शालेय शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा वेगवेगळ्या बोर्ड्सचा वेगळा आहे. विषयाचे नाव आरोग्य व शारीरिक शिक्षण असे आहे परंतु प्रत्यक्षात शाळेमध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाप्रमाणे चालते की क्रीडेवर अधिक भर दिला जातो याबाबत शारीरिक शिक्षण शिक्षक आणि शारीरिक शिक्षणातील तज्ञ यांच्यामध्ये मतमतांतरे आहे. बोर्डाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम राबवावा की स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल करून अभ्यासक्रम राबवावा याबद्दलही शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये द्विधा मनस्थिती आढळते. काही शाळांमध्ये मात्र त्यांच्या शाळेपुरता शारीरिक शिक्षणाचा वेगळा अभ्यासक्रम तयार करून तो राबविला जात आहे. शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत व हे मॉडेल्स वेगवेगळ्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत. शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमांचे मॉडेल्स कोणते ते जाणून घेऊ या
बहूपक्रम मॉडेल: हे मॉडेल विशेषत: माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम तयार करताना उपयुक्त आहे.या मॉडेलचा प्राथमिक हेतू विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शारीरिक उपक्रम व खेळांची ओळख करून देणे हे होय.
सुदृढता शिक्षण मॉडेल: सुदृढता शिक्षण मॉडेलचा उद्देश शारीरिक स्वास्थ्य सुधारणे आणि आयुष्यभर टिकविणे हे आहे.
अजीवन शारीरिक उपक्रम मॉडेल: विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचा शारीरिक उपक्रम निवडून त्यामध्ये अजीवन सहभागी होण्यासाठी व सक्रिय राहण्यासाठी मदत करणे हे या मॉडेलचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
हालचाल शिक्षण मॉडेल: नृत्य, खेळ आणि जिम्नॅस्टिक्ससारख्या क्षेत्रातील विविध हालचालींच्या कौशल्यांचा शोध घेण्यावर जोर देणे हे या क्षणाचे शैक्षणिक मॉडेलचे मूळ उद्दीष्ट आहेत.
क्रीडा शिक्षण मॉडेल: सायडनटॉप यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा साक्षर बनविण्याच्या उद्देशाने क्रीडा शिक्षण मॉडेलची रचना केली.विद्यार्थ्यांना विविध खेळ व शारिरीक क्रिया शिकवून प्रामाणिकपणाची मनोवृत्ती निर्माण करणे आणि केवळ चांगले खेळाडूच नव्हे तर क्रीडाप्रेमी व्यक्तींचा विकास करणे हे या मॉडेलचे मुख्य उद्दीष्ट आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाची विविध मॉडेल्स आहेत. परंतु बहु-उपक्रम मॉडेल अधिक वापरले जात होते.परंतु गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाचे मॉडेल अधिकाधिक वापरले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एक अहवालनुसार "क्रीडा आणि क्रियाशील मनोरंजन (Active Recreation) हे सर्व वयोगटाच्या आणि क्षमतांच्या व्यक्तीच्या शारीरिक क्रियाशीलतेच्या वाढीसाठी मदत करतात." हे मॉडेल कोणत्या शाळेत राबविले जाते? कसे राबविले जाते याबाबतीत उत्सुकता होती. त्यासाठी काही शिक्षक मित्रांकडून माहिती घेऊन ज्या शाळांमध्ये हे मॉडेल राबवले जात आहे त्या शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली असता महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी समोर आल्या त्या पुढील प्रमाणे
इयत्ता पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षण मॉडेल लागू केले जाते
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख करून दिली जाते.
पुढच्या वर्गात म्हणजे तिसर्या इयत्तेपासून एका खेळामध्ये स्पेशलायझेशन दिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, द्वंदात्मक खेळ इत्यादी विविध पर्याय दिले जातात.
क्रीडा शिक्षण मॉडेल शाळेच्या आधी किंवा नंतर लागू केले जाते, शाळेच्या नियमित वेळेदरम्यान नाही.
क्रीडा शिक्षण मॉडेल दररोज सोमवार ते शनिवार या कालावधीत राबविला जातो आणि एका सत्राचा कालावधी 90 मिनिटांचा असतो.
प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमला जातो
प्रत्येक खेळाचे वार्षिक नियोजन आणि सत्र नियोजन असते
विद्यार्थी दरवर्षी एक वेगळा खेळ निवडू शकतो किंवा प्रत्येक वर्षी समान खेळ निवडू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यास आवडीचे स्वातंत्र्य दिले जाते.
विद्यार्थ्यां खेळामध्ये चांगला सहभाग घेतात कारण, त्यांना त्यांचा आवडता खेळ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते.
अधिककरून विद्यार्थी फुटबॉल आणि बास्केटबॉलची निवड करतात.
उच्च कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना शाळेत काही सवलती दिल्या जातात उदाहरणार्थ प्रशिक्षणासाठी अधिक वेळ दिला जातो, आवश्यक असल्यास आर्थिक मदत दिली जाते, शाळेत उपस्थितीत सवलत दिली जाते.
क्रीडा शिक्षण मॉडेलच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसे साहित्य उपलब्ध करुन दिली जातात. विद्यार्थी - साहित्य प्रमाण साधारणत: 1/5: 1 असते जे खूप चांगले आहे.
क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ किंवा उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.
- या शाळांमधील क्रीडा शिक्षण मॉडेल व्यतिरिक्त शालेय वेळापत्रकात देखील शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. ज्यामध्ये योग, फिटनेस, तायक्वांदो इ. उपक्रम घेतले जातात
विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकण्याचे आणि निवडण्याचे स्वातंत्र्य मिळण्याचा पर्याय आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र कोच हे क्रीडा शिक्षण मॉडेलचे वैशिष्ट्य आहे.
युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शारीरिक शिक्षण आणि खेळांसाठी आठवड्यातून किमान 120 मिनिटे असावीत. परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणार्या शाळेमध्ये आठवड्यातून 450 मिनिटे शारीरिक शिक्षण आणि खेळासाठी दिले जातात. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत आणि क्रीडा शिक्षण मॉडेलची अंमलबजावणी करणार्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी 90 मिनिटे हालचाली करतात हे अतिशय सकारात्मक आहे. शारीरिक शिक्षण या विषयाची प्रत्यक्ष शाळेतील परिस्थिती पाहिल्यानंतर अथवा ऐकल्यानंतर मनामध्ये निराशाजनक भावना येतात परंतु क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर निश्चितच प्रेरणादायी आणि सकारात्मक भावना माझ्या मनात निर्माण झाल्या होत्या. तोच अनुभव शारीरिक शिक्षण क्षेत्रातील सर्वांना यावा हाच हा ब्लॉग लिहिण्याचा उद्देश आहे. क्रीडा शिक्षण मॉडेल राबविणाऱ्या शाळांचाही काही मर्यादा असतीलही तरीसुद्धा वरील बाबींचा विचार करता क्रीडा शिक्षण मॉडेल हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच यशस्वी मॉडेल आहे असे म्हणता येईल. असे प्रयोग इतर शाळेतही सुरू होतील अशी आशा.
शरद आहेर
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे