Saturday, December 26, 2020

विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने


विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने 

एकदा मैदानावर व्यायाम करत असताना शेजारीच बास्केटबॉल मैदानावर एक चिमुकला हातामध्ये बॉल घेऊन बास्केटबॉलच्या रिंग मध्ये टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. परंतु, त्याची उंची, त्याच्या हातातील ताकद आणि बास्केटबॉल पोलची उंची यामध्ये खूप अंतर असल्यामुळे त्याचा बॉल रिंग पर्यंत जात नव्हता. त्यावेळी मनात आले की, सुपरमॅन सारखे जाऊन आपण त्या बास्केटबॉल पोलची उंची कमी करावी जेणेकरून त्या चिमुकल्याचा बॉल बास्केटबॉल च्या रिंग मध्ये जाईल आणि तो आनंदाने उड्या मारील. अशा प्रकारचे अनेक प्रसंग नेहमीच आपल्या आजूबाजूला दिसतात. शारीरिक उपक्रमात, खेळात आणि कौशल्यात यश मिळाल्यानंतर मिळणारा आनंद मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खूप महत्वाचे असते नव्हे ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही किंवा सतत अपयश येते तेव्हा आपण ती गोष्ट करण्याचे सोडून देतो. जर आपल्याला सातत्याने अपयश येत असल्यास वाटते की, प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. हीच परिस्थिती शारीरिक शिक्षण पाठात बर्‍याचदा येऊ शकते. एखादे कौशल्य किंवा उपक्रम करताना जर विद्यार्थ्यांना यश आले नाही तर ते निराश होण्याची किंवा सराव थांबवण्याची शक्यता अधिक असते. जर शिक्षकाला असे वाटत असेल की, विद्यार्थ्याने चांगला सराव करावा, सरावात सातत्य आणि प्रेरणा असावी तर विद्यार्थ्याला करत असलेल्या उपक्रमात यश मिळायला हवे. यशस्वितेचा दर (Success rate) जर चांगला असेल तर विद्यार्थी सराव करण्यासाठी प्रेरित होतो. पण संशोधनानुसार नवीन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा यशस्वितेचा दर हा साधारणपणे 80 %
इतका असावा. उदाहरणार्थ एखादे कौशल्य विद्यार्थ्याने दहा वेळेस केले असता त्याला आठ वेळेस यश मिळाले तर तो सहवास प्रेरित होतो. चांगले कौशल्य प्राप्त करण्यासाठी ूप सार्‍या सरावाची आवश्यकता असते. कौशल्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी अनेक महिने अथवा वर्ष लागू शकता. याविरुद्ध त्यांना तात्काळ निकाल हवे असतात. विद्यार्थ्यांना थोडे जरी अपयश आले तरी त्यांना वाटते की आपण कौशल्य करू शकणार नाही त्यांचा आत्मविश्वास कमी होतो स्व संकल्पना कमी होण्याची शक्यता असत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शारीरिक शिक्षण शिक्षक हे सरावात अशा प्रकारे बदल करतात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा दर हा कच्चा असत. असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सराव देतो, सराव सोपे अवघड क्रमबद्ध क्रमबद्ध वाढवत नेतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. तसेच दुसरा बाद मौज बंद करतो जेणेकरून विद्यार्थी सरावात आनंदाने सहभागी होतात व कौशल्यात प्रगती करतात. विद्यार्थ्यांच्या यशाचा दर चांगला लागण्यासाठी काही तंत्र आहेत ती पुढीलप्रमाणे.

1. स्व निश्चित लक्ष्य (self adjusting target)

वेगवेगळ्या खेळामधील थ्रोइंग, कॅचींग  यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा चांगला उपयोग होतो. या कौशल्यांचा सराव करताना सर्वसाधारणपणे शिक्षक विशिष्ट असे अंतर निश्चित करून विद्यार्थ्यांना पासिंग, किकिंग यासारख्या कौशल्य करण्यास सांगतात. परंतु शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी योग्य असेलच असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता कौशल्य स्तर हा वेगळा असतो त्यामुळे शिक्षकाने निश्चित केलेले अंतर हे काही विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे तर काही विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. त्यासाठी अशा कौशल्यांचा सराव घेताना शिक्षकाने अंतर निश्चित न करता विद्यार्थ्यांना अंतर निश्चित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यामुळे काही विद्यार्थी लक्ष्यापासून कमी अंतरावर उभे राहतील आणि काही विद्यार्थी लक्ष पासून अधिक अंतरावर उभे राहतील आणि आपापल्या क्षमतेनुसार सराव करते. अशाप्रकारे शारीरिक शिक्षण पाठात काही प्रमाणात विद्यार्थ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विद्यार्थ्यांच्या यशाचा दर वाढण्यास मदत होईल. 

2. तिरकस रोप तंत्र (Slanty Rope technique)

तिरकस रोप तंत्र हेसुद्धा यशस्वितेचा दर वाढविण्यासाठीचे प्रभावी तंत्र आहे. जागेवरुन लांब उडी जागेवरून उंच उडी रनिंग थ्रोइंग यासारख्या कौशल्यांचा सराव करताना या तंत्राचा उपयोग होतो. यासाठी दोन रोप जमिनीवर ठेवावे एका टोकाला रोप जवळ असेल तर मधील अंतर कमी असेल तर दुसऱ्या टोकाला रोपमधील अंतर अधिक असेल. रोप नसल्यास मैदानावर फक्की ने अथवा कोणाच्या सहाय्याने आखणी केली तरी चालेल. सराव सुरू केल्यानंतर कोणत्या अंतरावरून उडी मारायची किंवा कौशल्य करायचे याचा निर्णय विद्यार्थ्यांवर सोपवायचा. विद्यार्थी आपापल्या क्षमतेप्रमाणे अंतर निश्चित करतील आणि त्या ठिकाणाहून ते कौशल्य करण्याचा प्रयत्न करते. आंतर निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिल्यामुळे विद्यार्थी कमी अंतरावरून कौशल्य करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात यश आल्यानंतर विद्यार्थी ते कौशल्य किंवा उपक्रम करण्यास प्रोत्साहित होतील. 

