Thursday, April 23, 2020

कर के देखो

कर के देखो

काही दिवसांपूर्वी मी शारीरिक शिक्षणातील उपक्रम यासंबंधी एक सर्वेक्षण केले व त्याला महाराष्ट्रातील 358 शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये चाललेल्या चांगल्या उपक्रमांचे संकलन करून ते जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, शारीरिक शिक्षणातील जे अॅक्टिविस्ट आहेत (म्हणजे आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृती करणारे) यांचे कार्य सर्वांसमोर आणणे, चांगल्या कामाची चर्चा घडून आणणे हा त्यामागचा उद्देश आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शासकीय धोरणामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये नैराश्याचे व चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. परंतु शासनाचे धोरण काहीही असले तरी प्रत्यक्ष मैदानावर काम करणारा शारीरिक शिक्षण शिक्षक कसे काम करत आहे याची झलक या सर्वेक्षणांमधून समोर आली आहे. शिक्षकांची तळमळ आणि उस्फूर्तता हेच घटक शिक्षण प्रक्रियेत परिणामकारक आहे हे दिसून येते. विकासाच्या नावाखाली  सिमेंटच्या जंगलामध्ये आणि मोबाइल-टीव्ही च्या विळख्यामद्धे विद्यार्थ्यांना खेळायला, हुंदडायला मिळते आहे का? त्यासाठी काय प्रयत्न वेगवेगळे शिक्षक करत आहे? हे थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे. या माहितीचे सामान्यीकरण (Generalization) करावे किंवा नाही? माहितीची सत्यता किती? याबद्दल मतांतरे असू शकतील. परंतु मिळणारा प्रतिसाद आणि उपक्रम उत्साह वाढवणारे आहे. कारण, याठिकाणी दिलेले उपक्रम केवळ कल्पना किंवा तत्वज्ञान नाही तर शाळेमध्ये प्रत्यक्ष राबविलेले आहे त्यामुळे ते आपणास विचार आणि कृती करण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच या लेखाचे शीर्षक कर के देखो असे दिले आहे. 

विविध शाळांमधून चाललेल्या उपक्रमांचा सारांश पुढीलप्रमाणे
1.       लेझिम या महाराष्ट्रीय तालबद्ध बाबीला आता एरोबीक्स आणि झुंबा या आधुनिक आणि आजच्या तरुण तरुणींना आवडणार्‍या उपक्रमाची साथ विविध शाळांमधून मिळत आहे
2.       स्पर्धा म्हणजे शालेय मुलांचा जीव की प्राण परंतु, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आंतर शालेय स्पर्धेत भाग घेता येत नाही म्हणून बर्‍याच शाळांमध्ये आंतरकुल स्पर्धा (दर महिन्याला/आठवड्याला) मोठ्या प्रमाणावर चालू आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धांचा अनुभव देता येतो व शाळेमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण व्हायला मदत होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थी खुप आनंदी असतात आणि त्यामुळे दररोजच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सक्रिय सहभाग दर्शवतात असेही एका शिक्षकाने नमूद केले आहे.
3.       शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दररोज सामूहिक सूर्यनमस्कार, फिटनेस अॅक्टिविटी घेतल्या जातात. तर इंदापूर येथील शाळेत १ ली ते ४ थी ३० मि दररोज मूलभूत कौशल्यांवर आधारित उपक्रम तर ५ वी ते १० वी वेगवेगळ्या पाच खेळांचे दररोज ६० मि अध्यापन केले जाते.
4.       पुण्यातील एका शाळेमध्ये वर्षभर दररोज एक तास (60 मि) अॅथलेटिक्स, मल्लखांब व जिमनास्टिक्स यापैकी विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार तास घेतले जातात. एका बाजूला शारीरिक शिक्षणाच्या तासांची संख्या कमी होत असतांना असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाठी महत्वपूर्ण आहे
5.       एका शाळेमध्ये मधल्या सुट्टीचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी केला जातो. त्यामध्ये खो खो, वॉलीबॉल, बॅडमिंटन यासारख्या खेळांच्या नियमामध्ये बदल करून स्पर्धा घेतल्या जातात तसेच चेस, कॅरम याचे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. अश्याप्रकारे बोरीवलीच्या शाळेमध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम चालतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशाप्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
6.       नगर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक शाळेमध्ये धाडसी खेळाचे प्रशिक्षण, होर्स रायडिंग, रायफल शूटिंग याचे प्रशिक्षण देत आहे
7.       हॅप्पी अवर (प्रत्येक शुक्रवारी) या नावाने एका शाळेमध्ये उपक्रम राबविला जातो त्याअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा, चित्रकला यासारखे उपक्रम घेतले जातात  
8.       ओतूर (जुन्नर) येथील शिक्षकाने संगीतलेले उपक्रम त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे
दर वर्षी प्रत्येक वर्गाच्या विदयार्थांच्या निवड चाचणी घेऊन ज्या विद्यार्थ्यांची एनर्जी लेव्हल आणि ज्याच्या मध्ये आवड व विशेष गुण दिसतात अशा विदयार्थ्यांना रोज संध्याकाळी त्या त्या गुणांमधून इव्हेटसाठी क्षमतेनुसार सराव करून घेतला जातो . रोज ४० पेक्षा जास्त विद्यार्थी नियमीत वर्षभर सराव करत आहेत . सर्व विद्यार्थी फिटनेस पासून ते प्रोफेशनल सराव करून घेतला जातो . त्याच बरोबर शाळेतील ज्या विदयार्थ्यांनमध्ये फॅट्स चे प्रमाण जास्त आहे अशा विदयार्थ्यांनच्या पालकांशी चर्चा करून त्या मुलाना फिटनेस साठी ग्राऊड वर बोलवतो . तसेच त्यांचा संपूर्ण डायटप्लानसह त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते . वर्षभर शाळेतील सर्व मुलांना खेळासाठी प्रोत्साहीत करून नियमित सरावासाठी वर्षभर बोलावण्याचा प्रयत्न असतो .  
9.       ओपन जिम हे सध्या शहरी भागामद्धे चांगलाच लोकप्रिय आहे. याचाच उपयोग शाळेमध्ये पुण्यातील एका शिक्षकाने केला आहे. तसेच वयोगाटानुसार फिटनेस स्पर्धा, आजारी न पडणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो
10.   शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा या पहिली ते दहावी पर्यंत घेतल्या जातात. तसेच शारीरिक शिक्षण या विषयाचे वेगळे प्रगती पुस्तक आहे.
11.   स्थूल व शारीरिक कमजोर विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या अगोदर व नंतर शारीरिक शिक्षणाचा विशेष कार्यक्रम राबविला जातो किवा शारीरिक शिक्षण तासाला सुद्धा ते करू शकतील अश्या अॅक्टिविटी दिल्या जातात. 2 ते 3 शाळांमध्ये असे स्थूल विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम चालू आहे ही अतिशय समाधानकारक बाब आहे.
12.   आठवड्यातून एक दिवस सर्व शिक्षकांसाठी टिम बिल्डिंग उपक्रम घेतले जातात
13.   पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून वर्षभरातील दोन उत्कृष्ट खेळाडूंना रु. 20000 दिले जातात.
    
असे म्हणतात की, एखादा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते त्यामुळे तो प्रश्न सुटायला मदत होते. हे वाक्य मला नेहमीच प्रेरित करते. मी लिहू शकतो का?त्याला साहित्य म्हणता येईल का? असे आपल्यासारख्या शिक्षकांना प्रश्न पडतात. परंतु, शिक्षणतज्ञ हेरंभ कुलकर्णी म्हणतात की, साहित्य म्हणजे काही अप्राप्य गोष्ट नाही. शिक्षकांनी आपल्या शाळेतील अनुभव लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला असे वाटतं, की आपल्या अनुभवात तसं काही विशेष नसतं. हे अनुभव सर्वच घेतात. पण तसं नसतं. म्हणूनच म्हणतात की,As you write personal and personal, it becomes universal and universal.” या अर्थाने आपण जितके आपले व्यक्तीगत अनुभव मांडत राहू, तितके ते जगाला आपले वाटतात.

शरद आहेर (9890025266)  
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे
   

Tuesday, March 24, 2020

व्यायामशाळा घरातील!


