Tuesday, August 20, 2024

क्रीडाराष्ट्र होण्यासाठी पायाभरणी हवी!!!

 *क्रीडाराष्ट्र होण्यासाठी पायाभरणी हवी.........* 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची नुकतीच सांगता झाली. भारताला मिळालेल्या ६ पदकांची संख्या जरी मर्यादित असली तरी एकूण ऑलिम्पिक मध्ये भारताची कामगिरी समाधानकारकच म्हणावे लागेल. कारण सहा खेळाडू असे होते जे चौथ्या क्रमांकावर राहिले. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडने एका वृत्तपत्रास मुलाखत दिली त्यावेळेस त्याला


प्रश्न विचारण्यात आले की, 140 कोटी लोकसंख्येचा देश केवळ मोजकेच ऑलिम्पिक पदक विजेते तयार करू शकला आहे (खरं तर हा प्रत्येक भारतीयाला चार वर्षानंतर पडणारा प्रश्न आहे). ते बदलण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते? त्यावेळेस राहुल द्रविड म्हणाला की, अव्वल क्रीडा राष्ट्रांपैकी एक होण्यासाठी, आपण प्रथम शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र (Physically Active Nation) बनणे आवश्यक आहे. आपण एक समाज म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आणि वयोगटातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे. खेळ ही पदके जिंकण्यापलीकडे आहे आणि ही मानसिकता समाजात तयार झाली पाहिजे. या वाक्याला पुष्टी देणाऱ्या एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, भारतातील 80 % विद्यार्थी दिवसाला 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही.तसेच भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हा कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि नाही. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वृध्दींगत होत जाते असा नैसर्गिक नियम आहे त्याप्रमाणे शासनाच्या आणि शिक्षणाच्या प्राधान्यक्रमामध्ये जेव्हा आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा विषय येईल तेव्हा पदकांची चर्चा आणि विश्लेषण करायला हवे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते होणे हा एक दीर्घकालीन आणि पद्धतशीर प्रक्रियेचा परिणाम असतो. परंतू आपण प्रक्रियेपेक्षा (Process) परिणामावर (Product) अधिक लक्ष केंद्रित करतो. आपण आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वतः मैदानावर जाऊन व्यायाम आणि खेळ खेळतो का ? आपल्या पाल्याला खेळण्यासाठी वेळ आणि प्रोत्साहन देतो का? याचा एक भारतीय म्हणून आपण विचार नव्हे तर कृती करायला हवी. 

खेळाडुंची गळती (Dropout) एक आव्हान: ज्याप्रमाणे भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात गळती होते आणि विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात त्याचप्रमाणे खेळामध्ये आहे. सर्वच स्तरावरील स्पर्धांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की १२ वर्षाखालील व 14 वर्षाखालील गटांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे त्या प्रमाणात १६ वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत जाते. अनेक विद्यार्थ्यांमध्ये खेळाची प्रतिभा मोठ्या प्रमाणात असतानाही १० वी आणि १२ वी परीक्षांना असणाऱ्या अनन्य साधारण महत्त्वामुळे अनेक खेळाडूंचे खेळातील करिअर सुरू होण्याअगोदरच संपते.इयत्ता १० वी आणि १२ वी नंतर खेळ सोडून देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण, अभ्यासातील बुध्दीमत्ता श्रेष्ठ आणि क्रीडेतील बुध्दीमत्ता कनिष्ठ समजली जाते. यामध्ये स्वतःहून खेळ सोडणाऱ्यांची संख्या नगण्य असते परंतू पालकांच्या आग्रहा खातर अथवा इच्छेखातर खेळ सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भारतातील क्रीडा प्रतिभा सुरुवातीच्या काळातच लुप्त होते. प्रतिभावान खेळाडूंचा ड्रॉप आऊट रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी पालकांमधील जागरूकता वाढणे महत्वाचे आहे. कारण, पदक विजेते खेळाडू घडण्याच्या प्रक्रियेतील पालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व देणाऱ्या सामाजिक रेट्यामध्ये आपल्या पाल्याला खेळायला सपोर्ट करणे खूप आव्हानात्मक परंतू महत्त्वाचे आहे.माझ्या माहितीतील काही पालक आहे जे आपल्या पाल्याला परिस्थिती नसतांनाही खूप सपोर्ट करत आहे परंतू त्यांची संख्या खूप मोजकी आहे. सध्याच्या काळात उच्च क्रीडा कार्यमनासाठी फिटनेस ट्रेनर, आहार, फिजिओ या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात आणि त्या बऱ्याच खर्चिक असतात त्यामुळे पालकांचा सपोर्ट हा कळीचा मुद्दा ठरतो. 

शालेय स्तरावरील पायाभरणी महत्वाची: २०२२ मध्ये ‘असर’ या अहवालात आलेल्या निष्कर्षावरून असे आढळले की, भारतातील एकूण शासकीय शाळांमधील बहुतांश शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास केवळ ८ % शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे. हि अतिशय धक्कादायक बाब आहे. जर शारीरिक शिक्षण शिक्षकच नसतील तर शाळेतील विद्यार्थी खेळात कसे सहभागी होतील? लाखो नव्हे तर शासकीय शाळेत शिक्षण घेणाऱ्या करोडो विद्यार्थी हे खेळापासून वंचित राहतात याला जबाबदार कोण? तात्पुरत्या लोकप्रियतेसाठी पदक विजेत्या खेळाडूंना करोडोची बक्षिसे देण्यात गैर काहीच नाही परंतू असे पदक विजेते त्यांचा प्रवास जेथे सुरू करतात अशा शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच करायची नाही हा शासनाचा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? ऑलिंपिक पदक जिंकणे ही बहुस्थरीय प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ दहीहंडीच्या विविध थरांमध्ये सर्वात वरचा थर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळणारे खेळाडू आणि सर्वात खालचा थर म्हणजे शालेय स्तरावरील शारीरिक शिक्षण आणि खेळ. विद्यार्थ्यांची खेळाबद्दलची धारणा, आवड-निवड निश्चित करणारा आणि निर्माण करणारा कालखंड हा विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे खेळाबद्दलचे अनुभव असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत विविध खेळाच्या संधी मिळणे, सकारात्मक अनुभव मिळणे हे खेळातील करिअरच्या दृष्टीने पायाभरणी असते. शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या नियुक्त्या करणे आणि मूलभूत क्रीडा सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेक पदक विजेते त्यांचा प्रवास सुरू करू शकतील याची जाणीव शासनाला कधी होणार? शाळेमध्ये खेळांसाठी पूरक वातावरण असेल, विद्यार्थ्यांना खेळण्याच्या विविध संधी मिळाल्या तर विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग निश्चित वाढेल. याबरोबरच शाळेत शारीरिक शिक्षणाला सध्या आठवड्याला दोन ते तीन इतकेच तास दिले जातात 

युनेस्कोच्या शारीरिक शिक्षण धोरणानुसार माध्यमिक शाळेत एका आठवड्यात शारीरिक शिक्षणासाठी किमान 180 मिनिटे द्यायला हवीत परंतू भारतात सर्वसाधारणपणे आठवड्याला ९० ते १२० मिनिटे इतकाच वेळ दिला जातो. याशिवाय शारीरिक शिक्षणाचा तास इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देखील वापरला जातो. हे चित्र बदलायला हवे आणि शालेय शारीरिक शिक्षणाकडे सर्वांनीच गांभीर्याने बघायला हवे. 

आशेचा किरण: गेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहे. पदक विजेत्यांना चांगले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात, ज्याठिकाणी या स्पर्धा होतात तेथे चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण होत आहे. तसेच टॉप्स (Target Olympic Podium Scheme) योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सर्व प्रकारचा सपोर्ट दिला जात आहे ही स्वागतार्ह बाब आहे. त्याचबरोबर विविध खेळांच्या लीग भारतात सुरू झाल्या आहे त्यामुळे उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळत आहे,आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांना सरकारी नोकरीमध्ये घेतले जात आहे. या काही आशादायी बाबी दिसत आहे. 

आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पिएर डी कुबर्टिन म्हणायचे की,‘‘जेव्हा देशातील बहुसंख्य नागरिकांना खेळ ही मूलभूत गरज असल्याची जाणीव होईल, तेव्हाच त्या देशाला क्रीडाराष्ट्र म्हणून संबोधता येईल,’’ २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी भारतात सुरू आहे तोपर्यंत तरी भारत एक क्रीडा राष्ट्र म्हणून पुढे येईल का?


डॉ. शरद आहेर 

प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

Friday, August 2, 2024

जगभरात वंचित शारीरिक शिक्षण !!!

 युनेस्कोच्या शिक्षण विभागाने द ग्लोबल स्टेट ऑफ प्ले अशा प्रकारचा एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणासंबंधीची सद्यस्थिती आणि ती सुधारण्यासाठीच्या काही शिफारशी देण्यात आलेल्या  आहेत. त्यातील शारीरिक शिक्षणाची जगभरातील सद्यस्थिती काय आहे याचा आढावा आपण या ब्लॉगमध्ये घेऊया. 

