शारीरिक शिक्षण तासातील वेळेचे गणित
असे म्हणतात की, विद्यार्थी शारीरिक शिक्षण तासापेक्षा मधल्या सुट्टीत अधिक मनसोक्त आणि आनंदाने खेळतात. मधली सुट्टी आणि शारीरिक शिक्षणाचा तास हे दोन प्रसंग डोळ्यासमोर आणले तर लक्षात येते की, मधल्या सुट्टी मध्ये विद्यार्थी मिळेल त्या साहित्यात वेळ न दवडता मित्रांसोबत खेळताना दिसतात. याउलट शारीरिक शिक्षणाच्या तासामध्ये सर्वसाधारणपणे पुढील चित्र दिसते. ओळीने मैदानावर येणे, शिक्षकांच्या सूचना ऐकणे, प्रास्ताविक हालचाली करणे, गट करणे, साहित्याची वाट पाहणे, कौशल्य सराव अथवा खेळ खेळणे आणि ओळीने वर्गात जाणे. अशा पद्धतीने शारीरिक शिक्षणाचा 30 मिनिटाच्या तासामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुदृढता/कौशल्य सराव अथवा खेळण्यास किती वेळ मिळतो ? याचा आढावा या लेखात घेऊ या
शारीरिक शिक्षणाचा तास हा विविध भागांमध्ये विभागलेला असतो. आयोजन कालावधी (Management time), सूचना कालावधी (Instruction time), शैक्षणिक अध्ययन कालावधी (Academic Learning time) आणि प्रतीक्षा कालावधी.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुदृढता/कौशल्य सराव अथवा खेळण्यास मिळणारा वेळ यास शैक्षणिक अध्ययन कालावधी (Academic learning Time)असे म्हणतात. हे सर्व भाग शारीरिक शिक्षण तासामध्ये अनिवार्य असले तरी कोणत्या भागाला अधिक वेळ मिळाला पाहिजे याबद्दल शारीरिक शिक्षण शिक्षकाने सजग राहायला हवे.
यासंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सर्वेक्षण झालेले आहेत त्यांचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.
- एका सर्वेक्षणानुसार आठवड्याला एका वर्गाला शारीरिक शिक्षणाचे तीन तास मिळत असतील तर वर्षाला एकूण ३२४० मिनिटे मिळतात. त्यामधील सूचना कालावधी, साहित्य देवाण-घेवाण, गट करणे आणि इतर कार्य या सर्व गोष्टींसाठी दिला जाणारा वेळ सोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य अध्ययनासाठी केवळ १४५८ मिनिटे म्हणजे वर्षाला २४.३ तास मिळतात.
- परदेशात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार विद्यार्थ्यांचा शारीरिक शिक्षण तासातील अध्ययन काळ हा केवळ २० % आहे, प्रतीक्षा कालावधी १९ % आहे, प्रास्ताविक हालचालींसाठी १४.७ इतका वेळ दिला जातो आणि स्थित्यंतर कालावधी १९ % आहेे .
- भारतामध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रत्यक्ष कौशल्य अध्ययनासाठी ३०.३६ % इतका वेळ दिला जातो.
- ज्याप्रमाणे विद्यार्थी मधल्या सुट्टीत, शाळा भरण्याअगोदर किंवा गल्लीबोळात विविध मॉडिफाइड साहित्याच्या सहाय्याने मित्रांबरोबर खेळत असतात त्याच प्रमाणे शारीरिक शिक्षण तासात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी वाढविण्यासाठी काही मॉडिफाइड साहित्य विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करणे.
- शारीरिक शिक्षण तासातील कौशल्य सराव, उपक्रम किंवा खेळ ही छोट्या गटात घेणे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळतील. कारण मोठ्या गटात उपक्रम घेतल्यानंतर स्ता ज्या विद्यार्थ्यांचा कौशल्य स्तर चांगला आहे हे ती विद्यार्थीच जास्त संधी घेतात आणि कमी कौशल्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा छोट्या गटात उपक्रम घ्यावी.
- विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अध्ययन कालावधी अधिक मिळण्यासाठी शिक्षकाचे नियोजन अत्यंत काटेकोर असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनी त्यांचा सूचना कालावधी कमीत कमी ठेवावा.
- शारीरिक शिक्षण पाठातील नियम आणि शिष्टाचार (शारीरिक शिक्षण तासाला मैदानावर येणे आणि जाणे, साहित्य देवान-घेवान, स्टार्ट आणि स्टॉप सिग्नल इ.) वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सांगितले आणि त्याचा सराव करून घेतल्यासशैक्षणिक अध्ययन कालावधी वाढण्यास मदत होते असे संशोधनावरून सिद्ध झालेले आहे.
- काही अनावश्यक औपचारिकता (लाईन करणे, सर्कल करणे इ ) शारीरिक शिक्षण तासातून कमी कराव्या.
- Graham George (2001). Teaching Children Physical Education. P.No. 17
- Jonathan Osbert Ayi Ammah (1998). Academic Learning Time In Physical Education In Ghana - A Descriptive Analytic Study