Friday, December 17, 2021

डोस आनंदाचा

 डोस आनंदाचा

 नुकतेच एक पुस्तक वाचत असताना डॉ. चंद्रशेखर देसाई यांचा 'आनंदी शिक्षक आनंदी विद्यार्थी' हा लेख वाचनात आला. या लेखामध्ये त्यांनी हॅपिनेस हार्मोन्स याविषयी विवेचन केलेले आहे.हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती. सर्वसामान्यपणे खेळाकडे आणि व्यायामाकडे आपला समाज केवळ शारीरिक फायद्यासाठीच बघतो परंतु, भावनिक आणि मानसिक गरजांसाठी शारीरिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव परत एकदा मला झाली.  आनंदी राहण्यासाठी किंवा 'आनंद' ही भावना निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये चार हॉर्मोन्स किंवा संप्रेरके आहेत. ती पुढील प्रमाणे

डोपामिन (D)

ऑक्सिटोसिन(O)

सेरिटोनीन (S)

एडॉर्फिन (E)

चारही संप्रेरकांचा पहिला शब्द मिळून जो शब्द तयार होतो त्यालाच डोस (DOSE)असे म्हटले आहे. अशा या चार हार्मोन्स ला हॅप्पीनेस हार्मोन्स असे म्हणतात. 

त्यातील डोपामीन हे छोट्या छोट्या कृतीमधून मिळत असते. छोटी ध्येये, आव्हाने आपण स्वतः करता आणि आपल्या विद्यार्थ्यांकरता मांडायची. ते ध्येय प्राप्त केले की विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शारीरिक शिक्षण आणि खेळांमध्ये अशा अनेक घटना किंवा परिस्थिती येतात ज्या वेळेस अशा प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. विद्यार्थ्यांमध्ये रेस लावल्यानंतर जो विद्यार्थी जिंकतो त्याच्या आनंदाला उधाण येते, फुटबॉल खेळत असताना गोल झाल्यानंतर, वॉलीबॉल, खोखो, कबड्डी यासारख्या खेळांमध्ये हे गुण मिळाल्यानंतर किंवा सामना जिंकल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शिक्षकाने शारीरिक शिक्षण तासादरम्यान विद्यार्थ्यांना अशी छोटी छोटी आव्हाने द्यायची आणि ती पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा जर दिली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हे कधीच शिक्षा वाटणार नाही. 

दुसरे आहे ऑक्सिटोसिन. जेव्हा एखाद्याला कौतुकाची थाप आपण देतो, किंवा चांगल्या गोष्टीला दाद देतो तितके ऑक्सिटोसिन तुम्हाला मिळते आणि आपल्याला आनंदाची भावना तयार होते. शारीरिक शिक्षण आणि खेळामध्ये जेव्हा विद्यार्थी चांगले कौशल्य दाखवतो, चांगले खेळतो, चांगले कार्य करतो अशावेळी नेहमीच शिक्षक त्यांचे कौतुक करतात त्यालाच मॅजिक वर्ड्स असेही संबोधले जाते. शब्बास, खूप छान, Good, Awesome या सारखे शब्द जेव्हा विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात तेव्हा विद्यार्थी आनंदी होतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठीची कोणतीही संधी दवडू नये आणि कौतुक करण्यात कंजुषी करू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे केवळ तात्पुरता आनंद मिळतो असे नाही तर पुन्हा चांगले कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत असते. 

