Monday, August 10, 2020

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

वास्तव शारीरिक शिक्षणाचे !

 

काल एका एम.फिल संशोधनाच्या सादरीकरणासाठी उपस्थित होतो. सदर संशोधन हे शाळेमधील शारीरिक शिक्षणाच्या संबंधीचे होते. त्यासाठी संशोधिकेने सातारा शहरांमधील 18 शिक्षकांचे 53 शारीरिक शिक्षण तासाचे निरीक्षण केले होते. संशोधनामधील प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे व अतिशय धक्कादायक होते. ते म्हणजे संशोधिकेने बघितलेल्या 53 शारीरिक शिक्षण तासांपैकी केवळ एक शारीरिक शिक्षणाचा तास नियोजनबद्ध असा होता ज्यामध्ये प्रास्ताविक हालचाली, कौशल्य सराव, विद्यार्थ्यांच्या चुकांची दुरुस्ती, सर्वांना सराव करता येईल इतके साहित्य होते. बाकीच्या 52 शारीरिक शिक्षण तासांमधील शिक्षकांनी कुठलेही नियोजन केलेले नव्हते, काही तासांमध्ये तर शिक्षकच चुकीचे प्रात्यक्षिक दाखवत होते, चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देत होते, तर काही पाठांमध्ये विद्यार्थी चुकीच्य पद्धतीने व्यायाम करत होते, कौशल्य सराव करत होते परंतु त्यांच्या चुकांची शिक्षक उपस्थित असूनही दुरुस्ती केली जात नव्हती, निरीक्षण केलेल्या 53 तासांपैकी बहुतांश शारीरिक शिक्षण तासांमध्ये शिक्षक केवळ कबड्डी खो-खो यासारखे खेळ घेत होते व शिक्षक केवळ पंचकार्य करत होते, त्या दरम्यान शिक्षक कुठलाही फीडबॅक देत नव्हते, काही तासांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यास काही विद्यार्थ्यांना बाजूला बसलेले गेलेले होते अशी काही प्रमुख निरीक्षणे व निष्कर्ष या संशोधनामध्ये नोंदविलेली होती. 

हे सर्व  ऐकल्यानंतर  दुःख, निराशा, संताप अशा सगळ्या भावना एकवटून आल्या होत्या. मनामध्ये एकामागून एक अशा अनेक प्रश्नांचा कलह माजलेला होता. पुस्तकांमध्ये अपेक्षित असलेला शारीरिक शिक्षणाचा तास आणि शाळांमध्ये चालू असणारे शारीरिक शिक्षण यातील तफावत प्रकर्षाने जाणवत होती.प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतक्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाचे प्रत्यक्ष शाळाशाळांमधून इतकी अनास्था का बरे असेल? हे संशोधन केवळ सातारा शहरापुरतेच मर्यादित होते परंतु शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग व इतर ठिकाणीही शाळाशाळांमधून चाललेले शारीरिक शिक्षण व अपेक्षित असणारे शारीरिक शिक्षण या मधली तफावत खूप मोठी आहे हे मान्य करावाच लागेल. हे सर्व चित्र बदलायचे असेल तर काय बरे करावे लागेल? या सर्व परिस्थितीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ? या परिस्थितीचे विश्लेषण करायचे झाले तर अनेक चर्चा रंगतीलही, परिस्थिती बदलायची वाट पाहायची की बदलण्यासाठी प्रयत्न करायचे ? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यामध्ये काहूर करत होते. त्याचवेळी महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील  प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होताआणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही  सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल.
शारीरिक शिक्षण शिक्षकांनाही याचं घटकांची आवश्यकता आहे असे वाटते!!!
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...