3. अध्यापनामध्ये निमंत्रण देणे (Teaching by Invitation)

अध्यापनात निमंत्रण म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रकारचा सराव किंवा उपक्रम न देता वेगवेगळे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे उदा. यामध्ये शिक्षक दोन किंवा त्यापेक्षा जास्त सरावकार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवतो व त्यानंतर विद्यार्थी निर्णय घेतात की त्यांच्यासाठी कोणते सराव कार्य योग्य आहे. कारण एकच सराव कार्य सर्व विद्यार्थ्यांना योग्य होईलच असे नाही, वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असतात आणि म्हणून अश्या वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे सराव कार्य दिले आणि कोणते सराव कार्य विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांनाच घेऊ दिला तर विद्यार्थी सरावासाठी निश्चितच प्रोत्साहित होतील. त्यासंदर्भात काही उदाहरणे पुढीलप्रमाणे 
ज्या विद्यार्थ्यांना मॉडिफाइड पुशअप्स करायच्या असतील त्यांनी मॉडिफाइड पुशअप्स करावेत, ज्यांना पूर्ण पुशअप्स करायचे असतील त्यांनी पूर्ण पुशअप्स करावेत.
तुम्हाला सराव जोडीदाराबरोबर करायचा असेल तर त्याच्याबरोबर करा अथवा एकटा करायचा असेल तर एकटा करा  
मला वाटते सर्वांनी किमान २५ सिटअप्स करावेत आणि ज्यांना जास्त करायच्या असतील त्यांनी जास्त करावे 
थोडक्यात सांगायचे म्हणजे विद्यार्थ्यांवर एकच सराव कार्य लादायचे नाही तर, त्यापेक्षा जास्त सराव कार्य विद्यार्थ्यां देणे व कोणता सराव करायचा याचा निर्णय विद्यार्थ्यांना घेऊ देणे. क्षमतेनुसार सरावाचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देणे जे पारंपरिक शारीरिक शिक्षण तासामध्ये साधारणपणे नसते. अध्यापनामध्ये निमंत्रण देताना शिक्षकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सराव कार्याची एकमेकांशी तुलना करायची नाही किंवा हे सराव कार्य चांगले दुसरे वाईट अशा प्रकारच्या तुलना करू नये. विद्यार्थ्यांना सराव करत असताना यश मिळावे, विद्यार्थ्यांची स्व संकल्पनेचा विकास करण्यासाठी, हालचालींचा आनंद मिळणे आणि सकारात्मक वातावरण निर्मिती करणे हाच वेगवेगळे सराव कार्य देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे हे शिक्षकाने लक्षात ठेवावे. प्रत्येक उपक्रम सक्तीचा, शिस्तीचा धाक या मानसिकतेमधून बाहेर पडून विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतींचा दैनंदिन पाठात उपयोग करणे सर्वसमावेशक शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक आहे.   

शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
sharadaher@agashecollege.org


Wednesday, December 16, 2020

शारीरिक साक्षरता काळाची गरज !!!


साक्षरता म्हणजे वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता. भारतामध्ये साक्षरता यावर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य झालेले आहे आणि चालू आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न होताना दिसत आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये अक्षर (Alphabetical) आणि संख्यात्मक (Numarical) साक्षरतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. परंतु, या साक्षर ते बरोबरच आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे हे सध्या करोना  महामारीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे. 

शारीरिक साक्षरता म्हणजे काय?

"आयुष्यभरासाठी शारीरिक सक्रिय राहण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, ज्ञान आणि समज असणे  म्हणजे शारीरिक साक्षरता " केवळ व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे म्हणजे शारीरिक साक्षरता नसून एखादा खेळ,  उपक्रम किंवा व्यायाम करण्याची क्षमता असणे, व्यायाम, किंवा उपक्रम आत्मविश्वासाने करणे,  जे व्यायाम किंवा उपक्रम  करतो आहोत त्यासंबंधी ज्ञान आणि समज असणे,  व्यायाम, उपक्रम किंवा खेळ खेळण्याची प्रेरणा असणे हे चारही घटक शारीरिक साक्षरतेसाठी महत्त्वाचे आहेत. कारण, हे चारही घटक आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य व्यक्ती व्यायाम अथवा उपक्रम करतो त्यावेळी त्या उपक्रमा बद्दलचे ज्ञान, समज फारशी लक्षात घेत नाही. म्हणजे एखादा व्यायाम का करावा? कसा करावा? किती करावा? त्याचे फायदे -तोटे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जात नाही. त्यामुळे कालांतराने इजा होणे, थकवा जाणवणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे  यासारखे अनुभव येतात आणि परिणामी व्यायामात खंड पडतो आणि बंद पडतो. म्हणून, व्यायाम/उपक्रम करण्याची  केवळ क्षमता असून उपयोग नाही तर त्या व्यायामाचे/उपक्रमाचे शास्त्रीय ज्ञान आणि समज  असणे महत्वाचे आहे. क्षमता, ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रेरणा हे वेगवेगळे घटक असूनही त्यांचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे. यातील एकाही घटकाची कमतरता शारीरिक साक्षरतेत बाधा आणू शकते.  शारीरिक साक्षरता विकसित करणे म्हणजे  हालचालीचा आनंद घेता येणे, आत्मविश्वासाने आणि मुक्तपणे हालचाली करता येणे, हालचाल  कशी करायची आणि आपण का हालचाल केली पाहिजे हे जाणून घेणे आणि शारीरिक उपक्रमात  सर्जनशील असणे. शारीरिक साक्षरता ही केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी आहे. शारीरिक साक्षरतेत तरुण-वयोवृद्ध, श्री-पुरुष, खेळाडू-खेळाडू नसलेले अशा  प्रत्येकाचा समावेश आहे किंबहुना प्रत्येकाची ती गरज आहे.   शारीरिक साक्षरता हा एक प्रवास आहे. तो कोणत्याही वयात सुरू करता येतो आणि आयुष्यभर चालू असतो. त्यामुळे शारीरिक साक्षर होण्यासाठी कोणतेही वयाची अट नाही. शारीरिक साक्षरता हि गुण (Marks) किंवा स्पर्धा (Competition) यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण, बरेच खेळाडू जोपर्यंत स्पर्धामद्धे सहभागी होतात तोपर्यंतच खेळाचा सराव करतात आणि स्पर्धा संपल्या कि, सराव थांबवितात. शारीरिक साक्षरतेसाठी अशाप्रकारे पार्ट टाईम कार्य अपेक्षित नाही. कारण, आरोग्य किंवा सुदृढता हि राखून, साचून (store) ठेऊ शकत नाही.  संशोधनात असेही दिसून आले आहे की, शारीरिक साक्षरतेशिवाय व्यक्ती शारीरिक उपक्रम  आणि खेळातून माघार घेऊ शकतात. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक निष्क्रियता आणि अस्वास्थ्य येते.  

