Friday, May 29, 2020

मिशन 80 टू 60

मिशन 80 टू 60 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत विकसित देश होणार अशा प्रकारचा आशावाद निर्माण केला होता. परंतू, ज्या तरुण पिढीच्या जोरावर त्यांनी हा आशावाद सांगितलं होता त्या तरुण पिढीच्या आरोग्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतला असता पुढील बाबी समोर आल्या. भारत मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जगातील सर्वात जास्त मधुमेही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत. एका सर्वेक्षणानुसार 1990 मध्ये भारतात 26 दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण होते त्यांची संख्या २०१६ ला ६५ दशलक्ष इतकी झाली तसेच फुफ्फुसांच्या संबंधित रुग्णांची संख्या २८ दशलक्ष होती ती २०१६ मध्ये ५५ दशलक्ष इतकी झाली. दरवर्षी हृदयविकारामुळे सुमारे 1.7 दशलक्ष भारतीयांचे मृत्यू  होतात. ही आकडेवारी गेल्या २५ वर्षात भारतातील आरोग्याची पातळी किती ढासळत आहे याचे चित्र दर्शविते आणि अतिशय चिंताजनक आहे. सध्या समाजामध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, हृदयाशी संबंधित आजार हे सर्व आजार शारीरिक अक्रियाशीलतेशी (Physical Inactivity) संबंधित आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वच घटकांना समाजामध्ये शारीरिक क्रियाशीलते विषयी जागृती निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे. शारीरिक क्रियाशीलते विषयीचा प्रसार व पाया शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्कम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. असे म्हणतात की, Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle” त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शारीरिक क्रियाशीलता किती करायला हव्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शिका दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

5 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्रियाशीलता पातळी किती असावी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या  शिफारशी 

तरुण व्यक्तीसाठी, शारीरिक क्रियाशीलतेमध्ये खेळ, क्रीडा, मनोरंजन, वाहतूक, दैनंदिन कामेशारीरिक शिक्षण किंवा नियोजित व्यायाम यांचा समावेश होतो.

  • 5 ते 17 वयोगटातील मुले आणि तरुणांनी दररोज कमीतकमी 60 मिनिटे  साधारण ते  तीव्र  शारीरिक हालचाली  केल्या पाहिजेत.
  •  60 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली अधिक आरोग्य लाभ प्रदान करतात.
  •  दैनंदिन शारीरिक हालचाली बहुतांश एरोबिक असाव्यात. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा स्नायू आणि हाडांना बळकटी देणार्‍या तीव्र हालचालींचा  समावेश केला पाहिजे.
  •  या शिफारसी लिंग, वांशिक किंवा उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता सर्व तरुणांसाठी लागू आहेत.
  • निष्क्रिय तरूणांसाठी, वरती संगीतलेले  लक्ष्य साध्य करण्यासाठी सुरूवातीला थोड्या प्रमाणात शारीरिक हालचालींसह प्रारंभ करावा आणि हळूहळू कालावधी, वारंवारता आणि तीव्रता वाढविणे योग्य आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जर तरुण सध्या कोणतीही शारीरिक हालचाल करीत नसतील तर शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कमी प्रमाणात केल्याने काहीही न केल्यापेक्षा अधिक फायदा होईल.

 परंतु एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, 5  ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही. अशा या 80 % विद्यार्थ्यांना 60 मिनिट शारीरिक हालचाली करण्यासाठी विविध उपक्रम घेणे व प्रोत्साहन देणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांपुढील आव्हान आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक मिशन 80-60  असे दिलेले आहे. या 80 % विद्यार्थ्यांना अधिकाधिक क्रियाशील करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक शाळेमध्ये काय करू शकतो याबद्दलचे विविध संशोधनाचे निष्कर्ष आणि जगभरातील काही शाळांमध्ये चालू असलेल्या कल्पना पुढे मांडत आहे. शारीरिक क्रियाशीलतेची पातळी वाढवण्यासाठी केवळ शारीरिक शिक्षणाचे तास पुरेसे होणार नाही तर त्यासाठी विविध उपाययोजना शाळेमध्ये कराव्या लागतील

