उत्कृष्ठतेच्या दिशेने............
काही
दिवसांपूर्वी मी महाविद्यालयीन शारीरिक
शिक्षणातील उपक्रमासंबंधी एक
सर्वेक्षण केले व त्याला महाराष्ट्रातील 60 महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रतिसाद
दिला. महाराष्ट्रातील
वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये चाललेल्या चांगल्या उपक्रमांचे संकलन करून ते
जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचविणे,
शारीरिक शिक्षणातील जे ‘अॅक्टिविस्ट’ आहेत (म्हणजे आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृती
करणारे) यांचे कार्य सर्वांसमोर आणणे, चांगल्या कामाची चर्चा घडून आणणे हा
त्यामागचा उद्देश आहे.
आजची तरुण पिढी सोशल मीडिया आणि अभ्यास यातून
मैदानवर येण्यासाठी पारंपारिक शारीरिक शिक्षणात बदल आवश्यक आहे आणि तरुण पिढीला
आकर्षित करतील असे काही प्रयत्न आपल्या आजूबाजूला चालू आहे त्यांचा प्रसार
यामध्यमातून करू या. असं म्हणतात की, “शिक्षक हुशार असण्याबरोबर,
संवेदनशील आणि उत्तरदायी असणच जास्त
महत्वाचे आहे” याचे प्रतिबिंब काही महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या विविध सामाजिक
उपक्रमातून जाणवते. एकीकडे आत्मकेंद्रीपणा वाढत असतांना विविध महाविद्यालयीन शिक्षक
आपल्या निस्वार्थीपनाच्या कक्षा रुंदावताना दिसत आहे ही बाब समाधान देऊन जाते. आजच्या
तरुण पिढीला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी
उपक्रम शक्य आहे हा आत्मविश्वास मिळतो.
महाविद्यालयीन उपक्रमांमद्धे प्रकर्षाने जाणवलेला
मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग. त्यामुळे शारीरिक शिक्षण केवळ फक्की
आणि शिट्टी, शारीरिक शिक्षण म्हणजे केवळ खेळ व स्पर्धा,
शारीरिक शिक्षण म्हणजे केवळ मैदान, यापुरतेच मर्यादित नसून काळाप्रमाणे आवश्यक बदल
करत आहे हि बाब आशादायी आहे. खेळ हे केवळ
स्पर्धेसाठी व बक्षिसांसाठी मर्यादित नसून आनंदासाठी खेळ,
उपजीविकेचे साधन अश्या नवीन आयामांची ओळख तरुण पिढीला करून द्यावी लागेल. या
सर्विक्षणातून विविध महाविद्यालयमद्धे चालू असलेले नावीन्यपूर्ण उपक्रम
पुढीलप्रमाणे
- पुण्यातील एका महाविद्यालयाने त्यांच्याच संस्थेची शाळा खेळासाठी दत्तक घेतली आहे. त्यामध्यमातून शाळेला लागणार्या सर्व सोयीसुविधा, साहित्य, प्रशिक्षक हे महाविद्यालय पुरविते
- Womanista fest या नावाने एका महाविद्यालयात फक्त मुलींसाठी वेगवेगळ्या सहा खेळांच्या ( डॉजबॉल, रस्सीखेच, रिले, कॅरम, डबल्स बॅडमिंटन, डबल्स कॅरम ) स्पर्धा आठवडाभरासाठी राबविल्या जातात.
- महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये फिटनेस ची क्रेझ लक्षात घेऊन काही महाविद्यालयांमध्ये fittest boy/ girl, obstacle race, crossfit या स्पर्धा आयोजित केल्या जातात जेणेकरून जे विद्यार्थी खेळांमध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली जाते व या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- ट्रेकिंग व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स या बद्दलही महाविद्यालयांमध्ये सध्या वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईतील एक महाविद्यालय वर्षातून किमान तीन ट्रेक आयोजित करते. तर दुसर्या महाविद्यालयात इको ट्रेक या उपक्रमांमध्ये दर वर्षी विद्यार्थ्यांना जवळपासच्या एका गडावर ट्रेकिंग करण्यासाठी घेऊन जातात. पुढील वर्षी सायकलिंग, रनिंग व ट्रायथलन असे क्लब महाविद्यालयात सुरू करण्याचा मानस आहे असे शिक्षकाने नमूद केले.