व्यायामशाळा घरातील!
कोरोंनामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालये, उद्योग, व्यायामशाळा सर्वच बंद आहे त्यामुळे वर्षानुवर्ष नियमितपणे व्यायाम करणार्‍या लोकांची यामुळे मोठी कोंडी झालेली आहे. सकाळी उठून पर्वतीला अथवा तळजाईला चालायला जाणारे  अनेक व्यायामप्रेमी घरात बसून आहे. ही परिस्थिति थोड्या कलावधीसाठी असली तरीही व्यायाम्प्रेमींनी नाउमेद न होता घरातील घरात व्यायाम करावे. आज आपण या लेखात  घरातील घरात जे व्यायाम करू शकतो ते पाहू या. या सर्व व्यायामांना कोणतेही विशेष साहित्य, जागा लागत नाही. कोरोंना विरुद्ध लढा देताना आपली प्रतिकारशक्ति चांगली ठेवण्यासाठी पुढील दहा व्यायामांचा निश्चित उपयोग होईल.

  1. जागेवर चालणे/धावणे: चालणे अथवा धावणे हा अतिशय उत्तम एरोबिक प्रकारचा व्यायाम आहे. ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता उंचवण्यास मदत होते. जागेवर चालतांना हातांची नेहमीप्रमाणे हालचाल करावी. हळूहळू हालचालींची गती वाढवावी. आपआपल्या सवयीप्रमाणे व क्षमतेप्रमाणे चालण्याचा अथवा धावण्याचा कालावधी ठरवावा.
  2. एरोबीक्स/ डांस: ज्यांना शक्य असेल त्यांनी घरामद्धे म्यूजिक लावावे व एरोबीक्स अथवा मनसोक्त डांस करावा. डांस हा उत्तम व्यायाम आहे व त्यामुळे कंटाळा येत नाही व सर्वच वयोगटासाठी चांगली अॅक्टिविटी आहे.
  3. सूर्यनमस्कार: हा सर्वांगीण आणि उत्तम व्यायाम आहे. घरातील सर्वांनी विशिष्ट लक्षं ठरवावे उदा. एका दिवशी सर्वांनी मिळून 100-200 याप्रमाणे एकत्रित सूर्यनमस्कार घालावे.   
  4.  बर्पी: हा सूर्यनमस्कार सारखाच कमी जागेत व सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये एकूण चार कृतींचा समावेश असतो. एका जागेवर उभे राहून एकला खाली बसून गोणही हात पायच्या दोन्ही बाजूला टेकवावे, दोनला दोन्ही पाय वेगात मागील बाजूला न्यावे  (यास्थितीत शरीरस्थिती पुशअप्स सारखी असते) तीनला पाय परत दोन्ही हातांच्या जवळ घेऊन यावे व चारला हवेत उडी घ्यावी अश्याप्रकारे एक बर्पी पूर्ण होते. अश्याप्रकारे 10 ते 15 बर्पीचे दोन ते तीन सेट करावे. 
  5. पुश-अप्स: हा अप्पर बॉडी स्नायुंसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. क्षमतेप्रमाणे 10 ते 20 रेपिटिशन चे दोन ते तीन सेट करावे. पूर्ण पुश अप्स करता येत नसल्यास गुडघे टेकून पुश अप्स करावे. 
  6.   स्क्वाट: हा कमरेच्या खालील स्नायुंसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. क्षमतेप्रमाणे 10 ते 20 रेपिटिशन चे दोन ते तीन सेट करावे. स्क्वाट हे हाफ (खुर्चीवर बसलेल्या स्थितीप्रमाणे) अथवा फूल असतात. वयोवृधांनी खुर्चीवर बसावे व उठावे अथवा स्क्वाट करतांना आधार घ्यावा. तरुणांनी शक्य असल्यास स्क्वाट करतांना उड्या माराव्या (जंप स्क्वाट)
  7. लंगेस: हासुद्धा कमरेच्या खालील स्नायुंसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. हा व्यायाम करतांना उभ्या स्थितीत एक पाय एक पाऊल टाकतो त्याप्रमाणे पुढे टाकावा व गुडघ्याधे वाकून खाली जाऊन वर यावे याप्रमाणे एक पाय पुढे असतांना 10 ते 20 याप्रमाणे दोन्ही पायांनी व्यायाम करावा. तोल सांभाळण्यासाठी हात बाजूला ठेवावे अथवा कमरेवर ठेवावे.
  8. सीट अप्स: हा पोटातील स्नायुंसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. पाठीवर झोपून पाय गुधघ्यात वाकऊन हात मानेच्या मागे अथवा बाजूला ठेवावे व यास्थितीत छातीचा भाग वर व खाली करावा. 12-15-20-25 या रेपिटिशन चे दोन ते तीन सेट करावे. पोटातील  स्नायुंची ताकद व दमदारपणासाठी हा चांगला व्यायाम आहे.  
  9.  प्लांक: पूश अप्स च्या स्थितीत स्थिर स्थितीत थांबणे म्हणजे प्लांक व्यायाम. हा पोट, पाठ, नितंब या कोअर स्नायुंसाठी अतिशय उत्तम व्यायाम आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे यास्थितीत किती वेळ स्थिर थांबू शकतो तितकावेळ स्थिर थांबावे. 
  10. विविध आसने व तानाचे व्यायाम: शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी विविध आसने व तानाचे (स्ट्रेचिंग) चे व्यायाम करावे.
अश्याप्रकारे 20 ते 30 मी. घरात सर्वांबरोबर व्यायाम केल्यास शरीरातील स्नायू, सांधे या सर्वांना व्यायाम होईल, प्रतिकार शक्ति चांगली राहील व कोरोंना मुळे बाहेर न जाता घरीच व्यायाम करा.  

                                          शरद आहेर
                        चन्द्रशेखर, आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे

Thursday, December 5, 2019

माझे प्रयोग

माझे प्रयोग!

सध्या मी बीपीएड विद्यार्थी शिक्षकांना फिटनेस आणि कंडिशनिंग शिकवत आहे. हे शिकवत असताना मी सर्वसाधारणपणे जे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अंमलबजावणी करतो. उदा. पार्टनर  बरोबर करावयाचे व्यायाम. यामध्ये कोणते व्यायाम घ्यायचे हे निश्चित केलेले असते, त्याप्रमाणे ते व्यायाम प्रकार सांगतो आणि विद्यार्थी करतात. परंतु, गेल्या काही तासांमध्ये मी माझ्या या पद्धतीमध्ये काही बदल केले. एक दिवशी Hoop Activities घ्यायच्या होत्या. नियोजन केल्याप्रमाणे व्यायाम सुरू केले परंतु, काही व्यायाम घेतल्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हणालो की, Hoop बरोबर कोणत्या activities करू शकता याचा विचार करा आणि करून पहा. ही सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थी एकटेच काय-काय करु शकतो याचा विचार करु लागले आणि त्याप्रमाणे कृती करू लागले तर, काही विद्यार्थी जोडीदाराबरोबर आणि गटामध्ये एकत्रितरीत्या वेगवेगळे व्यायाम विचार करून तयार करू लागली. 
तोच अनुभव Partner activities घेतानाही आला. सुरुवातीला मी काही जोडीदाराबरोबर चे व्यायाम सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या जोडीदाराबरोबर कोणते व्यायाम करू शकतो याचा विचार करा व ते करून पहा अशी सूचना केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण व्यायाम प्रकार करून दाखवले. 
विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले व्यायाम प्रकार कुठल्याही YouTube वरील व्हिडिओ मध्ये बघितलेले नाही किंवा कुठल्याही पुस्तकात दिलेले नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचार करून तयार केलेले व्यायाम होते. विशेष म्हणजे स्वतः तयार केलेले व्यायाम केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आणि मलाही माझ्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे वेगळेच समाधान जाणवत होते.
Innovation, Creativity, Design thinking हे सर्व शब्द मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने अनुभवत होतो. शारीरिक शिक्षण म्हणजे म्हणजे केवळ शिक्षकाने आज्ञा देणे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करणे एवढेच अपेक्षित नाही हेही लक्षात आले (बरेच उशिरा), तसेच नवीन पिढीला विचार करण्याची संधी दिली तर ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात याची जाणीव झाली.  

