Saturday, September 5, 2026

शिक्षकाची भूमिका बदलत आहे!!!

 मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती एक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाने पुसली जाऊ शकते का? माझ्या बाबतीत म्हणाल तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. १९९७ शारीरिक शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर मला आहे वाटायचे की, शिक्षक होणे म्हणजे "विद्यार्थ्यांना शिकविणे". त्यातच मला बी पी एड महाविद्यालयात नोकरी लागली त्यामुळे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यासाठी खूप कष्ट करायचो आणि वर्गात जाऊन तयार केलेले प्रेझेंटेशन घशाला कोरड पडेपर्यंत बोलायचे आणि विद्यार्थ्यांना काहीही माहीत नव्हते ते मी!!! त्यांना शिकविले या तोऱ्यात बाहेर यायचे. एक वेगळाच अहंकार असायचा त्या शिकविण्याचा. वर्गात कुणी बोलायचे नाही, चर्चा नाही, लिहून घ्या म्हटले की विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे आणि ऐका म्हटले की ऐकायचे. मागे वळून बघिल्यानंतर मी असे का करत असेन यावर विचार केल्यानंतर असे वाटते की, माझ्या मनात गेल्या अनेक वर्षात शिक्षकाची जी प्रतिमा तयार झालेली होती तिचा तर परिणाम नाही हा? माझ्या बाबतीत याचे उत्तर हो आहे. शिक्षक प्रशिक्षण घेत असताना अध्यापनाच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला होता परंतू तो परीक्षे पुरताच होता, शिक्षक हा Facilitator असतो हे सुद्धा अभ्यासले होते पण त्याचे उपयोजन प्रत्यक्ष व्यवहारात करू शकत नव्हतो कारण शिक्षक कसा असतो याचे गेले कित्येक वर्ष जे निरीक्षण केले होते, जे अनुभवले होते त्याचे पारडे ही एक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त होते. 

एकदा असेच शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आणि लीला पाटील यांची पुस्तक वाचताना माझ्या शिक्षक म्हणून असणाऱ्या प्रतिमांना, विचारांना एकामागून एक धक्के बसत होते त्यातच लीला पाटील यांच्या एका पुस्तकात International Education Council यांचे एक वाक्य वाचनात आले ते पुढीलप्रमाणे 

The teachers duty is to less and less inculcate knowledge and more and more to encourage thinking. He will have to become more and more advisor partner to talk to, someone to helps to seek out conflicting argument rather than handing out readymade truths. He will have to devote more time and energy for creative activities, interaction, discussion, stimulation, understanding, encouragement. (शिक्षकाचे कर्तव्य अधिकाधिक ज्ञान देण्याचे न राहता विचारप्रवृत्तीला चालना देण्याचे असले पाहिजे. त्याने सल्लागार व संवाद करणारा भागीदार बनले पाहिजे — जो विद्यार्थ्यांना ठराविक सत्ये देण्याऐवजी विरोधाभासी मतांची उत्तरे शोधण्यात मदत करतो. त्याने अधिक वेळ आणि ऊर्जा सृजनशील उपक्रम, परस्परसंवाद, चर्चा, प्रेरणा, समज आणि प्रोत्साहन यासाठी दिली पाहिजे)

आजच्या बदलत्या शैक्षणिक प्रक्रियेत शिक्षकाची पारंपरिक भूमिका बदलत चालली आहे. पूर्वी शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात माहिती भरणारा असा समज होता. मात्र वरील वाक्याचा गाभा असा सांगतो की, आता शिक्षकांचे काम केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित नसावे, तर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची सवय आणि क्षमता विकसित केली पाहिजे.


शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत एक सल्लागार किंवा सहप्रवासी होण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. त्याने विद्यार्थ्यांना तयार उत्तरं देण्याऐवजी वेगवेगळे विचार, परस्परविरोधी मते, प्रश्न यांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि सृजनशीलता (Creativity) विकसित होते.

शिक्षकाला अधिकाधिक वेळ संवाद, सर्जनशील उपक्रम, चर्चासत्रं, प्रोत्साहन यासाठी द्यावा लागेल. शिक्षकाची भूमिका आता ज्ञानाचा एकमेव स्त्रोत न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक व्हावे लागेल. 

जे कृष्णमूर्ती म्हणतात की, आजचे शिक्षण "हाऊ टू थिंक हे शिकवत नाही तर व्हॉट टू थिंक" हे शिकविते.

हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, विचारांचे काहूर माजले, परत परत ते वाक्य वाचत होतो आणि आपण काही चुकीचं तर वाचत नाही ना याची खात्री करून घेत होतो कारण गेली अनेक वर्ष माझ्या शिक्षक म्हणून सर्व कृती याच्या विरुद्धच होत्या. 

म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी शिक्षक म्हणून जी भूमिका पार पाडत होतो तिचे आकलन मला झालेलेच नव्हते!!! यासंबंधी भारतातील शिक्षण तज्ञ अरविंदो यांचेही एक वाक्य वाचनात आले ते असे “THE FIRST principle of  true teaching is that nothing can be taught. The teacher is not an instructor or taskmaster,  he is a helper and a guide.  His business is to suggest and not to impose. He does not actually train the pupil’s mind, he only shows him how to perfect his instruments of knowledge and helps and encourages him in the process.(खऱ्या अध्यापनाचा पहिला सिद्धांत असा आहे की काहीही शिकवता येत नाही. शिक्षक हा आदेश देणारा किंवा काम करवून घेणारा नसून, तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. त्याचे काम शिकवण्यावर बळ देणे नसून, केवळ सूचना देणे असते. तो विद्यार्थ्याच्या मनाला प्रत्यक्ष प्रशिक्षित करत नाही, तर केवळ ज्ञानाची साधने विकसित कशी करायची हे दाखवतो आणि त्या प्रक्रियेत त्याला मदत व प्रोत्साहन देतो)

हे दोन्ही वाक्य शिक्षकाची भूमिका नेमकी काय असावी याचे स्पष्टीकरण करणारी आहे. 

मला आठवते की, दंगल हा सिनेमा करायच्या अगोदर अमीर खान याने मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल केले होते, कुस्तीचे खरे प्रशिक्षण घेतले, विविध तंत्रे शिकली, कुस्तीपटूंप्रमाणे चालणे, बोलणे, चाल-ढाल आत्मसात केली, त्याने खऱ्या महावीर सिंग फोगाट यांची भेट घेतली, त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला, त्यांच्या मुलींसोबत संवाद साधला,हरियाणवी बोलीभाषा शिकण्यासाठी खास प्रशिक्षक घेतले. अमीर खान प्रमाणेच अनेक हीरो,हिरोईन भूमिका प्रभावी करता यावी यासाठी त्यावर बरेच संशोधन करतात, वाचन करतात. वरील संदर्भ शिक्षकाच्या बाबतीत योग्य होईल की नाही माहीत नाही परंतु भूमिकेची स्पष्टता येण्यासाठी एकीकडे इतके प्रयत्न केले जातात आणि शिक्षक म्हणून माझे नेमके काम काय? विविध तज्ञांची यासंबंधी काय विचार आहे? शिक्षणात भरीव आणि रचनात्मक कार्य केलेले शिक्षक कोणते? त्यांनी की काम केले? काय काम केले? जगभरातील 

२१ व्या शतकातील शिक्षक हा "Stage on the Stage" (मंचावर उभा राहून भाषण देणारा) नसून "Guide on the Side" (विद्यार्थ्यांच्या शेजारी राहून त्यांना दिशा दाखवणारा) असावा. 

शिक्षक शिक्षण देतो आणि विद्यार्थी ते घेतो अशाप्रकारचा भेद आता राहिलेला नाही कारण, शिक्षण ही कुणी कुणाला द्यायची वस्तू नाही ती आपली आपण आत्मसात करायची गोष्ट आहे. फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं ही समजूत, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही हा विचार, विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत हा दंडक, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा. शिक्षणातील ही सारी गृहीतकं बदलत आहेत. 

शिक्षण आणि शिक्षक याविषयीच्या सखोल आकलनासाठी विनोबा भावेंचे शिक्षण तत्व आणि विचार हे पुस्तक शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी लिहिलेले नयी तालीम, तसेच ज्यांनी कोल्हापूर येथे सृजन आनंद ही प्रायोगिक शाळा सुरू केली अशा लीला पाटील यांनी लिहिलेली शिक्षण घेता-देता, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेले बखर शिक्षणाची,शिक्षकांसाठी साने गुरूजी, कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कुल, दापोली येथे अनेक वर्षापासून प्रायोगिक शाळा चालविणाऱ्या शिक्षण तज्ञ रेणू दांडेकर यांची लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन केल्यामुळे शिक्षण आणि शिक्षक यासंबंधीच्या आपल्या धारना बदलत जातात हे दररोज अनुभवत आहे. 





Thursday, July 30, 2026

भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?

 भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे? 

जगाच्या इतिहासात चीनची महान भिंत ही मानवी बुद्धिमत्तेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते. हजारो किलोमीटर लांबीची ही भिंत एका उद्देशाने उभारली गेलीआक्रमण रोखण्यासाठी. चीनने उत्तरेकडून होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हजारो किलोमीटर लांबीची महान भिंत बांधली. भिंत अतिशय मजबूत होती आणि तिच्यावर पहारा देण्यासाठी सैनिक तैनात होते. पण काही वेळा आक्रमकांनी भिंत फोडली नाही; त्यांनी सीमेवरील सैनिकांना लाच दिली किंवा त्यांची साथ मिळवली, त्यामुळे प्रवेशद्वार उघडले गेले. परिणामी शत्रू सैन्य भिंतीतून सहज आत आले आणि चीनवर आक्रमण करण्यात यशस्वी झाले. "भिंत कमकुवत नव्हती; तिचे रक्षण करणाऱ्या माणसांची निष्ठा कमकुवत पडली."
चीनच्या भिंतीचा हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे अलीकडेच देशात परीक्षा व्यवस्थेबाबत सुरू झालेली चर्चाअलीकडे परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलातील सदस्य व्ही. कामकोटी यांनी एक महत्त्वाचे विधान केले  

आपल्याला विश्वास ठेवता येईल असे शिक्षक हवेत. प्रश्नपत्रिका तयार करून तिची संपूर्ण गोपनीयता राखणारे आणि ती फोडता प्रामाणिकपणे जबाबदारी पार पडणारे लोक हवे आहेत. आपल्यासमोरील हे एकमेव सर्वात मोठे आव्हान आहे.”

प्रत्येक समस्येनंतर आपण काय करतो?
नवीन समिती 
नवा कायदा.
नवे नियम.
अधिक CCTV.
अधिक पासवर्ड.
अधिक एन्क्रिप्शन.
अधिक सुरक्षा.
पण कधी आपण स्वतःला विचारतो का—
या सगळ्याची जबाबदारी सांभाळणारा माणूस किती प्रामाणिक आहे?
आज कृत्रिम बुद्धिमत्ता आली आहे.
ब्लॉकचेन आले आहे.
चेहरा ओळखणारी यंत्रणा आली आहे.
डिजिटल सुरक्षा दिवसेंदिवस मजबूत होत आहे.
पण अजून अशी कोणतीही प्रणाली निर्माण झालेली नाही जी माणसाच्या चारित्र्याची हमी देऊ शकेल.
कारण...
प्रामाणिकतेसाठी अजून कोणताही अल्गोरिदम तयार झालेला नाही.
व्ही. कामकोटी यांनी म्हटले आहे की, 
"आपल्याला विश्वास ठेवता येतील असे शिक्षक हवेत."
मी मनात म्हणालो...
हो.
पण फक्त शिक्षकच नाही तर 
आपल्याला विश्वास ठेवता येतील असे—
डॉक्टर हवेत.
न्यायाधीश हवेत.
पत्रकार हवेत.
प्रशासकीय अधिकारी हवेत.
उद्योगपती हवेत.
राजकारणी हवेत.
आणि सर्वांत महत्त्वाचे...
विश्वास ठेवता येतील असे नागरिक हवेत.
कारण समाज एका व्यवसायावर उभा नसतो.
तो परस्पर विश्वासावर उभा असतो. खरे पाहिले तर या प्रत्येक व्यवसायाचे भांडवल पैसा नसतो.विश्वास असतो. एकदा तो संपला की संस्था उरते; प्रतिष्ठा संपते. म्हणूनच प्रत्येक युगात प्रश्न तंत्रज्ञानाचा नसतो; तो मूल्यांचा असतो.

शिवाजी महाराजांनी भिंती नव्हे, माणसे जिंकली

भारतीय इतिहासात याच्या अगदी विरुद्ध उदाहरण दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते केवळ किल्ले जिंकून नाही.
त्यांनी माणसे जिंकली.
मावळ्यांच्या मनात स्वराज्याविषयी अशी निष्ठा निर्माण केली की प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जीवाची पर्वा केली नाही.
किल्ल्यांची ताकद त्यांच्या दगडी तटांमध्ये नव्हती.
ती त्या तटांवर उभ्या असलेल्या माणसांच्या विश्वासात होती.
म्हणूनच स्वराज्याचा पाया दगडांवर नव्हता.
तो विश्वासू माणसांच्या खांद्यावर उभा होता.

मग उपाय काय?
कठोर कायदे हवेत.
आधुनिक तंत्रज्ञानही हवे.
सुरक्षा व्यवस्थाही हव्यात.
पण त्याचबरोबर एक गोष्ट पुन्हा समाजाच्या केंद्रस्थानी आणावी लागेल.
चारित्र्य.
शेवटी...
चीनने भिंती बांधल्या.
आपण कुलपे बांधतो.
संगणकांना पासवर्ड देतो.
डेटा एन्क्रिप्ट करतो.
कायदे अधिक कठोर करतो.
पण एक प्रश्न अजूनही उरतो...
आपण अधिक सुरक्षित व्यवस्था निर्माण करत आहोत... की अधिक विश्वासू माणसे?
तुमच्या मते समाजाला आज सर्वाधिक गरज कशाची आहे?
  • अधिक कठोर कायदे?
  • अधिक आधुनिक तंत्रज्ञान?
  • अधिक कठोर शिक्षा?
  • की अधिक प्रामाणिक माणसे?
तुमचे विचार खाली कमेंटमध्ये जरूर लिहा.


प्रा. शरद आहेर

प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळ चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

Thursday, January 30, 2025

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'





भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारतातील शारीरिक शिक्षणाच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. हा अहवाल भारताच्या ग्रामीण भागातील 29 राज्य, 605 जिल्हे आणि 15728 शासकीय शाळांमधून मिळविलेल्या माहितीच्या आधारावर तयार केला आहे. या   अहवालात शालेय स्तरावर  शारीरिक शिक्षणाच्या खालील पाच महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. ते घटक खालीलप्रमाणे


  1. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • २०२४ मध्ये भारतातील ८५ % शाळांमध्ये प्रत्येक वर्गासाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी वेळ दिला जातो. 
  • २०२२ मध्ये हा आकडा ७६.८% होता, याचा अर्थ गेल्या काही वर्षांत शारीरिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे.
     2. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • २०२४ मध्ये भारतातील केवळ १६.५ % शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत. म्हणजेच भारतातील 83.5% शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र शिक्षकच नाही अशाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होणार?
  • केवळ प्राथमिक स्तराचा विचार केल्यास हे प्रमाण 4.8% इतके आहे तर माध्यमिक स्तरावर 30.2% शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक आहे.


    3. इतर विषयाच्या किती शिक्षकांकडे शारीरिक शिक्षण या विषयाची जबाबदारी दिलेली आहे याचे                  निष्कर्ष खालील प्रमाणे. 

  • भारतातील 59.6% शाळांमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाची जबाबदारी इतर विषय शिक्षकाकडे दिलेली आहे. हेच प्रमाण प्राथमिक स्तरावर 66.4% इतके आहे तर माध्यमिक स्तरावर 51.7% इतके आहे. इतर विषय शिक्षक काय बरं शारीरिक शिक्षण घेत असतील? असा प्रश्न पडतो की, हे केवळ कागदी सोपस्कार आहे?
    4. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे याचे निष्कर्ष खालील प्रमाणे. 

  • भारतातील 69% शाळांमध्ये क्रीडांगण उपलब्ध आहे. 

    5. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे  याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • भारतातील 82.4% शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे. 2018 मध्ये हेच प्रमाण 62.5 इतके होते. या अनुषंगाने क्रीडा साहित्याच्या बाबतीत निश्चित प्रगती झालेली आढळते. 

