Tuesday, May 12, 2020

शारीरिक शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली


शारीरिक शिक्षणातील पर्यायी अध्यापन शैली

                                       
सध्या शालेय शिक्षणामध्ये अध्ययन आणि अध्यापनासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालू आहेत, शैक्षणिक प्रवाह येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन शैली / पद्धती  विकसित होत आहेत. एकूणच शालेय शिक्षण व्यवस्था शिक्षकांकडून-विद्यार्थ्यांकडे, शिकविण्याकडून - शिकण्याकडे मार्गक्रमण करत आहे. शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या पद्धतींमध्ये, शैलींमद्धे बदल होत आहे. शिक्षक शिक्षण देतो आणि विद्यार्थी ते घेतो अशाप्रकारचा भेद आता राहिलेला नाही कारण, शिक्षण ही कुणी कुणाला द्यायची वस्तू नाही ती आपली आपण आत्मसात करायची गोष्ट आहे. फक्त शिक्षकांनच सर्व शिकवायचं असतं ही समजूत, शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही हा विचार, विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या सर्व आज्ञा व आदेश बिन तक्रार व तत्परतेने पाळले पाहिजेत हा दंडक, शिकताना विद्यार्थ्यांना अनावश्यक हालचाली किंवा आवाज करता कामा नये ही अपेक्षा. शिक्षणातील ही सारी गृहीतकं बदलत आहेत (पाटील, 2012). अशा या बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षणामध्येही आवश्यक ते बदल होणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. वर्षानुवर्षं ज्या पद्धतीने शिकवीत आहे, त्यामध्ये काळानुरूप बदल जे इतर विषयामध्ये होत आहे तसे शारीरिक शिक्षणामद्ध्येही होणे ही काळाची गरज आहे. शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले असता काही विद्यार्थी सराव करत असतात तर काही विद्यार्थी बाजूला गप्पा मारत बसलेले असतात. या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणामध्ये कसे सामावून घेता येईल? आजच्या तरुण-तरुणींना शारीरिक शिक्षणाकडे आकर्षित करण्यासाठी अध्यापन शैली मध्ये काय बदल करावे लागतील? या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावे लागतील.
सर्वसाधारणपणे शिक्षक सांगतात व विद्यार्थी ऐकून त्याप्रमाणे कृती करतात या प्रकारे हुकूम शैली हि शारीरिक शिक्षणाला घट्ट चिकटून बसलेली अध्यापन शैली आहे. यापेक्षा काही वेगळ्या शैलीने/पद्धतीने अध्यापनाचा विचारही करू शकत नाही.  शारीरिक शिक्षणामध्ये काही घटकांचे अध्यापन करण्यासाठी हुकूम शैली निश्चितच परिणामकारक आहे. परंतु,  सर्वच घटक हुकूम पद्धतीने शिकविणे हे ही तितकेच चुकीचे होईल.  हुकूम शैलीची परिणामकारकता आपणा सर्वांच्या परिचयाची आहे परतू या पद्धतीमध्ये पाठातील सर्व निर्णय शिक्षक घेतात, विद्यार्थ्याच्या विचार क्षमतेला कुठेही वाव नसतो या मर्यादा कमी करण्यासाठी आपणास इतर अध्यापन शैलीचा विचार करावा लागेल. विनोबा म्हणतात कि, शिक्षणाची पद्धतच अशी हवी कि, आपण काहीतरी शिकत आहोत असे विद्यार्थ्याला वाटायला नको तसेच शिक्षकालाही असे वाटला नको कि आपण काहीतरी शिकवत आहोत. या वाक्याचा प्रत्यय आपणास घेण्यासाठी शारीरिक शिक्षणातील विविध अध्यापन शैली पुढीलप्रमाणे
या अध्यापन शैलीद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग खर्‍या अर्थाने वाढतो व त्यांना स्वातंत्र्य, मोकळेपणा मिळून शिकण्याचा आनंद मिळतो. प्रस्तुत लेखामद्धे मॉस्टन व अश्वर्थ यांनी मांडलेल्या अध्यापन शैलींचा उल्लेख केलेला आहे. अध्यापन शैली व पद्धती याबद्दल विविध श्रोतात वेगवेगळी माहिती मिळते. मुळात अध्यापन पद्धती या मानसशाश्रातील काही सिद्धानतावर आधारित आहेत. सदर लेखातील अध्यापन शैली मॉस्टन यांनी मांडतांना अध्यापन प्रक्रियेतील निर्णयावर आधारित आहेत 

