"कळतं पण वळत नाही" असे खूपदा होते ना!!! वाचन केले पाहिजे असं लहानपणापासून कित्येकदा ऐकले असेल पण..............मलाही वाचायला पाहिजे असे नेहमी वाटायचे पण वळत नव्हते. शेवटी तीन चार वर्षापूर्वी एक पुस्तक वाचले आणि काय झाले माहीत नाही पण त्यानंतर वाचानाशिवाय चैन पडेना अशी स्थिती झाली. एखाद्या भुकेल्या माणसाला खूप दिवसांनी खायला मिळाल्यावर तो जसा तुटून पडेल आणि काय खाऊ अन् काय नाही असे होते तसे काहीसे वाचनाच्या बाबतीत माझे झाले. असेच काही इतरांच्याही आयुष्यात झालेले आहे. चला तर काही सत्यकथा व प्रसंगातून वाचनाचे महत्व जाणून घेऊया.
सत्यकथा १: आण्णा हजारे सुरुवातीला भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते एक सामान्य सैनिक होते, त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, पण त्यांना कसे करावे हे माहीत नव्हते. एके दिवशी त्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार आणि लेख वाचायला मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी त्यांच्यावर खोलवर परिणाम केला. त्या पुस्तकांमध्ये लिहिलेली ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका’ ही शिकवण त्यांनी आपल्या जीवनाचा भाग बनवली.
वाचनाने त्यांच्या मनात समाजसेवेसाठी प्रचंड उर्जा निर्माण केली. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि समाजसेवेसाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राळेगणसिद्धी हे गाव निवडले आणि तिथे त्यांनी ग्रामीण विकासाचे काम सुरू केले. त्यांनी पाणलोट व्यवस्थापन, वृक्षारोपण, शिक्षण, आणि गावातील मद्यबंदी सारखे अनेक उपक्रम राबवले. या सर्व कामांमागे त्यांच्या वाचनाने दिलेले मार्गदर्शन होते.
वाचनामुळे आण्णांचे जीवनच बदलले. त्यांनी केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला नाही, तर ते लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनले. वाचनाने मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावरच त्यांनी समाजात अमूल्य योगदान दिले आणि देशभरात भ्रष्टाचाराविरुद्धचे जनआंदोलन उभारले. वाचनाच्या शक्तीमुळे ते एक सामान्य सैनिक म्हणून काम करणारे आण्णा हजारे ते राष्ट्रीय नेते आणि समाजसेवक या प्रवासात बदलले.
या कथेतून आपण शिकतो की वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून, ते आयुष्य बदलण्याची ताकदही देते.
कथा २: संदीप नावाचा विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. तो एक चांगला खेळाडू होता, पण अभ्यासात फारसा रस नव्हता. एके दिवशी त्याला शिक्षकांनी ‘महात्मा गांधींचे आत्मचरित्र’ वाचायला दिले. ते पुस्तक त्याने नाइलाजानेच घरी नेले. सुरुवातीला त्याने ते वाचण्याकडे दुर्लक्ष केले, पण नंतर एकदा उघडले आणि त्यात हरवून गेला. गांधीजींच्या साधेपणाचे, सत्यनिष्ठेचे, आणि त्यागाचे वर्णन त्याच्या मनावर खोलवर ठसले. या वाचनाने संदीपचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्यातल्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने त्याला आयुष्यात नवी दिशा मिळवून दिली. तो म्हणायचा, "वाचनाने मला नवी दिशा दाखवली."
कथा ३: मिनाक्षी नावाची एक मुलगी, जी अभ्यासात मागे पडत होती आणि कायम खचून जात असे. तिचे अपयश तिला त्रास देत होते, पण एका दिवसाने सगळे बदलले. तिने शिक्षकांनी सुचवलेले एक ‘मनोधैर्य’ पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तकातील यशस्वी लोकांच्या संघर्षांच्या कथा वाचून तिचे मनोबल वाढले. ती म्हणायची, " जेव्हा अपयश येते तेव्हा ते शिकवण देण्यासाठीच येते, हे मला वाचनाने शिकवले." वाचनामुळे तिच्या विचारांत बदल झाला आणि ती यशाच्या मार्गावर पुढे गेली.
प्रत्येककाच्या आयुष्यात एक प्रसंग येतो, जिथे त्याला प्रेरणा आणि धैर्याची आवश्यकता असते. वाचन हे त्या प्रसंगात आपल्याला मार्गदर्शन करते. वाचनानेच इतिहासातील थोर लोकांना यशाची शिखरे गाठता आली. म्हणून, वाचन ही सवय केवळ चांगलीच नव्हे तर ती जीवनाला दिशा देणारा मार्ग आहे.
चला तर मग, "पुस्तक भिशीत" सहभागी होऊन वाचू या कारण वाचनाने तुमचे जीवनच बदलू शकते!
वाचाल तर वाचाल, हे सत्य आहे. आणि आजच्या पिढीला वाचनाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. खेळाडूंमध्ये संयम कमी प्रमाणात आढळतो आणि तो वाढवण्यासाठी वाचन हे साधन प्रभावी असेल.
ReplyDelete