  1. शारीरिक शिक्षण तासाची प्रभावी अंमलबजावणी: विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशिलतेच्या  पातळीत वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा तास. शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विद्यार्थी किती वेळ क्रियाशील असतात यासंबंधी काही संशोधन झालेले आहेत आणि त्यानुसार ३० मि. पैकी केवळ 9 ते 11 मि. विद्यार्थी क्रियाशील असतात. ही वेळ समाधानकारक नाही. शारीरिक शिक्षण तासांमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काही पर्याय (Options)
    उपलब्ध करून द्यायला हवे कारण सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ किंवा उपक्रम आवडेल असे नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यां संख्येच्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देणे,  त्यासाठी मॉडिफाइड साहित्य तयार करणे, शारीरिक शिक्षण तासातील उपक्रम छोट्या छोट्या गटात घेणे.शारीरिक शिक्षणाचे तास इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी न देणे आणि शारीरिक शिक्षण तासासाठी मिळालेल्या 30 मिनिटाचे जास्तीत जास्त हालचाली होण्यासाठी उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे ध्येय असायला हवे.
  2.  ऍक्टिव्ह ब्रेक (Active break): शाळेच्या वेळापत्रकात 5 ते 10 मिनिटाचा ऍक्टिव्ह ब्रेक जर दिला तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ व्हायला मदत होईल.या ब्रेक मध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ऑफिस कर्मचारी अशा सर्वांनीच विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली कराव्या. या ब्रेकमध्ये कोणत्या हालचाली कराव्यात, कशा कराव्यात याबद्दल आपापल्या स्थानिक पातळीवर विचार विनिमय करून निर्णय घ्यावा.त्यामुळे शाळेतील एकूण वातावरण शारीरिक क्रियाशीलतेला पूरक होईल.
  3. मधली सुट्टी: शालेय वेळापत्रका20 ते 30 मिनिटाची मधली सुट्टी असते. निरीक्षण केले असता या सुट्टीमध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच ते दहा मिनिटात आपला डबा खातात व उरलेल्या वेळेत मित्रांबरोबर खेळतात. अशाप्रकारे मधल्या सुट्टीतील दहा ते पंधरा मिनिट सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय राहण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, साहित्य उपलब्ध करून दिल्यास या वेळेचा विद्यार्थ्यांची क्रियाशीलता वाढविण्यास हातभार लागेल. मधल्या सुट्टीत शिक्षकाने शिकविणे अपेक्षित नाही तर विद्यार्थ्यांना हव्या त्या अनौपचारिक उपक्रम, खेळ खेळू द्यावे. अशाप्रकारचे मधल्या सुट्टीतील उपक्रम बऱ्याच शाळेमध्ये चालू आहे.
  4. शाळेनंतरचे उपक्रम: शाळा सुटल्यानंतर किंवा भरावयाच्या अगोदर एक तास शारीरिक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यास ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे असे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण, शारीरिक सुदृढता उपक्रम, तालबद्ध हलचाली, योगासन, स्केटिंग, मनोरंजनात्मक खेळ, अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव करता येईल.
  5. आंतरकूल स्पर्धा कार्यक्रम: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळाचा अनुभव देण्यासाठी शाळेमध्ये कुल पद्धती अवलंबिल्यास फायदेशीर ठरते. आठवड्यातून एक दिवस अंतरकूल स्पर्धा घेतल्यास शाळेमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास मदत होते. तसेच अशा स्पर्धांमधून वेगवेगळ्या खेळातील टॅलेंटेड विद्यार्थी समजतात.
  6.  अंतरविषय दृष्टिकोन (Interdisciplinary Approach ): मराठी, शास्त्र, गणित, भूगोल यासारख्या विषयांमधील काही घटक हे शारीरिक हालचालींवर आधारित घेतल्यास विद्यार्थ्यांची हालचालीची पातळी वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. वर्गात बसून शिकण्यापेक्षा कृतीयुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांना आवडते व ते परिणामकारक असते. त्यामुळे इतर विषयाच्या शिक्षकांशी चर्चा करून अशा प्रकारचे अध्यापन झाल्यास ते शारीरिक शिक्षण विषयासाठी पूरक असेल.
  7. सक्रिय वाहतूक: शहरांमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी शाळेमध्ये बस, रिक्षा किंवा व्हॅन या मध्ये येतात. परंतु शाळेमध्ये चालत अथवा सायकलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांच्या क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ होईल.

