नुकतीच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की, एका विद्यार्थ्याने शर्टइन केले नाही म्हणून पुण्यातील एका शिक्षकाने त्याला इतके मारले की त्याच्या नाक आणि कानातून रक्त वाहू लागले. यासाठी त्या शिक्षकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशा अनेक घटना घडतात परंतू काहींची चर्चा होते आणि काही दुर्लक्षित राहतात. शाळेत शिक्षणाचे महत्त्व हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते, तर त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त, मूल्यं, आणि सामाजिक भान शिकवले जाते. मात्र, काही शाळांमध्ये शिक्षेच्या नावाखाली शारीरिक किंवा मानसिक शिक्षा केल्या जातात. अशा प्रकारच्या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अशा शिक्षेचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर किती नकारात्मक परिणाम होतो यावर अनेक संशोधन झाले आहेत. एक सर्वेक्षण दर्शवते की, ज्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिली जाते, ते विद्यार्थी भावनिक ताण, नैराश्य, आणि आत्मविश्वासाच्या अभावाने ग्रस्त असतात. त्यांनी अभ्यासातील उत्साह गमावलेला असतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही याचा परिणाम होतो.'द लास्ट रिझल्ट' या शारीरिक शिक्षे विरुद्धच्या मासिकाच्या संपादिकेने देशभरातील शाळांमध्ये किती मुलांना अधिकृत औपचारिकरित्या मारण्यात आले होते यासंबंधी एक सर्वेक्षण केले. ज्या शाळांनी उत्तरे पाठवली नाहीत तिथेही ज्या शाळांनी उत्तरे पाठवली तितकेच मारले जाते किंबहुना अधिकच असे गृहीत धरल्यास शाळेच्या एका वर्षात 15 लाख वेळा मारझोड करण्यात आली. या मारहाणीला शाळांनी जरी चापटी मारणे असे नाव दिले तरी त्यापैकी काही लहान मुलांना त्यासाठी इस्पितळात जावे लागणे इतकी ती जबर जखमी होती आणि ही केवळ अधिकृत म्हणजे मुख्याध्यापकांच्या ऑफिसात करण्यात आलेली मारहाण असून तिची नोंद वहीत नोंद करण्यात आली होती. मुलांना आणखी किती अनधिकृत मारहाणीला तोंड द्यावे लागत असेल धपाटा, बुक्के, केस ओढणे, हात व कान पिरगाळणे गालगुच्चे घेणे, भिंतीवर आपटने, हाताने गुदा मारणे अशा वर्गात घडणाऱ्या घटना किती असतील याचा अंदाज करणेही शक्य नाही. शारीरिक हिंसा बरोबरच मानसिक हिंसेचे ही उपरोध चेष्टा अपमान असे अनेक प्रकार होत असतात.
अशा शिक्षा करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी जगभरात अनेक कायदे आणि नियम लागू करण्यात आले आहेत. मुळात शारीरिक शिक्षा (corporal punishment) अनेक देशांमध्ये निषिद्ध करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, युरोपमधील जवळजवळ सर्वच देशांमध्ये शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्वीडन हा 1979 मध्ये शारीरिक शिक्षेला बंदी घालणारे पहिला देश आहे. त्यांच्या शिक्षण पद्धतीत "Positive Discipline" वर जोर दिला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना चुकीच्या कृतींचे परिणाम समजावून सांगितले जाते, जेणेकरून त्यांच्यावर चांगल्या वर्तनाचा प्रभाव पडतो.आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये, युनिसेफ आणि यूनेस्को यांसारख्या संस्थांनी शारीरिक शिक्षेला पूर्णपणे नकार दिला आहे. त्यांचा विश्वास आहे की, शिस्त लावण्यासाठी आणि मुलांना जबाबदार बनवण्यासाठी संवाद आणि सहकार्य यांचा वापर करणे योग्य आहे.महाराष्ट्रातही शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाने 2010 साली एका परिपत्रकाद्वारे शारीरिक शिक्षेला रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. यात शिक्षण संस्थांमध्ये शाळेतील वातावरण सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यावर भर दिला जातो. यासोबतच, 'Right to Education' (RTE) कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली जाणे अवैध आहे. याआधारे शिक्षकांनी मुलांना शारीरिक शिक्षा केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल या अध्यादेशाच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली, शिक्षकांमध्ये संताप आणि भीतीची लाट उमटली. संताप यासाठी की मुलांना मारल्याशिवाय मुले अभ्यास करणार नाहीत या त्यांच्या गृहीतकाला धक्का बसला म्हणून. आता माराची भीतीच नसेल तर मुले अभ्यासच करणार नाहीत.\
शाळांमधील शिक्षेबद्दल दोन प्रमुख मतप्रवाह आढळतात. पहिला मतप्रवाह असा आहे की, विद्यार्थ्यांना कडक शिस्त लावल्याशिवाय शिक्षणात प्रगती होऊ शकत नाही. या विचारसरणीमध्ये शारीरिक शिक्षा किंवा कडक नियंत्रणाचे समर्थन केले जाते. परंतु, दुसरा मतप्रवाह असा आहे की, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची गरज आहे परंतु त्यासाठी शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे योग्य नाही. या मतप्रवाहानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना शिक्षणाद्वारे आत्मविश्वास व जबाबदारीची भावना दिली पाहिजे.