शारीरिक साक्षरतेचा विकास आणि प्रसार होण्यासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे 



शारीरिक साक्षरतेचा पाया 

कोणत्याही विषयाच्या अथवा क्षेत्राच्या काही मूलभूत (Fundamantals) गोष्टी असतात, तत्त्वे असतात त्याचप्रमाणे  विविध खेळांची/उपक्रमांची सुद्धा  काही मूलभूत कौशल्य आहेत. ज्याप्रमाणे मराठी भाषा ही  मुळाक्षरंवर आधारलेली आहे, तर इंग्रजी भाषा ही A to Z या अल्फाबेट वर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे खेळामधील मूलभूत कौशल्य म्हणजे सर्व खेळांचा,उपक्रमांचा व हालचालींचा पाया आहे. चालणे, धावणे, उड्या मारणे, लंगडी घालने, थ्रोइंग, कॅचींग, कीकिंग, पुलिंग, पुशिंग, बेंडींग ही सर्व मूलभूत कौशल्य म्हणजे शारीरिक साक्षरतेची बाराखडी म्हणजेच पाया आहे. कुठल्याही विषयात प्रगती साधायची असेल तर त्या विषयाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. वर्ष २ ते ७ हा कालखंड मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. २ ते ७ या कालखंडात मूलभूत कौशल्यांचा विकास जितका चांगला होईल तितके आयुष्यभर सक्रिय राहण्याची शक्यता वाढते, विविध उपक्रम करण्याची क्षमता येते त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे शारीरिक साक्षरतेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी मुलभूत कौशल्य शिकणे अत्यावश्यक आहे.


मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळांचे महत्व

शाळेमधील मधल्या सुट्टीचे निरीक्षण केले असता विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आनंदाने आणि मनसोक्तपणे मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळ खेळत असतात. परंतु असे खेळ बालपणाबरोबरच लुप्त पावतात. सर्वसाधारणपणे आपल्या समाजामध्ये खेळांकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनच बघितले जाते. परंतु,  आनंदासाठी खेळ असा दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारण,  व्यक्तीला एखादा शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळत असताना आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळते. समाजामध्ये मुख्य खेळांना (Major Games) अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजे ज्याचे विशिष्ट नियम असतात, वेगवेगळ्या स्तरावर ज्या खेळाच्या स्पर्धा होतात असे खेळ. परंतु असंरचित खेळ (Unstructured Games), मॉडिफाइड खेळ  सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. ज्याचे विशिष्ट असे नियम नसतात किंवा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धाही होत नाही. परंतू, गल्ली बोळांमद्धे,सोसायट्यांमद्धे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्तपणे अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात आणि त्यांचा आनंद लुटत असतात. उदा. विटी दांडू, लगोरी इ तसेच विविध खेळ, नृत्य प्रकार वेगवेगळ्या भागात केले जातात. नृत्य हा सुद्धा अनेक व्यक्तींचा आवडता शारीरिक उपक्रम आहे. शारीरिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून असे खेळ महत्त्वाचे आहेत. असे आंतरराष्ट्रिय मार्गदर्शक गोपीचंद यांनी म्हटले आहे. 

शारीरिक शिक्षण शिक्षक आणि पालकांची जबाबदारी 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध शारीरिक उपक्रम आणि खेळाची ओळख आणि त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी त्यामधून त्यांना जे आवडते उपक्रम किंवा खेळ आवडतील ते आयुष्यभर खेळू शकतील. कारण, सर्वांना एकच शारीरिक उपक्रम आवडतो असे नाही तर प्रत्येकाची आवड-निवड, क्षमता वेगळी असते. उदा. चालणे, योगासन, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग वेगवेगळे खेळ खेळणे इत्यादी. तसेच शिक्षकांनी व पालकांनी आपल्या आवडी-निवडी विद्यार्थ्यांवर लादू नये. अन्यथा विद्यार्थी त्या उपक्रमाचा आनंद घेऊ शकणार नाही.  त्यामुळे बालवयात विविध शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचीही जबाबदारी आहे.आणि आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठीचा तोच पाया आहे.जेव्हा पालक बालपणात हालचाली करण्यास प्रोत्साहित करतात तेव्हा शारीरिक साक्षरता सुरू होते

सर्वसाधारणपणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयांमध्ये अडचणी येतात अशा विषयाचे विद्यार्थी विशेष क्लासेस लावतात परंतु, सध्या खेळामध्ये जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना विशेष क्लास लावले जातात आणि त्यांच्यावर अधिक लक्ष दिले जाते. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करताना अडचणी येतात, त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा नसते अशा विद्यार्थ्यांना विशेष क्लासेसची आणि अधिक लक्ष देण्याची गरज असते. विद्यार्थ्याच्या मनात  शारीरिक उपक्रमाबद्दल भीती असेल तर तो आयुष्यभर त्यात भाग घेणार नाही. म्हणून शारीरिक उपक्रम करताना आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक साक्षरता हा वैयक्तिक आजीवन प्रवास आहे. शारीरिक साक्षरतेकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहणे आणि कृती करणे भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरेल.


शरद आहेर 

सहयोगी प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे 

मो. 9890025266 


Friday, September 4, 2020

मागे वळून पाहताना ........

मागे वळून पाहताना ........ 

सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्या. मी गेल्या 20 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहे. परंतु, शिक्षक म्हणून माझा जन्म  एक-दोन वर्षपूर्वीच झाला असे वाटते. त्याअगोदर मी ऑफिसर, पोलिस यांची भूमिका पार पाडली शिक्षकाची नाही असे वाटते. शिक्षकाला मुलांनी खूप घाबरले पाहिजे, शिक्षकाची मुलांना भीती, धाक, दडपण वाटले  पाहिजे. अशा समजुतीत माझी अनेक वर्ष गेली. ज्या शिक्षकांना विद्यार्थी खूप घाबरतात, जे शिक्षक मारतात तेच चांगले शिक्षक अशी पक्की समजूत होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये या समजुती मध्ये फरक पडत गेला तो पुढीलप्रमाणे.  यामध्ये प्रथम माझा जुना दृष्टीकोण आणि समज आहे आणि त्याच्या समोर यात झालेला बदल दिलेला आहे. 