शिक्षककेन्द्रित अध्यापन शैली
  1. हुकूम शैली        (Command Style)
  2.  सराव शैली       (Practice Style)
  3.  अन्योन्य शैली    (Reciprocal Style)
  4. सर्वसमावेशक शैली (Inclusion Style)
  5. स्व परीक्षण शैली      (Self Check Style )   
विद्यार्थीकेन्द्रित अध्यापन शैली
  1. निर्देशित शोध शैली   (Guided discovery Style)
  2.  केन्द्रोत्सरी शोध शैली (Divergent discovery Style )
  3. केंद्राभिगामी शोध शैली (Convergent discovery Style)
मी बीपीएड विद्यार्थी शिक्षकांना फिटनेस आणि कंडिशनिंग शिकवत असताना मी सर्वसाधारणपणे जे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अंमलबजावणी करतो. उदा. पार्टनरबरोबर करावयाचे व्यायाम. यामध्ये कोणते व्यायाम घ्यायचे हे निश्चित केलेले असते, त्याप्रमाणे ते व्यायाम प्रकार सांगतो आणि विद्यार्थी करतात. परंतु, गेल्या काही तासांमध्ये मी माझ्या या पद्धतीमध्ये काही बदल केले. एक दिवशी हुल्ला हुप बरोबर करायचे उपक्रम  घ्यायचे होते.  नियोजन केल्याप्रमाणे व्यायाम सुरू केले परंतु, काही व्यायाम घेतल्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हणालो की, हुप  बरोबर कोणते उपक्रम  करू शकता याचा विचार करा आणि करून पहा. ही सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थी एकटेच काय-काय करु शकतो याचा विचार करु लागले आणि त्याप्रमाणे कृती करू लागले तर, काही विद्यार्थी जोडीदाराबरोबर आणि गटामध्ये एकत्रितरीत्या वेगवेगळे उपक्रम विचार करून तयार करू लागले.  त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम व व्यायाम प्रकार करून दाखवले. विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले व्यायाम प्रकार कुठल्याही युट्यूब वरील व्हिडिओ मध्ये बघितलेले नाही किंवा कुठल्याही पुस्तकात दिलेले नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांमधून तयार केलेले व्यायाम होते. विशेष म्हणजे स्वतः तयार केलेले व्यायाम केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आणि मलाही माझ्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे वेगळेच समाधान जाणवत होते. सर्जनशीलता, नाविन्यता हे सर्व शब्द मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने अनुभवत होतो. शारीरिक शिक्षण म्हणजे म्हणजे केवळ शिक्षकाने आज्ञा देणे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करणे एवढेच अपेक्षित नाही हेही लक्षात आले(बरेच उशिरा), तसेच नविन पिढीला विचार करण्याची संधी दिली तर ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात याची जाणीव झाली.  या पद्धतीचे नाव आहे केन्द्रोत्सरी शोध शैली. या शैलीमध्ये एका प्रश्नाला अथवा परिस्थितीला विद्यार्थी अनेक उत्तरांचा आणि शक्यतांचा शोध घेतात. नवीन कौशलयांचे अध्यापन करतांना, विशेषकरून सुदृढताविषयक उपक्रम शिकविताना हि शैली उपयुक्त ठरते.
अन्योन्य शैली ही अशी शैली आहे ज्यामधे विद्यार्थी आपल्या जोडीदाराबरोबर शिकतो. एक विद्यार्थी कौशल्य सराव अथवा उपक्रम करतांना दूसरा विद्यार्थी त्याचे निरीक्षण करून अभिप्राय देतो. यामध्ये विद्यार्थी हा मिनी शिक्षकाची भूमिका करतो. काय निरीक्षण करायचे हे शिक्षकाने सांगीतलेले असते. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्यास काय होते हे अनुभव घेतल्यास अधिक चांगले समजेल. शाळेतील एका वर्गात साधारणपणे ५० ते ७० विद्यार्थिसंख्या असतांना अनेक घटकांसाठी या पद्धतीचा उपयोग केल्यास शिक्षकास निश्चित फायदा होईल.
सराव शैली ही अजून एक माझी आवडती शैली आहे. ज्यामधे विद्यार्थ्याला वैयक्तिक सरावाचे स्वातंत्र्य असते. विनोबा म्हणतात की स्वातंत्र्य हा शिक्षणाचा आत्मा आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या कौशल्याचा सराव घेतांना शिक्षक सर्वांना समान काठीण्यपातळीचा सराव देतात. वर्गामद्धे वेगवेगळ्या क्षमतेचे विद्यार्थी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांसाठी तो सराव अवघड असू शकतो तर, काहींसाठी तो अधिक सोपा असू शकतो. म्हणून प्रत्येकाला आपआपल्या क्षमतेला योग्य सराव करू देणारी ही पद्धत आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या
बास्केटबॉल अथवा हॅंडबॉल मधील ड्रिब्लिंग या कौशल्याचा सराव घ्यावयाचा असल्यास जागेवर ड्रिब्लिंग, चालत ड्रिब्लिंग, पळत ड्रिब्लिंग, जोडीदाराबरोबर ड्रिब्लिंग इत्यादी विविध सरावाच्या काठीण्यपातळी असू शकतील. यापैकी कोणत्या काठीण्यपातळीचा सराव करायचा हे शिक्षक नाही तेर विद्यार्थी स्वतः ठरवितो. तसेच काठीण्यपातळी  कधी बदलायची, सराव कधी सुरू करायचा कधी थांबायचे हेसुद्धा विद्यार्थी ठरवितात.