  • आयुष्यभर शारीरिक क्रियाशील राहण्यासाठी व तरुण पिढीचे मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असे असूनही अभ्यासक्रमामधील मुख्य विषय म्हणून शारीरिक शिक्षणाची क्षमता असूनही युनेस्कोच्या रिपोर्ट वरून असे दिसून येते की शारीरिक शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही. 
  • युनेस्कोच्या रिपोर्टनुसार शारीरिक शिक्षण विषयास अत्यंत कमी प्राधान्य दिले जाते. शारीरिक शिक्षणाच्या मुख्य कमतरतांमध्ये धोरणांची अंमलबजावणी अपुरा निधी, कुशल शारीरिक शिक्षकांची कमतरता, शारीरिक शिक्षणाच्या वर्गांतील विविधता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश आहे. 
  • जगभरातील 83% देशांनी शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य केलेले आहे. परंतू, अध्यापनाची गुणवत्ता आणि पाठ नियोजनातील विविधता या महत्त्वपूर्ण समस्या सध्या सगळ्यांनाच भेडसावत आहेत.
  • जगभरातील 63.8% देश त्यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक बजेटच्या केवळ 2 % पेक्षा कमी निधी शारीरिक शिक्षणाला देतात.


  • युनेस्कोच्या गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण धोरणानुसार (QPE) माध्यमिक शाळेत एका आठवड्यात शारीरिक शिक्षणासाठी किमान 180 मिनिट द्यायला हवीत. युनेस्कोच्या या धोरणाची अंमलबजावणी जगभरात तीन पैकी केवळ एका माध्यमिक शाळेत केली जाते. 
  • 32.2% उच्च माध्यमिक शाळा आणि 34.7% निम्न माध्यमिक शाळेत दर आठवड्याला किमान 180 मिनिटे शारीरिक शिक्षणाचे निकष पूर्ण करतात.
  • जागतिक स्तरावर, 69% शाळांनी नोंदवले आहे की, ते विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण तासादरम्यान कोणत्या प्रकारचे उपक्रम करायचे ते निवडण्याची संधी देतात.
  • तीन पैकी केवळ एका दिव्यांग विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षण दिले जाते.
  • जागतिक स्तरावर, 58.3% देशांनी नोंदवले आहे की, दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांबरोबरच  शारीरिक शिक्षण वर्गात उपस्थित असतात
  • 54.5% देशांमध्ये धोरणे किंवा योजना असूनही केवळ 7.1 % शाळा शारीरिक शिक्षणासाठी मुला व

    मुलींसाठी  समान वेळ देतात.
  • प्राथमिक शाळांमधील शारीरिक शिक्षण शिक्षकांपैकी केवळ 44.7% शिक्षक हे शारीरिक शिक्षणातील विषय तज्ञ (Specialist Teacher)आहेत. भारतात प्राथमिक स्तरावर विशेष शिक्षक नसल्यामुळे हे प्रमाण खूप जास्त असू शकेल 
  • जागतिक स्तरावर, 82.7% देशांनी शारीरिक शिक्षणामद्धे मुलींचा सहभाग अनिवार्य असल्याचे नोंदवले आहे
  • जागतिक स्तरावर 68.5% देश गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणच्या  अंमलबजावणीचा आढावा  घेतात
या रीपोर्ट मधे जगभरातील विविध देशांच्या शासनातील व्यक्तींचा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांचा त्यांच्या देशातील स्थितीबद्दल अभिप्राय देण्यात आला आहे. त्यातील काही निवडक मतं अथवा अभिप्राय खालील प्रमाणे 

शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व वाढवण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि शालेय स्तरांद्वारे शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे कोणतेही निरीक्षण आणि मूल्यमापन केले जात नाही.

                                    -मंत्री, ओशनिया

आम्ही देश आणि/किंवा राज्य स्तरावर विद्यार्थ्यांच्या आवडी आणि निवडी आणि स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाचा आदर करून विविध पर्याय ऑफर करण्यास सक्षम असले पाहिजे.
               -मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

शारीरिक शिक्षण हा राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा  अनिवार्य   विषय असूनही, शारीरिक शिक्षणाचे संपूर्ण वर्षात दहा पेक्षा कमी तास घेतले जातात कारण शिक्षक, त्यांच्या मुख्याध्यापकांच्या मान्यतेने, ते शिकवण्याकडे नियमितपणे दुर्लक्ष करतात.
            -मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

 

शारीरिक शिक्षण हे सार्वत्रिक नाही, ते सक्तीचे नाही, दर आठवड्याला खूप कमी तास असतात, आम्ही अतिशय कमी  साहित्यासह सुविधांमध्ये  काम करतो, आमच्याकडे शारीरिक विषयासह अनेक प्रलंबित समस्या आहेत.
                             - मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

क्रीडा आणि शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचे  कोणतेही अधिकृत पाठ्यपुस्तक नाहीत; क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक पाठात काय करावे हे ठरवण्यासाठी कोणताही रोडमॅप नाही.
          -शारीरिक शिक्षण शिक्षक,आफ्रिका 

महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापले अंगण स्वच्छ केल्यास संपूर्ण जग स्वच्छ होईल त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेत, महाविद्यालयात, क्लबमधे गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण राबविल्यास जगभरातील वरील चित्र बदलायला आपण हातभार लावू शकू. गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण कसे असावे यासंबंधी युनेस्कोने काही शिफारशी केल्या आहेत त्या पुढील ब्लॉग मधे पाहूया...  


संदर्भ : The Global State of Play: Report and recommendations on quality physical education.                                UNESKO. https://unesdoc.unesco.org/ark:/48223/pf0000390593

Friday, March 1, 2024

प्रेरणादायी !!!

२०२२-२४ या बॅचच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप नुकतीच संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी बी पी एड मध्ये आतापर्यंत मिळविलेल्या  ज्ञानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष वातावरणात जाऊन करण्याची संधि यानिमित्ताने विद्यार्थी शिक्षकांना असते. विद्यार्थी शिक्षकांच्या मन,मेंदू आणि मनगटाची परीक्षा बघणारा हा उपक्रम असतो. यावर्षी विद्यार्थ्यांनी सहा आठवड्यात शाळेमध्ये घेतलेले अनुभव ऐकताना आशा,निराशा,उत्साह,निरुत्साह अशा भावनांचा कल्लोळ मनामध्ये जात-येत होता. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे तासच नाही,शिक्षक नाही,साहित्य नाही या सर्व निराशा आणणाऱ्या वातावरणात स्नेहा भवारी या विद्यार्थिनीने तिच्या शाळेत घेतलेले अनुभव सांगायला सुरुवात केल्यानंतर आत्तापर्यंत आलेली निराशा आणि मरगळ काही क्षणात निघून गेली आणि संपूर्ण वातावरणच उत्साही आणि सकारात्मक जाणवू लागले. स्नेहाने तिची इंटर्नशिप कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नर येथे पूर्ण केली. 

स्नेहाने इंटर्नशिप दरम्यान जे काही कार्य केले होते त्या सर्व कार्याचे डॉक्युमेंटेशन अतिशय उत्तम पद्धतीने मेंटेन केलेले होते. इंटर्नशिप मध्ये विद्यार्थी शिक्षकाने दैनंदिन जे काही काम करतो त्याची नोंद दैनंदिनी मध्ये करावी अशी अपेक्षा असते. बऱ्याचदा विद्यार्थी केवळ सबमिशन म्हणून या दैनंदिन कडे बघतात. परंतु स्नेहाने तिची दैनंदिनी अतिशय चांगल्या रीतीने मेंटेन केलेली होती. दैनंदिनी मध्ये तिने दोन भाग केलेले होते. पहिल्या पानावर तिला दररोज काय करायचे आहे याचे नियोजन लिहिलेले होते तर पुढच्या पानावर झालेल्या नियोजनानुसार अंमलबजावणी झाली की नाही? हे लिहिलेले होते. त्याचा नमुना खालील प्रमाणे.

१. दैनंदिनी 


२. फीडबॅक

स्नेहाने इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आणि शाळेतील शिक्षकांकडून स्वतःचा फीडबॅक घेतला व तो व्यवस्थित रित्या सादर केला. विद्यार्थ्यांनी लिहिलेले फीडबॅक वाचल्यानंतर डोळे पाणावले होते आणि स्नेहाच्या नावाप्रमाणेच इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी स्नेहाने खूप चांगला स्नेह जपला होता हे जाणवले.



३. मॉडीफाईड साहित्य निर्मिती 

असे म्हणतात की, व्यक्तीने प्रश्नाचा नव्हे तर उत्तराचा भाग व्हायला हवे त्याचा प्रत्यय स्नेहाचे सादरीकरण बघतांना आला. बरेच विद्यार्थी मुख्याध्यापक,इतर शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्याबद्दल तक्रार करण्यात रमत होती त्याचवेळी स्नेहा शाळेतील समस्यांवर उत्तर शोधत होती. इंटर्नशिप दरम्यान स्नेहाने शाळेमध्ये हूप्स, कोन, बिनबॅग हे मॉडीफाईड साहित्य तयार केले व त्यावर पाठ घेतले.