  1. गृहपाठ: शाळेत वर्गामध्ये बसून विद्यार्थी कंटाळलेले असतात. घरी गेल्यानंतर मनसोक्त खेळण्याचे स्वप्न बाळगतात परंतु विविध विषयाच्या गृहपाठ अथवा ट्युशन मुळे त्यांना हे स्वप्न भंग पावते. त्यामुळे इतर विषयाचा सा गृहपाठ असतो तसाच शारीरिक शिक्षण विषयाचा ही ग्रहपाठ दिल्यास विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करण्यास प्रेरणा मिळेल व त्यांच्या हालचालीच्या पातळीत वाढ होईल.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलते मध्ये वाढ होण्यासाठी आणि दिवसभरात किमान 60 मिनिट क्रियाशील राहण्यासाठी विविध उपाययोजना करणे आरोग्यदायी पिढी असण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि भविष्यात तरुण पिढीचे आरोग्य सुधारल्यास शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून समाजासाठी आपले महत्त्वाचे योगदान राहील.

 शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
मो. 9890025266

 


Friday, May 22, 2020

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

 

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

ंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील बीपीएड चे विद्यार्थी दरवर्षी इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये दीड महिन्यासाठी जातात. परत आल्यानंतर त्यांच्याशी बोलताना सर्व विद्यार्थी एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे शाळेतील सीनियर शिक्षक काम करू देत नव्हते.  दोनच दिवसापूर्वी एका शाळेतील शिक्षकांचाही मला फोन आला व ते शाळेत काय काय उपक्रम राबवत आहे याबद्दल सांगू लागले परंतु, त्याचबरोबर सीनियर शिक्षक प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कशी आडकाठी घालतात याची खंत व्यक्त केली. अशा प्रकारची मानसिकता/ वाद सगळीकडेच असतात परंतु, याचे प्रमाण अधिकच वाढले असल्याचे जाणवत आहे. म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी लिहीत आहे.  

अलीकडच्या काळामध्ये शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, अध्यापन शैली, साहित्य, उपक्रम व एकूणच दृष्टिकोनमध्ये विविध बदल झालेले आहेत. हे नवीन बदल नवीन शिक्षक शाळेमध्ये राबविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतू, हे बदल जुन्या पिढीतील शिक्षकांना माहीत नसल्यामुळे दोन पिढ्यांमधील ज्ञानात दरी निर्माण झाल्यामुळे हे वाद होत असावेत. परंतु, त्यामुळे नवीन शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच समाजात, शासन स्तरावर, शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अनेक अडथळ्यांना आणि समस्यांना सामोरे जावे लागत असताना आपल्याच जुन्या आणि नव्या पिढीतील शिक्षकांमधील अशी दरी शारीरिक शिक्षण विषयासाठी मारक आहे. शारीरिक शिक्षणातील नवनवीन उपक्रम, कल्पना शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणे हे विषयाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. नवीन शिक्षकांना पाठिंबा, प्रेरणा जर मिळाली तर ते अधिक जोरदार काम करतील. अन्यथा सीनियर शिक्षकांच्या अशा मानसिकतेमुळे नवीन शिक्षक उत्साह थोड्याच कालावधीत कमी होतो परिणामी शारीरिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. माझी सीनियर शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करावे, पाठिंबा द्यावा, प्रोत्साहित करावे आणि शारीरिक शिक्षणातील नवीन प्रवाहा बरोबर जुळवून घ्यावे व नवीन शिक्षकांनी ही   सीनियर शिक्षकांना विश्वासात घ्यावे व त्यांचा मान राखला जाईल याची काळजी घ्यावी.  शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी दोघांचेही योगदान, सहयोग  मोलाचे असणार आहे