स्व परीक्षण शैली चे प्रमुख वैशिष्टे म्हणजे शिक्षकाने निश्चित केलेल्या सराव नियोजनानुसार वैयक्तिक सराव करणे. या शैली त शिक्षकाची भूमिका म्हणजे घटक निश्चित करणे, तर विद्यार्थ्याची भूमिका म्हणजे वैयक्तिक सराव करून शिक्षकांनी दिलेल्या निकषांप्रमाणे स्वतःच्या  कार्यामानाचे मूल्यमापन करणे.  स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी स्वतः घेणे, सामाजिक सुसंवादाचा विकास हे या शैलीचे वैशिष्ट आहे.   
सर्वसमावेशक शैली  हि नावानुसार कार्यमानात सर्व स्तरातील (कौशल्य अथवा सुदृढतेच्या दृष्टीने) विद्यार्थ्याचा पाठात समावेश करून घेण्यासाठी उपयुक्त शैली  आहे. ज्यामधे कमी मध्यम व क्लिष्ट अशा विविध काठीण्यपातळीचे कार्य विद्यार्थ्यांना दिले जाते आणि विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार काठिन्यपातळीची निवड करून सराव करावा. यादोन्ही शैलीमुळे विद्यार्थी सरावास व अध्ययनास प्रेरित होतात कारण त्यांना सरावात स्वातंत्र्य असते.       
निर्देशित शोध शैली हि विद्यार्थी केन्द्रित अध्यपन शैलीतील महत्वाची शैली  आहे. नावाप्रमाणेच या शैली मध्ये विद्यार्थी नवीन हालचालींचा, संकल्पनांचा, कौशल्याचा शोध घेतात व शिक्षक तो शोध घेण्यासाठी आवश्यक प्रश्नांची मालिका विद्यार्थ्यांसामोर मांडतो व विद्यार्थी त्या प्रश्नांचा शोध हालचालींचे वेगवेगळे प्रयोग करून शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रयोगाद्वारे शिकणे, समस्या सोडविणे हा या शैलीचा गाभा आहे.
केंद्राभिगामी शोध शैली मध्ये शिक्षक समस्येची मांडणी करतात व विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर शोधण्यास प्रवृत्त करतात. विद्यार्थी एकटे, गटात किंवा जोडीदारा बरोबर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. समस्या किंवा परिस्थिति काय मांडायची यासाठी शिक्षकांना विशेष तयारी करावी लागेल. कदाचित एका तासामध्ये उत्तर मिळणार नाही, कदाचित विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाली अपेक्षेप्रमाणे होणार नाही, परंतु विद्यार्थी बोधात्मकदृष्ट्या सक्रिय असतील, वेगळा विचार करतील व शारीरिक शिक्षण हे केवळ कारक क्षेत्राशीच (Psychomotor domain) संबंधित नसून, बोधात्मक (Cognitive domain) आणि भावात्मक क्षेत्राशी (Affective domain) सुद्धा निगडीत आहे, किंबहुना कारक बोधात्मक व भावात्मक अश्या तिन्ही क्षेत्रांचा विकास होण्यासाठी शारीरिक शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम आहे याची जाणीव सर्वांनाच होईल. शारीरिक शिक्षणातील  या शैली विद्यार्थ्यांची कुतूहल जिज्ञासा वाढविणाऱ्या,  स्वयम् अध्ययनाची प्रेरणा देणाऱ्या आहे. हुकूम शैली शिवाय इतर अध्यापन शैली प्रत्यक्ष राबविताना हाच अनुभव मिळतो. ज्ञान देणारी शिक्षण व्यवस्था बंद करून आता विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवायला शिकविणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागेल. शिक्षकच फक्त मुलांना शिकवू शकतो हा संकुचित दृष्टिकोन आता मागे पडला आहे. संधी दिली तर मुलं स्वतः सुद्धा शिकतात, परस्परांकडून  शिकतात. हे या सर्व अध्यापन  शैलीचा उपयोग केल्यानंतर लक्षात येते. असे म्हणतात की शिक्षक हा शाळेतील सौम्य हुकूमशहा असतो. नव्या शिक्षकांना आता हुकूम सोडीत राहण्याचा पवित्रा सोडावा लागेल. त्याची भूमिका आता थोरल्या भावाची  किंवा मित्रासारखी विकसित करावी लागेल.
या अध्यापन शैली शारीरिक शिक्षण तासात वापरणे शक्य होईल का ? विद्यार्थी प्रतिसाद देतील का? मोठ्या विद्यार्थी संख्या असल्यास या अध्यापन शैली कश्या राबविणार? साहित्य नसेल तर कसे करणार? असे एक अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात गर्दी करतील पण, बदल घडवायचा असेल, तर पर्याय शोधावे लागतील. बदल घडवायचे असतील तर, केवळ व्यवस्थेवर खापर फोडून चालणार नाही तर प्रत्यक्षा कृती करावी लागेल कारण, कृती हेच प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या विषयाचे महत्व पटवून देण्याच्या लढ्यामधे नावीन्यपूर्ण विचार, कृतीयुक्त सहभाग, कठोर परिश्रम घ्यावे लागतील. हि काही रेडिमेड मिळण्याची गोष्ट नव्हे, त्यासाठी  आपल्याला विषयाचे व पर्यायाने आपले स्टेटस बदलण्यासाठी अनेक प्रयोग, प्रयत्न करावे लागतील, त्यापैकि एक छोटा प्रयोग म्हणजे विविध अध्यापन शैली वापरुन अध्यापन करणे, त्याचे परिणाम सर्वांसमोर मांडणे व शारीरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात, विचारप्रक्रियेत व समजवर्तनात कसा आमुलाग्र बदल होतो हे दाखवून देणे. 
      