या संपूर्ण रिपोर्टवर विश्लेषण केले असता असे आढळते की, शाळेमध्ये शारीरिक शिक्षणासाठी वेळ दिला जातो शाळेला मैदान उपलब्ध आहे तसेच शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहे परंतु या सर्वांसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही ही मोठी चिंतेची बाब आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक जर नसेल तर इतर सर्व बाबी निरर्थक आहे असे वाटते. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लगबग सुरू आहेत तर दुसरीकडे 2036 च्या ऑलिंपिकचे यजमानपद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू असताना भारताच्या शासकीय शाळांमधे शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती करायची नाही ही सरकारची परस्पर विरोधी भूमिका आहे असे स्पष्टपणे दिसते. जगभरातील अनेक विकसित देशांमधील विद्यार्थी हे शासकीय शाळेतच शिक्षण घेत असताना भारतामध्ये मात्र शासकीय शाळांची अवस्था अतिशय गंभीर आहे त्यामुळे नाईलाजाने सगळ्यांना खाजगी शाळेत भरमसाठ फी भरून शिक्षण घ्यावे लागते आणि कसे बघायचे विकसित भारताचे स्वप्न?

संदर्भ: ASAR Report 2024 (Physical Education)


प्रा. शरद आहेर

प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळ चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

Monday, December 16, 2024

आय हेट टेनिस : आंद्रे आगासी

 

'ओपन' हे टेनिसचा जगप्रसिद्ध खेळाडू आंद्रे आगासीचे आत्मचरित्र आहे.  मी जी काही आत्मचरित्र वाचली त्यातील 'ओपन' हे अतिशय उत्तम आत्मचरित्र आहे. हे पुस्तक अतिशय लयबद्ध, वाचणाऱ्याच्या भावनांना स्पर्श करणारे, प्रत्यक्ष टेनिस सामना पाहताना जितकी उत्कंठा शिगेला पोहोचते तितकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त वाचताना निर्माण होते. ज्याप्रमाणे टेनिस सामन्यात गुण मिळविल्यानंतर प्रेक्षक टाळ्या वाजवितात त्याप्रमाणे पुस्तक वाचतानाही लेखन कौशल्यासाठी टाळ्या वाजवाव्या वाटतात. याचे श्रेय जाते ते जे आर मोहरींगर याला. कारण, ही कथा जरी आंद्रे आगासी ची असली तरी ती शब्दबद्ध केली आहे ती पत्रकार जे आर मोहरींगर याने. पहिल्या पानापासूनच पुस्तक तुमचा ताबा घेते. हे  आत्मचरित्र कमी आणि कादंबरीच जास्त वाटते. या आत्मचरित्राच्या नावाप्रमाणे आगासी खरोखर ओपन  झाला आहे. अतिशय स्पष्ट, परखडपणे आणि सहजरीत्या त्याने त्याच्या आयुष्याच्या पडद्यामागील अनेक गोष्टी सांगितल्या आहे. 


बालपणीचा आंद्रे त्याच्या वडिलांसोबत  
आंद्रे आगासीचे बालपण अमेरिकेतील लास वेगासमध्ये घडले.आंद्रे आगासीचा जन्म एका कठोर,जबरदस्ती करणारे आणि महत्त्वाकांक्षी वडिलांच्या छत्राखाली झाला. त्याच्या वडिलांचे टेनिसबद्दलचे अपार प्रेम आणि त्यांच्या अपेक्षांची ओझी लहानग्या आंद्रेवर सतत असायची. त्याच्या वडिलांचे गणित असे होते की, रोज २५०० चेंडू मारले तर आठवड्यात १७५०० आणि वर्ष अखेरीस जवळ जवळ दहा लाख चेंडू खेळेल त्याला कोणीही हरवू शकणार नाही. आंद्रेच्या वडिलांना घर विकत घ्यायचे होते तेव्हा नवीन घराबद्दल त्यांचा एकच निकष होता तो म्हणजे घराच्या अंगणात टेनिस
मैदान बसेल इतकी जागा हवी. त्यांनी तसेच घर शोधले. घर तयार झाले तेव्हा तो म्हणतो माझा तुरुंगच तयार झाला होता. आंद्रे आणि त्याच्या वडिलांमधील द्वंद्व वाचल्यानंतर मला प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचीच आठवण झाली.  आंद्रे बालपणीची आठवण सांगताना म्हणतो की, मला कोणीही,एकदाही, चुकूनसुद्धा असे विचारले नाही की, बाळा !!! तुला टेनिस खेळायचे आहे का? आंद्रेचे पूर्ण बालपण केवळ टेनिस,टेनिस, आणि टेनिस मध्येच गेले. त्यामुळेच की काय, जो भेटेल त्याला आंद्रे एकच सांगायचा, I hate Tennis (मी टेनिसचा आत्यंतिक तिरस्कार करतो) 

थोड्याच दिवसात आंद्रेची रवानगी 'द निक बोलेटिरी अकॅडमी ऑफ टेनिस' येथे झाली. आंद्रेच्या भाषेत सांगायचे तर, सक्तमजुरीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. त्या ठिकाणच्या कडक शिस्ती विरोधात आंद्रेने अनेकदा बंडखोरी केली, त्याचे मजेदार किस्से पुस्तकात देण्यात आले आहे. तेथूनच आंद्रेच्या व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाली. त्याकाळातील त्याचे प्रतिस्पर्धी बोरिस बेकर, मायकल चॅग, पीट सॅप्रास यांच्यातील गमती जमती, त्यांच्यात सर्वोच्च स्थान पटकविण्यासाठी चाललेला संघर्ष अतिशय उत्कंठावर्धक रीतीने मांडलेला आहे. त्यांचे स्वभाव, सवयी, संबंध खूप प्रभावी रीतीने मांडलेले आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च स्थानासाठी आंद्रेची प्रमुख स्पर्धा ही पीट सॅप्रास याच्याशी होती. त्या काळातील बहुतांश ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरीत ते दोघेच प्रतिस्पर्धी असत. त्यांच्यात रंगलेले अंतिम सामने कागदावर सुद्धा तितकेच रंगविण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. पीट सॅप्रास आणि आंद्रे दोघेही अतिशय विरुद्ध व्यक्तिमत्त्वाचे खेळाडू होते त्याचे वर्णन मजेशीर पद्धतीने मांडलेले आहे.एवढे वर्ष कठोर परिश्रम केले तरीसुद्धा पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा २२ वर्षांनी जिंकली. त्यामुळे व्यावसायिक खेळाडूंना किती संयम लागतो याची जाणिव होते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आंद्रेची केशरचना, त्याचे मैदानातील कपडे, सवयी, वर्तन हा खूप चर्चेचा विषय होता त्याबद्दलही खूप सारं विनोदी शैलीत लिहिले आहे. सुरुवातीच्या यशानंतर आंद्रेच्या आयुष्यात असा एक काल येतो की, त्याला सतत अपयश येते. या अपयशामुळे  नैराश्य त्याला ग्रासते व तो ड्रग्जचे  सेवन करायला सुरुवात करतो व एकवेळ अशी येते की त्याचे  जागतिक क्रमावरीतील स्थान १४१ इतके खाली गेले होते. या नैराशेतुन बाहेर येण्यासाठी त्याचा ट्रेनर गिल, मार्गदर्शक ब्रॅड  आणि मित्र जे पी यांनी त्याला मदत केली आणि त्यानंतर अगदी नवीन टेनिस खेळायला सुरुवात करतो तशीच सुरुवात आंद्रेने केली.  परत कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आंद्रेने प्रथम स्थान पटकावले हा प्रवास वाचकाला खूप काही शिकून जातो. 

आंद्रे आणि स्टेफी 
आंद्रेचे आयुष्य मैदानावर जसे यश अपयशाचे हेलकावे घेत होते तसेच वैयक्तिक आयुष्यातही हेलकावे बसत होते. आंद्रे खुलेपणाने सांगतो की, माझ्या मैत्रिणींचे माझ्या आयुष्यातील कालावधी हा ठरलेला होता तो म्हणजे दोन वर्षाचा. अर्थात हे योगायोगाने तसेच घडत होते. ब्रुक या आफ्रिकन अभिनेत्रीशी प्रेमकहाणी सविस्तरपणे मंडळी आहे. एकदा आंद्रे तिची शूटिंग चालू असते तेथे जातो आणि तेव्हा तिचा रोमॅंटिक प्रसंग चालू असतो तो पाहतांना आंद्रेची झालेली अस्वस्थता वाचून हसू येते. ब्रुकशी लग्नानंतर काही काळातच घटस्फोट होतो. त्यानंतर  टेनिसमधील  महान खेळाडू स्टेफी ग्राफ बरोबरची प्रेमकहाणी गमतीशीर मांडलेली आहे. एकदा आंद्रे स्टेफी साठी खूप सारी गुलाबाची फुले पाठवतो आणि तिला जेवणाचे आमंत्रण देतो. त्याने पाठविलेल्या फुलांना स्टेफी काय प्रतिसाद देते याची आंद्रे अधिरपणे फोनची वाट पाहत असतो तेव्हा तो लिहितो की, "फोनकडे कितीही काकुळतीने पाहिले, कितीही चिडून डोळे वटारले तरी तो काही वाजायला तयार नेव्हता." आंद्रे आणि स्टेफी ग्राफचे लग्न होते आणि आंद्रेचे आयुष्य पूर्वपदावर येते. 