Sunday, May 17, 2020

बदलती क्रीडा साहित्य खोली

बदलती क्रीडा साहित्य खोली  

काळानुरूप आपल्या घरातील टीव्ही, लाइट, फ्रीज इ. उपकरणांमद्धे बदल झालेला आहे. त्याप्रमाणे क्रीडा साहित्य खोलीमध्येही काही बदल झालेले आहे. हे बदल या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ या. सर्वसाधारणपणे क्रीडासाहित्य खोलीमद्धे डंबेल्स, करेला, रिंग हे कवायत प्रकारांचे साहित्य व फूटबॉल, बास्केटबॉल, वॉलीबॉल यासारख्या खेळांचे विविध बॉल असायचे. साधारणपणे मैदाणावर एका बॉल मागे 50 ते 60 विद्यार्थ्यांना खेळताना, पळताना बघतो. शाळेचे मैदान व इमारत कितीही मोठी असली तरी बॉल च्या संखेत फरक पडत नाही. परंतू, कौशल्य अध्ययन करताना सरावाच्या संधी जितक्या जास्त मिळतील तितके अध्ययन चांगले होते असे संशोधांनवरून दिसून येते. त्यामुळे विद्यार्थी साहित्य गुणोत्तर चांगले असणे परिणामकारक अध्ययनासाठी व शाळेतील शारीरिक उपक्रमास पोषक वातावरण निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहे.

  1. कोन: कोन हे क्रीडा साहित्य अत्यावश्यक साहित्य झाले आहे. कारण त्याचा बहुपयोग. कोंनचा उपयोग हा ग्राऊंड मार्किंग साठी, बाऊन्ड्रि म्हणून, दिशाख्तेचे व्यायाम करण्यासाठी, जम्पिंग करण्यासाठी असे विविध उपयोग होतात. कोन हे विविध ऊंची व रंगामद्धे उपलब्ध असतात. विविध रंगाच्या कोनमुळे मैदाना वरील वातावरण उत्चावर्धक होते. आमच्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी शिक्षक एका खेडे गावातील शाळेत पाठ घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने मैदानावर कोन मांडल्या नंतर संपूर्ण शाळा ते कोन बघण्यासाठी गोळा झाले होते. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना ही अवस्था का आहे याचा शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विचार करायला हवा.
  2. हर्ड्ल्स: कोनप्रमाणेच विविध रंगामद्धे व उंचीचे प्लास्टिकचे हर्ड्ल्सल सध्या उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग जंपिंगसाठी केला जातो.

  3. विविध आकाराचे बॉल: विविध आकाराचे व रंगाचे बॉल सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती कमी आहेत प्रमाणित फूटबॉल, वॉलीबॉल च्या एका बॉल च्या किमतीत 10 ते 15 हे बॉल येतात. त्यामुळे अधिक बॉल घेऊ शकतो. शारीरिक शिक्षण तासात विविध कौशल्या अध्यापनात, मनोरंजनात्मक व मॉडिफाइड खेळ खेळतांना, त्यांचा उपयोग करता येतो. सर्वात मतहत्वाचे म्हणजे या बॉलमुळे  विद्यार्थी साहित्य गुणोत्तर वाढविता येते. 

  4. पॅरॅशूट: हे विविध स्थानांतरनीय कौशल्य सरावासाठी व मनोरंजनात्मक खेळांसाठी उपयोगी येते. कलरफुल असल्याने प्रत्येकाला आकर्षित करते व अनौपचारिकरित्या शारीरिक सक्रियता वाढते. पॅरॅशूट हे विविध आकारमध्ये उपलब्ध आहे.

  5. बिन बॅग: या प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कॅचींग व थ्रोईंग करण्यासाठी, मनोरंजनात्मक खेळांमद्धे या बिन बॅग चा उपयोग होतो.
  6. फ्रिस्बी: फ्रिस्बी ही मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय साहित्य आहे. समन्वय वाढविण्यासाठी, मॉडिफाइड खेळ खेळण्यासाठी फ्रिस्बी अतिशय उपयुक्त आहे. फ्रिस्बी विविध आकार आणि कलरमद्धे उपलब्ध आहेत. किमत कमी असल्यामुळे अधिक संखेने घेता येऊ शकतात.