Tuesday, October 1, 2019

शिक्षणतज्ञ महात्मा गांधी

शिक्षणतज्ञ महात्मा गांधी

युनेस्कोने जगभरातील 100 शिक्षण तज्ञांची चरित्रे प्रसिद्ध केली त्यामध्ये भारतामधील केवळ तीन शिक्षण तज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जे. पी. नाईक. महात्मा गांधींची शिक्षणतज्ञ म्हणून ओळख खूपच थोड्या लोकांना माहीत आहे त्यापैकीच मी एक होतो. कृतिशीलता हा महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात महत्वाचं गुणवैशिष्ट्ये.त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या स्वतः अंगीकारलेल्या होत्या त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी सांगितलेले शिक्षण विषयक विचार हे केवळ सांगितले नाही तर अशा शिक्षण विचारांवर आधारित काही प्रयोग त्यांनी केले. अशा या गांधीप्रणीत शिक्षण विषयक प्रयोगांची ओळख करून देणारे प्रा. रमेश पानसे यांचे 'नई तालीम' हे पुस्तक वाचले तेव्हा महात्मा गांधींचे शिक्षण विषयक विचार किती दूरगामी होते, सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये भेडसाव नाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे महात्मा गांधींच्या शिक्षण विषयक विचारांमध्ये आणि प्रयोगांमध्ये दडलेली आहे याची जाणीव झाली. शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहे परंतु महात्मा गांधीजींच्या 'नई तालीम' या पुस्तकामुळे विचारांना एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला व शिक्षण विषयक समज वाढली आणि ती आपणा सर्वांशी शेअर करावी म्हणून या पुस्तकातील काही ही महत्त्वाचे विचार मांडत आहे.
 गांधीजींनी या 'नई तालीमच्या' शिक्षण विषयक नव्या संकल्पनेची व्याख्या 'जीवनासाठी आणि जिवनाकरवी शिक्षण' अशी केली आहे. शाळेतील जीवनात साक्षरतेचे शिक्षण होते पण जीवनाच्या शाळेत जीवन जगण्याचे शिक्षण होत असते शिक्षण हे जीवनाशी बांधलेले नसेल तर ते अपुरे शिक्षण होय अशी गांधीजींची धारणा होती. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण हे केवळ शाळा आणि पाठ्यपुस्तक केंद्रित झालेले आहे अश्यावेळी महात्मा गांधीजींनी सांगितलेली शिक्षणाची ही व्याख्या खूपच महत्त्वाची वाटते, ज्यामध्ये जीवनाचा आणि शिक्षणाचा संबंध असायला हवा  त्याचबरोबर त्यांनी उद्योग आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध बांधला आणि उद्योगकेंद्री शिक्षणाचा विचार मांडला. शिक्षणाच्या केंद्रस्थानी एखादा उत्पादक हस्तोद्योग असावा त्याच्या माध्यमातून सर्व विषयांचे शिक्षण दिले जावे आणि हा हस्तोद्योग विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थिती आणि परिचित अशा वातावरणातील मुख्य उद्योग असावा. शाळेमध्ये विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल हे सर्व विषय त्या उद्योगाशी