Friday, July 24, 2020

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले

प्रवास ध्यासाचा: कै. कॅ. शिवरामपंत दामले


कै. कॅ. शिवरामपंत दामले उर्फ शिवा काकांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे 1924 मध्ये महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, त्याचबरोबर कुस्ती, लाठी, मैदानी खेळ हे तरुणांना शिकविणे, त्यासाठी व्यायाम शाळा काढणे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व नैतिक उन्नतीसाठी सहाय्य करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शारीरिक शिक्षण हे शास्र आहे अशा छोटेसा तालमीत त्याचा विकास होणे शक्य नाही हे जाणून त्यांनी १९२४ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर कै अण्णासाहेब भोपटकर व कै केळकर यांच्या सहकार्याने  टिळक रोड येथे महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. शिवरामपंत दामले म्हणजे प्रचंड  इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी यांचा योग्य असा मिलाफ असलेलं व्यक्तिमत्व होतं. शारीरिक शिक्षण हे शास्त्र आहे व त्याचे सुसंपन्न असे महाविद्यालय आपण काढलेच पाहिजे असा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी १९३८ पासून महाविद्यालयाची परवानगी मिळविण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू केले आणि १९३८ साली सुरू केलेल्या प्रयत्नांना १९७७ मध्ये यश आले. अशा प्रकारे ३९ वर्ष त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून शारीरिक शिक्षणाचे महाविद्यालय सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांना अनंत अडचणी आल्या परंतु, त्यांनी ते डगमगले नाहीत की हरले नाहीत. कारण त्यांचा चिकाटी वरती पूर्ण विश्वास होता. 
त्यांनी काही वर्ष सैन्यामध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले कि महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजी चांगले येत नाही. मराठी तरुणांनी नेहमी उच्च ध्येय घ्यावे अशा विचाराने प्रभावित असलेले शिवरामपंत दामलेंनी इंग्रजीचे जागतिक स्तरावरील स्थान जाणून जागतिक बाजारपेठेत व सनदी लष्करी सेवेत यश प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे धाडस केले. आजही ही शाळा एक नामवंत शाळा म्हणून ओळखली जाते. त्यांच्या याच दूरदृष्टीचे फळ म्हणजे आज पोलीस,  सैन्य अशा विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रीय मंडळातील विद्यार्थी उत्तमपणे कार्य करत आहे. आज महाराष्ट्रीय मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय व शारीरिक  शिक्षणाचे महाविद्यालय असा मोठा विस्तार झालेला आहे. अशा या शैक्षणिक विस्ताराबरोबरच क्रीडा विस्तारही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. कुस्ती, मल्लखांब, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल यासारख्या देशी विदेशी खेळांचे प्रशिक्षण महाराष्ट्रीय मंडळामध्ये दिले जाते. 
आज महाराष्ट्रीय मंडळामध्ये तीन वर्षांपासून तर सत्तर वर्षांपर्यंत अनेक लोक व्यायाम करण्यासाठी व खेळण्यासाठी नियमित  येतात. महाराष्ट्रीय मंडळाने व शिवा काकांनी व्यायामाला  एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणाऱ्या आणि आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या अनेक पिढ्या शिवा काकांनी आणि महाराष्ट्रीय मंडळाने निर्माण केलेल्या आहेत. आजचा तरुण हा रगेल बनला पाहिजे, बेडर झाला पाहिजे असे शिवा काका नेहमी म्हणत. आजही टिळक रोड आणि गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या  मैदानावर  हजारो युवक युवती व्यायाम करतात, खेळतात आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रीय मंडळा मध्ये पारंपरिक व्यायाम प्रकाराबरोबरच आधुनिक व्यायाम प्रकार व क्रीडा बाबी आजच्या तरुण पिढीला शिकविल्या जातात. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ ही फक्त व्यक्ती किंवा संस्था नसून तो एक विचार आहे आणि हा विचार व्यायामाच्या माध्यमातून खेळांच्या माध्यमातून जपला जात आहे. एकीकडे सिमेंटची जंगल उभे रहात असताना महाराष्ट्रीय मंडळाने मैदानाचे संवर्धन करून समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपली कटिबद्ध सिद्ध केलेली आहे. तसेच महाराष्ट्रीय मंडळ म्हणजे नुसती व्यायाम  शाळा नव्हती तर ती एक चळवळ होती, आमचा पोरगा जगाच्या बाजारात खणखणीत नाण्यासारखा वाजला पाहिजे ही शिवा काकांची त्याच्या मागे तळमळ होती आणि त्याच्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. आज शिवरामपंत दामले हे नाव खूपच कमी लोकांना माहित असेल कारण ते प्रसिद्धीसाठी कधीही हपापलेले नव्हते. आपले ध्येय हे समाजहितासाठी जोपासणारे रामदास स्वामींचे कार्य साठवणारे निष्ठावंत कार्यकर्ते होते. शासनाची कुठलीही मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर आणि लोकांचा सहकाऱ्यांवर महाराष्ट्र मंडळ ही संस्था शिक्षण आणि व्यायामाच्या प्रचार आणि प्रसाराचे अतिशय मूलभूत आणि रचनात्मक कार्य समर्थपणे करत आहे.  शिवा काकांचे विचार पुढील काळामध्ये त्यांचे चिरंजीव कै रमेश दामले यांनी, नातू कै. धनंजय दामले व आता तिसऱ्या पिढीतील तरुण तडफदार श्री. रोहन दामले  समर्थपणे पुढे नेत आहेत. एका व्यक्तीने बघितलेले   स्वप्न, त्याची  इच्छाशक्ती व दूरदृष्टी पुढे अनेक पिढ्यांवर कशी परिणाम करते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कै. कॅ. शिवरामपंत दामले व महाराष्ट्रीय मंडळ होय.

शरद आहेर  




'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...