  1. शिक्षक म्हणजे खूप शिकविणारा → शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करणारा.
  2. ज्याला विद्यार्थी खूप घाबरतात तो चांगला शिक्षक →ज्याला विद्यार्थी अजिबात घाबरत नाही आणि मित्रासारखे वाटतात तो चांगला शिक्षक.
  3. जो विद्यार्थ्यांना मारतो तो चांगला शिक्षक → जो  विद्यार्थ्यांवर प्रेम करतो तो चांगला शिक्षक.
  4. चांगले प्रेझेन्टेशन करणारा, विद्यार्थ्यांना नोट्स लिहून देणारा  →विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव देणारा, विद्यार्थ्यांशी चर्चा करणारा, स्व अध्ययनाला चालना देणारा 
  5. केवळ पुस्तकी माहितीवर आणि अभ्यासक्रम पूर्ण करणारा  →पुस्तका बाहेरील वास्तविक जीवनाशी निगडित शिकवणारा 
  6. उत्तम बोलणारा  →चांगला शिक्षक उत्तम श्रोता (Good listener) असावा 
  7. आदेश देणारा → विद्यार्थ्यांचे मत विचारात घेणारा
  8. चुकल्यानंतर शिक्षा करणारा → समजून घेणारा 
  9. वर्गात शांतता अपेक्षित करणारा → विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणारा, विद्यार्थ्यांना वर्गात मुक्त हालचालीस वाव देणारा  
  10. घोकंपट्टीवर आणि माहितीवर (Inform) आधारित परीक्षा घेणारा →  कृतीवर आधारित, सर्जनशिलतेला वाव असणारी परीक्षा घेणारा
  11. स्टेजवरून व्याख्यान देणारा → विद्यार्थ्यांमध्ये मिसळून चर्चा करणारा 
  12. व्याख्यान पद्धतीचा, हुकूम पद्धतीचा पुरस्कर्ता → विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कर्ता 
माझ्या शिक्षकाबद्दलचा दृष्टीकोण आणि समज वाढविण्यात शिक्षण तत्व आणि विचार (विनोबा भावे), बखर शिक्षणाची, कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स,शिक्षकांसाठी साने गुरुजी (हेरंभ कुलकर्णी), परिवर्तनशील शिक्षण, प्रवास ध्यासचा आनंद सृजनाचा, अर्थपूर्ण शिक्षणासाठी, शिक्षण देता-घेता (लीला पाटील), नयी तालिम, रचनावादी शिक्षण, शिक्षण आनंदक्षण (रमेश पानसे), शिक्षण क्रांति हीच खरी क्रांती (आचार्य रजनिश) या सर्व पुस्तकांमुळे शक्य झाले. असे म्हणतात की, " शिक्षकाचे कर्तव्य म्हणजे कमीत कमी ज्ञान देणे आणि जास्तीत जास्त विचार करण्यास प्रेरित करणे आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सल्लागार, जोडीदार असावा. संवाद, चर्चा, समजून घेणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावर अधिक वेळ व्यतीत करणरा असावा."  
शिक्षक होण्यासाठीची पदवी (Degree) घेणे आणि शिक्षकाची समज येणे यात किती फरक आहे हे समजायला मला अनेक वर्ष लागली. आपल्याला ती समज लवकर यावी यासाठी हा प्रयत्न     

Monday, August 10, 2020

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

काल एका एम.फिल संशोधनाच्या सादरीकरणासाठी उपस्थित होतो. सदर संशोधन हे शाळेमधील शारीरिक शिक्षणाच्या संबंधीचे होते. त्यासाठी संशोधिकेने सातारा शहरांमधील 18 शिक्षकांचे 53 शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले होते. संशोधनामधील प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे व अतिशय धक्कादायक होते. ते म्हणजे संशोधिकेने बघितलेल्या 53 शारीरिक शिक्षण तासांपैकी केवळ एक शारीरिक शिक्षणाचा तास नियोजनबद्ध असा होता ज्यामध्ये प्रास्ताविक हालचाली, कौशल्य सराव, विद्यार्थ्यांच्या चुकांची दुरुस्ती, सर्वांना सराव करता येईल इतके साहित्य होते. बाकीच्या 52 शारीरिक शिक्षण तासांमधील शिक्षकांनी कुठलेही नियोजन केलेले नव्हते, काही तासांमध्ये तर शिक्षकच चुकीचे प्रात्यक्षिक दाखवत होते, चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देत होते, तर काही पाठांमध्ये विद्यार्थी चुकीच्य पद्धतीने व्यायाम करत होते, कौशल्य सराव करत होते परंतु त्यांच्या चुकांची शिक्षक उपस्थित असूनही दुरुस्ती केली जात नव्हती, निरीक्षण केलेल्या 53 तासांपैकी बहुतांश शारीरिक शिक्षण तासांमध्ये शिक्षक केवळ कबड्डी खो-खो यासारखे खेळ घेत होते व शिक्षक केवळ पंचकार्य करत होते, त्या दरम्यान शिक्षक कुठलाही फीडबॅक देत नव्हते, काही तासांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यास काही विद्यार्थ्यांना बाजूला बसलेले गेलेले होते अशी काही प्रमुख निरीक्षणे व निष्कर्ष या संशोधनामध्ये नोंदविलेली होती. 