सेरेटोनिन मिळवण्याकरता आपल्याला थोडेसे स्वतः मधून बाहेर पडावे लागते. आपण जेव्हा इतरांकरिता काहीही केले तरी स्वतःच्या शरीरात सेरेटोनिन गोळा व्हायला लागते. आपण गरजू व्यक्तींसाठी, पर्यावरणासाठी असे कोणासाठीही काही केले की, हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक अतिशय महत्त्वाचे हॅपिनेस हार्मोन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे इतरांना देण्यासाठी काहीतरी असते. ज्ञान, वेळ, पैसा, कौशल्य, प्रेम असे बरेच काही. या हार्मोनचे महत्त्व आणि ते कशामुळे तयार होते हे समजल्या नंतर शारीरिक शिक्षणामध्ये अनेक प्रसंगी याचा अंतर्भाव करता येईल. कोणत्याही वर्गामध्ये काही विद्यार्थी विशिष्ट खेळांमध्ये कुशल असतात आणि काही विद्यार्थी अकुशल असतात. अशावेळी कुशल विद्यार्थ्यांच्या मदतीने अकुशल विद्यार्थ्यांना शिकविण्यास सांगितल्यास आपल्याकडे जे कौशल्य आहे ते इतरांना शिकविण्याची प्रेरणा यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांना आनंदाची अनुभूती येईल. एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा अनुभव. पहिलीच्या वर्गाला बाई शिकवत होत्या. एकदा त्यांनी मुलांना चित्र काढायला सांगितले. तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी मदत केली आहे अशा कोणाचेही चित्र काढा, असे बाईंनी मुलांना सांगितले होते. पहिलीतील लहान मुलांनी झटपट चित्रे काढली पाटीवर. बाईंनी ती सगळी चित्रे वर्गासमोर मांडली. मुलांनी काढलेल्या त्या चित्रांवर वर्गामध्ये चर्चा सुरू केली. कोणी आईची चित्र काढले होते, कोणी बाबांचे चित्र काढले होते. एका चित्रात फक्त हात दाखवला होता. तर हा हात कोणाचा यावर बाईंनी चर्चा सुरू केली. चौकातल्या वाहतूक पोलिसाचा हात आहे, देवाचा हात आहे, शेतकऱ्याचा हात आहे अशी काही उत्तरे मुलांनी दिली. शेवटी बाईंनी ज्या मुलाने हे चित्र काढले होते त्यालाच विचारले की हा तू काढलेला हात कोणाचा? तो विद्यार्थी म्हणाला "बाई, हा हात तुमचाच!" त्या मुलाने पुढे सांगितले, मी झोपडपट्टीत राहतो. माझे कपडे खराब आहे. माझ्याकडे जुनी पुस्तके आहेत. मी पहिल्यांदा वर्गात आलो आणि या सगळ्या मुलांना पाहिल्यानंतर पळून चाललो होतो. त्याचवेळी तुम्ही वर्गाकडे येत होत्या. तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून वर्गात घेऊन आलात. मी कोणाला तरी हवा आहे ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. अशा रीतीने आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो हा संस्कार त्या बाईंनी त्यांच्या कृतीतून विद्यार्थ्यांसमोर ठेवला होता. एका शाळेमध्ये एक अथलेटिक्सचा अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता. परतू त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. चांगल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक शूज त्याच्याकडे नव्हते. अशा वेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून शिक्षकांकडे दिले व त्याला शूज आणायला सांगितले. अशा प्रकारची भावना आणि मानसिकता निर्माण होण्यासाठी शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 2019 मध्ये दिवाळीला चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी गरजू व्यक्तींना फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फराळ, पैसे किंवा कपडे देण्याचे आवाहन केले. त्याला सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गोळा झालेले फराळ, कपडे आणि ब्लॅंकेट घेऊन हे विद्यार्थी रात्री पुण्यातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तींकडे गेले आणि त्यांनी केवळ फराळ आणि कपडे दिले नाही तर त्यांच्याशी काही वेळ प्रेमाने गप्पा मारल्या, त्यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतलेले अनुभव सर्वांना सांगितले त्यावेळेस प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते. अशा रीतीने सर्वांचीच दिवाळी इतरांसाठी काहीतरी केल्याने आनंदात गेली होती. 