संबंधित शिकवावे. ज्यामुळे तरुण स्वावलंबी होतील. सध्याच्या काळात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या बेकार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांत्रिकीकरणामुळे नोकर्‍या कमी झाल्या आहेत अशावेळी महात्मा गांधीजींचा हा विचार खूपच महत्त्वाचा वाटतो. ज्ञान आणि काम हे बरोबरच चालायला हवे त्याची फारकत होता कामा नये. बुद्धी आणि श्रम यांची फारकत करण्यात आल्यामुळेच खेडे गावांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सध्याच्याा शिक्षण पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीची पहिले २० ते २२ वर्ष ज्ञान घेण्यासाठी जातात आणि त्यानंतर ती व्यक्ती कामाच्या शोधात बाहेर पडते असे दोन वेगवेगळे टप्पे गांधीजींना मान्य नव्हते. सर्व शिक्षण प्रक्रिया हीच मुळी करून शिकण्याची श्रम केंद्री अशी झाली पाहिजे. माणूस जे काही काम करीत असतो त्यातच त्याचे स्वतःचे शिक्षणही होत असते..साक्षर शिक्षणाचे अतिरेकी महत्त्व कमी करून त्याने रिकामी केलेली जागा कला शिक्षणाला, क्रीडा शिक्षणाला देण्याची अनिवार्य गरज आहे. शिक्षण हे मातृभाषेमधूनच द्यायला हवे, इंग्रजी शिक्षणाचे जोखड मानेवर आहे तोवर स्वराज्य अशक्य आहे हे गांधीजी ठामपणे बजावतात. 
विविध विषयांतील उपलब्ध असलेले ज्ञान मुलांपर्यंत कसे पोचवावे याचा विचार पारंपारिक शिक्षण पद्धतीत अभिप्रेत असतो, विद्यार्थ्यांच्या अंगाने अभ्यासक्रमाचा विचार होत नाही हा सध्याच्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. 
जोपर्यंत मुलांच्या आणि शिक्षकांच्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात स्वच्छता व आरोग्य यांचा पाया बळकट केला जात नाही तोवर त्यावर शिक्षणाची इमारत उभी राहणार नाही हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमात आरोग्य शिक्षणाला प्रमुख स्थान द्यावे. जोवर स्वतः शिक्षकच शरीराने आणि मनाने निरोगी होत नाही, आरोग्याचे नियम स्वतः पाळत नाहीत तोवर ते भावी पिढीला शिकवू शकणार नाहीत. 
एक मुल ही एक परिपूर्ण गोष्ट आहे मूल अपूर्ण आहे असे मानून त्याला पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा आटापिटा असेल तर ते खरे शिक्षण नव्हे नव्हे. त्यामुळे आमच्या जवळच्या बाबी त्यांच्या मेंदूत ठासून भरण्याची जरुरी नाही असे नेहमीच मानले जाते की मुलांना घडविणे हे आपले काम आहे पण मुले घडलेली असतात. 
शिक्षण ही जास्तीत जास्त घेण्याची वस्तू आहे आणि कमीत कमी देण्याची वस्तू आहे जिथे शिक्षण द्यायचे आहे तेथे ते कमीत कमी दिले पाहिजे जास्तीत जास्त घेऊ दिले पाहिजे.
दुर्दैवाने अनेक सरकारे आले आणि गेली परंतु महात्मा गांधींच्या शिक्षणविचारांना मूर्त स्वरूप येऊ शकले नाही.भविष्यात हे विचार प्रतक्षात उतरतील अशी अपेक्षा करू या!!!