आंद्रेच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते त्यापैकी एक म्हणजे तो अतिशय संवेदनशील होतो. एकदा त्याचा ट्रेनर गिल याच्या मुलीचा अपघात होतो तेव्हा तो रात्रभर गिल बरोबर हॉस्पिटलमध्ये राहतो तसेच तिच्या रूम मध्ये केवळ फॅन असतो आणि तेथे खूप उष्णता असते तेव्हा आंद्रे मोठा ए सी घेऊन येतो आणि बसवतो. असे अनेक प्रसंग पुस्तकात दिलेले आहे ज्यात आंद्रेला इतरांना मदत करतांना खूप समाधान मिळत होते आणि तो अशा संधी सोडत नव्हता. त्याच्या संवेदनशीलतेचा परमोच्य क्षण म्हणजे त्याने सुरू केलेली “आंद्रे आगासी कॉलेज प्रिपरेटरी अकॅडमी” या अकॅडमीच्या माध्यमातून वंचित मुलांना शिक्षणाच्या संधी दिल्या जात आहेत. आंद्रे आगासी फाऊंडेशन फॉर एड्युकेशन च्या माध्यमातून त्याने या अकॅडमीसाठी संडे आठ कोटी डॉलर पेक्षा जास्त निधी जमवला आहे. 

आंद्रेने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक हजारपेक्षा जास्त सामने खेळले आहे. आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहे ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि चारही ग्रँड स्लॅम जिंकून 'गोल्डन स्लॅम' मिळविणारा तो एकमेव पुरुष खेळाडू आहे.  

"ओपन" वाचून फक्त आंद्रे आगाशीचे आयुष्य कळत नाही, तर तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे आत्मचरित्र आहे.  


शरद आहेर 

प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे 

Wednesday, October 16, 2024

जाता - येता खेळता!!!



शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजे ही जागतिक आरोग्य संघटनेचे अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रत्यक्ष हालचाली यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार 5 ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या अपेक्षा पूर्ण करत नाही ही चिंतेची बाब आहे. 

शासकीय धोरणांमुळे शारीरिक शिक्षणाला मिळणारे तास , तंत्रज्ञानाच्या अती वापरामुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा, अभ्यासाचा ताण अशा अनेक घटकांचा हा परिणाम आहे आणि या घटकांवर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे नियंत्रण नाही त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी काही  नावीन्यपूर्ण पर्यायांची, उपक्रमांची आणि कल्पनांची आवश्यकता आहे. 

याप्रसंगी मला आमच्या शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक चव्हाण सरांच्या वाक्याची आठवण होते आहे, ते म्हणायचे की, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात लांब उडीचे पिट असायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी शाळेत येता जाता उड्या मारत जाईल. ही कल्पना आजच्या काळातही इतकी महत्त्वाची आहे कारण, शारीरिक शिक्षणासाठी वेळापत्रकात खूप कमी कालावधी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याअगोदर, छोट्या आणि मोठ्या सुटिदरम्यान आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी  शारीरिक हालचालींसाठी जास्तीत जास्त आकर्षित, प्रेरित  कसे होतील आणि अनौपचारिकपणे हालचाली होतील यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक हालचालींना प्रोत्साहन देणारे किमान खालील साहित्य प्रत्येक शाळेत असावे असे सुचवीत आहे.

पहिले साहित्य म्हणजे डबल बार. आमच्या शाळेच्या मैदानात एक डबल बार होता. त्यावर मी शाळा सुरू होण्याअगोदर जाऊन विविध व्यायाम करायचो. आत्ताही महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानात तीन डबल बार ठेवलेले आहेत त्यावर छोटी व मोठी माणसं नियमितपणे विविध हालचाली करताना दिसतात. या साधनाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातांच्या आणि खांद्यांच्या स्नायूंचा विकास होतो. संशोधनानुसार, रोज १०-१५ मिनिटे डबल बारचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्नायूंची ताकद २०% ने वाढू शकते. याशिवाय, डबल बारचा वापर करताना विद्यार्थ्यांमध्ये भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. 


दुसरे साधन म्हणजे बॉक्सिंग बॅग.बॉक्सिंग बॅग हे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि ताण कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. जाता येता विद्यार्थी एकमेकाला


हाताने अथवा पायाने मारत असतात. हेच करण्यासाठी शाळेच्या आवारात जेथून विद्यार्थी ये - जा करतात अशा ठिकाणी जर बॉक्सिंग बॅग असतील तर विद्यार्थी पंचींग आणि किकिंग करतील ज्यामुळे त्यांची ऊर्जा कमी होऊन शाळेतील गैरवर्तन कमी होण्यास मदत होऊ शकेल.  बॉक्सिंगच्या सरावाने हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि नियमितपणे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १५-२०% अधिक शारीरिक सक्रियता वाढलेली दिसून येते.

तिसरे साहित्य म्हणजे लाँगजंप पिट. शाळेच्या आवारात जर लाँगजंप पिट असेल तर विद्यार्थी वेळ मिळेल तेव्हा उड्या मारतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची शक्ती,वेग हे घटक विकसित होतात. एका शाळेतील ५०% विद्यार्थी जे पूर्वी शारीरिक उपक्रमांमध्ये कमी सक्रिय होते, ते लांबउडी पिटमुळे नियमितपणे शारीरिक सराव करू लागले. शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी हे साधन शाळेच्या ग्राउंडवर सहजपणे वापरता येण्याजोगे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी वाटणारे असते.

विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील DLRS शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक चेतन पाटील यांनी MoSaFit नावाचा उपक्रम सुरू केला आहे. MoSaFit चे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली ऍक्टिव्ह झाली पाहिजे. ही संकल्पना समजायला खूप साधीसरळ आहे. Mo- Monday to Sa- Saturday fitness. या तत्वावर MoSaFit काम करते.मोड्युल तयार करताना Gross motor skill, Fine motor skill, Locomotor skill, Non-Locomotor skill, Manipulative skill, Health related Physical fitness, Skill Related Physical Fitness या गोष्टींचा वापर करून मोड्युल तयार केले आहेत. स्कूल मध्ये या मोडयुलचा उपयोग केला आहे यामुळे विद्यार्थी ऍक्टिव्ह झाले, हालचाली वाढल्या. MoSaFit हे इंस्टाग्राम या social media वर play- learn- grow- together या पेज वर ऍक्टिव्ह आहे. 

असे म्हणतात की, “Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle”शाळेतील शारीरिक शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे हा असतो. परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाची सवय लावणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी एक आव्हान ठरते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, शाळेच्या परिसरात डबल बार, लांबउडी पिट आणि बॉक्सिंग बॅग इत्यादी  साधनं उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक शारीरिक सक्रियतेला चालना देऊ शकतात.


डॉ. शरद आहेर 

प्राध्यापक,महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे 









Sunday, October 6, 2024

पोलिस नको शिक्षक होऊ या!!!