परंतू शिक्षणतज्ञ कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या कृष्णमूर्ती शाळांमध्ये मात्र आज नव्हे तर स्थापनेपासून शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे. बक्षीस आणि शिक्षा विरहित मुलांना शिकवायला हवे हा तिथला दृष्टिकोन आहे. कृष्णमूर्तींनी सतत ज्या गोष्टीवर खूप टीका केली असेल ती म्हणजे शिस्त होय. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांची उर्मी मरते मनाची चपळता नष्ट होते ही बाह्य शिस्तीची सक्ती मनाला मंद बनविते. खडी दाबण्याच्या यंत्राची उपमा कृष्णमूर्ती शिस्तीला देऊन त्याची दमन क्षमता स्पष्ट करतात. मुळातच शिस्तीच्या मागची वृत्ती ही लोकशाही विरोधी व हुकूमशाही असते. समोरच्याला त्याचे मतपरिवर्तन न करता सक्तीने बदलविणे त्यात गृहीत असते. त्यामुळे समोरच्याच्या भावना, मनोभूमिका याचा किंचितही त्यात विचार केलेला नसतो. एका साच्यात सर्वांना बांधण्यावर भर दिलेला असतो. स्वतंत्र विचार दाबण्यासाठी तिचा उपयोग होतो. अभ्यास न करण्याबाबत केले जाणारी शिक्षा ही आम्ही तुला अभ्यासाची आवड लावू शकत नाही इतका वेळ आणि संयम आमच्याजवळ नाही तेव्हा मी शिक्षा करतो तू त्या भीतीने अभ्यास कर, असा सरळ मामला असतो. मारामारी करणाऱ्या मुलात अतिरिक्त ऊर्जा असते त्या ऊर्जेला आम्ही वळण देऊ शकत नाही. तेव्हा मार्क आणि त्या भीतीने तुझी ऊर्जा दाबून ठेव असा सांगावा असतो. थोडक्यात मुलांशी प्रेमाने संवाद करून त्यांना बदलविण्याची आमची तयारी नसल्याने आम्ही शिक्षेचा शॉर्टकट वापरतो यावर वादविवाद होतील विद्यार्थी संख्या, वेळ सारे मुद्दे येतील पण दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. मागच्या पिढीने शिस्तीचा इतका प्रचंड प्रभाव आपल्यावर बसवलेला आहे की आपण दुसऱ्या बाजूने विचार करण्याची क्षमता गमावून बसलो आहोत. भीतीशिवाय अपेक्षित परिणाम साधला जाईल यावर आपला विश्वास उरला नाही. संवादाने प्रेमाने मुले बदलू शकतात यावर आपला विश्वास आहे का? हे मनाच्या तळात जाऊन स्वतःपुरतेच शोधले पाहिजे तर आपलाच मुळात प्रेमावर एक थेरपी म्हणून विश्वास नाही म्हणून आपण शिस्त आणि शारीरिक शिक्षा यांना कवटाळून बसतो आहोत. शिक्षेमुळे मुलं बदलतात असे सर्वांना वाटते. आपल्या समाजात मुळी चूक केल्यावर तुरुंग आणि चांगल्या कामांना पुरस्कार अशी रचना आहे. त्यामुळे शिक्षा करण्याला आपल्या समाजात प्रतिष्ठा आहे. मग त्याला शाळा अपवाद कसे असणार. “छडी लागे छम छम” हे सूत्र तर प्रतिष्ठित आहे. आमच्या सर्व चर्चांमध्ये जेव्हा बालपणीच्या जुन्या पिढीच्या चांगल्या शिक्षकांचा विषय निघतो तेव्हा हमखास ते एका गल्लीने जात तेव्हा आम्ही दुसऱ्या गल्लीने जात असू ही आमच्या चांगल्या शिक्षकाची व्याख्या. जो शिक्षक अधिक शिक्षा करी त्याचा शाळेत दरारा असायचा किंबहुना असतो. कुठलेही चुकीचे वर्तन झाल्यानंतर केवळ शिक्षा अथवा मार अथवा जोराने ओरडणे हाच एक उपाय असू शकतो हा विचार शिक्षकांच्या मनामध्ये जबरदस्त भिनलेला असतो. शिक्षक आणि पोलीस यातला फरक आम्ही करणार की नाही? विद्यार्थ्यांना शिक्षकाची भीती वाटायला लागली की, शिक्षकाचा अहंकार सुखाऊ लागतो. जे कृष्णमूर्ती म्हणतात की, शाळा म्हणजे मोठ्या माणसांचे अहंकार सुखावण्याची केंद्रे झाल्या आहेत.कृष्णमूर्ती म्हणतात की, शिक्षकांचा संबंध हा यंत्राशी नसून तो जिवंत मुला-मुलींशी आहे. ही मुले भीती, अनुकरण, प्रेम, राग या भावनांमध्ये गुरफटलेली आहेत तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढायला खूप समजूतदारपणा, खूप संयम आणि प्रेमाची आवश्यकता आहे. शिक्षण तज्ञ जे कृष्णमूर्ती हे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याबद्दल महत्त्वाचे मत मांडतात ते म्हणतात शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते समान पातळीवर असले पाहिजे शिक्षकाच्या मनात अहंगंड नसावा व विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड नसावा. शिक्षक जर स्वतःला उच्च स्थानावर समजला तर तो विद्यार्थ्यांना हीन समजू शकतो. यात त्यांच्यात कोणतेच नाते निर्माण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यात भय आणि तणाव निर्माण होतो आणि लहान वयातच तो नात्यातील श्रेष्ठ कनिष्ठता शिकू लागतो. विद्यार्थ्यांत न्युनगंड वाढायला लागतो, तो स्वतःला शूद्र मानायला लागतो. त्यातून तो आक्रमक होतो त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांशी नम्रतेने बोलले पाहिजे.