हे सर्व  ऐकल्यानंतर  दुःख, निराशा, संताप अशा सगळ्या भावना एकवटून आल्या होत्या. मनामध्ये एकामागून एक अशा अनेक प्रश्नांचा कलह माजलेला होता. पुस्तकांमध्ये अपेक्षित असलेला शारीरिक शिक्षणाचा तास आणि शाळांमध्ये चालू असणारे शारीरिक शिक्षण यातील तफावत प्रकर्षाने जाणवत होती.प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतक्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाचे प्रत्यक्ष शाळाशाळांमधून इतकी अनास्था का बरे असेल? हे संशोधन केवळ सातारा शहरापुरतेच मर्यादित होते परंतु शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग व इतर ठिकाणीही शाळाशाळांमधून चाललेले शारीरिक शिक्षण व अपेक्षित असणारे शारीरिक शिक्षण या मधली तफावत खूप मोठी आहे हे मान्य करावाच लागेल. हे सर्व चित्र बदलायचे असेल तर काय बरे करावे लागेल? या सर्व परिस्थितीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ? या परिस्थितीचे विश्लेषण करायचे झाले तर अनेक चर्चा रंगतीलही, परिस्थिती बदलायची वाट पाहायची की बदलण्यासाठी प्रयत्न करायचे ? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यामध्ये काहूर करत होते. त्याचवेळी महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील  प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होताआणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही  सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल.
शारीरिक शिक्षण शिक्षकांनाही याचं घटकांची आवश्यकता आहे असे वाटते!!!
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६

Friday, July 24, 2020

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले


कै. कॅ. शिवरामपंत दामले उर्फ शिवा काकांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे 1924 मध्ये महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, त्याचबरोबर कुस्ती, लाठी, मैदानी खेळ हे तरुणांना शिकविणे, त्यासाठी व्यायाम शाळा काढणे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व नैतिक उन्नतीसाठी सहाय्य करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शारीरिक शिक्षण हे शास्र आहे अशा छोटेसा तालमीत त्याचा विकास होणे शक्य नाही हे जाणून त्यांनी १९२४ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर कै अण्णासाहेब भोपटकर व कै केळकर यांच्या सहकार्याने  टिळक रोड येथे महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. शिवरामपंत दामले म्हणजे प्रचंड  इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी यांचा योग्य असा मिलाफ असलेलं व्यक्तिमत्व होतं. शारीरिक शिक्षण हे शास्त्र आहे व त्याचे सुसंपन्न असे महाविद्यालय आपण काढलेच पाहिजे असा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी १९३८ पासून महाविद्यालयाची परवानगी मिळविण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू केले आणि १९३८ साली सुरू केलेल्या प्रयत्नांना १९७७ मध्ये यश आले. अशा प्रकारे ३९ वर्ष त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून शारीरिक शिक्षणाचे महाविद्यालय सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांना अनंत अडचणी आल्या परंतु, त्यांनी ते डगमगले नाहीत की हरले नाहीत. कारण त्यांचा चिकाटी वरती पूर्ण विश्वास होता. 
त्यांनी काही वर्ष सैन्यामध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले कि महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजी चांगले येत नाही. मराठी तरुणांनी नेहमी उच्च ध्येय घ्यावे अशा विचाराने प्रभावित असलेले शिवरामपंत दामलेंनी इंग्रजीचे जागतिक स्तरावरील स्थान जाणून जागतिक बाजारपेठेत व सनदी लष्करी सेवेत यश प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे धाडस केले. आजही ही शाळा एक नामवंत शाळा म्हणून ओळखली जाते. त्यांच्या याच दूरदृष्टीचे फळ म्हणजे आज पोलीस,  सैन्य अशा विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रीय मंडळातील विद्यार्थी उत्तमपणे कार्य करत आहे. आज महाराष्ट्रीय मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व शारीरिक  शिक्षणाचे महाविद्यालय असा मोठा विस्तार झालेला आहे. अशा या शैक्षणिक विस्ताराबरोबरच क्रीडा विस्तारही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कुस्ती, मल्लखांब, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल यासारख्या देशी विदेशी खेळांचे प्रशिक्षण महाराष्ट्रीय मंडळामध्ये दिले जाते. 
आज महाराष्ट्रीय मंडळामध्ये तीन वर्षांपासून तर सत्तर वर्षांपर्यंत अनेक लोक व्यायाम करण्यासाठी व खेळण्यासाठी नियमित  येतात. महाराष्ट्रीय मंडळाने व शिवा काकांनी व्यायामाला  एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या आणि आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या अनेक पिढ्या शिवा काकांनी आणि महाराष्ट्रीय मंडळाने निर्माण केलेल्या आहेत. आजचा तरुण हा रगेल बनला पाहिजे, बेडर झाला पाहिजे असे शिवा काका नेहमी म्हणत. आजही टिळक रोड आणि गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या  मैदानावर  हजारो युवक युवती व्यायाम करतात, खेळतात आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रीय मंडळा मध्ये पारंपरिक व्यायाम प्रकाराबरोबरच आधुनिक व्यायाम प्रकार व क्रीडा बाबी आजच्या तरुण पिढीला शिकविल्या जातात. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ ही फक्त व्यक्ती किंवा संस्था नसून तो एक विचार आहे आणि हा विचार व्यायामाच्या माध्यमातून खेळांच्या माध्यमातून जपला जात आहे. एकीकडे सिमेंटची जंगल उभे रहात असताना महाराष्ट्रीय मंडळाने मैदानाचे संवर्धन करून समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपली कटिबद्ध सिद्ध केलेली आहे. तसेच महाराष्ट्रीय मंडळ म्हणजे नुसती व्यायाम  शाळा नव्हती तर ती एक चळवळ होती, आमचा पोरगा जगाच्या बाजारात खणखणीत नाण्यासारखा वाजला पाहिजे ही शिवा काकांची त्याच्या मागे तळमळ होती आणि त्याच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. आज शिवरामपंत दामले हे नाव खूपच कमी लोकांना माहित असेल कारण ते प्रसिद्धीसाठी कधीही हपापलेले नव्हते. आपले ध्येय हे समाजहितासाठी जोपासणारे रामदास स्वामींचे कार्य साठवणारे निष्ठावंत कार्यकर्ते होते. शासनाची कुठलीही मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांचा सहकाऱ्यांवर महाराष्ट्र मंडळ ही संस्था शिक्षण आणि व्यायामाच्या प्रचार आणि प्रसाराचे अतिशय मूलभूत आणि रचनात्मक कार्य समर्थपणे करत आहे.  शिवा काकांचे विचार पुढील काळामध्ये त्यांचे चिरंजीव कै रमेश दामले यांनी, नातू कै. धनंजय दामले व आता तिसऱ्या पिढीतील तरुण तडफदार श्री. रोहन दामले  समर्थपणे पुढे नेत आहेत. एका व्यक्तीने बघितलेले   स्वप्न, त्याची  इच्छाशक्ती व दूरदृष्टी पुढे अनेक पिढ्यांवर कशी परिणाम करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. कॅ. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ होय.

