विद्यार्थ्यांचा आवडता उपक्रम-एरोबिक्स !
लेझीम, सह-साहित्य कवायती आणि झांज यासारख्या तालबद्ध उपक्रमांची महाराष्ट्रा मध्ये मोठी परंपरा आहे. या तालबद्ध उपक्रमांमध्ये आता 'एरोबिक्स' या उपक्रमाचा गेल्या काही वर्षापासून समावेश झाला आहे. एरोबिक्स ही संकल्पना काही वर्षांपूर्वी केवळ जिम किंवा हेल्थ क्लब यांच्याशी संबंधित होती. परंतु सध्या एरोबिक्स हा तालबद्ध उपक्रम केवळ शहरी भागातील नव्हे तर खेड्या पाड्या वरील शाळेच्या मैदानावरही मोठ्या उत्साहात केला जातो. याचे सर्व श्रेय चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. नयना निमकर यांचे.
मॅडमच्या प्रयत्नांमुळेच केवळ बी.पी. एड अभ्यासक्रमातच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 'एरोबिक्स' या उपक्रमाचा समावेश करण्यात आला. या उपक्रमाचे महत्त्व बीपीएड करणाऱ्या भावी शारीरिक शिक्षण शिक्षकांना समजले आणि जेव्हा हे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले त्यावेळी त्यांनी हा आधुनिक तालबद्ध उपक्रम आपआपल्या शाळेमध्ये घ्यायला सुरुवात केली. अनेक वर्षानुवर्ष त्याच-त्याच सह-साहित्य कवायती नाखुषीने करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एरोबिक्स मुळे नवचैतन्य संचारले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.कारण, अनेक वर्षानंतर शारीरिक शिक्षणात काहीतरी नवीन उपक्रम आला होता, तालबद्ध उपक्रमांसाठी एक पर्याय आला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा एरोबिक्स साठी म्यूजिक सुरू होते तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा जोष संचारतो आणि हिरमुसलेल्या चेहर्यांवर हास्य उमटते. अजूनही शाळेत एरोबिक्स सुरू झाल्यानंतर ज्याप्रमाणे खेडे गावात एखादी नवीन गाडी आल्यानंतर सर्व गाव बघण्यासाठी गोळा होते तसे आसपासचे लोक कुतुहलाने बघतात. जणूकाही शारीरिक शिक्षणाच्या तासात संगीत लाऊन काय प्रकार चालू आहे ? एरोबिक्स हा उपक्रम केवळ मुलीं मध्येच लोकप्रिय नसून विद्यार्थीही याकडे आकर्षिले गेले आहेत. अतिशय कमी जागेत आणि संगीताच्या तालावर हा उपक्रम केला जातो त्यामुळे सर्वच वयोगटाच्या व्यक्तींचा हा आवडता उपक्रम आहे .- रुधिराभिसरण दमदारपणा वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
- आपल्या हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती सुधारली
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
- तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत
- स्नायू मजबूत होतात आणि टोन सुधारतो
एरोबिक्स म्हणजे एक प्रकारचे शिस्तबद्ध असे नृत्य आहे. ज्यामध्ये मार्चिंग, साइड टू साइड, L-शेप, डबल साइड टू साइड, ग्रेप वाइन यासारख्या मूलभूत प्रकार किंवा हालचाली आहेत. या हालचालींच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारच्या रचना तयार करता येतात. एरोबिक्स करताना हे प्रकार उजव्या आणि डाव्या बाजूला एकसारखे केले जातात. गाण्याची निवड हा एरोबिक्स मधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.त्यासाठी काही नियम नाही परंतु गाणे हे जोषपूर्ण असावे. सध्या अनेक शाळांमध्ये संपूर्ण शाळेचे एकत्रित एरोबिक्स आठवड्यातून एकदा घेतले जाते. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा वार्षिक क्रीडा महोत्सव या कार्यक्रमांमध्ये विविध प्रात्यक्षिके सादर केली जातात. त्यामध्ये सध्या एरोबिक्सचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आढळतो.
शिक्षकांसाठी काही शिफारशी
- विद्यार्थ्यांना सुरूवातीला मूलभूत स्टेप्स शिकवाव्या
- शारीरिक शिक्षण तासात आठवड्यातून किमान एकदा काही वेळ एरोबिक्स घ्यावे
- नवनवीन आणि लोकप्रिय गाण्यांचा समावेश करावा
- विद्यार्थी नेत्यांचा (Leaders) सहाय्याने घेता येईल
- मूलभूत स्टेप्स च्या एकत्रीकरण करून नवीन रचना तयार करण्यासाठी विद्यार्थांना प्रोत्साहित करावे