पुढचे हार्मोन आहे ते म्हणजे एडॉर्फिन. एडॉर्फिन निर्माण करायचे असेल तर त्याकरता व्यायाम, शरीरश्रम करणे आवश्यक आहे. तसेच आपण जेव्हा खळखळून हसतो तेव्हा भरपूर एडॉर्फिन मिळते. विविध मनोरंजनात्मक खेळ खेळताना या दोन्ही बाबींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांचा व्यायाम आणि शरीर श्रम होत असतात त्याचबरोबर विद्यार्थी मनसोक्तपणे हसत आणि खेळत असतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी शिस्तीचा अति बाऊ न करता विद्यार्थ्यांना अधिकाधिक खेळायला कसे मिळेल आणि वर्गामध्ये खेळीमेळीचे वातावरण कसे असेल याचा विचार करावा. छोट्या-छोट्या रिले, मनोरंजनात्मक खेळ, मॉडिफाइड खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद  (एडॉर्फिन) मिळू शकते.

व्यायाम, शारीरिक शिक्षण आणि खेळ याकडे केवळ वजन कमी किंवा जास्त, स्पर्धा अथवा मेडल यादृष्टीने न बघता आनंदाचा मुख्य स्रोत म्हणूनही बघू या!

संदर्भ

माणूस घडविणारे शिक्षण. मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा. पा. क्र.११३-११७




15 comments:

  1. DOSE हे शारिरीक शिक्षण शिक्षक दररोज तासामधे याचा अधिक अधिक समवेश कसा होईल याचा प्रयत्न करत असतात.आज त्यांची वैज्ञानिक नावे समजली व त्याचे अधिक चांगले ज्ञान मिळाले

    ReplyDelete
  2. अतिशय शास्त्रशुद्ध हॉर्मोन्स विषयी माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती ह्या मधून आम्हाला मिळाली अतिशय महत्वाची माहिती या मधून मिळाली याचा उपयोग आम्हाला भावी आयुष्यात खूप होणार आहे

    ReplyDelete
  4. Thank u sir giving nice information

    ReplyDelete
  5. Appreciation should be a part of any teacher. It not only makes the students happy but also motivates him to work hard. Wonderful insight about DOSE. This write up has added more knowledge. Thank you.

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती आपण समाजा पुढे मंडळी आणी सोप्या शब्दात आपण शारीरिक शिक्षणचे महत्त्व सांगितले. आपलले ब्लॉग हे नेहमीच प्रेरणदायी असतात.

    ReplyDelete
  7. खूप छान सर अतिशय सुरेख माहिती दिली आहे नेमकं खेळ कशासाठी खेळावा हे तुम्ही अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत सांगितले. या माहितीचा आम्हाला भावी जीवनात नक्कीच फायदा होणार आहे.

    ReplyDelete
  8. अप्रतिम माहिती आहे 👍🏻

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती आहे सर 🙏🏻.. Dose चा आनंद आम्ही नक्कीच घेऊ पुढील आयुष्यात.. धन्यवाद..

    ReplyDelete
  10. शारीरिक शिक्षण मध्ये सामुहिक कवायत महत्वाची आहे.खुप महत्वाची महतवाची आहे.

    ReplyDelete
  11. मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळल्यानंतर किंवा व्हाट्सअप किंवा इंस्टा मध्ये रममाण झालेली तरुण वयस्कर माणसे , व्यसनाची तलप लागणे ही सर्व किमया डोपामिन ची आहे आणि ती निष्क्रियतेकडे घेऊन जाणारी आहे. हेच डोपामइडोपामिन शारीरिक शिक्षणाच्या छोट्या छोट्या खेळाच्या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा डान्स मधून सुद्धा निर्माण होऊ शकतो, चिकन डान्स उत्तम उदाहरण आहे, शारीरिक सक्रियतेने, व्यायामा बाबत ही तलब निर्माण करणे हेच आजच्या शारीरिक शिक्षण शिक्षकासाठी असणारे आवाहन... 💪

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...