  7. रिंग: टेनिक्वाइट रिंग च्या स्पर्धा होतात. परंतू, फ्रिस्बी प्रमाणेच समन्वय वाढविण्यासाठी, कॅचींग व थ्रोईंग साठी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
  8. हुल्ला हुप: या विशेषता मुलींमद्धे अधिक लोकप्रिय आहेत. परंतू, विविध मनोरंजनात्मक  खेळांसाठी, प्रात्यक्षिकासाठी व विविध उपक्रमांसाठी यांचा उपयोग होतो.  
  9. दिशाभिमुखता पोल (Agility Pole: दिशाभिमुखतेचे विविध व्यायाम करण्यासाठी पोल सध्या लोकप्रिय होत आहेत.
    Agility Pole
  10. शिडी (Ladder): अगिलिटी लद्दर हे सध्या विविध व्यायाम करण्यासाठी लोकप्रिय आहे. रनिंग, जुंपिंग, स्टेपिंग इ. विविध व्यायाम यावर करता येतात. ते विविध आकार व कलरमद्धे उपलब्ध आहेत.
    Agility Ladder 

हे सर्व साहित्य कलरफुल असल्यामुळे विद्यार्थ्यंना शारीरिक उपक्रम करण्यासाठी आकर्षित आणि प्रेरित करते. कुठलेही साहित्य हे हालचालींमद्धे टिकून राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महवचे असल्यामुळे क्रीडा साहित्य खोलीमध्ये हे साहित्य असणे आवश्यक आहे. हे साहित्य केवळ असून उपयोग नाही तर त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीती जास्त उपयोग करण्यासाठी उपलब्ध करून देणे तितकेच महत्वाचे आहे.

 

Tuesday, May 12, 2020

शारीरिक शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली


शारीरिक शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली

                                       
सध्या शालेय शिक्षणामध्ये अध्ययन आणि अध्यापनासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू आहेत, शैक्षणिक प्रवाह येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन शैली / पद्धती  विकसित होत आहेत. एकूणच शालेय शिक्षण व्यवस्था शिक्षकांकडून-विद्यार्थ्यांकडे, शिकविण्याकडून - शिकण्याकडे मार्गक्रमण करत आहे. शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या पद्धतींमध्ये, शैलींमद्धे बदल होत आहे. शिक्षक शिक्षण देतो आणि विद्यार्थी ते घेतो अशाप्रकारचा भेद आता राहिलेला नाही कारण, शिक्षण ही कुणी कुणाला द्यायची वस्तू नाही ती आपली आपण आत्मसात करायची गोष्ट आहे. फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं ही समजूत, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही हा विचार, विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत हा दंडक, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा. शिक्षणातील ही सारी गृहीतकं बदलत आहेत (पाटील, 2012). अशा या बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षणामध्येही आवश्यक ते बदल होणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. वर्षानुवर्षं ज्या पद्धतीने शिकवीत आहे, त्यामध्ये काळानुरूप बदल जे इतर विषयामध्ये होत आहे तसे शारीरिक शिक्षणामद्ध्येही होणे ही काळाची गरज आहे. शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले असता काही विद्यार्थी सराव करत असतात तर काही विद्यार्थी बाजूला गप्पा मारत बसलेले असतात. या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणामध्ये कसे सामावून घेता येईल? आजच्या तरुण-तरुणींना शारीरिक शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी अध्यापन शैली मध्ये काय बदल करावे लागतील? या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावे लागतील.
सर्वसाधारणपणे शिक्षक सांगतात व विद्यार्थी ऐकून त्याप्रमाणे कृती करतात या प्रकारे हुकूम शैली हि शारीरिक शिक्षणाला घट्ट चिकटून बसलेली अध्यापन शैली आहे. यापेक्षा काही वेगळ्या शैलीने/पद्धतीने अध्यापनाचा विचारही करू शकत नाही.  शारीरिक शिक्षणामध्ये काही घटकांचे अध्यापन करण्यासाठी हुकूम शैली निश्चितच परिणामकारक आहे. परंतु,  सर्वच घटक हुकूम पद्धतीने शिकविणे हे ही तितकेच चुकीचे होईल.  हुकूम शैलीची परिणामकारकता आपणा सर्वांच्या परिचयाची आहे परतू या पद्धतीमध्ये पाठातील सर्व निर्णय शिक्षक घेतात, विद्यार्थ्याच्या विचार क्षमतेला कुठेही वाव नसतो या मर्यादा कमी करण्यासाठी आपणास इतर अध्यापन शैलीचा विचार करावा लागेल. विनोबा म्हणतात कि, शिक्षणाची पद्धतच अशी हवी कि, आपण काहीतरी शिकत आहोत असे विद्यार्थ्याला वाटायला नको तसेच शिक्षकालाही असे वाटला नको कि आपण काहीतरी शिकवत आहोत. या वाक्याचा प्रत्यय आपणास घेण्यासाठी शारीरिक शिक्षणातील विविध अध्यापन शैली पुढीलप्रमाणे
या अध्यापन शैलीद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग खर्‍या अर्थाने वाढतो व त्यांना स्वातंत्र्य, मोकळेपणा मिळून शिकण्याचा आनंद मिळतो. प्रस्तुत लेखामद्धे मॉस्टन व अश्वर्थ यांनी मांडलेल्या अध्यापन शैलींचा उल्लेख केलेला आहे. अध्यापन शैली व पद्धती याबद्दल विविध श्रोतात वेगवेगळी माहिती मिळते. मुळात अध्यापन पद्धती या मानसशाश्रातील काही सिद्धानतावर आधारित आहेत. सदर लेखातील अध्यापन शैली मॉस्टन यांनी मांडतांना अध्यापन प्रक्रियेतील निर्णयावर आधारित आहेत 