मैदानावर एरोबिक्स घेण्यासाठी शाळेमध्ये म्युझिक सिस्टीम नव्हती म्हणून स्नेहाने स्वतः एक म्युझिक सिस्टीम घेतली व त्याला विद्यार्थिनींकडून डेकोरेट करून घेतली.

३. सुदृढतेचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र गुणपत्रक तयार केले होते व त्याचे फिट इंडिया मानकांद्वारे मूल्यांकन केले होते त्याचा नमुना खालील प्रमाणे.


४. स्नेहाने विज्ञानातील components of cell हा पाठ मैदानावर खेळाच्या माध्यमातून घेतले 




असे म्हणतात की, " शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील असनंच जास्त महत्त्वाचे आहे"  या वाक्याचा प्रत्यय स्नेहाच्या कार्याकडे पाहून येतो. शिक्षकांमध्ये आत्मकेंद्रीपणा वाढत असताना स्नेहा सारख्या प्रामाणिक,संवेदनशील, सृजनशील शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. 


      स्नेहा सुरेश भवारी

Sunday, March 26, 2023

भारत : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र (Physically Active Nation)

सर्वोच्च क्रीडा राष्ट्र बनण्यासाठी, आपण प्रथम शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र (Physically Active Nation)बनले पाहिजे


एज्युकेशन वर्ल्ड या संकेतस्थळाला भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलेली मुलाखत 11 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झाली होती. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणारे शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू आणि पालक या सर्वांसाठी ही मुलाखत अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या या मुलाखतीचे रूपांतर मराठी मध्ये केले आहे 


प्रश्न: देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या क्रीडा शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी तुमचे मत काय आहे?

शाळा-महाविद्यालयांमध्ये शारीरिक किंवा क्रीडा शिक्षणात खूप सुधारणा झाली आहे. प्रशिक्षकांच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे तरीही बरेच काही करायचे बाकी आहे. मुलाच्या वाढीमध्ये शारीरिक शिक्षण (पीई) शिक्षकांच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो कारण त्यांच्याद्वारे शिकवलेली मूल्ये वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक/प्रशिक्षक पात्र आहेत याची आम्हाला खात्री करणे आवश्यक आहे.

प्रश्न:खेळ हा छंदातून व्यवसायात विकसित झाला आहे असे तुम्हाला वाटते का?

गेल्या काही वर्षांमध्ये खेळ हळूहळू छंदातून व्यवसायात विकसित झाला आहे. माझ्या काळात खेळाला करिअर म्हणून निवडताना जी भीती होती ती जास्त होती; आज क्रीडा उद्योगात खूप संधी आहेत. मला वाटते की निरोगी जीवन जगण्यासाठी खेळ आणि शारीरिक हालचालींचे महत्त्व लक्षात घेण्यात या महामारीने मोठी भूमिका बजावली आहे. आज, तुम्ही यशस्वी अॅथलीट नसल्यास, तरीही तुम्ही इकोसिस्टमचा भाग बनून खेळाशी स्वतःला जोडू शकता. स्पोर्ट्स सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी यांसारख्या खेळांमध्ये करिअरच्या अनेक संधी आणि दररोज येत असलेल्या अनेक संधींमुळे हा आता छंद राहिलेला नाही.

प्रश्न: १.४ अब्ज लोकसंख्येचा देश केवळ मोजकेच ऑलिम्पिक पदक विजेते तयार करू शकला आहे. ते बदलण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते?

मला वाटते की अलिकडच्या काही वर्षांत आपण एक राष्ट्र म्हणून जे काही साध्य केले आहे ते अविश्वसनीय आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक चळवळींनी खेळ आणि खेळांच्या महत्त्वाबद्दल प्रचंड जागरूकता निर्माण केली आहे. तथापि, अव्वल क्रीडा राष्ट्रांपैकी एक होण्यासाठी, आपण प्रथम शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र बनणे आवश्यक आहे. आपण एक समाज म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आणि सर्व स्तर आणि वयोगटातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे. खेळ ही पदके जिंकण्यापलीकडे आहे आणि ही मानसिकता समाजात तयार झाली पाहिजे, शाळेतील मुलांपासून सुरुवात केली पाहिजे.

प्रश्न:तुमच्या मते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि क्रीडाप्रेमी तरुण भारतीयांच्या पिढीचे पालनपोषण करण्याची गुरुकिल्ली काय आहे?

पायाभूत सुविधा आणि सुलभता या महत्त्वाच्या आहेत; तथापि, आपली जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. शारीरिक सक्रियता हा एक कौटुंबिक समारंभ असावा जिथे सर्व सदस्य एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवताना त्यांच्या आवडीचा खेळ खेळत असतील.

प्रश्न: शाळेपासून तुमच्या जीवनात खेळाचे महत्त्व काय आहे? क्रिकेटमध्ये करिअर निवडण्यासाठी तुमची प्रेरणा कोण होती? तुमचे पालक आणि शाळेने किती पाठिंबा दिला?

माझ्यासाठी, माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात खेळाने मोठी भूमिका बजावली आहे. मी क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी माझ्या शालेय दिवसांमध्ये मी हॉकी खेळायचो पण लवकरच मला समजले की मला त्यात गती नाही आणि सुदैवाने क्रिकेटमुले ते मागे पडले.

मी खूप भाग्यवान आहे की माझ्या संपूर्ण कारकिर्दीत, मला एक सक्षम प्रणाली (Ecosystem) मिळाली. माझी शाळा असो किंवा कुटुंब, त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण केले ज्यामुळे मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करता आले. माझ्या शाळेची एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे त्यांनी नेहमीच शैक्षणिक आणि खेळाला समान महत्त्व दिले ज्यामुळे मला स्वाभाविकपणे विश्वास वाटला की एकापेक्षा जास्त नाही आणि विद्यार्थ्यांना दोन्ही गोष्टींमध्ये भरभराट होऊ दिली.

प्रश्न:नवोदित क्रीडापटूंना तुमचा सल्ला?

आजच्या युगात, नवोदित खेळाडूंवरील दबाव काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त आहे. मला वाटते की खेळाडूंपेक्षा, पालकांना माझा सल्ला आहे की त्यांनी खेळात असताना त्यांच्या मुलांवर दबाव टाकणे टाळावे. त्यांना स्पर्धा करताना मजा करू द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना अपयशी होऊ द्या. आपण यशावर इतके लक्ष केंद्रित करतो की आपण लहान वयातच अपयशी होण्यास शिकण्याचे महत्त्व विसरतो.

प्रश्न:पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सचे उद्दिष्ट काय आहे? आणि त्याच्या प्रगतीबद्दल तुम्ही किती समाधानी आहात?

क्रीडापटूंना सर्व स्तरांवर स्पर्धा करता यावी यासाठी त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्राच्या कार्याच्या पाचव्या वर्षी, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण किती पुढे आलो आहोत हे पाहून मला खूप आनंद होतो. सेंटरमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारे काही उत्कृष्ट खेळाडूच तयार केले नाहीत तर तळागाळातील खेळाच्या विकासासाठी देखील मदत केली आहे. आम्ही सर्व स्तरांवर खेळाला प्रोत्साहन देण्याची गती कायम राखू आशा करतो.


Monday, January 23, 2023

'असर' की विसर शारीरिक शिक्षणाचा

 


नुकताच २०२२ चा 'असर' ASAR (Annual Status of Education Report) अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.त्यावर वर्तमानपत्रांमधून चर्चा सुरू आहे. ३ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणितीय क्रिया अशा मूलभूत अध्ययन क्षमतांची स्थिती कशी आहे यावर 'प्रथम' या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण १७००२ शासकीय शाळांमध्ये करण्यात आले आहे. 

'असर' वेबसाईटवर गेले असता त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण अहवाल या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतही सर्वेक्षण केले जाते हे बघून मन सुखावून गेले. शारीरिक शिक्षणाच्या या अहवालामध्ये केवळ चार बाबींचा अंतर्भाव आहे त्या खालीलप्रमाणे

१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो ?

२. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत ?

3. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे ?

४. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे. अश्या चार घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे ?

या चारही प्रश्नांचे विश्लेषण खालीलप्रमाणे 

१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो या प्रश्नाचे टक्केवारीत विश्लेषण खालीलप्रमाणे 

  • आनंदाची बाब ही आहे की, महाराष्ट्रातील सर्वाधिक शाळा (९६%) म्हणजेच १७००२ शाळांपैकी १६३२१ शाळांच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणासाठी  वेळ दिला जातो.  
२. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत याचे शेकडा प्रमाण खालीलप्रमाणे
  • महाराष्ट्रातील केवळ ८.८ % म्हणजेच १७००२ शाळांपैकी केवळ १४९६ शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे ही धक्कादायक बाब आहे. वरील नकाशावर नजर टाकल्यानंतर असे लक्षात येते की, शासकीय शाळांमधून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरती होत नाहीये. नवीन शिक्षण धोरण असोत की, फिट इंडिया चळवळ असो या सर्वांच्या अमलबजावणीसाठी तज्ञ शिक्षक असणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला ऑलिंपिक मध्ये अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर सरकार अशा खेळाडूंना करोडो रुपये बक्षीस देते (लोकप्रियतेसाठी?) परंतू अशा प्रकारचे अधिकाधिक खेळाडू तयार होण्यासाठीची मूलभूत गुंतवणूक करायला सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे वरील विश्लेषण वरून जाणवते म्हणूनच असे वाटते की,सरकारला शारीरिक शिक्षणाचा पूर्व विसर पडलेला आहे. 

3. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे ?

  • भारतातील बहुतांश शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. क्रीडा साहित्यामध्ये वेगवेगळ्या खेळासाठी व उपक्रमांसाठी वेगवेगळ्या साहित्याची आवश्यकता असते. तसेच जे साहित्य आहे ते विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आहे की नाही हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्रीडा साहित्याचे सर्वेक्षण करतांना कोणते निकष अथवा आधार घेतला ते रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. 
४. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे याचे शेकडा प्रमाण खालीलप्रमाणे 
  • भारतातील बहुतांश शासकीय शाळेच्या आवारात क्रीडांगण आहे हीसुद्धा आनंदाची बाब आहे.
वरील विश्लेषनावरून शारीरिक शिक्षणाच्या सद्यस्थितीत पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. 'प्रथम' सारखी संस्था असे सर्वकष (Comprehensive) सर्वेक्षण करील अशी अपेक्षा करणेही चुकीचे होईल त्यामुळे शाळेमध्ये कार्य करणाऱ्या शिक्षकांनी आपापल्या शाळेतील शारीरिक शिक्षणाची सद्यस्थिती कशी आहे? याबद्दल शालेय स्तरावर काही प्रश्नांची उत्तरे शोधावी असे वाटते.
१. शाळेतील विद्यार्थ्यांची सरासरी शारीरिक सक्रियता (Physical Activity Level) किती आहे?
२. शाळेतील विद्यार्थ्यांची सरासरी सुदृढता (ताकद, रुधिराभिसरण दमदारपणा, लवचिकता) स्तर कसा आहे?
३. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळातील मूलभूत कौशल्य करता येतात का?
४. शाळेतील विद्यार्थ्यांना (इ.१ ली ते ४ थी.) रनिंग, जम्पिंग, कॅचिंग, थ्रोइंग इ मूलभूत कौशल्यांचा स्तर काय आहे? 

वरील प्रश्नांचा शोध कसा घ्यायचा याबद्दल पुढील ब्लॉगमध्ये चर्चा करू या!

संदर्भ

http://www.asercentre.org/survey/p/418.html

Thursday, September 15, 2022

शारीरिक शिक्षण अभासक्रम कसा असावा?


 शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असावा याबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच मतांतरे आहेत. तसेच भारतातील शैक्षणिक संरचनेचा विचार करता प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत अभ्यासक्रमाची रचना कशी असावी याबद्दल विविध बोर्डचा वेगवेगळा अप्रोच, मार्ग आहे. उदिष्टे, सोईसुविधा,स्थानिक संस्कृती इ विविध घटकांनुसार अभ्यासक्रम वेगवेगळा असू शकतो. तरीसुध्दा शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या स्तरावर कसा विकसित होत जावा यासाठी pangrazi या शारीरिक शिक्षणातील तज्ञाने एक रचना मांडली आहे व ती डायमंड सारख्या आकृतीत मांडली आहे म्हणून त्याला डायमंड कल्पनाबंध असे संबोधले जाते. 

डायमंडची सुरुवात तळातील एका बिंदूपासून होते व तो वरच्या बाजूस रुंदावत जातो. या आकाराचा मतितार्थ असा आहे की, अगदी सुरुवातीच्या शालेय स्तरावर एखाद दुसरे कौशल्य अथवा संकल्पनांचा परिचय करत जावे व जसे विद्यार्थी शिकत जातील तसतसे अधिक कौशल्य व संकल्पना समाविष्ट कराव्या. आपण जसे डायमंड वर, वर सरकु तसा आपण प्राथमिक शालेय स्तरावर प्रवास करत जातो. वरच्या वर्गात प्रवेश झाल्यावर अधिक कौशल्य, संकल्पनांचा शिक्षक परिचय करून देतात. विद्यार्थी जसजसे नवीन संकल्पना अथवा ज्ञान आत्मसात करत जातील तसतसे अधिक ज्ञान कौशल्य संकल्पना शिकविल्या जाव्यात असे या डायमंडच्या तळाचा आकार दर्शवितो.

सुरुवातीच्या काळात म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरावर मूलभूत कारक कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. त्यालाच आकृतीत पायाभरणी (Building the foundation) असे म्हटले आहे. यामध्ये विविध उपक्रम अथवा खेळ खेळण्यासाठी आवश्यक चालणे, धावणे, उड्या मारणे, वळणे, कॅच करणे, थ्रो करणे, ढकलणे, ओढणे, हिट करणे, ड्रिबल करणे अशा विविध मूलभूत कौशल्यांचे अध्यापन या स्तरावर करणे अपेक्षित आहे. जेणेकरून पाया भक्कम होऊन विद्यार्थी विविध शारीरिक उपक्रम करू शकतील आणी त्यांचा आनंद पुढील जीवनात घेऊ शकतील. 

त्यानंतर आपण डायमंडच्या सर्वात रुंद अशा मध्यावर म्हणजेच  प्राथमिक व माध्यमिक स्तरावर पोहोचतो त्यावेळी आपला विद्यार्थी विविध खेळांची ओळख करून घेण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी सज्ज झालेला असतो. या  स्तरावर  विद्यार्थ्यांना खूप उपक्रम, खेळ शिकवावेत. सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ आवडेल असे नाही तर, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना विविध खेळांची अथवा उपक्रमांची ओळख करून दिल्यास विद्यार्थी त्यांच्या भावी जीवनात सक्रिय राहण्याची शक्यता वाढते. त्यालाच वरील आकृतीत Sampling the Menu असे संबोधले आहे. म्हणजे ज्या प्रमाणे हॉटेलमधे गेल्यानंतर मेनूकार्ड दाखविले जाते आणि आपल्याला हवा त्या पदार्थाची निवड आपण करतो त्या रीतीने शारीरिक शिक्षणाच्या तासात विद्यार्थ्यांना विविध उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले (Choice) तर विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतील. शालेय स्तरावर विविध उपक्रम शिकल्यास आपल्याला कोणता उपक्रम आवडतो, जमतो हे विद्यार्थ्याला समजेल उदा. विविध वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, रॅकेट स्पोर्ट इ 

आपला डायमंड वरील प्रवास जसा वरच्या दिशेने सरकतो तसा विद्यार्थी माध्यमिक ते उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध उपक्रमांतून विशिष्ट उपक्रमाची, खेळाची निवड करावी त्यालाच आकृतीत मार्ग निवड (Choosing the Path) असे संबोधले आहे. आता या अरुंद डायमंडचा आकार पुन्हा निमुळता होत जातो या स्तरावर निर्णयक्षमता, समस्या निराकरण क्षमता, स्व व्यवस्थापन क्षमता इत्यादी विकसित होऊन विद्यार्थी निवडक उपक्रमात पारंगत होऊन काही उपक्रम आजीवन करण्यासाठी तयार होणे अपेक्षित आहेडायमंडचा हा निमुळता आकार काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे, विविध पर्यायातून सुयोग्य निवड करणे, निवडक गोष्टी उपक्रमात प्राविण्य मिळवणे व त्यासाठी अथक परिश्रम करणे व त्याचे पर्यावसन आजीवन शारीरिक उपक्रम सहभाग घेण्यात होते हे दर्शवितो. या स्तरावर विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या काही उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने सहभाग घेतील आणि प्रावीण्य प्राप्त करतील.

अशा प्रकारच्या प्रक्रियेमधून जर विद्यार्थी गेला तर तो आजीवन सक्रिय राहण्याची शक्यता वाढते शारीरिक साक्षरतेचे प्रमाण वाढेल, शारीरिक शिक्षणाने सुशिक्षित व्यक्ती घडण्यासाठी पोषक वातावरण मिळेल. डायमंड कल्पना आकृतीबंध हा अभ्यासक्रम कसा असावा यावरील अंतिम उत्तर नाही परंतू तो मार्गदर्शक आहे, तर्कशुध्द आहे आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. 



Thursday, March 17, 2022

लिहितं होऊ या!

 तीन-चार वर्षांपूर्वी "शिक्षकांसाठी साने गुरुजी" हे हेरंभ कुलकर्णी यांचे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकात साने गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूबद्दल सविस्तर विवेचन केलेले आहे. सानेगुरुजी सर्वांनाच एक संवेदनशील शिक्षक म्हणून परिचित आहे. त्याचबरोबर साहित्यिक म्हणून साने गुरुजीचे कार्य खूप मोठे आहे आणि ते या पुस्तकात सविस्तर मांडलेले आहे जे अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातील एका पानावर मी जे वाचलं त्याने मला खूप अंतर्मुख केले, प्रेरित केले आणि माझ्या धारणा त्यामुळे बदलून गेल्या.