Sunday, September 1, 2019

स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग

आंतरराष्ट्रीय स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कार्यशाळा, ग्वालियर – २०१९

ग्वालियर येथील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या विद्यापीठामध्ये स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग या विषयासंबंधी एक कार्यशाळा दिनांक २० ते २६ ऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला व महाविद्यालयातील इतर तीन शिक्षकांना मिळाली. या कार्यशाळेमध्ये आम्हाला आलेले अनुभव व मिळालेली माहिती आपल्यासोबत शेअर करण्यासाठी हा लेख लिहीत आहे.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो. कार्लो बुझेचेली हे लाभले होते. प्रो. कार्लो हे त्यांच्या काळातील जागतिक दर्जाचे १०० मीटर धावपटू आहेत व सध्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. ते क्रीडा प्रशिक्षण विषयातील तज्ञ व या विषयातील ‘Periodization' या लोकप्रिय पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. या कार्यशाळेमध्ये प्रकर्षाने जाणवलेल्या काही प्रमुख बाबी खालील प्रमाणे:
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे दीर्घकालीन नियोजन - एक ते चार वर्षांचे - निश्चित केलेले असते पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू वगळता इतर खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे दीर्घकालीन नियोजन केलेले दिसून येत नाही. दीर्घकालीन कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. 
तसेच प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक गोष्टींच्या नोंदी करणे महत्वाचे आहे (भार/लोड, रेपिटिशन, टेम्पो, सेट, इ.). ह्या नोंदीवर अभ्यास करून प्रशिक्षणात बदल करणे महत्वाचे आहे. प्रो. कर्लो यांच्या वैयक्तिक भार प्रशिक्षणादरम्यान त्यांनी प्रत्येक सेट मधील विश्रांती काळात बर्‍याच नोंदी केल्या व त्यामुळे ह्या नोंदींचे महत्व अधिक पटले. 
लोडिंग व अनलोडिंग: प्रो. कार्लो यांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रमाणात खेळाडूचा लोड (load) वाढवला जातो त्या प्रमाणात तो कमी केला जात नाही (Unloading or deloading). त्यांच्या प्रमाणे एका Monocycle मध्ये किमान चार ते आठ आठवड्याचा संक्रमण (Transition) कालावधी असणे गरजेचे आहे, तर एका Microcycle मध्ये एक ते दोन सत्र Unloading/deloading ची असावी. नुसतेच दीर्घकालीन नियोजनामध्ये नसून प्रत्येक दिवशीच्या वर्कआऊट करताना दोन सेट मधील विश्रांती देखील फार महत्त्वाची असते आणि ती शास्त्रीय आधाराचा विचार करून घ्यावी. 
विश्रांती ही बर्‍याच शास्त्रीय गोष्टींवर अवलंबून असते. आपण जो खेळ खेळत आहोत त्या खेळासाठी कोणती ऊर्जा संस्था उपयोगात येते Aerobic की Anaerobic ह्यावर विश्रांती अवलंबून असावी. उदा. Power workout करताना विश्रांतीचे प्रमाण (ratio) हे १:४०-६० म्हणजे एक सेकंद वर्कआउट केला असेल तर त्यानंतर चाळीस ते साठ सेकंद विश्रांती घ्यायला हवी. उदा. १०० मीटर स्प्रिंट ऑलआऊट १२ सेकंदामध्ये पूर्ण केल्यास त्यानंतर किमान आठ मिनिटांची विश्रांती घ्यावी त्यानंतर दुसरी स्प्रिंट करावी. अशाप्रकारे दोन सेटमधील विश्रांती ही प्रत्येक खेळा नुसार व तीव्रतेनुसार वेगवेगळी असेल. 
प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यापूर्वी काही प्रमुख गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. या गोष्टी म्हणजे विविध शास्त्र व त्यांचे खेळातील महत्व, खेळाचे स्वरूप, गरज, विविध ऊर्जा संस्था व त्यांचे खेळामधील वापर, हालचाली, खेळाडूची शरीरयष्टी व शारीरिक व मानसिक स्थिती, इ.
प्रो. कार्लो यांचा ऊर्जा संस्थेवर अधिक भर होता. प्रशिक्षणाचे नियोजन करताना खेळासाठी लागणाऱ्या ऊर्जा संस्थेचा (Energy System – Anaerobic Alactic, Anaerobic Lactic & Aerobic) विचार प्रामुख्याने करावा असे ते म्हणाले.
कोणतेही प्रशिक्षण करताना अंतर (Distance), कालावधी (Time), तीव्रता (intensity) आणि विश्रांती (Rest) हे घटक विचारात घ्यावे.
प्रशिक्षण हे स्नायूंना नाही तर हालचालींना द्यावे (Train movement not muscle)
प्रशिक्षणा दरम्यान Myofascial Release या वैद्यकीय उपचार तंत्राचा उपयोग जरुर करावा. अस्थी स्नायूंच्या मोबिलिटीसाठी व दुख (Pain) कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.