 

नुकतीच वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की, एका विद्यार्थ्याने शर्टइन केले नाही म्हणून पुण्यातील एका शिक्षकाने त्याला इतके मारले की त्याच्या नाक आणि कानातून रक्त वाहू लागले. यासाठी त्या शिक्षकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशा अनेक घटना घडतात परंतू काहींची चर्चा होते आणि काही दुर्लक्षित राहतात. शाळेत शिक्षणाचे महत्त्व हे फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते, तर त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त, मूल्यं, आणि सामाजिक भान शिकवले जाते. मात्र, काही शाळांमध्ये शिक्षेच्या नावाखाली शारीरिक किंवा मानसिक शिक्षा केल्या जातात. अशा प्रकारच्या शिक्षेमुळे  विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. अशा शिक्षेचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर किती नकारात्मक परिणाम होतो यावर अनेक संशोधन झाले आहेत. एक सर्वेक्षण दर्शवते की, ज्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिली जाते, ते विद्यार्थी भावनिक ताण, नैराश्य, आणि आत्मविश्वासाच्या अभावाने ग्रस्त असतात. त्यांनी अभ्यासातील उत्साह गमावलेला असतो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही याचा परिणाम होतो.'द लास्ट रिझल्ट' या शारीरिक शिक्षे विरुद्धच्या मासिकाच्या संपादिकेने देशभरातील शाळांमध्ये किती मुलांना अधिकृत औपचारिकरित्या मारण्यात आले होते यासंबंधी एक सर्वेक्षण केले. ज्या शाळांनी उत्तरे पाठवली नाहीत तिथेही ज्या शाळांनी उत्तरे पाठवली तितकेच मारले जाते किंबहुना अधिकच असे गृहीत धरल्यास शाळेच्या एका वर्षात 15 लाख वेळा मारझोड करण्यात आली. या मारहाणीला शाळांनी जरी चापटी मारणे असे नाव दिले तरी त्यापैकी काही लहान मुलांना त्यासाठी इस्पितळात जावे लागणे इतकी ती जबर जखमी होती आणि ही केवळ अधिकृत म्हणजे मुख्याध्यापकांच्या ऑफिसात करण्यात आलेली मारहाण असून तिची नोंद वहीत नोंद करण्यात आली होती. मुलांना आणखी किती अनधिकृत मारहाणीला तोंड द्यावे लागत असेल धपाटा, बुक्के, केस ओढणे, हात व कान पिरगाळणे गालगुच्चे घेणे, भिंतीवर आपटने, हाताने गुदा मारणे अशा वर्गात घडणाऱ्या घटना किती असतील याचा अंदाज करणेही शक्य नाही. शारीरिक हिंसा बरोबरच मानसिक हिंसेचे ही उपरोध चेष्टा अपमान असे अनेक प्रकार होत असतात.


अशा शिक्षा करण्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी जगभरात अनेक कायदे आणि नियम लागू करण्यात आले आहेत. मुळात शारीरिक शिक्षा (corporal punishment) अनेक देशांमध्ये निषिद्ध करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, युरोपमधील जवळजवळ सर्वच देशांमध्ये शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्वीडन हा 1979 मध्ये शारीरिक शिक्षेला बंदी घालणारे पहिला देश आहे. त्यांच्या शिक्षण पद्धतीत "Positive Discipline" वर जोर दिला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना चुकीच्या कृतींचे परिणाम समजावून सांगितले जाते, जेणेकरून त्यांच्यावर चांगल्या वर्तनाचा प्रभाव पडतो.आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये, युनिसेफ आणि यूनेस्को यांसारख्या संस्थांनी शारीरिक शिक्षेला पूर्णपणे नकार दिला आहे. त्यांचा विश्वास आहे की, शिस्त लावण्यासाठी आणि मुलांना जबाबदार बनवण्यासाठी संवाद आणि सहकार्य यांचा वापर करणे योग्य आहे.महाराष्ट्रातही शाळांमध्ये शारीरिक शिक्षेला बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाने 2010 साली एका परिपत्रकाद्वारे शारीरिक शिक्षेला रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. यात शिक्षण संस्थांमध्ये शाळेतील वातावरण सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यावर भर दिला जातो. यासोबतच, 'Right to Education' (RTE) कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली जाणे अवैध आहे. याआधारे शिक्षकांनी मुलांना शारीरिक शिक्षा केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल या अध्यादेशाच्या चर्चेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली, शिक्षकांमध्ये संताप आणि भीतीची लाट उमटली. संताप यासाठी की मुलांना मारल्याशिवाय मुले अभ्यास करणार नाहीत या त्यांच्या गृहीतकाला धक्का बसला म्हणून. आता माराची भीतीच नसेल तर मुले अभ्यासच करणार नाहीत.\

    शाळांमधील शिक्षेबद्दल दोन प्रमुख मतप्रवाह आढळतात. पहिला मतप्रवाह असा आहे की, विद्यार्थ्यांना कडक शिस्त लावल्याशिवाय शिक्षणात प्रगती होऊ शकत नाही. या विचारसरणीमध्ये शारीरिक शिक्षा किंवा कडक नियंत्रणाचे समर्थन केले जाते. परंतु, दुसरा मतप्रवाह असा आहे की, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची गरज आहे परंतु त्यासाठी शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे योग्य नाही. या मतप्रवाहानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना शिक्षणाद्वारे आत्मविश्वास व जबाबदारीची भावना दिली पाहिजे.

    परंतू शिक्षणतज्ञ कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या कृष्णमूर्ती शाळांमध्ये मात्र आज नव्हे तर स्थापनेपासून शारीरिक शिक्षा करायला बंदी आहे. बक्षीस आणि शिक्षा विरहित मुलांना शिकवायला हवे हा तिथला दृष्टिकोन आहे. कृष्णमूर्तींनी सतत ज्या गोष्टीवर खूप टीका केली असेल ती म्हणजे शिस्त होय. शिक्षेमुळे विद्यार्थ्यांची उर्मी मरते मनाची चपळता नष्ट होते ही बाह्य शिस्तीची सक्ती मनाला मंद बनविते. खडी दाबण्याच्या यंत्राची उपमा कृष्णमूर्ती शिस्तीला देऊन त्याची दमन क्षमता स्पष्ट करतात. मुळातच शिस्तीच्या मागची वृत्ती ही लोकशाही विरोधी व हुकूमशाही असते. समोरच्याला त्याचे मतपरिवर्तन न करता सक्तीने बदलविणे त्यात गृहीत असते. त्यामुळे समोरच्याच्या भावना, मनोभूमिका याचा किंचितही त्यात विचार केलेला नसतो. एका साच्यात सर्वांना बांधण्यावर भर दिलेला असतो. स्वतंत्र विचार दाबण्यासाठी तिचा उपयोग होतो. अभ्यास न करण्याबाबत केले जाणारी शिक्षा ही आम्ही तुला अभ्यासाची आवड लावू शकत नाही इतका वेळ आणि संयम आमच्याजवळ नाही तेव्हा मी शिक्षा करतो तू त्या भीतीने अभ्यास कर, असा सरळ मामला असतो. मारामारी करणाऱ्या मुलात अतिरिक्त ऊर्जा असते त्या ऊर्जेला आम्ही वळण देऊ शकत नाही. तेव्हा मार्क आणि त्या भीतीने तुझी ऊर्जा दाबून ठेव असा सांगावा असतो. थोडक्यात मुलांशी प्रेमाने संवाद करून त्यांना बदलविण्याची आमची तयारी नसल्याने आम्ही शिक्षेचा शॉर्टकट वापरतो यावर वादविवाद होतील विद्यार्थी संख्या, वेळ सारे मुद्दे येतील पण दृष्टिकोन हा असा असला पाहिजे. मागच्या पिढीने शिस्तीचा इतका प्रचंड प्रभाव आपल्यावर बसवलेला आहे की आपण दुसऱ्या बाजूने विचार करण्याची क्षमता गमावून बसलो आहोत. भीतीशिवाय अपेक्षित परिणाम साधला जाईल यावर आपला विश्वास उरला नाही. संवादाने प्रेमाने मुले बदलू शकतात यावर आपला विश्वास आहे का? हे मनाच्या तळात जाऊन स्वतःपुरतेच शोधले पाहिजे तर आपलाच मुळात प्रेमावर एक थेरपी म्हणून विश्वास नाही म्हणून आपण शिस्त आणि शारीरिक शिक्षा यांना कवटाळून बसतो आहोत. शिक्षेमुळे  मुलं बदलतात असे सर्वांना वाटते. आपल्या समाजात मुळी चूक केल्यावर तुरुंग आणि चांगल्या कामांना पुरस्कार अशी रचना आहे. त्यामुळे शिक्षा करण्याला आपल्या समाजात प्रतिष्ठा आहे. मग त्याला शाळा अपवाद कसे असणार. “छडी लागे छम छम” हे सूत्र तर प्रतिष्ठित आहे. आमच्या सर्व चर्चांमध्ये जेव्हा बालपणीच्या जुन्या पिढीच्या चांगल्या शिक्षकांचा विषय निघतो तेव्हा हमखास ते एका गल्लीने जात तेव्हा आम्ही दुसऱ्या गल्लीने जात असू ही आमच्या चांगल्या शिक्षकाची व्याख्या. जो शिक्षक अधिक शिक्षा करी त्याचा शाळेत दरारा असायचा किंबहुना असतो. कुठलेही चुकीचे वर्तन झाल्यानंतर केवळ शिक्षा अथवा मार अथवा जोराने ओरडणे हाच एक उपाय असू शकतो हा विचार शिक्षकांच्या मनामध्ये जबरदस्त भिनलेला असतो. शिक्षक आणि पोलीस यातला फरक आम्ही करणार की नाही?  विद्यार्थ्यांना शिक्षकाची भीती वाटायला लागली की, शिक्षकाचा अहंकार सुखाऊ लागतो. जे कृष्णमूर्ती म्हणतात की, शाळा म्हणजे मोठ्या माणसांचे अहंकार सुखावण्याची केंद्रे झाल्या आहेत.कृष्णमूर्ती म्हणतात की, शिक्षकांचा संबंध हा यंत्राशी नसून तो जिवंत मुला-मुलींशी आहे. ही मुले भीती, अनुकरण, प्रेम, राग या भावनांमध्ये गुरफटलेली आहेत तेव्हा त्यांना त्यातून बाहेर काढायला खूप समजूतदारपणा, खूप संयम आणि प्रेमाची आवश्यकता आहे. शिक्षण तज्ञ जे कृष्णमूर्ती हे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याबद्दल महत्त्वाचे मत मांडतात ते म्हणतात शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते समान पातळीवर असले पाहिजे शिक्षकाच्या मनात अहंगंड नसावा व विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड नसावा. शिक्षक जर स्वतःला उच्च स्थानावर समजला तर तो विद्यार्थ्यांना हीन समजू शकतो. यात त्यांच्यात कोणतेच नाते निर्माण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यात भय आणि तणाव निर्माण होतो आणि लहान वयातच तो नात्यातील श्रेष्ठ कनिष्ठता शिकू लागतो. विद्यार्थ्यांत न्युनगंड वाढायला लागतो, तो स्वतःला शूद्र मानायला लागतो. त्यातून तो आक्रमक होतो त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांशी नम्रतेने बोलले पाहिजे.