ते म्हणजे "As you write personal and personal it becomes universal and universal". या अर्थाने आपण जितके आपले व्यक्तिगत अनुभव मांडत राहू तितके ते जगाला आपले वाटत असतात. लेखन म्हणजे अशी काही अशक्यप्राय गोष्ट नाही. आपणही सहज लिहू शकतो, असा साधारण आशय या पानावर होता. त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला होता. तितक्यातच मी माझ्या मुलीला स्पर्धेसाठी एका शाळेमध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी मला खूप चांगला अनुभव आला किंबहुना मी भारावून गेलो होतो. पुस्तकातील या ओळी माझ्या डोक्यात घर करून राहिलेल्या होत्याच. त्या ठिकाणी मी लगेच ते अनुभव मोबाईलवर लिहून काढले जसं सुचेल तसे लिहित गेलो. त्या क्षणी जे अनुभवले, ज्या भावना मनात येत होत्या त्या लिहित गेलो. लिहून झाल्यानंतर मन खूप हलक वाटत होतं. जणूकाही खूप जवळच्या मित्राला तो अनुभव सांगितला होता. असं म्हणतात ना ! की, लेखन म्हणजे संवाद असतो पेनाचा कागदाशी आणि स्वतःचा स्वतःशी हा अनुभव मी प्रथमच घेत होतो. लिहिलेला अनुभव मी व्हॉट्स ॲपवर शेअर केला. काहींनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मला या अनुभवाने आत्मविशवास दिला की, मी पण लिहू शकतो. त्यानंतर मी सुचेल ते लिहित आहे, आलेले अनुभव लिहित आहे. मला वाटायचं आपण फक्त खेळू शकतो,व्यायाम करू शकतो पण लेखन हा आपला प्रांत नाही. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या बहुतांश व्यक्तींना साधारणपणे असाच न्यूनगंड असतो किंबहुना तसे वातावरण, प्रेरणा नसतात. तोत्तोचान, टू सर विथ लव्ह, टीचर ही पुस्तकांत शिक्षकांनी आपले वैयक्तिक अनुभव अत्यंत सहज भाषेत माडले आणि आज ही पुस्तकं जगप्रसिद्ध आहे. आपण सर्वच दैनंदिन जीवनात विविध अनुभव घेतो, काही घटना, प्रसंग घडतात हे आपण लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला असं वाटतं की, आपल्या अनुभवात काय विशेष आहे? हे अनुभव सर्वच घेतात.पण असं नसतं. आपले अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी असू शकतील. 

आज शेती, उद्योग, शिक्षण तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांमध्ये विपुल आणि सकस असे साहित्य उपलब्ध आहे. परंतू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात असे साहित्य उपलब्ध नाही याची खंत वाटते. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात जे काही साहित्य उपलब्ध आहेत ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचतच नाही. विनोबा म्हणतात की,विज्ञान जोपर्यंत मातृभाषेतून मिळत नाही तोपर्यंत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. हे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासाठी पूर्णपणे लागू होते कारण, शारीरिक शिक्षणाचे विपुल साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे परंतु ते मराठीत नसल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहतचत नाही. विनोबा पुढे म्हणतात की, सुशिक्षित लोक आपल्या भाषेत विज्ञान नाही अशी ओरड करतात त्याऐवजी विज्ञान आपल्या भाषेत आणण्यास काहीतरी योगदान करावे. इंग्रजीत चांगली पुस्तके आहेत ती सर्व आपल्या भाषेत आणली पाहिजेत. परंतु यासंबंधी कोणी विचारच करत नाहीत. खरे पाहता ज्यांनी स्वतः इंग्रजीचे ज्ञान मिळविले त्यांनी व्रत घेतले पाहिजे की मी मरण्यापूर्वी एका चांगल्या इंग्रजी पुस्तकाचा माझ्या मातृभाषेत अनुवाद करीन. असा अनुवाद केल्याशिवाय मला मारण्याचा अधिकार नाही. 

असे म्हणतात की,‘एखादा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते त्यामुळे तो प्रश्न सुटायला मदत होते.’ म्हणूनच मनापासून वाटते की, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी चांगले साहित्य निर्माण होणे, लेखक आणि वाचकांची एक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. चला तर लिहितं होऊ या! व्यक्त होऊ या!


संदर्भ

शिक्षकांसाठी साने गुरुजी. हेरंब कुलकर्णी

ज्ञान ते सांगतो पुन्हा. विनोबा भावे



Friday, December 17, 2021

डोस आनंदाचा

 डोस आनंदाचा

 नुकतेच एक पुस्तक वाचत असताना डॉ. चंद्रशेखर देसाई यांचा 'आनंदी शिक्षक आनंदी विद्यार्थी' हा लेख वाचनात आला. या लेखामध्ये त्यांनी हॅपिनेस हार्मोन्स याविषयी विवेचन केलेले आहे.हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती. सर्वसामान्यपणे खेळाकडे आणि व्यायामाकडे आपला समाज केवळ शारीरिक फायद्यासाठीच बघतो परंतु, भावनिक आणि मानसिक गरजांसाठी शारीरिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे याची जाणीव परत एकदा मला झाली.  आनंदी राहण्यासाठी किंवा 'आनंद' ही भावना निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये चार हॉर्मोन्स किंवा संप्रेरके आहेत. ती पुढील प्रमाणे

डोपामिन (D)

ऑक्सिटोसिन(O)

सेरिटोनीन (S)

एडॉर्फिन (E)

चारही संप्रेरकांचा पहिला शब्द मिळून जो शब्द तयार होतो त्यालाच डोस (DOSE)असे म्हटले आहे. अशा या चार हार्मोन्स ला हॅप्पीनेस हार्मोन्स असे म्हणतात. 

त्यातील डोपामीन हे छोट्या छोट्या कृतीमधून मिळत असते. छोटी ध्येये, आव्हाने आपण स्वतः करता आणि आपल्या विद्यार्थ्यांकरता मांडायची. ते ध्येय प्राप्त केले की विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शारीरिक शिक्षण आणि खेळांमध्ये अशा अनेक घटना किंवा परिस्थिती येतात ज्या वेळेस अशा प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो. विद्यार्थ्यांमध्ये रेस लावल्यानंतर जो विद्यार्थी जिंकतो त्याच्या आनंदाला उधाण येते, फुटबॉल खेळत असताना गोल झाल्यानंतर, वॉलीबॉल, खोखो, कबड्डी यासारख्या खेळांमध्ये हे गुण मिळाल्यानंतर किंवा सामना जिंकल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदाचा अनुभव येतो. शिक्षकाने शारीरिक शिक्षण तासादरम्यान विद्यार्थ्यांना अशी छोटी छोटी आव्हाने द्यायची आणि ती पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा जर दिली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण हे कधीच शिक्षा वाटणार नाही. 

दुसरे आहे ऑक्सिटोसिन. जेव्हा एखाद्याला कौतुकाची थाप आपण देतो, किंवा चांगल्या गोष्टीला दाद देतो तितके ऑक्सिटोसिन तुम्हाला मिळते आणि आपल्याला आनंदाची भावना तयार होते. शारीरिक शिक्षण आणि खेळामध्ये जेव्हा विद्यार्थी चांगले कौशल्य दाखवतो, चांगले खेळतो, चांगले कार्य करतो अशावेळी नेहमीच शिक्षक त्यांचे कौतुक करतात त्यालाच मॅजिक वर्ड्स असेही संबोधले जाते. शब्बास, खूप छान, Good, Awesome या सारखे शब्द जेव्हा विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात तेव्हा विद्यार्थी आनंदी होतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठीची कोणतीही संधी दवडू नये आणि कौतुक करण्यात कंजुषी करू नये. कारण प्रत्येक व्यक्तीची ती एक भावनिक गरज असते. त्यामुळे केवळ तात्पुरता आनंद मिळतो असे नाही तर पुन्हा चांगले कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत असते. 

