व्याकरण ते अंतःकरण !!!
उस्मनाबाद जिल्ह्यातील चिंचपूर या छोट्याशा गावातील अन्सार शेख सर हे हिंदी विषयाचे शिक्षक. परंतु शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कबड्डी खेळलेले असल्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कबड्डी विषयाचे प्रेम होतेच. दिवसभर शाळेमध्ये हिंदी विषयाचे अध्यापन झाल्यानंतर अन्सार सर सायंकाळी 7 ते 9 कबड्डीच्या मैदानावर येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागले. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि मुलांबरोबर मुलीही सरावाला येऊ लागल्या. सरांच्या मार्गदर्शनाखाली 14,16 आणि 17 वर्षाखालील मुल व मुलींचे संघ जिल्हा आणि राज्यस्तरावर चांगले कार्यमान करून लक्ष वेधून लागले. मैदानावर येणार्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगले नसल्यामुळे बाहेरगावी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी सर्व खर्च अन्सार सर स्वतः करतात. ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे महत्व पटवून देऊन त्यात मिळणाऱ्या संधी काय काय आहेत याची विशेष माहिती करून देण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी असतो. आत्तापर्यंत सरांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले तर एक मुलगी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाली. या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर कदाचित विशेष काही वाटणार नाही परंतु, ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि हे विद्यार्थीही खेळतात ते कुठल्याही संख्याशास्त्रीय विश्लेषणा पलिकडचे आहे असे वाटते. कारण, शाळेत बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील,बिगारी कामगार,ऊसतोड कामगारांची आहेत. त्यामुळे त्यांचे आई वडील सहसा कामानिमित्त जास्त वेळ बाहेरच असतात,त्यामुळे ही मुलं आजी, आजोबा किंवा नातेवाईकांकडे असतात. परिणामी घरी लक्ष द्यायला कुणी नसल्यामुळे मुल वाईट मार्गाला किंवा इतर ठिकाणी भटकू नयेत म्हणून शेख सर विशेष लक्ष देतात. वेळप्रसंगी त्यांचा अभ्यास घेणे, आर्थिक मदत करणे ही कामे सर करताना दिसून येतात.त्यांच्या या कार्यात त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांची मदत नेहमी असते,क्लासमेंट्स नावाचा माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप सरांकडे जमेल तेवढे पैसे देऊन सरांच्या कार्याला हातभार लावतात.गावातील सर्व क्षेत्रातील व्यक्तीसुद्धा त्यांच्या कामात सहकार्य करतात.
या विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीच्या मैदानावरच स्पर्धा करावी लागत नसून जीवनाच्या मैदानावरही त्यांना दररोज स्पर्धा करावी लागते. आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांना भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शन असते ते अन्सार सरांचे.
अन्सार सर विद्यार्थ्यांना केवळ कबड्डीचेच धडे देत नाही तर ज्याप्रमाणे हिंदी चे व्याकरण सुधारण्यासाठी वर्गामध्ये प्रयत्न करतात तसेच विद्यार्थ्यांचे अंतकरण सुधारण्यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करतात. त्यासाठी सरांनी घरामध्येच छोटे ग्रंथालय सुरू केले आहेत. या ग्रंथालयात विविध प्रेरणादायी पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला सर आवर्जून पुस्तक भेट म्हणून देतात आणि विद्यार्थ्यांना अवांतर वाचनास प्रेरित करतात. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी विविध विषयावर लेखन तसेच कविता करू लागले आहे.
हे सगळे कार्य करण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे किंवा तुम्ही हे का करता? या प्रश्नावर सर म्हणाले की "कबड्डी हे माझे पॅशन आहे आणि कबड्डीच्या मैदानावर मला आनंद मिळतो जो मला इतर कुठेही मिळत नाही" म्हणून मी हे सर्व कार्य करतो. "आपल्याला काय पाहिजे ते पाहू नका, मुलांना काय पाहिजे ते ओळखा आणि त्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करा"असे सरांचे नेहमी म्हणणे असते.
असे म्हणतात की, " शिक्षक हुशार असण्याबरोबरच संवेदनशील आणि उत्तरदायी असनंच जास्त महत्त्वाचे आहे" या वाक्याचा प्रत्यय सरांच्या कार्याकडे पाहून येतो. समाजामध्ये आत्मकेंद्रीपणा वाढत असताना अन्सार सरांसारखे शिक्षक इतर शिक्षकांना अंतर्मुख आणि प्रेरित करतात. सरांच्या या कार्याला सलाम!!!
नाव - अन्सार शेख
मो. 9657584171
लेखन
युवराज देवकर : ७७७४८०११७६
शरद आहेर : ९८९००२५२६६