नुकताच २०२२ चा 'असर' ASAR (Annual Status of Education Report) अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.त्यावर वर्तमानपत्रांमधून चर्चा सुरू आहे. ३ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणितीय क्रिया अशा मूलभूत अध्ययन क्षमतांची स्थिती कशी आहे यावर 'प्रथम' या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण १७००२ शासकीय शाळांमध्ये करण्यात आले आहे.
'असर' वेबसाईटवर गेले असता त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण अहवाल या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतही सर्वेक्षण केले जाते हे बघून मन सुखावून गेले. शारीरिक शिक्षणाच्या या अहवालामध्ये केवळ चार बाबींचा अंतर्भाव आहे त्या खालीलप्रमाणे
१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो ?
२. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत ?
3. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे ?
४. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे. अश्या चार घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे ?
या चारही प्रश्नांचे विश्लेषण खालीलप्रमाणे
१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो या प्रश्नाचे टक्केवारीत विश्लेषण खालीलप्रमाणे
- आनंदाची बाब ही आहे की, महाराष्ट्रातील सर्वाधिक शाळा (९६%) म्हणजेच १७००२ शाळांपैकी १६३२१ शाळांच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणासाठी वेळ दिला जातो.
- महाराष्ट्रातील केवळ ८.८ % म्हणजेच १७००२ शाळांपैकी केवळ १४९६ शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे ही धक्कादायक बाब आहे. वरील नकाशावर नजर टाकल्यानंतर असे लक्षात येते की, शासकीय शाळांमधून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरती होत नाहीये. नवीन शिक्षण धोरण असोत की, फिट इंडिया चळवळ असो या सर्वांच्या अमलबजावणीसाठी तज्ञ शिक्षक असणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला ऑलिंपिक मध्ये अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर सरकार अशा खेळाडूंना करोडो रुपये बक्षीस देते (लोकप्रियतेसाठी?) परंतू अशा प्रकारचे अधिकाधिक खेळाडू तयार होण्यासाठीची मूलभूत गुंतवणूक करायला सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे वरील विश्लेषण वरून जाणवते म्हणूनच असे वाटते की,सरकारला शारीरिक शिक्षणाचा पूर्व विसर पडलेला आहे.
- भारतातील बहुतांश शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. क्रीडा साहित्यामध्ये वेगवेगळ्या खेळासाठी व उपक्रमांसाठी वेगवेगळ्या साहित्याची आवश्यकता असते. तसेच जे साहित्य आहे ते विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आहे की नाही हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्रीडा साहित्याचे सर्वेक्षण करतांना कोणते निकष अथवा आधार घेतला ते रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही.
- भारतातील बहुतांश शासकीय शाळेच्या आवारात क्रीडांगण आहे हीसुद्धा आनंदाची बाब आहे.