सेरेटोनिन मिळवण्याकरता आपल्याला थोडेसे स्वतः मधून बाहेर पडावे लागते. आपण जेव्हा इतरांकरिता काहीही केले तरी स्वतःच्या शरीरात सेरेटोनिन गोळा व्हायला लागते. आपण गरजू व्यक्तींसाठी, पर्यावरणासाठी असे कोणासाठीही काही केले की, हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक अतिशय महत्त्वाचे हॅपिनेस हार्मोन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे इतरांना देण्यासाठी काहीतरी असते. ज्ञान, वेळ, पैसा, कौशल्य, प्रेम असे बरेच काही. या हार्मोनचे महत्त्व आणि ते कशामुळे तयार होते हे समजल्या नंतर शारीरिक शिक्षणामध्ये अनेक प्रसंगी याचा अंतर्भाव करता येईल. कोणत्याही वर्गामध्ये काही विद्यार्थी विशिष्ट खेळांमध्ये कुशल असतात आणि काही विद्यार्थी अकुशल असतात. अशावेळी कुशल विद्यार्थ्यांच्या मदतीने अकुशल विद्यार्थ्यांना शिकविण्यास सांगितल्यास आपल्याकडे जे कौशल्य आहे ते इतरांना शिकविण्याची प्रेरणा यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांना आनंदाची अनुभूती येईल. एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा अनुभव. पहिलीच्या वर्गाला बाई शिकवत होत्या. एकदा त्यांनी मुलांना चित्र काढायला सांगितले. तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी मदत केली आहे अशा कोणाचेही चित्र काढा, असे बाईंनी मुलांना सांगितले होते. पहिलीतील लहान मुलांनी झटपट चित्रे काढली पाटीवर. बाईंनी ती सगळी चित्रे वर्गासमोर मांडली. मुलांनी काढलेल्या त्या चित्रांवर वर्गामध्ये चर्चा सुरू केली. कोणी आईची चित्र काढले होते, कोणी बाबांचे चित्र काढले होते. एका चित्रात फक्त हात दाखवला होता. तर हा हात कोणाचा यावर बाईंनी चर्चा सुरू केली. चौकातल्या वाहतूक पोलिसाचा हात आहे, देवाचा हात आहे, शेतकऱ्याचा हात आहे अशी काही उत्तरे मुलांनी दिली. शेवटी बाईंनी ज्या मुलाने हे चित्र काढले होते त्यालाच विचारले की हा तू काढलेला हात कोणाचा? तो विद्यार्थी म्हणाला "बाई, हा हात तुमचाच!" त्या मुलाने पुढे सांगितले, मी झोपडपट्टीत राहतो. माझे कपडे खराब आहे. माझ्याकडे जुनी पुस्तके आहेत. मी पहिल्यांदा वर्गात आलो आणि या सगळ्या मुलांना पाहिल्यानंतर पळून चाललो होतो. त्याचवेळी तुम्ही वर्गाकडे येत होत्या. तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवून वर्गात घेऊन आलात. मी कोणाला तरी हवा आहे ही भावना माझ्या मनात निर्माण झाली. अशा रीतीने आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो हा संस्कार त्या बाईंनी त्यांच्या कृतीतून विद्यार्थ्यांसमोर ठेवला होता. एका शाळेमध्ये एक अथलेटिक्सचा अतिशय उत्कृष्ट खेळाडू होता. परतू त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. चांगल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक शूज त्याच्याकडे नव्हते. अशा वेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून शिक्षकांकडे दिले व त्याला शूज आणायला सांगितले. अशा प्रकारची भावना आणि मानसिकता निर्माण होण्यासाठी शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 2019 मध्ये दिवाळीला चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी गरजू व्यक्तींना फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना फराळ, पैसे किंवा कपडे देण्याचे आवाहन केले. त्याला सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्तम प्रतिसाद दिला. गोळा झालेले फराळ, कपडे आणि ब्लॅंकेट घेऊन हे विद्यार्थी रात्री पुण्यातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तींकडे गेले आणि त्यांनी केवळ फराळ आणि कपडे दिले नाही तर त्यांच्याशी काही वेळ प्रेमाने गप्पा मारल्या, त्यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतलेले अनुभव सर्वांना सांगितले त्यावेळेस प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते. अशा रीतीने सर्वांचीच दिवाळी इतरांसाठी काहीतरी केल्याने आनंदात गेली होती. 

पुढचे हार्मोन आहे ते म्हणजे एडॉर्फिन. एडॉर्फिन निर्माण करायचे असेल तर त्याकरता व्यायाम, शरीरश्रम करणे आवश्यक आहे. तसेच आपण जेव्हा खळखळून हसतो तेव्हा भरपूर एडॉर्फिन मिळते. विविध मनोरंजनात्मक खेळ खेळताना या दोन्ही बाबींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांचा व्यायाम आणि शरीर श्रम होत असतात त्याचबरोबर विद्यार्थी मनसोक्तपणे हसत आणि खेळत असतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी शिस्तीचा अति बाऊ न करता विद्यार्थ्यांना अधिकाधिक खेळायला कसे मिळेल आणि वर्गामध्ये खेळीमेळीचे वातावरण कसे असेल याचा विचार करावा. छोट्या-छोट्या रिले, मनोरंजनात्मक खेळ, मॉडिफाइड खेळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद  (एडॉर्फिन) मिळू शकते.

व्यायाम, शारीरिक शिक्षण आणि खेळ याकडे केवळ वजन कमी किंवा जास्त, स्पर्धा अथवा मेडल यादृष्टीने न बघता आनंदाचा मुख्य स्रोत म्हणूनही बघू या!

संदर्भ

माणूस घडविणारे शिक्षण. मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा. पा. क्र.११३-११७




Tuesday, August 17, 2021

बुद्धिमत्तेवर मार्काची सत्ता !


बुद्धिमत्ता हा शब्द उच्चारला की,,  सर्वसामान्यपणे डोळ्यासमोर शाळेचे प्रगतिपुस्तक येते. नव्हे ते एक समीकरणच झाले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये असणारे प्रश्न हे तार्किकतेवर व गणितीय प्रक्रियावर आधारलेले असतात. त्यामुळे वेगळ्या क्षमता आणि बुद्धिमत्तेला त्यात वाव नसतो. परंतु अलीकडच्या संशोधनांतून विशेषतः मेंदूविषयीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,  बुद्धिमत्ता नावाची एकच क्षमता नसून अनेक बुद्धिमत्तांची  वेगवेगळे केंद्रे मेंदूच्या डाव्या व उजव्या भागात असतात. हार्वर्ड गार्डनर यांच्या "फ्रेम्स ऑफ माईंड" या ग्रंथात अशा आठ प्रकारच्या बुद्धिमत्तांचा उल्लेख केला आहे. त्या पुढीप्रमाणे 


  1. भाषिक / वाचिक बुद्धिमत्ता - भाषिक व्यवहारांची निर्मिती , भाषे / भाषांवरील प्रभुत्व , भाषेचा लवचिक वापर , काव्य , कथाकथन , कथा - कादंबरी  लेखन , चर्चा , संवाद इत्यादींमध्ये भाषेची बुद्धिमत्ता अभिव्यक्त होते . ज्या लोकांना ही बुद्धिमत्ता तीव्रतेने प्राप्त झालेली असते असे लोक साहित्यिक , वक्ते , विनोदकर किंवा अगदी उत्तम वाचकही असतात . आचार्य अत्रे , पु.ल. देशपांडे अनेक साहित्य क्षेत्रातील दिगजांची नावे आपल्याला उदाहरणादाखल घेता येतील .

  2. तार्किक / गणिती बुद्धिमत्ता - तार्किक विचार करता येणे , शास्त्रांच्या किंवा गणिताच्या क्षेत्रात अवगाहन करणे , अमूर्त गोष्टींत रमणे अशा गोष्टींतून ही बुद्धिमत्ता प्रकट होत असते . ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेल्या व्यक्ती , प्रामुख्याने , घटनांचे विश्लेषण करणे , गणित - शास्त्रे यांतील प्रश्नांची उकल करणे , अशा बाबीमध्ये चांगले तयार असतात . आईनस्टाईन , रसेल , रामन अशी अनेक उदाहरणे सांगता येतील . 

  3. सांगितिक बुद्धिमत्ता - गुणगुणणे , ताल , लय यांचे आकलन होणे , त्यांचा वापर करता येणे , आवाजाबाबत संवेदनशील असणे , गाण्यांची धून आठवणे , म्हणता येणे इ . यांमधून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होते . गायक , संगीतकार , वादक , काव्यगायक अशा लोकांचा या प्रकारात समावेश होतो . कुमारगंधर्व , लता मंगेशकर , रवी शंकर अशी अनेक नावे आपण या प्रकारात सागू शकू .

  4. अवकाशीय दृष्टीगोचर / बुद्धिमत्ता (Visual-Spatial Intelligence) - पाहिलेल्या रचना , आकार याचे मनात चित्र तायर करता येणे , भौगोलिक नकाशे करता येणे , समजणे , अंतराचा अंदाज घेता येणे अशा अनेक कृतींतून या बुद्धिमत्तेची अभिव्यक्ती होत असते . चित्रकार , वास्तुरचनाकार , शिल्पकार , अभियंते , शल्यविशारद अशांसारख्यांना प्रामुख्याने अशी विशेष दृष्टी असते . कोलंबसाला ही बुद्धिमत्ता होती असे म्हणता येईल . 

  5. शारीरिक स्नायुविषयक बुद्धिमत्ता - आपल्या संपूर्ण शरीराचा किंवा एखादी विशिष्ट अवयवांचा वापर करून भावना व्यक्त करता येणे किंवा उत्तम खेळता येणे , उत्तम शारीरिक नियंत्रण , अवयवांचे परस्पर संघटन किंवा हाताने करून पाहून गोष्ट शिकता येणे अशा प्रकारांतून ही बुद्धिमत्ता व्यक्त होते . नर्तक , खेळाडू , पोहणारे किंवा शल्यविशारद यांना अशातर्‍हेची  बुद्धिमत्ता असते .

