२०२२-२४ या बॅचच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप नुकतीच संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी बी पी एड मध्ये आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी प्रत्यक्ष वातावरणात जाऊन करण्याची संधि यानिमित्ताने विद्यार्थी शिक्षकांना असते. विद्यार्थी शिक्षकांच्या मन,मेंदू आणि मनगटाची परीक्षा बघणारा हा उपक्रम असतो. यावर्षी विद्यार्थ्यांनी सहा आठवड्यात शाळेमध्ये घेतलेले अनुभव ऐकताना आशा,निराशा,उत्साह,निरुत्साह अशा भावनांचा कल्लोळ मनामध्ये जात-येत होता. शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे तासच नाही,शिक्षक नाही,साहित्य नाही या सर्व निराशा आणणाऱ्या वातावरणात स्नेहा भवारी या विद्यार्थिनीने तिच्या शाळेत घेतलेले अनुभव सांगायला सुरुवात केल्यानंतर आत्तापर्यंत आलेली निराशा आणि मरगळ काही क्षणात निघून गेली आणि संपूर्ण वातावरणच उत्साही आणि सकारात्मक जाणवू लागले. स्नेहाने तिची इंटर्नशिप कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नर येथे पूर्ण केली.
स्नेहाने इंटर्नशिप दरम्यान जे काही कार्य केले होते त्या सर्व कार्याचे डॉक्युमेंटेशन अतिशय उत्तम पद्धतीने मेंटेन केलेले होते. इंटर्नशिप मध्ये विद्यार्थी शिक्षकाने दैनंदिन जे काही काम करतो त्याची नोंद दैनंदिनी मध्ये करावी अशी अपेक्षा असते. बऱ्याचदा विद्यार्थी केवळ सबमिशन म्हणून या दैनंदिन कडे बघतात. परंतु स्नेहाने तिची दैनंदिनी अतिशय चांगल्या रीतीने मेंटेन केलेली होती. दैनंदिनी मध्ये तिने दोन भाग केलेले होते. पहिल्या पानावर तिला दररोज काय करायचे आहे याचे नियोजन लिहिलेले होते तर पुढच्या पानावर झालेल्या नियोजनानुसार अंमलबजावणी झाली की नाही? हे लिहिलेले होते. त्याचा नमुना खालील प्रमाणे.
१. दैनंदिनी
२. फीडबॅक
स्नेहाने इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आणि शाळेतील शिक्षकांकडून स्वतःचा फीडबॅक घेतला व तो व्यवस्थित रित्या सादर केला. विद्यार्थ्यांनी लिहिलेले फीडबॅक वाचल्यानंतर डोळे पाणावले होते आणि स्नेहाच्या नावाप्रमाणेच इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी स्नेहाने खूप चांगला स्नेह जपला होता हे जाणवले.

३. मॉडीफाईड साहित्य निर्मिती
असे म्हणतात की, व्यक्तीने प्रश्नाचा नव्हे तर उत्तराचा भाग व्हायला हवे त्याचा प्रत्यय स्नेहाचे सादरीकरण बघतांना आला. बरेच विद्यार्थी मुख्याध्यापक,इतर शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्याबद्दल तक्रार करण्यात रमत होती त्याचवेळी स्नेहा शाळेतील समस्यांवर उत्तर शोधत होती. इंटर्नशिप दरम्यान स्नेहाने शाळेमध्ये हूप्स, कोन, बिनबॅग हे मॉडीफाईड साहित्य तयार केले व त्यावर पाठ घेतले.
मैदानावर एरोबिक्स घेण्यासाठी शाळेमध्ये म्युझिक सिस्टीम नव्हती म्हणून स्नेहाने स्वतः एक म्युझिक सिस्टीम घेतली व त्याला विद्यार्थिनींकडून डेकोरेट करून घेतली.
असे म्हणतात की, " शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील असनंच जास्त महत्त्वाचे आहे" या वाक्याचा प्रत्यय स्नेहाच्या कार्याकडे पाहून येतो. शिक्षकांमध्ये आत्मकेंद्रीपणा वाढत असताना स्नेहा सारख्या प्रामाणिक,संवेदनशील, सृजनशील शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे.