शिक्षणतज्ञ महात्मा गांधी
युनेस्कोने जगभरातील 100 शिक्षण तज्ञांची चरित्रे प्रसिद्ध केली त्यामध्ये भारतामधील केवळ तीन शिक्षण तज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जे. पी. नाईक. महात्मा गांधींची शिक्षणतज्ञ म्हणून ओळख खूपच थोड्या लोकांना माहीत आहे त्यापैकीच मी एक होतो. कृतिशीलता हा महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात महत्वाचं गुणवैशिष्ट्ये.त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या स्वतः अंगीकारलेल्या होत्या त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी सांगितलेले शिक्षण विषयक विचार हे केवळ सांगितले नाही तर अशा शिक्षण विचारांवर आधारित काही प्रयोग त्यांनी केले. अशा या गांधीप्रणीत शिक्षण विषयक प्रयोगांची ओळख करून देणारे प्रा. रमेश पानसे यांचे 'नई तालीम' हे पुस्तक वाचले तेव्हा महात्मा गांधींचे शिक्षण विषयक विचार किती दूरगामी होते, सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये भेडसाव नाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे महात्मा गांधींच्या शिक्षण विषयक विचारांमध्ये आणि प्रयोगांमध्ये दडलेली आहे याची जाणीव झाली. शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहे परंतु महात्मा गांधीजींच्या 'नई तालीम' या पुस्तकामुळे विचारांना एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला व शिक्षण विषयक समज वाढली आणि ती आपणा सर्वांशी शेअर करावी म्हणून या पुस्तकातील काही ही महत्त्वाचे विचार मांडत आहे.
गांधीजींनी या 'नई तालीमच्या' शिक्षण विषयक नव्या संकल्पनेची व्याख्या 'जीवनासाठी आणि जिवनाकरवी शिक्षण' अशी केली आहे. शाळेतील जीवनात साक्षरतेचे शिक्षण होते पण जीवनाच्या शाळेत जीवन जगण्याचे शिक्षण होत असते शिक्षण हे जीवनाशी बांधलेले नसेल तर ते अपुरे शिक्षण होय अशी गांधीजींची धारणा होती. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण हे केवळ शाळा आणि पाठ्यपुस्तक केंद्रित झालेले आहे अश्यावेळी महात्मा गांधीजींनी सांगितलेली शिक्षणाची ही व्याख्या खूपच महत्त्वाची वाटते, ज्यामध्ये जीवनाचा आणि शिक्षणाचा संबंध असायला हवा त्याचबरोबर त्यांनी उद्योग आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध बांधला आणि उद्योगकेंद्री शिक्षणाचा विचार मांडला. शिक्षणाच्या केंद्रस्थानी एखादा उत्पादक हस्तोद्योग असावा त्याच्या माध्यमातून सर्व विषयांचे शिक्षण दिले जावे आणि हा हस्तोद्योग विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थिती आणि परिचित अशा वातावरणातील मुख्य उद्योग असावा. शाळेमध्ये विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल हे सर्व विषय त्या उद्योगाशी संबंधित शिकवावे. ज्यामुळे तरुण स्वावलंबी होतील. सध्याच्या काळात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या बेकार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांत्रिकीकरणामुळे नोकर्या कमी झाल्या आहेत अशावेळी महात्मा गांधीजींचा हा विचार खूपच महत्त्वाचा वाटतो. ज्ञान आणि काम हे बरोबरच चालायला हवे त्याची फारकत होता कामा नये. बुद्धी आणि श्रम यांची फारकत करण्यात आल्यामुळेच खेडे गावांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सध्याच्याा शिक्षण पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे व्यक्तीची पहिले २० ते २२ वर्ष ज्ञान घेण्यासाठी जातात आणि त्यानंतर ती व्यक्ती कामाच्या शोधात बाहेर पडते असे दोन वेगवेगळे टप्पे गांधीजींना मान्य नव्हते. सर्व शिक्षण प्रक्रिया हीच मुळी करून शिकण्याची श्रम केंद्री अशी झाली पाहिजे. माणूस जे काही काम करीत असतो त्यातच त्याचे स्वतःचे शिक्षणही होत असते..साक्षर शिक्षणाचे अतिरेकी महत्त्व कमी करून त्याने रिकामी केलेली जागा कला शिक्षणाला, क्रीडा शिक्षणाला देण्याची अनिवार्य गरज आहे. शिक्षण हे मातृभाषेमधूनच द्यायला हवे, इंग्रजी शिक्षणाचे जोखड मानेवर आहे तोवर स्वराज्य अशक्य आहे हे गांधीजी ठामपणे बजावतात.
विविध विषयांतील उपलब्ध असलेले ज्ञान मुलांपर्यंत कसे पोचवावे याचा विचार पारंपारिक शिक्षण पद्धतीत अभिप्रेत असतो, विद्यार्थ्यांच्या अंगाने अभ्यासक्रमाचा विचार होत नाही हा सध्याच्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे.
• जोपर्यंत मुलांच्या आणि शिक्षकांच्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात स्वच्छता व आरोग्य यांचा पाया बळकट केला जात नाही तोवर त्यावर शिक्षणाची इमारत उभी राहणार नाही हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमात आरोग्य शिक्षणाला प्रमुख स्थान द्यावे. जोवर स्वतः शिक्षकच शरीराने आणि मनाने निरोगी होत नाही, आरोग्याचे नियम स्वतः पाळत नाहीत तोवर ते भावी पिढीला शिकवू शकणार नाहीत.
• एक मुल ही एक परिपूर्ण गोष्ट आहे मूल अपूर्ण आहे असे मानून त्याला पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा आटापिटा असेल तर ते खरे शिक्षण नव्हे नव्हे. त्यामुळे आमच्या जवळच्या बाबी त्यांच्या मेंदूत ठासून भरण्याची जरुरी नाही असे नेहमीच मानले जाते की मुलांना घडविणे हे आपले काम आहे पण मुले घडलेली असतात.
• शिक्षण ही जास्तीत जास्त घेण्याची वस्तू आहे आणि कमीत कमी देण्याची वस्तू आहे जिथे शिक्षण द्यायचे आहे तेथे ते कमीत कमी दिले पाहिजे जास्तीत जास्त घेऊ दिले पाहिजे.
दुर्दैवाने अनेक सरकारे आले आणि गेली परंतु महात्मा गांधींच्या शिक्षणविचारांना मूर्त स्वरूप येऊ शकले नाही.भविष्यात हे विचार प्रतक्षात उतरतील अशी अपेक्षा करू या!!!