शरद आहेर  




Friday, May 29, 2020

मिशन 80 टू 60

मिशन 80 टू 60 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत विकसित देश होणार अशा प्रकारचा आशावाद निर्माण केला होता. परंतू, ज्या तरुण पिढीच्या जोरावर त्यांनी हा आशावाद सांगितलं होता त्या तरुण पिढीच्या आरोग्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतला असता पुढील बाबी समोर आल्या. भारत मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. जगातील सर्वात जास्त मधुमेही भारत आणि चीन या दोन देशांमध्ये आहेत. एका सर्वेक्षणानुसार 1990 मध्ये भारतात 26 दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण होते त्यांची संख्या २०१६ ला ६५ दशलक्ष इतकी झाली तसेच फुफ्फुसांच्या संबंधित रुग्णांची संख्या २८ दशलक्ष होती ती २०१६ मध्ये ५५ दशलक्ष इतकी झाली. दरवर्षी हृदयविकारामुळे सुमारे 1.7 दशलक्ष भारतीयांचे मृत्यू  होतात. ही आकडेवारी गेल्या २५ वर्षात भारतातील आरोग्याची पातळी किती ढासळत आहे याचे चित्र दर्शविते आणि अतिशय चिंताजनक आहे. सध्या समाजामध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, हृदयाशी संबंधित आजार हे सर्व आजार शारीरिक अक्रियाशीलतेशी (Physical Inactivity) संबंधित आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वच घटकांना समाजामध्ये शारीरिक क्रियाशीलते विषयी जागृती निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यावे लागणार आहे. शारीरिक क्रियाशीलते विषयीचा प्रसार व पाया शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्कम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. असे म्हणतात की, Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle” त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना शारीरिक क्रियाशीलता किती करायला हव्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शिका दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

5 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्रियाशीलता पातळी किती असावी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या  शिफारशी 

तरुण व्यक्तीसाठी, शारीरिक क्रियाशीलतेमध्ये खेळ, क्रीडा, मनोरंजन, वाहतूक, दैनंदिन कामेशारीरिक शिक्षण किंवा नियोजित व्यायाम यांचा समावेश होतो.

  • 5 ते 17 वयोगटातील मुले आणि तरुणांनी दररोज कमीतकमी 60 मिनिटे  साधारण ते  तीव्र  शारीरिक हालचाली  केल्या पाहिजेत.
  •  60 मिनिटांपेक्षा जास्त शारीरिक हालचाली अधिक आरोग्य लाभ प्रदान करतात.
  •  दैनंदिन शारीरिक हालचाली बहुतांश एरोबिक असाव्यात. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा स्नायू आणि हाडांना बळकटी देणार्‍या तीव्र हालचालींचा  समावेश केला पाहिजे.
  •  या शिफारसी लिंग, वांशिक किंवा उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता सर्व तरुणांसाठी लागू आहेत.
  • निष्क्रिय तरूणांसाठी, वरती संगीतलेले  लक्ष्य साध्य करण्यासाठी सुरूवातीला थोड्या प्रमाणात शारीरिक हालचालींसह प्रारंभ करावा आणि हळूहळू कालावधी, वारंवारता आणि तीव्रता वाढविणे योग्य आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जर तरुण सध्या कोणतीही शारीरिक हालचाल करीत नसतील तर शिफारस केलेल्या पातळीपेक्षा कमी प्रमाणात केल्याने काहीही न केल्यापेक्षा अधिक फायदा होईल.

 परंतु एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, 5  ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही. अशा या 80 % विद्यार्थ्यांना 60 मिनिट शारीरिक हालचाली करण्यासाठी विविध उपक्रम घेणे व प्रोत्साहन देणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांपुढील आव्हान आहे. म्हणूनच या लेखाचे शीर्षक मिशन 80-60  असे दिलेले आहे. या 80 % विद्यार्थ्यांना अधिकाधिक क्रियाशील करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक शाळेमध्ये काय करू शकतो याबद्दलचे विविध संशोधनाचे निष्कर्ष आणि जगभरातील काही शाळांमध्ये चालू असलेल्या कल्पना पुढे मांडत आहे. शारीरिक क्रियाशीलतेची पातळी वाढवण्यासाठी केवळ शारीरिक शिक्षणाचे तास पुरेसे होणार नाही तर त्यासाठी विविध उपाययोजना शाळेमध्ये कराव्या लागतील