शिक्षककेन्द्रित अध्यापन शैली
  1. हुकूम शैली        (Command Style)
  2.  सराव शैली       (Practice Style)
  3.  अन्योन्य शैली    (Reciprocal Style)
  4. सर्वसमावेशक शैली (Inclusion Style)
  5. स्व परीक्षण शैली      (Self Check Style )   
विद्यार्थीकेन्द्रित अध्यापन शैली
  1. निर्देशित शोध शैली   (Guided discovery Style)
  2.  केन्द्रोत्सरी शोध शैली (Divergent discovery Style )
  3. केंद्राभिगामी शोध शैली (Convergent discovery Style)
मी बीपीएड विद्यार्थी शिक्षकांना फिटनेस आणि कंडिशनिंग शिकवत असताना मी सर्वसाधारणपणे जे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अंमलबजावणी करतो. उदा. पार्टनरबरोबर करावयाचे व्यायाम. यामध्ये कोणते व्यायाम घ्यायचे हे निश्चित केलेले असते, त्याप्रमाणे ते व्यायाम प्रकार सांगतो आणि विद्यार्थी करतात. परंतु, गेल्या काही तासांमध्ये मी माझ्या या पद्धतीमध्ये काही बदल केले. एक दिवशी हुल्ला हुप बरोबर करायचे उपक्रम  घ्यायचे होते.  नियोजन केल्याप्रमाणे व्यायाम सुरू केले परंतु, काही व्यायाम घेतल्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हणालो की, हुप  बरोबर कोणते उपक्रम  करू शकता याचा विचार करा आणि करून पहा. ही सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थी एकटेच काय-काय करु शकतो याचा विचार करु लागले आणि त्याप्रमाणे कृती करू लागले तर, काही विद्यार्थी जोडीदाराबरोबर आणि गटामध्ये एकत्रितरीत्या वेगवेगळे उपक्रम विचार करून तयार करू लागले.  त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम व व्यायाम प्रकार करून दाखवले. विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले व्यायाम प्रकार कुठल्याही युट्यूब वरील व्हिडिओ मध्ये बघितलेले नाही किंवा कुठल्याही पुस्तकात दिलेले नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांमधून तयार केलेले व्यायाम होते. विशेष म्हणजे स्वतः तयार केलेले व्यायाम केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आणि मलाही माझ्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे वेगळेच समाधान जाणवत होते. सर्जनशीलता, नाविन्यता हे सर्व शब्द मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने अनुभवत होतो. शारीरिक शिक्षण म्हणजे म्हणजे केवळ शिक्षकाने आज्ञा देणे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करणे एवढेच अपेक्षित नाही हेही लक्षात आले(बरेच उशिरा), तसेच नविन पिढीला विचार करण्याची संधी दिली तर ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात याची जाणीव झाली.  या पद्धतीचे नाव आहे केन्द्रोत्सरी शोध शैली. या शैलीमध्ये एका प्रश्नाला अथवा परिस्थितीला विद्यार्थी अनेक उत्तरांचा आणि शक्यतांचा शोध घेतात. नवीन कौशलयांचे अध्यापन करतांना, विशेषकरून सुदृढताविषयक उपक्रम शिकविताना हि शैली उपयुक्त ठरते.