  6. व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता (Interpersonal Intelligence) - स्वतःच्या मनात डोकावता येणे , स्वतःच्या भावना ओळखता येणे , त्यांवर नियंत्रण ठेवता येणे किंवा अध्यात्मिक अनुभव घेता येणे या प्रकारच्या बुद्धिमत्तेला व्यक्ती - अंतर्गत बुद्धिमत्ता असे म्हणतात . संयमित , ध्यानधारणा करणारे , भावनांचे उद्दिपन होऊ न देणारे असे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . स्थितप्रज्ञ , संत , अध्यात्मिक गुरू यांचा यात समावेश करता येतो 

  7. आंतर - व्यक्ती बुद्धिमत्ता (Intrapersonal Intelligence) - दुसऱ्यांशी संवाद साधता येणे , मिळून मिसळून वागता येणे , दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणे , दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणे अशा क्षमता असणारे लोक ही बुद्धिमत्ता प्राप्त झालेले असतात . नेते , शिक्षक , विक्रीकरणारे किंवा लोकांच्यात रमणारे , एकत्रित काम करायला आवडणारे असे हे लोक असतात . दुसऱ्यांच्या भावनांची जपणूक करणे , किंवा दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे हे यांना चांगले जमते . महात्मा गांधी , हिटलर किंवा कृष्णमूर्ती , रजनीश अशा मोठ्या लोकांचा समावेश आपण या गटात करू शकतो . अलीकडे आणखी एका बुद्धिमत्तेचा , गार्डनर यांनी , आपल्या यादीत समावेश केला आहे . ती म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्ता . 

  8. सृष्टपदार्थविषयक बुद्धिमत्ता - निसर्गातील पशु - पक्षी - प्राणी , झाडे , खडक , नद्या - डोंगर अशा गोष्टींविषयी ओढ असणे , त्यांचे - त्यांच्या स्वरूपाचे आकलन असणे , त्यांविषयी जवळिक वाटणे , किंवा निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हे या बुद्धिमत्तेच्या माणसांचे विशेष आहेत . या लोकांना , रानावनांतून हिंडण्याच्या शिकारीची , डोंगर चढण्याची किंवा वनस्पतींचा , प्राण्यांचा अभ्यास करण्याची आवड असते . डार्विनचे ठळक नाव यासंदर्भात आपल्यासमोर येईल . 

अशा प्रकारे बुद्धिमत्ता एक नसून अनेक आहे आणि प्रत्येक मनुष्याला यापैकी काही बुद्धिमत्ता उपजत प्राप्त  झालेल्या असतात. असा एकही मनुष्य नसतो की ज्याला एकही बुद्धिमत्ता नाही किंवा असा आहे कोणी नसतो की त्याला सर्वच बुद्धिमत्ता तीव्रतेने प्राप्त झालेल्या आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्ती ही इतरांपासून भिन्न असते. शाळेच्या संदर्भात हा सिद्धांत लागू केला तर असे लक्षात येईल की शाळेत आजवर केले जाणारी 'हुशार' आणि 'ढ'  विभागणी चुकीचे आहे. शाळेतील एखादा विद्यार्थी एखाद्या गोष्टीत 'हुशार' असेल तर तोच दुसऱ्या कुठल्यातरी बाबतीत 'ढ' असेल. त्यामुळे शाळेत प्रत्येकजण कशात तरी 'हुशार' आणि कशात तरी 'ढ'  असतो.विद्यार्थ्यांमधील विविध बुद्धिमत्तांचा शोध घेणारी त्या  बुद्धिमत्तांच्या  विकासाला वाव देणारी आणि त्या बुद्धिमत्तांच्या दिशेने कौशल्य पुरविणारी अशी नवी शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे.

काही वर्षापूर्वी 'शिक्षणाच्या आईचा घो' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात मुलाला क्रिकेटची प्रचंड आवड असते आणि कौशल्यही असते तर वडिलांना मात्र आपल्या मुलाने शाळेमध्ये चांगले गुण मिळवावे अशी प्रखर इच्छा असते. मुलगा व वडीलांमधला संघर्ष या सिनेमामध्ये दाखविलेला आहे. अनेक विद्यार्थी अशा प्रकारच्या संघर्षांना तोंड देत आहेत.शिक्षणाच्या दबावामुळे आणि पालकांच्या महत्वकांक्षामुळे आज अनेक विद्यार्थी त्यांच्यातील बुद्धिमत्ता काय आहे हे माहीत असूनही ते त्यांचे आवडीचे क्षेत्र अथवा क्रीडाक्षेत्र सोडून देतात   अशाच संघर्षाला बळी पडलेल्या काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता एका विद्यार्थिनीने सांगितले की तिला परीक्षेत खूप कमी मार्क मिळायचे त्यामुळे घरचे सारखेच टोमणे मारायचे, इतर विद्यार्थ्यांशी तुलना करायचे त्याला कंटाळून शेवटी तिने खेळ सोडून दिला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, तो खेळामध्ये खूप चांगली प्रगती करत होता, वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदकही मिळविल होते परंतु घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्याने शेवटी क्रीडा क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. अशा अनेक खेळाडूंना किंवा वेगळी बुद्धिमत्ता असणार्‍या बालकांना पाठिंब्याची नितांत गरज आहे. शिक्षक आणि पालकांनी बालकातील बुद्धिमत्ता ओळखून ती वृद्धिंगत करण्यासाठी संधी पुरविण्याची आणि संपूर्ण पाठिंबा देण्याची गरज आहे.

संदर्भ: 

प्रा. रमेश पानसे. आजचे शिक्षण: उद्याचे जीवन 


शरद आहेर 


 

Sunday, July 11, 2021

संघर्षातून उत्कर्ष !!!


 

झरे (ता. करमाळा, जि.सोलापूर) या  अत्यंत खेडेगावातील व आई वडील शेतमजुरी करून पोट भरतात अशा परिस्थितीत एक व्यक्ती मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण  संचालक पदापर्यंत पोहोचते. ही संघर्षमय कथा आहे डॉ.मोहन आमृळे यांची. शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाच्या माहेर घरी म्हणजे पुण्यात येतात. बी.पी. एड ला प्रवेश घेतात. परंतु फी भरण्यासाठी पैसे नसतात. त्यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या फीचे पैसे देतात. त्यानंतर एम.पी.एड साठीही प्रवेश घेतात. वेगवेगळी कामं करून काही फी ते भरतात तर काही मित्र फी साठी मदत करतात. कधी मेसचे पैसे माफ केले जातात, कधी मित्र भरतात, हॉस्टेलची फी भरण्यासाठीही पैसे नसतात तेव्हा मित्रांच्या रूमवर राहतात. अशा अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत आमृळे सरांनी आपले बी.पी.एड व एम. पी. एड पूर्ण केले. त्यानंतर एका शाळेमध्ये काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांना महाविद्यालयामध्ये नोकरी मिळते. 2003 मध्ये पुण्यातील सर्वात मोठे फर्ग्युसन महाविद्यालयात कोणाचाही पाठिंबा आणि वरदहस्त नसतांनाही शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पदी निवड होते. अशा प्रकारे त्यांच्या संघर्षाचा प्रवास काही प्रमाणत कमी होऊन उत्कर्षाच्या प्रवासाला सुरुवात होते. या संपूर्ण प्रवासात त्यांना प्रा. सुनीता कुलकर्णी, प्रा. पुरुषोत्तम  पटेल, नेस वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत तुलकर, कै. अशोकराव मोरे  व विद्यार्थी सहाय्यक समिती या सर्वांनी आर्थिक व सर्वप्रकारची मदत या संघर्षमय काळात केली. त्यानंतरही स्वस्थ बसत ते आमृळे सर कसले? थोड्याच दिवसात सरांनी विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदासाठी सरांची नियुक्ती झाली. थोड्याच कालावधीत सरांनी धडाकेबाज निर्णय घेतले जे क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड (Milestone) ठरत आहे. 

डॉ.मोहन आमृळे यांनी मुंबई विद्यापीठाच्याा संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण  कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेले बदल पुढील प्रमाणे

१. खेळाडूंना स्पर्धाकाळात मिळणारा दैनिक भत्ता (DA) २५० होता त्याच्यात वाढ करून थोड्याच दिवसात ४५० केला आणि नुकताच तो 1000 रुपये केला.  खेळाडूंना इतका दैनिक आत्ता देणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.




2. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे बजेट १ कोटीवरुन  वरून ४ कोटी   करण्यात आले. 



३. खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान प्रवास सुद्धा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

४. मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचे अनुदान २५ लाखावरून १ कोटी ३० लाख करण्यात आली. 

५. आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला मिळणारे अनुदान १ लाखावरून ६ लाख रुपये करण्यात आले.


६. स्पर्धांमधील गैरप्रकार कमी करण्यासाठी ज्या संघांनी आणि खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असेल अशाच संघांना आणि खेळाडूंना खेळण्यास पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सरांवर विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमृळे  सर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे इतर खेळाडूंवर होणारा अन्याय कमी झाला. 