  1. शारीरिक शिक्षण तासाची प्रभावी अंमलबजावणी: विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशिलतेच्या  पातळीत वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे शारीरिक शिक्षणाचा तास. शारीरिक शिक्षणाच्या तासांमध्ये विद्यार्थी किती वेळ क्रियाशील असतात यासंबंधी काही संशोधन झालेले आहेत आणि त्यानुसार ३० मि. पैकी केवळ 9 ते 11 मि. विद्यार्थी क्रियाशील असतात. ही वेळ समाधानकारक नाही. शारीरिक शिक्षण तासांमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काही पर्याय (Options)
    उपलब्ध करून द्यायला हवे कारण सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ किंवा उपक्रम आवडेल असे नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यां संख्येच्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देणे,  त्यासाठी मॉडिफाइड साहित्य तयार करणे, शारीरिक शिक्षण तासातील उपक्रम छोट्या छोट्या गटात घेणे.शारीरिक शिक्षणाचे तास इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी न देणे आणि शारीरिक शिक्षण तासासाठी मिळालेल्या 30 मिनिटाचे जास्तीत जास्त हालचाली होण्यासाठी उपयोग करून घेणे हे महत्त्वाचे ध्येय असायला हवे.
  2.  ऍक्टिव्ह ब्रेक (Active break): शाळेच्या वेळापत्रकात 5 ते 10 मिनिटाचा ऍक्टिव्ह ब्रेक जर दिला तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ व्हायला मदत होईल.या ब्रेक मध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ऑफिस कर्मचारी अशा सर्वांनीच विविध प्रकारच्या शारीरिक हालचाली कराव्या. या ब्रेकमध्ये कोणत्या हालचाली कराव्यात, कशा कराव्यात याबद्दल आपापल्या स्थानिक पातळीवर विचार विनिमय करून निर्णय घ्यावा.त्यामुळे शाळेतील एकूण वातावरण शारीरिक क्रियाशीलतेला पूरक होईल.
  3. मधली सुट्टी: शालेय वेळापत्रका20 ते 30 मिनिटाची मधली सुट्टी असते. निरीक्षण केले असता या सुट्टीमध्ये विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच ते दहा मिनिटात आपला डबा खातात व उरलेल्या वेळेत मित्रांबरोबर खेळतात. अशाप्रकारे मधल्या सुट्टीतील दहा ते पंधरा मिनिट सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय राहण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, साहित्य उपलब्ध करून दिल्यास या वेळेचा विद्यार्थ्यांची क्रियाशीलता वाढविण्यास हातभार लागेल. मधल्या सुट्टीत शिक्षकाने शिकविणे अपेक्षित नाही तर विद्यार्थ्यांना हव्या त्या अनौपचारिक उपक्रम, खेळ खेळू द्यावे. अशाप्रकारचे मधल्या सुट्टीतील उपक्रम बऱ्याच शाळेमध्ये चालू आहे.
  4. शाळेनंतरचे उपक्रम: शाळा सुटल्यानंतर किंवा भरावयाच्या अगोदर एक तास शारीरिक उपक्रमांसाठी राखीव ठेवल्यास ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे असे विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये विविध खेळांचे विशेष प्रशिक्षण, शारीरिक सुदृढता उपक्रम, तालबद्ध हलचाली, योगासन, स्केटिंग, मनोरंजनात्मक खेळ, अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव करता येईल.
  5. आंतरकूल स्पर्धा कार्यक्रम: शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक खेळाचा अनुभव देण्यासाठी शाळेमध्ये कुल पद्धती अवलंबिल्यास फायदेशीर ठरते. आठवड्यातून एक दिवस अंतरकूल स्पर्धा घेतल्यास शाळेमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण होण्यास मदत होते. तसेच अशा स्पर्धांमधून वेगवेगळ्या खेळातील टॅलेंटेड विद्यार्थी समजतात.
  6.  अंतरविषय दृष्टिकोन (Interdisciplinary Approach ): मराठी, शास्त्र, गणित, भूगोल यासारख्या विषयांमधील काही घटक हे शारीरिक हालचालींवर आधारित घेतल्यास विद्यार्थ्यांची हालचालीची पातळी वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. वर्गात बसून शिकण्यापेक्षा कृतीयुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांना आवडते व ते परिणामकारक असते. त्यामुळे इतर विषयाच्या शिक्षकांशी चर्चा करून अशा प्रकारचे अध्यापन झाल्यास ते शारीरिक शिक्षण विषयासाठी पूरक असेल.
  7. सक्रिय वाहतूक: शहरांमध्ये बऱ्याचदा विद्यार्थी शाळेमध्ये बस, रिक्षा किंवा व्हॅन या मध्ये येतात. परंतु शाळेमध्ये चालत अथवा सायकलवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांच्या क्रियाशीलतेच्या पातळीत वाढ होईल.

  1. गृहपाठ: शाळेत वर्गामध्ये बसून विद्यार्थी कंटाळलेले असतात. घरी गेल्यानंतर मनसोक्त खेळण्याचे स्वप्न बाळगतात परंतु विविध विषयाच्या गृहपाठ अथवा ट्युशन मुळे त्यांना हे स्वप्न भंग पावते. त्यामुळे इतर विषयाचा सा गृहपाठ असतो तसाच शारीरिक शिक्षण विषयाचा ही ग्रहपाठ दिल्यास विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करण्यास प्रेरणा मिळेल व त्यांच्या हालचालीच्या पातळीत वाढ होईल.

अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलते मध्ये वाढ होण्यासाठी आणि दिवसभरात किमान 60 मिनिट क्रियाशील राहण्यासाठी विविध उपाययोजना करणे आरोग्यदायी पिढी असण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि भविष्यात तरुण पिढीचे आरोग्य सुधारल्यास शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून समाजासाठी आपले महत्त्वाचे योगदान राहील.

 शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे
मो. 9890025266

 


Friday, May 22, 2020

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

 

सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !

ंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील बीपीएड चे विद्यार्थी दरवर्षी इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये दीड महिन्यासाठी जातात. परत आल्यानंतर त्यांच्याशी बोलताना सर्व विद्यार्थी एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे शाळेतील सीनियर शिक्षक काम करू देत नव्हते.  दोनच दिवसापूर्वी एका शाळेतील शिक्षकांचाही मला फोन आला व ते शाळेत काय काय उपक्रम राबवत आहे याबद्दल सांगू लागले परंतु, त्याचबरोबर सीनियर शिक्षक प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कशी आडकाठी घालतात याची खंत व्यक्त केली. अशा प्रकारची मानसिकता/ वाद सगळीकडेच असतात परंतु, याचे प्रमाण अधिकच वाढले असल्याचे जाणवत आहे. म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी लिहीत आहे.  

अलीकडच्या काळामध्ये शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, अध्यापन शैली, साहित्य, उपक्रम व एकूणच दृष्टिकोनमध्ये विविध बदल झालेले आहेत. हे नवीन बदल नवीन शिक्षक शाळेमध्ये राबविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतू, हे बदल जुन्या पिढीतील शिक्षकांना माहीत नसल्यामुळे दोन पिढ्यांमधील ज्ञानात दरी निर्माण झाल्यामुळे हे वाद होत असावेत. परंतु, त्यामुळे नवीन शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच समाजात, शासन स्तरावर, शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अनेक अडथळ्यांना आणि समस्यांना सामोरे जावे लागत असताना आपल्याच जुन्या आणि नव्या पिढीतील शिक्षकांमधील अशी दरी शारीरिक शिक्षण विषयासाठी मारक आहे. शारीरिक शिक्षणातील नवनवीन उपक्रम, कल्पना शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणे हे विषयाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. नवीन शिक्षकांना पाठिंबा, प्रेरणा जर मिळाली तर ते अधिक जोरदार काम करतील. अन्यथा सीनियर शिक्षकांच्या अशा मानसिकतेमुळे नवीन शिक्षक उत्साह थोड्याच कालावधीत कमी होतो परिणामी शारीरिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. माझी सीनियर शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करावे, पाठिंबा द्यावा, प्रोत्साहित करावे आणि शारीरिक शिक्षणातील नवीन प्रवाहा बरोबर जुळवून घ्यावे व नवीन शिक्षकांनी ही   सीनियर शिक्षकांना विश्वासात घ्यावे व त्यांचा मान राखला जाईल याची काळजी घ्यावी.  शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी दोघांचेही योगदान, सहयोग  मोलाचे असणार आहे