संदर्भ
Muska Mosston & Sara Ashworth (2008). Teaching Physical Education
विनोबा (2016). शिक्षण विचार. सर्व सेवा संघ प्रकाशन, वाराणसी.
ओशो (1993). शिक्षण क्रांति हीच खरी क्रांति. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन, पुणे.
पाटील लीला (2012). शिक्षण घेता-देता. उन्मेष प्रकाशन, पुणे.
पानसे रमेश (2016). रचनावादी शिक्षण. ग्राममंगल, पुणे.   


शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

Monday, April 27, 2020

उत्कृष्ठतेच्या दिशेने............

 उत्कृष्ठतेच्या दिशेने............ 

काही दिवसांपूर्वी मी महाविद्यालयीन शारीरिक शिक्षणातील उपक्रमासंबंधी एक सर्वेक्षण केले व त्याला महाराष्ट्रातील 60 महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये  चाललेल्या चांगल्या उपक्रमांचे संकलन करून ते जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, शारीरिक शिक्षणातील जे अॅक्टिविस्ट आहेत (म्हणजे आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृती करणारे) यांचे कार्य सर्वांसमोर आणणे, चांगल्या कामाची चर्चा घडून आणणे हा त्यामागचा उद्देश आहे.

आजची तरुण पिढी सोशल मीडिया आणि अभ्यास यातून मैदानवर येण्यासाठी पारंपारिक शारीरिक शिक्षणात बदल आवश्यक आहे आणि तरुण पिढीला आकर्षित करतील असे काही प्रयत्न आपल्या आजूबाजूला चालू आहे त्यांचा प्रसार यामध्यमातून करू या. असं म्हणतात की, “शिक्षक हुशार असण्याबरोबर, संवेदनशील आणि उत्तरदायी असणच  जास्त महत्वाचे आहे” याचे प्रतिबिंब काही महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमातून जाणवते. एकीकडे आत्मकेंद्रीपणा वाढत असतांना विविध महाविद्यालयीन शिक्षक आपल्या निस्वार्थीपनाच्या कक्षा रुंदावताना दिसत आहे ही बाब समाधान देऊन जाते. आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम शक्य आहे हा आत्मविश्वास मिळतो.

महाविद्यालयीन उपक्रमांमद्धे प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग. त्यामुळे शारीरिक शिक्षण केवळ फक्की आणि शिट्टी, शारीरिक शिक्षण म्हणजे केवळ खेळ व स्पर्धा, शारीरिक शिक्षण म्हणजे केवळ मैदान, यापुरतेच मर्यादित नसून काळाप्रमाणे आवश्यक बदल करत आहे हि बाब आशादायी आहे.  खेळ हे केवळ स्पर्धेसाठी व बक्षिसांसाठी मर्यादित नसून आनंदासाठी खेळ, उपजीविकेचे साधन अश्या नवीन आयामांची ओळख तरुण पिढीला करून द्यावी लागेल. या सर्विक्षणातून विविध महाविद्यालयमद्धे चालू असलेले नावीन्यपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे      

