माझे प्रयोग!
सध्या मी बीपीएड विद्यार्थी शिक्षकांना फिटनेस आणि कंडिशनिंग शिकवत आहे. हे शिकवत असताना मी सर्वसाधारणपणे जे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अंमलबजावणी करतो. उदा. पार्टनर बरोबर करावयाचे व्यायाम. यामध्ये कोणते व्यायाम घ्यायचे हे निश्चित केलेले असते, त्याप्रमाणे ते व्यायाम प्रकार सांगतो आणि विद्यार्थी करतात. परंतु, गेल्या काही तासांमध्ये मी माझ्या या पद्धतीमध्ये काही बदल केले. एक दिवशी Hoop Activities घ्यायच्या होत्या. नियोजन केल्याप्रमाणे व्यायाम सुरू केले परंतु, काही व्यायाम घेतल्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हणालो की, Hoop बरोबर कोणत्या activities करू शकता याचा विचार करा आणि करून पहा. ही सूचना दिल्यानंतर काही विद्यार्थी एकटेच काय-काय करु शकतो याचा विचार करु लागले आणि त्याप्रमाणे कृती करू लागले तर, काही विद्यार्थी जोडीदाराबरोबर आणि गटामध्ये एकत्रितरीत्या वेगवेगळे व्यायाम विचार करून तयार करू लागली.
तोच अनुभव Partner activities घेतानाही आला. सुरुवातीला मी काही जोडीदाराबरोबर चे व्यायाम सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या जोडीदाराबरोबर कोणते व्यायाम करू शकतो याचा विचार करा व ते करून पहा अशी सूचना केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण व्यायाम प्रकार करून दाखवले.
विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले व्यायाम प्रकार कुठल्याही YouTube वरील व्हिडिओ मध्ये बघितलेले नाही किंवा कुठल्याही पुस्तकात दिलेले नाही. तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचार करून तयार केलेले व्यायाम होते. विशेष म्हणजे स्वतः तयार केलेले व्यायाम केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता. आणि मलाही माझ्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये बदल केल्यामुळे वेगळेच समाधान जाणवत होते.
Innovation, Creativity, Design thinking हे सर्व शब्द मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने अनुभवत होतो. शारीरिक शिक्षण म्हणजे म्हणजे केवळ शिक्षकाने आज्ञा देणे आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करणे एवढेच अपेक्षित नाही हेही लक्षात आले (बरेच उशिरा), तसेच नवीन पिढीला विचार करण्याची संधी दिली तर ते नाविन्यपूर्ण विचार करू शकतात याची जाणीव झाली.