Sunday, May 17, 2020

बदलती क्रीडा साहित्य खोली

बदलती क्रीडा साहित्य खोली  

काळानुरूप आपल्या घरातील टीव्ही, लाइट, फ्रीज इ. उपकरणांमद्धे बदल झालेला आहे. त्याप्रमाणे क्रीडा साहित्य खोलीमध्येही काही बदल झालेले आहे. हे बदल या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ या. सर्वसाधारणपणे क्रीडासाहित्य खोलीमद्धे डंबेल्स, करेला, रिंग हे कवायत प्रकारांचे साहित्य व फूटबॉल, बास्केटबॉल, वॉलीबॉल यासारख्या खेळांचे विविध बॉल असायचे. साधारणपणे मैदाणावर एका बॉल मागे 50 ते 60 विद्यार्थ्यांना खेळताना, पळताना बघतो. शाळेचे मैदान व इमारत कितीही मोठी असली तरी बॉल च्या संखेत फरक पडत नाही. परंतू, कौशल्य अध्ययन करताना सरावाच्या संधी जितक्या जास्त मिळतील तितके अध्ययन चांगले होते असे संशोधांनवरून दिसून येते. त्यामुळे विद्यार्थी साहित्य गुणोत्तर चांगले असणे परिणामकारक अध्ययनासाठी व शाळेतील शारीरिक उपक्रमास पोषक वातावरण निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहे.

  1. कोन: कोन हे क्रीडा साहित्य अत्यावश्यक साहित्य झाले आहे. कारण त्याचा बहुपयोग. कोंनचा उपयोग हा ग्राऊंड मार्किंग साठी, बाऊन्ड्रि म्हणून, दिशाख्तेचे व्यायाम करण्यासाठी, जम्पिंग करण्यासाठी असे विविध उपयोग होतात. कोन हे विविध ऊंची व रंगामद्धे उपलब्ध असतात. विविध रंगाच्या कोनमुळे मैदाना वरील वातावरण उत्चावर्धक होते. आमच्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी शिक्षक एका खेडे गावातील शाळेत पाठ घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने मैदानावर कोन मांडल्या नंतर संपूर्ण शाळा ते कोन बघण्यासाठी गोळा झाले होते. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना ही अवस्था का आहे याचा शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विचार करायला हवा.
  2. हर्ड्ल्स: कोनप्रमाणेच विविध रंगामद्धे व उंचीचे प्लास्टिकचे हर्ड्ल्सल सध्या उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग जंपिंगसाठी केला जातो.

  3. विविध आकाराचे बॉल: विविध आकाराचे व रंगाचे बॉल सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती कमी आहेत प्रमाणित फूटबॉल, वॉलीबॉल च्या एका बॉल च्या किमतीत 10 ते 15 हे बॉल येतात. त्यामुळे अधिक बॉल घेऊ शकतो. शारीरिक शिक्षण तासात विविध कौशल्या अध्यापनात, मनोरंजनात्मक व मॉडिफाइड खेळ खेळतांना, त्यांचा उपयोग करता येतो. सर्वात मतहत्वाचे म्हणजे या बॉलमुळे  विद्यार्थी साहित्य गुणोत्तर वाढविता येते. 

  4. पॅरॅशूट: हे विविध स्थानांतरनीय कौशल्य सरावासाठी व मनोरंजनात्मक खेळांसाठी उपयोगी येते. कलरफुल असल्याने प्रत्येकाला आकर्षित करते व अनौपचारिकरित्या शारीरिक सक्रियता वाढते. पॅरॅशूट हे विविध आकारमध्ये उपलब्ध आहे.

  5. बिन बॅग: या प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कॅचींग व थ्रोईंग करण्यासाठी, मनोरंजनात्मक खेळांमद्धे या बिन बॅग चा उपयोग होतो.
  6. फ्रिस्बी: फ्रिस्बी ही मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय साहित्य आहे. समन्वय वाढविण्यासाठी, मॉडिफाइड खेळ खेळण्यासाठी फ्रिस्बी अतिशय उपयुक्त आहे. फ्रिस्बी विविध आकार आणि कलरमद्धे उपलब्ध आहेत. किमत कमी असल्यामुळे अधिक संखेने घेता येऊ शकतात.

  7. रिंग: टेनिक्वाइट रिंग च्या स्पर्धा होतात. परंतू, फ्रिस्बी प्रमाणेच समन्वय वाढविण्यासाठी, कॅचींग व थ्रोईंग साठी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
  8. हुल्ला हुप: या विशेषता मुलींमद्धे अधिक लोकप्रिय आहेत. परंतू, विविध मनोरंजनात्मक  खेळांसाठी, प्रात्यक्षिकासाठी व विविध उपक्रमांसाठी यांचा उपयोग होतो.  
  9. दिशाभिमुखता पोल (Agility Pole: दिशाभिमुखतेचे विविध व्यायाम करण्यासाठी पोल सध्या लोकप्रिय होत आहेत.
    Agility Pole
  10. शिडी (Ladder): अगिलिटी लद्दर हे सध्या विविध व्यायाम करण्यासाठी लोकप्रिय आहे. रनिंग, जुंपिंग, स्टेपिंग इ. विविध व्यायाम यावर करता येतात. ते विविध आकार व कलरमद्धे उपलब्ध आहेत.
    Agility Ladder 

हे सर्व साहित्य कलरफुल असल्यामुळे विद्यार्थ्यंना शारीरिक उपक्रम करण्यासाठी आकर्षित आणि प्रेरित करते. कुठलेही साहित्य हे हालचालींमद्धे टिकून राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महवचे असल्यामुळे क्रीडा साहित्य खोलीमध्ये हे साहित्य असणे आवश्यक आहे. हे साहित्य केवळ असून उपयोग नाही तर त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीती जास्त उपयोग करण्यासाठी उपलब्ध करून देणे तितकेच महत्वाचे आहे.

 

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...