  1.  पुण्यातील एका महाविद्यालयाने त्यांच्याच संस्थेची शाळा खेळासाठी दत्तक घेतली आहे. त्यामध्यमातून शाळेला लागणार्‍या सर्व सोयीसुविधा, साहित्य, प्रशिक्षक हे महाविद्यालय पुरविते 
  2.  Womanista fest या नावाने एका महाविद्यालयात फक्त मुलींसाठी वेगवेगळ्या सहा खेळांच्या ( डॉजबॉल, रस्सीखेच, रिले, कॅरम, डबल्स बॅडमिंटन, डबल्स कॅरम ) स्पर्धा आठवडाभरासाठी राबविल्या जातात.
  3. महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये फिटनेस ची क्रेझ लक्षात घेऊन काही महाविद्यालयांमध्ये fittest boy/ girl, obstacle race, crossfit या स्पर्धा आयोजित केल्या जातात जेणेकरून जे विद्यार्थी खेळांमध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली जाते व या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
  4.  ट्रेकिंग व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स या बद्दलही महाविद्यालयांमध्ये सध्या वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईतील एक महाविद्यालय वर्षातून किमान तीन ट्रेक आयोजित करते. तर दुसर्‍या महाविद्यालयात इको ट्रेक या उपक्रमांमध्ये दर वर्षी विद्यार्थ्यांना जवळपासच्या एका गडावर ट्रेकिंग करण्यासाठी घेऊन जातात. पुढील वर्षी सायकलिंग, रनिंग ट्रायथलन असे क्लब महाविद्यालयात सुरू करण्याचा मानस आहे असे शिक्षकाने नमूद केले. 
  5. Monson mud Fiesta या नावाने एक आठवड्याचा उपक्रम मुंबईतील महाविद्यालयात आयोजित केला जातो. यामध्ये पावसाळ्यात एका आठवड्यात पाच खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात  ( Mud cricket, mud football, mud tag Rugby &  tug of war) 
  6. तंत्रज्ञानाचा उपयोग: एका महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षकाने इंस्टाग्राम पेज तयार केलेले आहे आणि व्यायाम, खेळ, प्रशिक्षण संबंधीची माहिती, उपक्रम आणि अचीवमेंट त्यावर टाकल्या जातात. तर राहुरी येथील महाविद्यालयातील शिक्षकाने तंत्रज्ञानाच्या आधारे महाविद्यालयात व्हिडिओ लायब्ररी सुरू केलेली आहे.  ज्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण, फिटनेस, विविध खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने, क्रीडाविषयक चित्रपट  याचा अंतर्भाव आहे व त्याचा विविध विद्यार्थी आवश्यकतेनुसार लाभ घेतात व भविष्यात क्रीडाविभागाची स्वतंत्र वेबसाइट तयार करावयाची आहे जेणेकरून सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या लायब्ररीचा उपयोग होईल असा मानस व्यक्त केला. तसेच नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिति अंतेर्गत येणार्‍या सर्व स्पर्धाचे वेळापत्रक, निकाल, परिपत्रके, नियम, अशी सर्व आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्यासाठी एका शिक्षकाने ॲप तयार केले आहे त्याचा फायदा  खेळाडू व शिक्षकांना होत आहे.     
  7. शारीरिक शिक्षण आणि क्रीडेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन: फन फिटनेस सेंटर या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील खेळाडूं मार्फत आसपासच्या  परिसरातील व शाळेतील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते व फिटनेस करून घेतला जातो. तर दुसर्‍या एका महाविद्यालयात MSEB कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा सलग दोन वर्षापासून घेतल्या जात आहे. एका महाविद्यालयातील शिक्षक खेळाडूंना घेऊन तीन वर्षापासून पाणी फाउंडेशन मध्ये श्रमदान करत आहे. अनेक शिक्षक आपआपल्या गावात, परिसरात होतकरू खेळाडूंना खेळाचे विशेष प्रशिक्षण, पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण मोफत देत आहे.  