अनेक मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, आणि पालकांचा दुसऱ्या मतप्रवाहाकडे कल आहे. त्यांचा विश्वास आहे की, विद्यार्थ्यांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य जर चांगले असेल, तर ते शाळेत चांगली कामगिरी करतात आणि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होते.

शिक्षेला पर्याय म्हणून अनेक शाळेत विविध पर्याय व प्रयोग केले जात आहे ते पुढीलप्रमाणे

  • अमेरिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनावर उपाय म्हणून "Restorative Practices" हा दृष्टिकोन वापरला जातो, या तंत्रामध्ये संवाद, समंजसपणा, आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतींमुळे दुसऱ्यांना झालेल्या परिणामांची जाणीव करून दिली जाते आणि त्यांच्या वर्तनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाते.ज्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या वागणुकीचे परिणाम समजतात आणि त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते.
  • Positive Reinforcement* हे तंत्र शिकवताना विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन ओळखून त्यांना बक्षीस, प्रशंसा किंवा इतर सकारात्मक प्रोत्साहन देऊन वर्तनाचा पुनरावृत्ती करायला उद्युक्त करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, वर्गातील विद्यार्थ्याने उत्तम वर्तन केले तर त्याला शाबासकी देणे, किंवा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यावर त्याला अतिरिक्त क्रियाकलापांची संधी देणे. त्यामुळे मुलांना आपल्या कृतीचे महत्त्व समजते आणि ते चांगल्या वर्तनाच्या दिशेने प्रेरित होतात.
  • *Conflict Resolution* तंत्रामध्ये विवाद किंवा संघर्ष सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याचे, इतरांचे विचार समजून घेण्याचे आणि आपली समस्या शांतपणे सोडवण्याचे कौशल्य शिकवले जाते. हे तंत्र त्यांना शांततेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहण्यास मदत करते.
  • काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनासंबंधी नियम विद्यार्थीच करतात व ते पाळले जातात किंवा नाही यावर देखरेखही विद्यार्थीच करतात. 
  • जबाबदारी दिली जाणे: विद्यार्थ्यांना त्यांची चूक सुधारण्यासाठी जबाबदारी सोपवणे, जसे की नुकसान भरपाई करणे किंवा चूक सुधारण्यासाठी काम करणे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणे आणि त्यांना जबाबदार बनवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा वापर केल्यास शिक्षणात सुधारणा होईल. शाळा हे ठिकाण शिक्षण आणि विकासाचे केंद्र असावे, शिक्षेचे नव्हे. म्हणूनच, "पोलीस नको शिक्षक होऊ या," असे म्हणत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यावर चांगला परिणाम करणारी शिक्षण पद्धती विकसित केली पाहिजे.





शारीरिक शिक्षणाच्या तासालाही वर्षानुवर्ष अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून वेगवेगळे व्यायाम करायला लावतात उद. रनिंग, उठ बश्या, फ्रंट रोल, प्लांक इ. खरंतर हे सर्व व्यायाम शारीरिक सुदृढता विकासासाठी अतिशय उत्तम असे व्यायाम आहे. परंतु हेच व्यायाम शिक्षा म्हणून केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या व्यायामाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते व आयुष्यभर त्या उठबष्या  लक्षात ठेवतात. आपल्या सगळ्यांनाच याची जाणीव आहे की व्यायाम हा आरोग्यदायी जीवनशैली मध्ये किती महत्त्वाचा घटक आहे. व्यायाम हा शिक्षा होऊ शकत नाही हे आपणास ज्ञात असूनही आपण त्याचा वापर शिक्षा म्हणून करतो व विद्यार्थ्यांच्या मनावर व्यायामाबद्दल ची नकारात्मक भावना आयुष्यभर बिंबवतो.

Thursday, October 3, 2024

वाचाल तर वाचाल!!!

 










"कळतं पण वळत नाही" असे खूपदा होते ना!!! वाचन केले पाहिजे असं लहानपणापासून कित्येकदा ऐकले असेल पण..............मलाही वाचायला पाहिजे असे नेहमी वाटायचे पण वळत नव्हते. शेवटी तीन चार वर्षापूर्वी एक पुस्तक वाचले आणि काय झाले माहीत नाही पण त्यानंतर वाचानाशिवाय चैन पडेना अशी स्थिती झाली. एखाद्या भुकेल्या माणसाला खूप दिवसांनी खायला मिळाल्यावर तो जसा तुटून पडेल आणि काय खाऊ अन् काय नाही असे होते तसे काहीसे वाचनाच्या बाबतीत माझे झाले. असेच काही इतरांच्याही आयुष्यात झालेले आहे. चला तर काही सत्यकथा व प्रसंगातून वाचनाचे महत्व जाणून घेऊया.

सत्यकथा १: आण्णा हजारे सुरुवातीला भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते एक सामान्य सैनिक होते, त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, पण त्यांना कसे करावे हे माहीत नव्हते. एके दिवशी त्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार आणि लेख वाचायला मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी त्यांच्यावर खोलवर परिणाम केला. त्या पुस्तकांमध्ये लिहिलेली ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका’ ही शिकवण त्यांनी आपल्या जीवनाचा भाग बनवली.

वाचनाने त्यांच्या मनात समाजसेवेसाठी प्रचंड उर्जा निर्माण केली. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि समाजसेवेसाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राळेगणसिद्धी हे गाव निवडले आणि तिथे त्यांनी ग्रामीण विकासाचे काम सुरू केले. त्यांनी पाणलोट व्यवस्थापन, वृक्षारोपण, शिक्षण, आणि गावातील मद्यबंदी सारखे अनेक उपक्रम राबवले. या सर्व कामांमागे त्यांच्या वाचनाने दिलेले मार्गदर्शन होते.

वाचनामुळे आण्णांचे जीवनच बदलले. त्यांनी केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला नाही, तर ते लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनले. वाचनाने मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावरच त्यांनी समाजात अमूल्य योगदान दिले आणि देशभरात भ्रष्टाचाराविरुद्धचे जनआंदोलन उभारले. वाचनाच्या शक्तीमुळे ते एक सामान्य सैनिक म्हणून काम करणारे आण्णा हजारे ते राष्ट्रीय नेते आणि समाजसेवक या प्रवासात बदलले.

या कथेतून आपण शिकतो की वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून, ते आयुष्य बदलण्याची ताकदही देते.

कथा २: संदीप नावाचा विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. तो एक चांगला खेळाडू होता, पण अभ्यासात फारसा रस नव्हता. एके दिवशी त्याला शिक्षकांनी ‘महात्मा गांधींचे आत्मचरित्र’ वाचायला दिले. ते पुस्तक त्याने नाइलाजानेच घरी नेले. सुरुवातीला त्याने ते वाचण्याकडे दुर्लक्ष केले, पण नंतर एकदा उघडले आणि त्यात हरवून गेला. गांधीजींच्या साधेपणाचे, सत्यनिष्ठेचे, आणि त्यागाचे वर्णन त्याच्या मनावर खोलवर ठसले. या वाचनाने संदीपचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्यातल्या जिद्दीने आणि कर्तृत्वाने त्याला आयुष्यात नवी दिशा मिळवून दिली. तो म्हणायचा, "वाचनाने मला नवी दिशा दाखवली."