- Monson mud Fiesta या नावाने एक आठवड्याचा उपक्रम मुंबईतील महाविद्यालयात आयोजित केला जातो. यामध्ये पावसाळ्यात एका आठवड्यात पाच खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात ( Mud cricket, mud football, mud tag Rugby & tug of war)
- तंत्रज्ञानाचा उपयोग: एका महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षकाने इंस्टाग्राम पेज तयार केलेले आहे आणि व्यायाम, खेळ, प्रशिक्षण संबंधीची माहिती, उपक्रम आणि अचीवमेंट त्यावर टाकल्या जातात. तर राहुरी येथील महाविद्यालयातील शिक्षकाने तंत्रज्ञानाच्या आधारे महाविद्यालयात व्हिडिओ लायब्ररी सुरू केलेली आहे. ज्यामध्ये क्रीडा प्रशिक्षण, फिटनेस, विविध खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने, क्रीडाविषयक चित्रपट याचा अंतर्भाव आहे व त्याचा विविध विद्यार्थी आवश्यकतेनुसार लाभ घेतात व भविष्यात क्रीडाविभागाची स्वतंत्र वेबसाइट तयार करावयाची आहे जेणेकरून सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या लायब्ररीचा उपयोग होईल असा मानस व्यक्त केला. तसेच नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिति अंतेर्गत येणार्या सर्व स्पर्धाचे वेळापत्रक, निकाल, परिपत्रके, नियम, अशी सर्व आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्यासाठी एका शिक्षकाने ॲप तयार केले आहे त्याचा फायदा खेळाडू व शिक्षकांना होत आहे.
- शारीरिक शिक्षण आणि क्रीडेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन: फन फिटनेस सेंटर या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील खेळाडूं मार्फत आसपासच्या परिसरातील व शाळेतील मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते व फिटनेस करून घेतला जातो. तर दुसर्या एका महाविद्यालयात MSEB कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा सलग दोन वर्षापासून घेतल्या जात आहे. एका महाविद्यालयातील शिक्षक खेळाडूंना घेऊन तीन वर्षापासून पाणी फाउंडेशन मध्ये श्रमदान करत आहे. अनेक शिक्षक आपआपल्या गावात, परिसरात होतकरू खेळाडूंना खेळाचे विशेष प्रशिक्षण, पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण मोफत देत आहे.
- वेगळेपण: एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रिलमार्च’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येक महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम होतो व त्यामध्ये खेळाडूंना बक्षिसे दिली जातात परंतु, एका महाविद्यालयात खेळाडूंबरोबर त्यांच्या पालकांचाही सत्कार केला जातो ही अतिशय चांगली बाब आहे.
- फिट इंडिया मोहिमेअंतर्गत एका महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी प्रत्येकी दहा व्यक्तींचा शारीरिक सुदृढतेचे सर्वेक्षण करतात अशाप्रकारे एकूण २२५०० लोकांचे सर्वेक्षण करून त्यावर आधारित रिपोर्ट तयार करतात ज्यामुळे समाजात सुदृढतेविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होईल
- रायझिंग स्टार समर कॅम्प याअंतर्गत एप्रिल महिन्यामध्ये पंधरा दिवसाचा समर कॅम्प आयोजित केला जातो यामध्ये हॉर्स रायडिंग, लाठीकाठी, स्केटिंग, योगा, सेल्फ डिफेन्स, मूलभूत कौशल्य अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो.
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पंधरा दिवसांचा योग सर्टीफिकेट प्रोग्राम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो.
- एका महाविद्यालयात करके तो देखो या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना लांब उडी, उंच उडी, भालाफेक, अडथळा शर्यत, धावणे या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना यापैकी ज्या प्रकारात आवड असेल व कार्यमान असेल त्याचा वर्षभर सरावासाठी विद्यार्थ्यांना आवाहन व प्रबोधन केले जाते
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महाविद्यालयात वॉकर्स क्लब गेल्या पाच वर्षापासून चालविला जातो
- काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य, गणवेश मोफत दिला जातो तर काही महाविद्यालयात शिष्यवृत्ती दिली जाते. एका महाविद्यालयात खेळाडूंना प्रवेश फी मध्ये विशेष सवलत दिली जाते व महागडे क्रीडा साहित्य माजी विद्यार्थ्यांना, गरजू शाळांना पुरविले जाते. तर नांदेड मधील एका महाविद्यालयात गरजू खेळाडूंना राहण्याची मोफत सुविधा व डायट पुरविला जातो
- आठवड्यातून दोन दिवस स्वसंरक्षणाचे उपक्रम सर्व वर्गांना नियमितपणे घेतले जातात.
- महाविद्यालय म्हटलं म्हणजे वेगवेगळे विभाग, वेगवेगळे अभ्यासक्रम हे आलेच आणि बऱ्याच महाविद्यालयांमध्ये या वेगवेगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये, संस्था अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातात व जो विभाग अधिक गुण मिळवतो त्या विभागाला सर्वसामान्य विजेतेपद दिले जाते.
- विविध महाविद्यालयांमध्ये जागतिक ऑलिंपिक दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन, स्वछ भारत अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, जागतिक योग दिन यासारखे दिवस उत्साहात साजरे केले जातात.
शासकिय
धोरण व अभ्यासक्रम यापलीकडे जाऊन तळमळीने आणि उत्स्फूर्तपणे कार्य करणार्या ध्येयवेड्या
शिक्षकांना सल्यूट !
शरद आहेर (9890025266)
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,पुणे
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,पुणे