Saturday, December 26, 2020
विद्यार्थी केंद्रित शारीरिक शिक्षणाच्या दिशेने
Wednesday, December 16, 2020
शारीरिक साक्षरता काळाची गरज !!!
साक्षरता म्हणजे वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता. भारतामध्ये साक्षरता यावर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य झालेले आहे आणि चालू आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न होताना दिसत आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये अक्षर (Alphabetical) आणि संख्यात्मक (Numarical) साक्षरतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. परंतु, या साक्षर ते बरोबरच आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शारीरिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे हे सध्या करोना महामारीमुळे प्रकर्षाने जाणवत आहे.
शारीरिक साक्षरता म्हणजे काय?
"आयुष्यभरासाठी शारीरिक सक्रिय राहण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता, ज्ञान आणि समज असणे म्हणजे शारीरिक साक्षरता " केवळ व्यायाम करणे किंवा एखादा खेळ खेळणे म्हणजे शारीरिक साक्षरता नसून एखादा खेळ, उपक्रम किंवा व्यायाम करण्याची क्षमता असणे, व्यायाम, किंवा उपक्रम आत्मविश्वासाने करणे, जे व्यायाम किंवा उपक्रम करतो आहोत त्यासंबंधी ज्ञान आणि समज असणे, व्यायाम, उपक्रम किंवा खेळ खेळण्याची प्रेरणा असणे हे चारही घटक शारीरिक साक्षरतेसाठी महत्त्वाचे आहेत. कारण, हे चारही घटक आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य व्यक्ती व्यायाम अथवा उपक्रम करतो त्यावेळी त्या उपक्रमा बद्दलचे ज्ञान, समज फारशी लक्षात घेत नाही. म्हणजे एखादा व्यायाम का करावा? कसा करावा? किती करावा? त्याचे फायदे -तोटे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या जात नाही. त्यामुळे कालांतराने इजा होणे, थकवा जाणवणे किंवा अपेक्षित परिणाम न मिळणे यासारखे अनुभव येतात आणि परिणामी व्यायामात खंड पडतो आणि बंद पडतो. म्हणून, व्यायाम/उपक्रम करण्याची केवळ क्षमता असून उपयोग नाही तर त्या व्यायामाचे/उपक्रमाचे शास्त्रीय ज्ञान आणि समज असणे महत्वाचे आहे. क्षमता, ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रेरणा हे वेगवेगळे घटक असूनही त्यांचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे. यातील एकाही घटकाची कमतरता शारीरिक साक्षरतेत बाधा आणू शकते. शारीरिक साक्षरता विकसित करणे म्हणजे हालचालीचा आनंद घेता येणे, आत्मविश्वासाने आणि मुक्तपणे हालचाली करता येणे, हालचाल कशी करायची आणि आपण का हालचाल केली पाहिजे हे जाणून घेणे आणि शारीरिक उपक्रमात सर्जनशील असणे. शारीरिक साक्षरता ही केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा खेळाडूंसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी आहे. शारीरिक साक्षरतेत तरुण-वयोवृद्ध, श्री-पुरुष, खेळाडू-खेळाडू नसलेले अशा प्रत्येकाचा समावेश आहे किंबहुना प्रत्येकाची ती गरज आहे. शारीरिक साक्षरता हा एक प्रवास आहे. तो कोणत्याही वयात सुरू करता येतो आणि आयुष्यभर चालू असतो. त्यामुळे शारीरिक साक्षर होण्यासाठी कोणतेही वयाची अट नाही. शारीरिक साक्षरता हि गुण (Marks) किंवा स्पर्धा (Competition) यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण, बरेच खेळाडू जोपर्यंत स्पर्धामद्धे सहभागी होतात तोपर्यंतच खेळाचा सराव करतात आणि स्पर्धा संपल्या कि, सराव थांबवितात. शारीरिक साक्षरतेसाठी अशाप्रकारे पार्ट टाईम कार्य अपेक्षित नाही. कारण, आरोग्य किंवा सुदृढता हि राखून, साचून (store) ठेऊ शकत नाही. संशोधनात असेही दिसून आले आहे की, शारीरिक साक्षरतेशिवाय व्यक्ती शारीरिक उपक्रम आणि खेळातून माघार घेऊ शकतात. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अधिक निष्क्रियता आणि अस्वास्थ्य येते.
शारीरिक साक्षरतेचा विकास आणि प्रसार होण्यासाठी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे
शारीरिक साक्षरतेचा पाया
कोणत्याही विषयाच्या अथवा क्षेत्राच्या काही मूलभूत (Fundamantals) गोष्टी असतात, तत्त्वे असतात त्याचप्रमाणे विविध खेळांची/उपक्रमांची सुद्धा काही मूलभूत कौशल्य आहेत. ज्याप्रमाणे मराठी भाषा ही मुळाक्षरंवर आधारलेली आहे, तर इंग्रजी भाषा ही A to Z या अल्फाबेट वर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे खेळामधील मूलभूत कौशल्य म्हणजे सर्व खेळांचा,उपक्रमांचा व हालचालींचा पाया आहे. चालणे, धावणे, उड्या मारणे, लंगडी घालने, थ्रोइंग, कॅचींग, कीकिंग, पुलिंग, पुशिंग, बेंडींग ही सर्व मूलभूत कौशल्य म्हणजे शारीरिक साक्षरतेची बाराखडी म्हणजेच पाया आहे. कुठल्याही विषयात प्रगती साधायची असेल तर त्या विषयाचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. वर्ष २ ते ७ हा कालखंड मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. २ ते ७ या कालखंडात मूलभूत कौशल्यांचा विकास जितका चांगला होईल तितके आयुष्यभर सक्रिय राहण्याची शक्यता वाढते, विविध उपक्रम करण्याची क्षमता येते त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे शारीरिक साक्षरतेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी मुलभूत कौशल्य शिकणे अत्यावश्यक आहे.
मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळांचे महत्व
शाळेमधील मधल्या सुट्टीचे निरीक्षण केले असता विद्यार्थी आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर आनंदाने आणि मनसोक्तपणे मनोरंजनात्मक आणि मॉडिफाइड खेळ खेळत असतात. परंतु असे खेळ बालपणाबरोबरच लुप्त पावतात. सर्वसाधारणपणे आपल्या समाजामध्ये खेळांकडे स्पर्धात्मक दृष्टिकोनातूनच बघितले जाते. परंतु, आनंदासाठी खेळ असा दृष्टिकोन निर्माण होणे ही काळाची गरज आहे. कारण, व्यक्तीला एखादा शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळत असताना आनंद मिळत असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर शारीरिक उपक्रम किंवा खेळ खेळते. समाजामध्ये मुख्य खेळांना (Major Games) अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजे ज्याचे विशिष्ट नियम असतात, वेगवेगळ्या स्तरावर ज्या खेळाच्या स्पर्धा होतात असे खेळ. परंतु असंरचित खेळ (Unstructured Games), मॉडिफाइड खेळ सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. ज्याचे विशिष्ट असे नियम नसतात किंवा वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धाही होत नाही. परंतू, गल्ली बोळांमद्धे,सोसायट्यांमद्धे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये मुक्तपणे अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात आणि त्यांचा आनंद लुटत असतात. उदा. विटी दांडू, लगोरी इ तसेच विविध खेळ, नृत्य प्रकार वेगवेगळ्या भागात केले जातात. नृत्य हा सुद्धा अनेक व्यक्तींचा आवडता शारीरिक उपक्रम आहे. शारीरिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून असे खेळ महत्त्वाचे आहेत. असे आंतरराष्ट्रिय मार्गदर्शक गोपीचंद यांनी म्हटले आहे.
शारीरिक शिक्षण शिक्षक आणि पालकांची जबाबदारी
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध शारीरिक उपक्रम आणि खेळाची ओळख आणि त्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी त्यामधून त्यांना जे आवडते उपक्रम किंवा खेळ आवडतील ते आयुष्यभर खेळू शकतील. कारण, सर्वांना एकच शारीरिक उपक्रम आवडतो असे नाही तर प्रत्येकाची आवड-निवड, क्षमता वेगळी असते. उदा. चालणे, योगासन, ट्रेकिंग, सायकलिंग, स्विमिंग वेगवेगळे खेळ खेळणे इत्यादी. तसेच शिक्षकांनी व पालकांनी आपल्या आवडी-निवडी विद्यार्थ्यांवर लादू नये. अन्यथा विद्यार्थी त्या उपक्रमाचा आनंद घेऊ शकणार नाही. त्यामुळे बालवयात विविध शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचीही जबाबदारी आहे.आणि आयुष्यभर शारीरिक सक्रिय राहण्यासाठीचा तोच पाया आहे.जेव्हा पालक बालपणात हालचाली करण्यास प्रोत्साहित करतात तेव्हा शारीरिक साक्षरता सुरू होते
सर्वसाधारणपणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयांमध्ये अडचणी येतात अशा विषयाचे विद्यार्थी विशेष क्लासेस लावतात परंतु, सध्या खेळामध्ये जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना विशेष क्लास लावले जातात आणि त्यांच्यावर अधिक लक्ष दिले जाते. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना शारीरिक उपक्रम करताना अडचणी येतात, त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा नसते अशा विद्यार्थ्यांना विशेष क्लासेसची आणि अधिक लक्ष देण्याची गरज असते. विद्यार्थ्याच्या मनात शारीरिक उपक्रमाबद्दल भीती असेल तर तो आयुष्यभर त्यात भाग घेणार नाही. म्हणून शारीरिक उपक्रम करताना आत्मविश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक साक्षरता हा वैयक्तिक आजीवन प्रवास आहे. शारीरिक साक्षरतेकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहणे आणि कृती करणे भविष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरेल.
शरद आहेर
सहयोगी प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे
मो. 9890025266
'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'
भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER) नुकताच ...

-
शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजे ही जागतिक आरोग्य संघटनेचे अपेक्षा आणि वि...
-
युनेस्कोच्या शिक्षण विभागाने द ग्लोबल स्टेट ऑफ प्ले अशा प्रकारचा एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षणासंबंधीच...
-
भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER) नुकताच ...