अनेक मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, आणि पालकांचा दुसऱ्या मतप्रवाहाकडे कल आहे. त्यांचा विश्वास आहे की, विद्यार्थ्यांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य जर चांगले असेल, तर ते शाळेत चांगली कामगिरी करतात आणि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होते.
शिक्षेला पर्याय म्हणून अनेक शाळेत विविध पर्याय व प्रयोग केले जात आहे ते पुढीलप्रमाणे
- अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनावर उपाय म्हणून "Restorative Practices" हा दृष्टिकोन वापरला जातो, या तंत्रामध्ये संवाद, समंजसपणा, आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतींमुळे दुसऱ्यांना झालेल्या परिणामांची जाणीव करून दिली जाते आणि त्यांच्या वर्तनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाते.ज्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम समजतात आणि त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.
- Positive Reinforcement* हे तंत्र शिकवताना विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन ओळखून त्यांना बक्षीस, प्रशंसा किंवा इतर सकारात्मक प्रोत्साहन देऊन वर्तनाचा पुनरावृत्ती करायला उद्युक्त करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, वर्गातील विद्यार्थ्याने उत्तम वर्तन केले तर त्याला शाबासकी देणे, किंवा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यावर त्याला अतिरिक्त क्रियाकलापांची संधी देणे. त्यामुळे मुलांना आपल्या कृतीचे महत्त्व समजते आणि ते चांगल्या वर्तनाच्या दिशेने प्रेरित होतात.
- *Conflict Resolution* तंत्रामध्ये विवाद किंवा संघर्ष सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याचे, इतरांचे विचार समजून घेण्याचे आणि आपली समस्या शांतपणे सोडवण्याचे कौशल्य शिकवले जाते. हे तंत्र त्यांना शांततेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहण्यास मदत करते.
- काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनासंबंधी नियम विद्यार्थीच करतात व ते पाळले जातात किंवा नाही यावर देखरेखही विद्यार्थीच करतात.
- जबाबदारी दिली जाणे: विद्यार्थ्यांना त्यांची चूक सुधारण्यासाठी जबाबदारी सोपवणे, जसे की नुकसान भरपाई करणे किंवा चूक सुधारण्यासाठी काम करणे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणे आणि त्यांना जबाबदार बनवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा वापर केल्यास शिक्षणात सुधारणा होईल. शाळा हे ठिकाण शिक्षण आणि विकासाचे केंद्र असावे, शिक्षेचे नव्हे. म्हणूनच, "पोलीस नको शिक्षक होऊ या," असे म्हणत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यावर चांगला परिणाम करणारी शिक्षण पद्धती विकसित केली पाहिजे.
शारीरिक शिक्षणाच्या तासालाही वर्षानुवर्ष अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वेगवेगळे व्यायाम करायला लावतात उद. रनिंग, उठ बश्या, फ्रंट रोल, प्लांक इ. खरंतर हे सर्व व्यायाम शारीरिक सुदृढता विकासासाठी अतिशय उत्तम असे व्यायाम आहे. परंतु हेच व्यायाम शिक्षा म्हणून केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या व्यायामाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते व आयुष्यभर त्या उठबष्या लक्षात ठेवतात. आपल्या सगळ्यांनाच याची जाणीव आहे की व्यायाम हा आरोग्यदायी जीवनशैली मध्ये किती महत्त्वाचा घटक आहे. व्यायाम हा शिक्षा होऊ शकत नाही हे आपणास ज्ञात असूनही आपण त्याचा वापर शिक्षा म्हणून करतो व विद्यार्थ्यांच्या मनावर व्यायामाबद्दल ची नकारात्मक भावना आयुष्यभर बिंबवतो.