  8. वेगळेपण: एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ड्रिलमार्च या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येक महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम होतो व त्यामध्ये खेळाडूंना बक्षिसे दिली जातात परंतु, एका महाविद्यालयात खेळाडूंबरोबर त्यांच्या पालकांचाही सत्कार केला जातो ही अतिशय चांगली बाब आहे.
  9. फिट इंडिया मोहिमेअंतर्गत एका महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी प्रत्येकी दहा व्यक्तींचा शारीरिक सुदृढतेचे सर्वेक्षण करतात अशाप्रकारे एकूण २२५०० लोकांचे सर्वेक्षण करून त्यावर आधारित रिपोर्ट तयार करतात ज्यामुळे समाजात सुदृढतेविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल
  10. रायझिंग स्टार समर कॅम्प याअंतर्गत एप्रिल महिन्यामध्ये पंधरा दिवसाचा समर कॅम्प आयोजित केला जातो यामध्ये हॉर्स रायडिंग, लाठीकाठी, स्केटिंग, योगा, सेल्फ डिफेन्स, मूलभूत कौशल्य अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. 
  11. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पंधरा दिवसांचा योग सर्टीफिकेट प्रोग्राम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. 
  12. एका महाविद्यालयात करके तो देखो या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना लांब उडी, उंच उडी, भालाफेक, अडथळा शर्यत, धावणे या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना यापैकी ज्या प्रकारात आवड असेल व कार्यमान असेल त्याचा वर्षभर सरावासाठी विद्यार्थ्यांना आवाहन व प्रबोधन केले जाते 
  13. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महाविद्यालयात वॉकर्स क्लब गेल्या पाच वर्षापासून चालविला जातो 
  14. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य, गणवेश मोफत दिला जातो तर काही महाविद्यालयात शिष्यवृत्ती दिली जाते. एका महाविद्यालयात खेळाडूंना प्रवेश फी मध्ये विशेष सवलत दिली जाते व महागडे क्रीडा साहित्य माजी विद्यार्थ्यांना, गरजू शाळांना पुरविले जाते. तर नांदेड मधील एका महाविद्यालयात गरजू खेळाडूंना राहण्याची मोफत सुविधा व डायट पुरविला जातो  
  15. आठवड्यातून दोन दिवस स्वसंरक्षणाचे उपक्रम सर्व वर्गांना नियमितपणे घेतले जातात. 
  16. महाविद्यालय म्हटलं म्हणजे वेगवेगळे विभाग, वेगवेगळे अभ्यासक्रम हे आलेच आणि बऱ्याच महाविद्यालयांमध्ये या वेगवेगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये,  संस्था अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातात व जो विभाग अधिक गुण मिळवतो त्या विभागाला सर्वसामान्य विजेतेपद दिले जाते. 
  17. विविध महाविद्यालयांमध्ये जागतिक ऑलिंपिक दिन,  राष्ट्रीय क्रीडा दिन, स्वछ भारत अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, जागतिक योग दिन यासारखे दिवस उत्साहात साजरे केले जातात.

शासकिय धोरण व अभ्यासक्रम यापलीकडे जाऊन तळमळीने आणि उत्स्फूर्तपणे कार्य करणार्‍या ध्येयवेड्या शिक्षकांना सल्यूट !   


शरद आहेर (9890025266)
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,पुणे 


शिक्षकाची भूमिका बदलत आहे!!!

  मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती ए...