वर्कआऊट करताना विविध इतर यंत्र व तंत्रज्ञानाचा उपयोग प्रभावी ठरतो उदा. Accelerometer (train with push). वर्कआऊट दरम्यानची विविध माहिती (functional movements, workloads, biometric markers, position-specific patterns in movement, design more efficient sports-specific training programs for performance optimization, and screen for potential causes of injury) या यंत्राद्वारे संकलित केली जाते – हालचाल व हालचालींच्या गतीचे मापन, गरजेनुसार प्रशिक्षण देता येते, इ. अनेक फायदे या तंत्रज्ञानाच्या आहेत. 
Sprinting athlete ला प्रशिक्षण देताना ‘heavy sledge' चा उपयोग जरूर करावा. या प्रशिक्षणाचा वापर कार्यामन अधिक चांगल्या रित्या व पटकन उंचविण्यासाठी उपयुक्त ठरतो. या परिणामकारक साधनाचा वापर विविध प्रशिक्षक करत नाहीत व एका चांगल्या प्रशिक्षण पद्धतीपासून वंचित आहेत. या पद्धतीचा वापर स्प्रिंटिंगसाठी जरूर करावा व परिणाम पाहावा. 
Sprinting आणि throwing event साठी प्रमुख व्यायामामध्ये Olympic lift, Deadlift, Quarter squat, Bench press, Kettlebell swing हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रो. कर्लो यांनी Deadlift, Squat, Bench press व Kettlebell swing ह्या व्यायाम प्रकारांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देखील करून घेतले. या प्रत्यक्ष प्रशिक्षणात त्यांचा भर अधिक वजनावर नसून शरीर स्थिति, हालचाल, टेम्पो (tempo) यावरच अधिक होता. पहिले योग्य तंत्र आत्मसात करा व मग प्रशिक्षण भार वाढवणे. 
प्रो. कार्लो यांनी प्रशिक्षक निरीक्षण यावर देखील खूप भर द्यावा असे संगितले. वर्क-आऊट करताना इतर कोणाशी चर्चा किंवा लक्ष न देणे हे टाळून मार्गदर्शकाने खेळाडूचे बारकाईने निरीक्षण करणे महत्वाचे आहे. खेळाडू आपल्याकडे आला की जा वार्म-अप कर असे सांगून आपले काम करणे टाळा. खेळाडूच्या प्रत्येक हालचाळीकडे बारीक लक्ष ठेवा. त्याच्या व्यायामामध्ये होत असलेल्या चूकांची दुरुस्ती करायला हवी (Observe – Analyze – Resolve). हालचाली करत असताना वेगवेगळ्या सांध्यामधील कोन योग्य आहे का? हालचालींचा वेग योग्य आहे का? इ. सर्व बाबींचे अतिशय बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित आहे. 
ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ कॉलेजमध्ये आला होता तेव्हा त्याने विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की, भारतामध्ये चांगल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, या सारख्या सर्वच स्पर्धा खेळावे लागतात, परंतु तुलनेने अमेरिका, चीन, इ. देशांमधील प्रमुख खेळाडू हे केवळ महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये - ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धा – सहभागी होतात. ह्यामुळे त्यांना प्रमुख स्पर्धांवर लक्ष केंद्रित करता येते आणि परिणामी रिझल्ट चांगले मिळतात. त्यामुळे चांगल्या खेळाडूला वर्षभरात कोणत्या स्पर्धेला पाठवायचे याचा सर्व चकोचेसनी विचार करायला हवा ज्यामुळे खेळाडूवर अतिरिक्त ताण येणार नाही.
वेगवेगळ्या खेळाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोचेस किंवा फिटनेस ट्रेनर यांनी ट्यूडर बोंपा आणि कार्लो बुझेचेली (Tudor Bompa & Carlo Buzzichelli) यांचे Periodization हे पुस्तक वाचल्यास अधिक सविस्तर माहिती मिळू शकेल.
प्रो. कार्लो यांनी असे संगितले की एकूणच भारतामध्ये भरपूर टॅलेंट आहे पण शास्त्रीय प्रशिक्षण व प्रशिक्षकाची गरज आहे. ज्ञान ग्रहण करा – पुस्तकातून किंवा तज्ञांकडून पण ज्ञान जसेच तसे वापरू नये. मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून विविध छोटे प्रयोग करा व खेळाडूप्रमाणे वैयक्तिक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करा. प्रशिक्षण कार्यक्रमापेक्षा प्रशिक्षण सिधांत विचारात घ्या व आपले स्व:तचे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करा. 
वेगवेगळ्या क्लब आणि संस्थांमधून उभरते खेळाडू आणि त्याचे कॉचेस खूप सराव करुन घाम गाळत आहेत, परंतु यास शास्त्रीय आधाराची जोड मिळाल्यास निश्चित रिझल्ट मिळतील व खेळाडू आणि कोचेस करत असलेल्या कष्टाचे चिज होईल असे वाटते. या लेखाद्वारे आपणास मिळालेले ज्ञान व अनुभव देण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ह्या लेखाचा उपयोग आपण करीत असलेल्या प्रशिक्षणात होईल व भविष्यात चांगले खेळाडू आपण तयार कराल अशी आशा वाटते.

शरद आहेर, अमित प्रभू, महेश देशपांडे आणि श्रीकांत महाडिक 
महाराष्ट्रीय मंडळाचे
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे
मो. ९८९००२५२६६

शिक्षकाची भूमिका बदलत आहे!!!

  मी शिक्षक होण्यासाठीची पदवी घेतली म्हणजे मी शिक्षक झालो का? संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात शिक्षक म्हणून जी प्रतिमा तयार होते ती ए...