७. आमृळे सरांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या वर्षी विविध स्पर्धांच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर खेळाडूंची निवड, स्पर्धा आयोजन यासंबंधी वाद-विवाद झालेले निरीक्षणास आले. त्यामुळे पुढील वर्षी सरांनी एक समिती स्थापन करून मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांची एक घटना किंवा धोरण निश्चित करण्यात आले. ज्यामध्ये स्पर्धा आयोजन, स्पर्धांच्या रचना, स्पर्धा पद्धती, खेळाडू निवड पद्धती अशा विविध घटकांबद्दल निश्चित असे धोरण ठरविले. त्यामुळे असे वाद-विवाद टळतील अशी सरांना आशा आहे. विद्यापीठाची ही घटना किंवा धोरण हे इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. एकूणच मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये पारदर्शकता आणून यंत्रणा सुधारण्यावर सर भर देत आहेत जेणेकरून तरुण आणि तरुणी खेळाच्या मैदानाकडे आकर्षिले जातील. या सगळ्याचा परिणाम खूप चांगला दिसत आहे. 

भविष्यामध्ये क्रीडा विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटलायझेशन करण्याचा सरांचा मानस आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाखापासून १ कोटी पर्यंत शिष्यवृत्ती देण्याची सरांची योजना आहे. थोड्याच दिवसांमध्ये ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडिया मध्ये ऑलम्पिक पदकांबद्दल चर्चा आणि विश्लेषण सुरू होतील. परंतु पदक विजेते निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तिंचीही तितकीच आवश्यकता आहे.

मोहन आमृळे सरांच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता मला महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होता, आणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल. याच पद्धतीने टोकाचा प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि प्रखर इच्छाशक्ती  डॉ.मोहन आमृळे  सरांचे स्वभाववैशिष्ट्ये आहे. अशाच प्रामाणिक आणि तळमळ असणार्‍या शिक्षकांची आज  केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे.

Wednesday, June 30, 2021

शारीरिक शिक्षणातील प्रयोग -क्रीडा शिक्षण अभ्यासक्रम मॉडेल

 

शालेय शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या बोर्ड्सचा वेगळा आहे. विषयाचे नाव आरोग्य व शारीरिक शिक्षण असे आहे परंतु प्रत्यक्षात शाळेमध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाप्रमाणे चालते की क्रीडेवर अधिक भर दिला जातो याबाबत शारीरिक शिक्षण शिक्षक आणि  शारीरिक शिक्षणातील तज्ञ यांच्यामध्ये  मतमतांतरे आहे. बोर्डाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम राबवावा की स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल करून अभ्यासक्रम राबवावा याबद्दलही शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये द्विधा मनस्थिती  आढळते. काही शाळांमध्ये मात्र त्यांच्या शाळेपुरता शारीरिक शिक्षणाचा वेगळा अभ्यासक्रम तयार करून तो राबविला जात आहे. शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे  वेगवेगळे मॉडेल्स आहेत व हे  मॉडेल्स वेगवेगळ्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत.  शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे मॉडेल्स कोणते ते जाणून घेऊ या  

  1. बहूपक्रम मॉडेल: हे मॉडेल विशेषत: माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम तयार करताना उपयुक्त आहे.या मॉडेलचा प्राथमिक हेतू विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शारीरिक उपक्रम व  खेळांची ओळख करून देणे हे होय. 

  2. सुदृढता शिक्षण मॉडेल: सुदृढता शिक्षण मॉडेलचा उद्देश शारीरिक स्वास्थ्य सुधारणे आणि आयुष्यभर टिकविणे हे आहे. 

  3. अजीवन  शारीरिक उपक्रम मॉडेल: विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचा शारीरिक उपक्रम निवडून त्यामध्ये अजीवन सहभागी होण्यासाठी व सक्रिय राहण्यासाठी मदत करणे हे या मॉडेलचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

  4. हालचाल शिक्षण मॉडेल: नृत्य, खेळ आणि जिम्नॅस्टिक्ससारख्या क्षेत्रातील विविध हालचालींच्या कौशल्यांचा शोध घेण्यावर जोर देणे हे या क्षणाचे शैक्षणिक मॉडेलचे मूळ उद्दीष्ट आहेत.

  5. क्रीडा शिक्षण मॉडेल: सायडनटॉप यांनी  विद्यार्थ्यांना क्रीडा साक्षर बनविण्याच्या उद्देशाने क्रीडा शिक्षण मॉडेलची रचना केली.विद्यार्थ्यांना विविध खेळ व शारिरीक क्रिया शिकवून प्रामाणिकपणाची मनोवृत्ती निर्माण करणे आणि केवळ चांगले खेळाडूच नव्हे तर क्रीडाप्रेमी  व्यक्तींचा विकास करणे हे या मॉडेलचे मुख्य उद्दीष्ट आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची विविध मॉडेल्स आहेत. परंतु बहु-उपक्रम  मॉडेल अधिक वापरले जात होते.परंतु गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाचे मॉडेल अधिकाधिक वापरले जात  आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एक अहवालनुसार "क्रीडा आणि क्रियाशील मनोरंजन (Active Recreation) हे सर्व वयोगटाच्या आणि क्षमतांच्या व्यक्तीच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या वाढीसाठी मदत करतात." हे मॉडेल कोणत्या शाळेत राबविले जाते? कसे राबविले जाते याबाबतीत उत्सुकता होती. त्यासाठी काही शिक्षक मित्रांकडून माहिती घेऊन ज्या शाळांमध्ये हे मॉडेल राबवले जात आहे त्या शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली असता महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी समोर आल्या त्या पुढील प्रमाणे 


  • इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षण मॉडेल लागू केले जाते

  • इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख करून दिली जाते.

  • पुढच्या वर्गात म्हणजे तिसर्‍या इयत्तेपासून एका खेळामध्ये स्पेशलायझेशन दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, द्वंदात्मक खेळ इत्यादी विविध पर्याय दिले जातात.

  • क्रीडा शिक्षण मॉडेल शाळेच्या आधी किंवा नंतर लागू केले जाते, शाळेच्या नियमित वेळेदरम्यान नाही.

  • क्रीडा शिक्षण मॉडेल दररोज सोमवार ते शनिवार या कालावधीत राबविला जातो आणि एका सत्राचा कालावधी 90 मिनिटांचा असतो.

  • प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमला जातो

  • प्रत्येक खेळाचे वार्षिक नियोजन आणि सत्र नियोजन असते

  • विद्यार्थी दरवर्षी एक वेगळा खेळ निवडू शकतो किंवा प्रत्येक वर्षी समान खेळ निवडू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यास आवडीचे स्वातंत्र्य दिले जाते.

  • विद्यार्थ्यां खेळामध्ये चांगला सहभाग घेतात कारण, त्यांना त्यांचा आवडता खेळ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.

  • अधिककरून  विद्यार्थी फुटबॉल आणि बास्केटबॉलची निवड करतात.

  • उच्च कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत काही सवलती दिल्या जातात उदाहरणार्थ प्रशिक्षणासाठी अधिक वेळ दिला जातो, आवश्यक असल्यास आर्थिक मदत दिली जाते, शाळेत उपस्थितीत सवलत दिली जाते.

  • क्रीडा शिक्षण मॉडेलच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसे साहित्य  उपलब्ध करुन दिली जातात. विद्यार्थी - साहित्य प्रमाण साधारणत: 1/5: 1 असते जे खूप चांगले आहे.

  • क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ किंवा उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. 

  • या शाळांमधील क्रीडा शिक्षण मॉडेल व्यतिरिक्त शालेय वेळापत्रकात देखील शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. ज्यामध्ये योग, फिटनेस, तायक्वांदो इ. उपक्रम घेतले जातात 

  • विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकण्याचे आणि निवडण्याचे स्वातंत्र्य मिळण्याचा पर्याय आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र कोच हे क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य आहे. 


युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शारीरिक शिक्षण आणि खेळांसाठी आठवड्यातून किमान 120 मिनिटे असावीत. परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणार्‍या शाळेमध्ये आठवड्यातून 450 मिनिटे शारीरिक शिक्षण आणि खेळासाठी दिले जातात. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत आणि क्रीडा शिक्षण मॉडेलची अंमलबजावणी करणार्‍या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी  90 मिनिटे हालचाली करतात हे अतिशय सकारात्मक आहे. शारीरिक शिक्षण या विषयाची प्रत्यक्ष शाळेतील परिस्थिती पाहिल्यानंतर अथवा ऐकल्यानंतर मनामध्ये निराशाजनक भावना येतात परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर  निश्चितच प्रेरणादायी आणि सकारात्मक भावना माझ्या मनात निर्माण झाल्या होत्या. तोच अनुभव शारीरिक शिक्षण क्षेत्रातील सर्वांना यावा हाच हा ब्लॉग लिहिण्याचा उद्देश आहे.  क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शाळांचाही काही मर्यादा असतीलही तरीसुद्धा वरील बाबींचा विचार करता क्रीडा शिक्षण मॉडेल हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच यशस्वी मॉडेल आहे असे म्हणता येईल. असे प्रयोग इतर शाळेतही सुरू होतील अशी आशा.  


 शरद आहेर 

चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे 

शिक्षकाची भूमिका बदलत आहे!!!

  मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती ए...