कराव्या लागतील

  1. शारीरिक शिक्षण तासाची प्रभावी अंमलबजावणी: विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशिलतेच्या  पातळीत वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा तास. शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विद्यार्थी किती वेळ क्रियाशील असतात यासंबंधी काही संशोधन झालेले आहेत आणि त्यानुसार ३० मि. पैकी केवळ 9 ते 11 मि. विद्यार्थी क्रियाशील असतात. ही वेळ समाधानकारक नाही. शारीरिक शिक्षण तासांमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काही पर्याय (Options)
    उपलब्ध करून द्यायला हवे कारण सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ किंवा उपक्रम आवडेल असे नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यां संख्येच्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देणे,  त्यासाठी मॉडिफाइड साहित्य तयार करणे, शारीरिक शिक्षण तासातील उपक्रम छोट्या छोट्या गटात घेणे.शारीरिक शिक्षणाचे तास इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी न देणे आणि शारीरिक शिक्षण तासासाठी मिळालेल्या 30 मिनिटाचे जास्तीत जास्त हालचाली होण्यासाठी उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे ध्येय असायला हवे.
  2.  ऍक्टिव्ह ब्रेक (Active break): शाळेच्या वेळापत्रकात 5 ते 10 मिनिटाचा ऍक्टिव्ह ब्रेक जर दिला तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ व्हायला मदत होईल.या ब्रेक मध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ऑफिस कर्मचारी अशा सर्वांनीच विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली कराव्या. या ब्रेकमध्ये कोणत्या हालचाली कराव्यात, कशा कराव्यात याबद्दल आपापल्या स्थानिक पातळीवर विचार विनिमय करून निर्णय घ्यावा.त्यामुळे शाळेतील एकूण वातावरण शारीरिक क्रियाशीलतेला पूरक होईल.
  3. मधली सुट्टी: शालेय वेळापत्रका20 ते 30 मिनिटाची मधली सुट्टी असते. निरीक्षण केले असता या सुट्टीमध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच ते दहा मिनिटात आपला डबा खातात व उरलेल्या वेळेत मित्रांबरोबर खेळतात. अशाप्रकारे मधल्या सुट्टीतील दहा ते पंधरा मिनिट सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय राहण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, साहित्य उपलब्ध करून दिल्यास या वेळेचा विद्यार्थ्यांची क्रियाशीलता वाढविण्यास हातभार लागेल. मधल्या सुट्टीत शिक्षकाने शिकविणे अपेक्षित नाही तर विद्यार्थ्यांना हव्या त्या अनौपचारिक उपक्रम, खेळ खेळू द्यावे. अशाप्रकारचे मधल्या सुट्टीतील उपक्रम बऱ्याच शाळेमध्ये चालू आहे.
  4. शाळेनंतरचे उपक्रम: शाळा सुटल्यानंतर किंवा भरावयाच्या अगोदर एक तास शारीरिक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यास ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे असे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण, शारीरिक सुदृढता उपक्रम, तालबद्ध हलचाली, योगासन, स्केटिंग, मनोरंजनात्मक खेळ, अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव करता येईल.
  5. आंतरकूल स्पर्धा कार्यक्रम: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळाचा अनुभव देण्यासाठी शाळेमध्ये कुल पद्धती अवलंबिल्यास फायदेशीर ठरते. आठवड्यातून एक दिवस अंतरकूल स्पर्धा घेतल्यास शाळेमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास मदत होते. तसेच अशा स्पर्धांमधून वेगवेगळ्या खेळातील टॅलेंटेड विद्यार्थी समजतात.
  6.  अंतरविषय दृष्टिकोन (Interdisciplinary Approach ): मराठी, शास्त्र, गणित, भूगोल यासारख्या विषयांमधील काही घटक हे शारीरिक हालचालींवर आधारित घेतल्यास विद्यार्थ्यांची हालचालीची पातळी वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. वर्गात बसून शिकण्यापेक्षा कृतीयुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांना आवडते व ते परिणामकारक असते. त्यामुळे इतर विषयाच्या शिक्षकांशी चर्चा करून अशा प्रकारचे अध्यापन झाल्यास ते शारीरिक शिक्षण विषयासाठी पूरक असेल.
  7. सक्रिय वाहतूक: शहरांमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी शाळेमध्ये बस, रिक्षा किंवा व्हॅन या मध्ये येतात. परंतु शाळेमध्ये चालत अथवा सायकलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांच्या क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ होईल.

  1. गृहपाठ: शाळेत वर्गामध्ये बसून विद्यार्थी कंटाळलेले असतात. घरी गेल्यानंतर मनसोक्त खेळण्याचे स्वप्न बाळगतात परंतु विविध विषयाच्या गृहपाठ अथवा ट्युशन मुळे त्यांना हे स्वप्न भंग पावते. त्यामुळे इतर विषयाचा सा गृहपाठ असतो तसाच शारीरिक शिक्षण विषयाचा ही ग्रहपाठ दिल्यास विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करण्यास प्रेरणा मिळेल व त्यांच्या हालचालीच्या पातळीत वाढ होईल.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलते मध्ये वाढ होण्यासाठी आणि दिवसभरात किमान 60 मिनिट क्रियाशील राहण्यासाठी विविध उपाययोजना करणे आरोग्यदायी पिढी असण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि भविष्यात तरुण पिढीचे आरोग्य सुधारल्यास शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून समाजासाठी आपले महत्त्वाचे योगदान राहील.

 शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
मो. 9890025266

 


1 comment:

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...