अन्योन्य शैली ही अशी शैली आहे ज्यामधे विद्यार्थी आपल्या जोडीदाराबरोबर शिकतो. एक विद्यार्थी कौशल्य सराव अथवा उपक्रम करतांना दूसरा विद्यार्थी त्याचे निरीक्षण करून अभिप्राय देतो. यामध्ये विद्यार्थी हा मिनी शिक्षकाची भूमिका करतो. काय निरीक्षण करायचे हे शिक्षकाने सांगीतलेले असते. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्यास काय होते हे अनुभव घेतल्यास अधिक चांगले समजेल. शाळेतील एका वर्गात साधारणपणे ५० ते ७० विद्यार्थिसंख्या असतांना अनेक घटकांसाठी या पद्धतीचा उपयोग केल्यास शिक्षकास निश्चित फायदा होईल.
सराव शैली ही अजून एक माझी आवडती शैली आहे. ज्यामधे विद्यार्थ्याला वैयक्तिक सरावाचे स्वातंत्र्य असते. विनोबा म्हणतात की स्वातंत्र्य हा शिक्षणाचा आत्मा आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या कौशल्याचा सराव घेतांना शिक्षक सर्वांना समान काठीण्यपातळीचा सराव देतात. वर्गामद्धे वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांसाठी तो सराव अवघड असू शकतो तर, काहींसाठी तो अधिक सोपा असू शकतो. म्हणून प्रत्येकाला आपआपल्या क्षमतेला योग्य सराव करू देणारी ही पद्धत आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या
बास्केटबॉल अथवा हॅंडबॉल मधील ड्रिब्लिंग या कौशल्याचा सराव घ्यावयाचा असल्यास जागेवर ड्रिब्लिंग, चालत ड्रिब्लिंग, पळत ड्रिब्लिंग, जोडीदाराबरोबर ड्रिब्लिंग इत्यादी विविध सरावाच्या काठीण्यपातळी असू शकतील. यापैकी कोणत्या काठीण्यपातळीचा सराव करायचा हे शिक्षक नाही तेर विद्यार्थी स्वतः ठरवितो. तसेच काठीण्यपातळी  कधी बदलायची, सराव कधी सुरू करायचा कधी थांबायचे हेसुद्धा विद्यार्थी ठरवितात.
स्व परीक्षण शैली चे प्रमुख वैशिष्टे म्हणजे शिक्षकाने निश्चित केलेल्या सराव नियोजनानुसार वैयक्तिक सराव करणे. या शैली त शिक्षकाची भूमिका म्हणजे घटक निश्चित करणे, तर विद्यार्थ्याची भूमिका म्हणजे वैयक्तिक सराव करून शिक्षकांनी दिलेल्या निकषांप्रमाणे स्वतःच्या  कार्यामानाचे मूल्यमापन करणे.  स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी स्वतः घेणे, सामाजिक सुसंवादाचा विकास हे या शैलीचे वैशिष्ट आहे.   
सर्वसमावेशक शैली  हि नावानुसार कार्यमानात सर्व स्तरातील (कौशल्य अथवा सुदृढतेच्या दृष्टीने) विद्यार्थ्याचा पाठात समावेश करून घेण्यासाठी उपयुक्त शैली  आहे. ज्यामधे कमी मध्यम व क्लिष्ट अशा विविध काठीण्यपातळीचे कार्य विद्यार्थ्यांना दिले जाते आणि विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार काठिन्यपातळीची निवड करून सराव करावा. यादोन्ही शैलीमुळे विद्यार्थी सरावास व अध्ययनास प्रेरित होतात कारण त्यांना सरावात स्वातंत्र्य असते.       
निर्देशित शोध शैली हि विद्यार्थी केन्द्रित अध्यपन शैलीतील महत्वाची शैली  आहे. नावाप्रमाणेच या शैली मध्ये विद्यार्थी नवीन हालचालींचा, संकल्पनांचा, कौशल्याचा शोध घेतात व शिक्षक तो शोध घेण्यासाठी आवश्यक प्रश्नांची मालिका विद्यार्थ्यांसामोर मांडतो व विद्यार्थी त्या प्रश्नांचा शोध हालचालींचे वेगवेगळे प्रयोग करून शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रयोगाद्वारे शिकणे, समस्या सोडविणे हा या शैलीचा गाभा आहे.