कथा ३: मिनाक्षी नावाची एक मुलगी, जी अभ्यासात मागे पडत होती आणि कायम खचून जात असे. तिचे अपयश तिला त्रास देत होते, पण एका दिवसाने सगळे बदलले. तिने शिक्षकांनी सुचवलेले एक ‘मनोधैर्य’ पुस्तक वाचायला सुरुवात केली. पुस्तकातील यशस्वी लोकांच्या संघर्षांच्या कथा वाचून तिचे मनोबल वाढले. ती म्हणायची, " जेव्हा अपयश येते तेव्हा ते शिकवण देण्यासाठीच येते, हे मला वाचनाने शिकवले." वाचनामुळे तिच्या विचारांत बदल झाला आणि ती यशाच्या मार्गावर पुढे गेली. 

प्रत्येककाच्या आयुष्यात एक प्रसंग येतो, जिथे त्याला प्रेरणा आणि धैर्याची आवश्यकता असते. वाचन हे त्या प्रसंगात आपल्याला मार्गदर्शन करते. वाचनानेच इतिहासातील थोर लोकांना यशाची शिखरे गाठता आली. म्हणून, वाचन ही सवय केवळ चांगलीच नव्हे तर ती जीवनाला दिशा देणारा मार्ग आहे.

चला तर मग, "पुस्तक भिशीत" सहभागी होऊन वाचू या  कारण वाचनाने तुमचे जीवनच बदलू शकते!

Tuesday, August 20, 2024

क्रीडाराष्ट्र होण्यासाठी पायाभरणी हवी!!!

 *क्रीडाराष्ट्र होण्यासाठी पायाभरणी हवी.........* 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची नुकतीच सांगता झाली. भारताला मिळालेल्या ६ पदकांची संख्या जरी मर्यादित असली तरी एकूण ऑलिम्पिक मध्ये भारताची कामगिरी समाधानकारकच म्हणावे लागेल. कारण सहा खेळाडू असे होते जे चौथ्या क्रमांकावर राहिले. काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडने एका वृत्तपत्रास मुलाखत दिली त्यावेळेस त्याला


प्रश्न विचारण्यात आले की, 140 कोटी लोकसंख्येचा देश केवळ मोजकेच ऑलिम्पिक पदक विजेते तयार करू शकला आहे (खरं तर हा प्रत्येक भारतीयाला चार वर्षानंतर पडणारा प्रश्न आहे). ते बदलण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल असे तुम्हाला वाटते? त्यावेळेस राहुल द्रविड म्हणाला की, अव्वल क्रीडा राष्ट्रांपैकी एक होण्यासाठी, आपण प्रथम शारीरिकदृष्ट्या सक्रिय राष्ट्र (Physically Active Nation) बनणे आवश्यक आहे. आपण एक समाज म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आणि वयोगटातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे. खेळ ही पदके जिंकण्यापलीकडे आहे आणि ही मानसिकता समाजात तयार झाली पाहिजे. या वाक्याला पुष्टी देणाऱ्या एका सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, भारतातील 80 % विद्यार्थी दिवसाला 60 मि. शारीरिक हालचाली करत नाही.तसेच भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा हा कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि नाही. ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वृध्दींगत होत जाते असा नैसर्गिक नियम आहे त्याप्रमाणे शासनाच्या आणि शिक्षणाच्या प्राधान्यक्रमामध्ये जेव्हा आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा विषय येईल तेव्हा पदकांची चर्चा आणि विश्लेषण करायला हवे. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेते होणे हा एक दीर्घकालीन आणि पद्धतशीर प्रक्रियेचा परिणाम असतो. परंतू आपण प्रक्रियेपेक्षा (Process) परिणामावर (Product) अधिक लक्ष केंद्रित करतो. आपण आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वतः मैदानावर जाऊन व्यायाम आणि खेळ खेळतो का ? आपल्या पाल्याला खेळण्यासाठी वेळ आणि प्रोत्साहन देतो का? याचा एक भारतीय म्हणून आपण विचार नव्हे तर कृती करायला हवी. 

खेळाडुंची गळती (Dropout) एक आव्हान: ज्याप्रमाणे भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात गळती होते आणि विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात त्याचप्रमाणे खेळामध्ये आहे. सर्वच स्तरावरील स्पर्धांचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की १२ वर्षाखालील व 14 वर्षाखालील गटांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे त्या प्रमाणात १६ वर्षाखालील व 19 वर्षाखालील वयोगटात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत जाते. अनेक विद्यार्थ्यांमध्ये खेळाची प्रतिभा मोठ्या प्रमाणात असतानाही १० वी आणि १२ वी परीक्षांना असणाऱ्या अनन्य साधारण महत्त्वामुळे अनेक खेळाडूंचे खेळातील करिअर सुरू होण्याअगोदरच संपते.इयत्ता १० वी आणि १२ वी नंतर खेळ सोडून देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण, अभ्यासातील बुध्दीमत्ता श्रेष्ठ आणि क्रीडेतील बुध्दीमत्ता कनिष्ठ समजली जाते. यामध्ये स्वतःहून खेळ सोडणाऱ्यांची संख्या नगण्य असते परंतू पालकांच्या आग्रहा खातर अथवा इच्छेखातर खेळ सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भारतातील क्रीडा प्रतिभा सुरुवातीच्या काळातच लुप्त होते. प्रतिभावान खेळाडूंचा ड्रॉप आऊट रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी पालकांमधील जागरूकता वाढणे महत्वाचे आहे. कारण, पदक विजेते खेळाडू घडण्याच्या प्रक्रियेतील पालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व देणाऱ्या सामाजिक रेट्यामध्ये आपल्या पाल्याला खेळायला सपोर्ट करणे खूप आव्हानात्मक परंतू महत्त्वाचे आहे.माझ्या माहितीतील काही पालक आहे जे आपल्या पाल्याला परिस्थिती नसतांनाही खूप सपोर्ट करत आहे परंतू त्यांची संख्या खूप मोजकी आहे. सध्याच्या काळात उच्च क्रीडा कार्यमनासाठी फिटनेस ट्रेनर, आहार, फिजिओ या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात आणि त्या बऱ्याच खर्चिक असतात त्यामुळे पालकांचा सपोर्ट हा कळीचा मुद्दा ठरतो. 

शालेय स्तरावरील पायाभरणी महत्वाची: २०२२ मध्ये ‘असर’ या अहवालात आलेल्या निष्कर्षावरून असे आढळले की, भारतातील एकूण शासकीय शाळांमधील बहुतांश शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास केवळ ८ % शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे. हि अतिशय धक्कादायक बाब आहे. जर शारीरिक शिक्षण शिक्षकच नसतील तर शाळेतील विद्यार्थी खेळात कसे सहभागी होतील? लाखो नव्हे तर शासकीय शाळेत शिक्षण घेणाऱ्या करोडो विद्यार्थी हे खेळापासून वंचित राहतात याला जबाबदार कोण? तात्पुरत्या लोकप्रियतेसाठी पदक विजेत्या खेळाडूंना करोडोची बक्षिसे देण्यात गैर काहीच नाही परंतू असे पदक विजेते त्यांचा प्रवास जेथे सुरू करतात अशा शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच करायची नाही हा शासनाचा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? ऑलिंपिक पदक जिंकणे ही बहुस्थरीय प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ दहीहंडीच्या विविध थरांमध्ये सर्वात वरचा थर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळणारे खेळाडू आणि सर्वात खालचा थर म्हणजे शालेय स्तरावरील शारीरिक शिक्षण आणि खेळ. विद्यार्थ्यांची खेळाबद्दलची धारणा, आवड-निवड निश्चित करणारा आणि निर्माण करणारा कालखंड हा विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे खेळाबद्दलचे अनुभव असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत विविध खेळाच्या संधी मिळणे, सकारात्मक अनुभव मिळणे हे खेळातील करिअरच्या दृष्टीने पायाभरणी असते. शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या नियुक्त्या करणे आणि मूलभूत क्रीडा सोयीसुविधा निर्माण केल्यास अनेक पदक विजेते त्यांचा प्रवास सुरू करू शकतील याची जाणीव शासनाला कधी होणार? शाळेमध्ये खेळांसाठी पूरक वातावरण असेल, विद्यार्थ्यांना खेळण्याच्या विविध संधी मिळाल्या तर विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग निश्चित वाढेल. याबरोबरच शाळेत शारीरिक शिक्षणाला सध्या आठवड्याला दोन ते तीन इतकेच तास दिले जातात 

युनेस्कोच्या शारीरिक शिक्षण धोरणानुसार माध्यमिक शाळेत एका आठवड्यात शारीरिक शिक्षणासाठी किमान 180 मिनिटे द्यायला हवीत परंतू भारतात सर्वसाधारणपणे आठवड्याला ९० ते १२० मिनिटे इतकाच वेळ दिला जातो. याशिवाय शारीरिक शिक्षणाचा तास इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देखील वापरला जातो. हे चित्र बदलायला हवे आणि शालेय शारीरिक शिक्षणाकडे सर्वांनीच गांभीर्याने बघायला हवे. 

आशेचा किरण: गेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहे. पदक विजेत्यांना चांगले पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात, ज्याठिकाणी या स्पर्धा होतात तेथे चांगल्या क्रीडा सुविधा निर्माण होत आहे. तसेच टॉप्स (Target Olympic Podium Scheme) योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सर्व प्रकारचा सपोर्ट दिला जात आहे ही स्वागतार्ह बाब आहे. त्याचबरोबर विविध खेळांच्या लीग भारतात सुरू झाल्या आहे त्यामुळे उभरत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळत आहे,आंतरराष्ट्रीय पदकविजेत्यांना सरकारी नोकरीमध्ये घेतले जात आहे. या काही आशादायी बाबी दिसत आहे. 

आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पिएर डी कुबर्टिन म्हणायचे की,‘‘जेव्हा देशातील बहुसंख्य नागरिकांना खेळ ही मूलभूत गरज असल्याची जाणीव होईल, तेव्हाच त्या देशाला क्रीडाराष्ट्र म्हणून संबोधता येईल,’’ २०३६ च्या ऑलम्पिक स्पर्धांचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी भारतात सुरू आहे तोपर्यंत तरी भारत एक क्रीडा राष्ट्र म्हणून पुढे येईल का?


डॉ. शरद आहेर 

प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

Friday, August 2, 2024

जगभरात वंचित शारीरिक शिक्षण !!!

 युनेस्कोच्या शिक्षण विभागाने द ग्लोबल स्टेट ऑफ प्ले अशा प्रकारचा एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणासंबंधीची सद्यस्थिती आणि ती सुधारण्यासाठीच्या काही शिफारशी देण्यात आलेल्या  आहेत. त्यातील शारीरिक शिक्षणाची जगभरातील सद्यस्थिती काय आहे याचा आढावा आपण या ब्लॉगमध्ये घेऊया. 

  • आयुष्यभर शारीरिक क्रियाशील राहण्यासाठी व तरुण पिढीचे मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असे असूनही अभ्यासक्रमामधील मुख्य विषय म्हणून शारीरिक शिक्षणाची क्षमता असूनही युनेस्कोच्या रिपोर्ट वरून असे दिसून येते की शारीरिक शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही. 
  • युनेस्कोच्या रिपोर्टनुसार शारीरिक शिक्षण विषयास अत्यंत कमी प्राधान्य दिले जाते. शारीरिक शिक्षणाच्या मुख्य कमतरतांमध्ये धोरणांची अंमलबजावणी अपुरा निधी, कुशल शारीरिक शिक्षकांची कमतरता, शारीरिक शिक्षणाच्या वर्गांतील विविधता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश आहे. 
  • जगभरातील 83% देशांनी शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य केलेले आहे. परंतू, अध्यापनाची गुणवत्ता आणि पाठ नियोजनातील विविधता या महत्त्वपूर्ण समस्या सध्या सगळ्यांनाच भेडसावत आहेत.
  • जगभरातील 63.8% देश त्यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक बजेटच्या केवळ 2 % पेक्षा कमी निधी शारीरिक शिक्षणाला देतात.


  • युनेस्कोच्या गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण धोरणानुसार (QPE) माध्यमिक शाळेत एका आठवड्यात शारीरिक शिक्षणासाठी किमान 180 मिनिट द्यायला हवीत. युनेस्कोच्या या धोरणाची अंमलबजावणी जगभरात तीन पैकी केवळ एका माध्यमिक शाळेत केली जाते. 
  • 32.2% उच्च माध्यमिक शाळा आणि 34.7% निम्न माध्यमिक शाळेत दर आठवड्याला किमान 180 मिनिटे शारीरिक शिक्षणाचे निकष पूर्ण करतात.
  • जागतिक स्तरावर, 69% शाळांनी नोंदवले आहे की, ते विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण तासादरम्यान कोणत्या प्रकारचे उपक्रम करायचे ते निवडण्याची संधी देतात.
  • तीन पैकी केवळ एका दिव्यांग विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षण दिले जाते.
  • जागतिक स्तरावर, 58.3% देशांनी नोंदवले आहे की, दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांबरोबरच  शारीरिक शिक्षण वर्गात उपस्थित असतात
  • 54.5% देशांमध्ये धोरणे किंवा योजना असूनही केवळ 7.1 % शाळा शारीरिक शिक्षणासाठी मुला व

    मुलींसाठी  समान वेळ देतात.
  • प्राथमिक शाळांमधील शारीरिक शिक्षण शिक्षकांपैकी केवळ 44.7% शिक्षक हे शारीरिक शिक्षणातील विषय तज्ञ (Specialist Teacher)आहेत. भारतात प्राथमिक स्तरावर विशेष शिक्षक नसल्यामुळे हे प्रमाण खूप जास्त असू शकेल 
  • जागतिक स्तरावर, 82.7% देशांनी शारीरिक शिक्षणामद्धे मुलींचा सहभाग अनिवार्य असल्याचे नोंदवले आहे
  • जागतिक स्तरावर 68.5% देश गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणच्या  अंमलबजावणीचा आढावा  घेतात
या रीपोर्ट मधे जगभरातील विविध देशांच्या शासनातील व्यक्तींचा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांचा त्यांच्या देशातील स्थितीबद्दल अभिप्राय देण्यात आला आहे. त्यातील काही निवडक मतं अथवा अभिप्राय खालील प्रमाणे 

शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व वाढवण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि शालेय स्तरांद्वारे शारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे कोणतेही निरीक्षण आणि मूल्यमापन केले जात नाही.

                                    -मंत्री, ओशनिया

आम्ही देश आणि/किंवा राज्य स्तरावर विद्यार्थ्यांच्या आवडी आणि निवडी आणि स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाचा आदर करून विविध पर्याय ऑफर करण्यास सक्षम असले पाहिजे.
               -मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

शारीरिक शिक्षण हा राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा  अनिवार्य   विषय असूनही, शारीरिक शिक्षणाचे संपूर्ण वर्षात दहा पेक्षा कमी तास घेतले जातात कारण शिक्षक, त्यांच्या मुख्याध्यापकांच्या मान्यतेने, ते शिकवण्याकडे नियमितपणे दुर्लक्ष करतात.
            -मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

 

शारीरिक शिक्षण हे सार्वत्रिक नाही, ते सक्तीचे नाही, दर आठवड्याला खूप कमी तास असतात, आम्ही अतिशय कमी  साहित्यासह सुविधांमध्ये  काम करतो, आमच्याकडे शारीरिक विषयासह अनेक प्रलंबित समस्या आहेत.
                             - मंत्री, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन

क्रीडा आणि शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचे  कोणतेही अधिकृत पाठ्यपुस्तक नाहीत; क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक पाठात काय करावे हे ठरवण्यासाठी कोणताही रोडमॅप नाही.
          -शारीरिक शिक्षण शिक्षक,आफ्रिका 

महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापले अंगण स्वच्छ केल्यास संपूर्ण जग स्वच्छ होईल त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेत, महाविद्यालयात, क्लबमधे गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण राबविल्यास जगभरातील वरील चित्र बदलायला आपण हातभार लावू शकू. गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण कसे असावे यासंबंधी युनेस्कोने काही शिफारशी केल्या आहेत त्या पुढील ब्लॉग मधे पाहूया...  


संदर्भ : The Global State of Play: Report and recommendations on quality physical education.                                UNESKO. https://unesdoc.unesco.org/ark:/48223/pf0000390593

शिक्षकाची भूमिका बदलत आहे!!!

 मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती एक...