मागे वळून पाहताना ........
सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्या. मी गेल्या 20 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहे. परंतु, शिक्षक म्हणून माझा जन्म एक-दोन वर्षपूर्वीच झाला असे वाटते. त्याअगोदर मी ऑफिसर, पोलिस यांची भूमिका पार पाडली शिक्षकाची नाही असे वाटते. शिक्षकाला मुलांनी खूप घाबरले पाहिजे, शिक्षकाची मुलांना भीती, धाक, दडपण वाटले पाहिजे. अशा समजुतीत माझी अनेक वर्ष गेली. ज्या शिक्षकांना विद्यार्थी खूप घाबरतात, जे शिक्षक मारतात तेच चांगले शिक्षक अशी पक्की समजूत होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये या समजुती मध्ये फरक पडत गेला तो पुढीलप्रमाणे. यामध्ये प्रथम माझा जुना दृष्टीकोण आणि समज आहे आणि त्याच्या समोर यात झालेला बदल दिलेला आहे.
- शिक्षक म्हणजे खूप शिकविणारा → शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करणारा.
- ज्याला विद्यार्थी खूप घाबरतात तो चांगला शिक्षक →ज्याला विद्यार्थी अजिबात घाबरत नाही आणि मित्रासारखे वाटतात तो चांगला शिक्षक.
- जो विद्यार्थ्यांना मारतो तो चांगला शिक्षक → जो विद्यार्थ्यांवर प्रेम करतो तो चांगला शिक्षक.
- चांगले प्रेझेन्टेशन करणारा, विद्यार्थ्यांना नोट्स लिहून देणारा →विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अनुभव देणारा, विद्यार्थ्यांशी चर्चा करणारा, स्व अध्ययनाला चालना देणारा
- केवळ पुस्तकी माहितीवर आणि अभ्यासक्रम पूर्ण करणारा →पुस्तका बाहेरील वास्तविक जीवनाशी निगडित शिकवणारा
- उत्तम बोलणारा →चांगला शिक्षक उत्तम श्रोता (Good listener) असावा
- आदेश देणारा → विद्यार्थ्यांचे मत विचारात घेणारा
- चुकल्यानंतर शिक्षा करणारा → समजून घेणारा
- वर्गात शांतता अपेक्षित करणारा → विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणारा, विद्यार्थ्यांना वर्गात मुक्त हालचालीस वाव देणारा
- घोकंपट्टीवर आणि माहितीवर (Inform) आधारित परीक्षा घेणारा → कृतीवर आधारित, सर्जनशिलतेला वाव असणारी परीक्षा घेणारा
- स्टेजवरून व्याख्यान देणारा → विद्यार्थ्यांमध्ये मिसळून चर्चा करणारा
- व्याख्यान पद्धतीचा, हुकूम पद्धतीचा पुरस्कर्ता → विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीचा पुरस्कर्ता