केंद्राभिगामी शोध शैली मध्ये शिक्षक समस्येची मांडणी करतात व विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर शोधण्यास प्रवृत्त करतात. विद्यार्थी एकटे, गटात किंवा जोडीदारा बरोबर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. समस्या किंवा परिस्थिति काय मांडायची यासाठी शिक्षकांना विशेष तयारी करावी लागेल. कदाचित एका तासामध्ये उत्तर मिळणार नाही, कदाचित विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाली अपेक्षेप्रमाणे होणार नाही, परंतु विद्यार्थी बोधात्मकदृष्ट्या सक्रिय असतील, वेगळा विचार करतील व शारीरिक शिक्षण हे केवळ कारक क्षेत्राशीच (Psychomotor domain) संबंधित नसून, बोधात्मक (Cognitive domain) आणि भावात्मक क्षेत्राशी (Affective domain) सुद्धा निगडीत आहे, किंबहुना कारक बोधात्मक व भावात्मक अश्या तिन्ही क्षेत्रांचा विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे याची जाणीव सर्वांनाच होईल. शारीरिक शिक्षणातील  या शैली विद्यार्थ्यांची कुतूहल जिज्ञासा वाढविणाऱ्या,  स्वयम् अध्ययनाची प्रेरणा देणाऱ्या आहे. हुकूम शैली शिवाय इतर अध्यापन शैली प्रत्यक्ष राबविताना हाच अनुभव मिळतो. ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतः सुद्धा शिकतात, परस्परांकडून  शिकतात. हे या सर्व अध्यापन  शैलीचा उपयोग केल्यानंतर लक्षात येते. असे म्हणतात की शिक्षक हा शाळेतील सौम्य हुकूमशहा असतो. नव्या शिक्षकांना आता हुकूम सोडीत राहण्याचा पवित्रा सोडावा लागेल. त्याची भूमिका आता थोरल्या भावाची  किंवा मित्रासारखी विकसित करावी लागेल.
या अध्यापन शैली शारीरिक शिक्षण तासात वापरणे शक्य होईल का ? विद्यार्थी प्रतिसाद देतील का? मोठ्या विद्यार्थी संख्या असल्यास या अध्यापन शैली कश्या राबविणार? साहित्य नसेल तर कसे करणार? असे एक अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात गर्दी करतील पण, बदल घडवायचा असेल, तर पर्याय शोधावे लागतील. बदल घडवायचे असतील तर, केवळ व्यवस्थेवर खापर फोडून चालणार नाही तर प्रत्यक्षा कृती करावी लागेल कारण, कृती हेच प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या विषयाचे महत्व पटवून देण्याच्या लढ्यामधे नावीन्यपूर्ण विचार, कृतीयुक्त सहभाग, कठोर परिश्रम घ्यावे लागतील. हि काही रेडिमेड मिळण्याची गोष्ट नव्हे, त्यासाठी  आपल्याला विषयाचे व पर्यायाने आपले स्टेटस बदलण्यासाठी अनेक प्रयोग, प्रयत्न करावे लागतील, त्यापैकि एक छोटा प्रयोग म्हणजे विविध अध्यापन शैली वापरुन अध्यापन करणे, त्याचे परिणाम सर्वांसमोर मांडणे व शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात, विचारप्रक्रियेत व समजवर्तनात कसा आमुलाग्र बदल होतो हे दाखवून देणे. 
      
संदर्भ
Muska Mosston & Sara Ashworth (2008). Teaching Physical Education
विनोबा (2016). शिक्षण विचार. सर्व सेवा संघ प्रकाशन, वाराणसी.
ओशो (1993). शिक्षण क्रांति हीच खरी क्रांति. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन, पुणे.
पाटील लीला (2012). शिक्षण घेता-देता. उन्मेष प्रकाशन, पुणे.
पानसे रमेश (2016). रचनावादी शिक्षण. ग्राममंगल, पुणे.   


शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...